विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 20 June 2019

भारतातील एल-डोराडो : यादवांची देवगिरी

आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची





भारतातील एल-डोराडो : यादवांची देवगिरी
#दुर्गजागर_2
#इतिहास_अपरिचीत_मराठवाड्याचा
ते तो कुंडलिनीयेचा टेंभा
अंधारी केला उभा ।
तया चोजविले प्रभा
निमथावरी ।।
----------------- ज्ञानेश्वरी,अध्याय 12(50)
दुर्गातील एक अतिशय मजबूत आणि संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा भाग म्हणजे अंधारी.आणि त्या अंधारीच्या निरीक्षणाबाबत संत ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवलेली ही ओवी.
महाराष्ट्रात अनेक स्वकीय-परकीय सत्ता नांदल्या.शिवछत्रपतींच्या रयतेच्या स्वराज्यापासून ते औरंगजेबासारख्या कट्टर धर्माभिमानी पातशाहाच्या सत्तेचे दर्शन या स्थायिक लोकांनी केले.पण,शिवरायांच्या आधीही या भुमीवर वैभव नांदत होते,आणि तो काळ होता,देवगिरीच्या यादवांचा..!!
नाशिक जवळ असणाऱ्या सेउनदेशाच्या यादवकुलात जन्म घेतलेल्या पाचव्या भिल्लम याने देवगिरी ही आपली राजधानी स्थापन केली.भिल्लम,जैत्रपाल,सिंघन,महादेव,रामचंद्र,शंकरदेव आणि हरपालदेव या मोठ्या पराक्रमी,स्वातंत्रप्रिय,धर्मनिष्ठ,रसिक आणि विद्वत्तेची बुज राखणाऱ्या राजांनी राजकारणाची सूत्रे येथूनच हलवली.
संत ज्ञानेश्वर यांनी रचलेल्या अजून एका ओवीमधे म्हणतात,
‘तेथ यदुवंश विलासु ।
जो सकलकला निवासु ।
न्यायाते पोखिता क्षितिजु ।
श्रीरामचंद्रु ।।’
या गडाचे यादवांच्या काळात 2 भाग होते.वरील डोंगराळ म्हणजे गडाचा मुख्य भाग आणि खाली पसरलेल्या तटबंदीला नाव दिले होते,’कटक’..येथेच सोन्यामोत्यांचे बाजार भरले जाई.सैनिकांचाही तळ याच भागात असे.
पुढे अल्लाउद्दीन ख़िलजी याने या भागावर आक्रमण केले.यादवांनी शूरपणे लढा दिला पण ऐन मोक्याला लढाईचे पारडे फिरले.खरेतर या लढाईविषयी समकालीन आणि काही त्यानंतर केलेल्या नोंदी आहेत पण प्रत्येकाची भाषा वेगवेगळी आहे.या सर्वांमधे फरिश्ता,बर्नी,इब्नबतूता,एसामि यांची माहिती विश्वासार्ह मानली जाते.
पुढे काही काळाने दिल्लीमधे राजपदासाठी बंडाळी निर्माण झाली.त्याचा फायदा घेत हरपालदेव याने देवगिरी भागात उठाव केला.मुसलमान अधिकार्यास हाकलून लावले.पण दिल्लीहुन आलेल्या खुश्रुखान समोर मात्र हरपालदेव पराभूत झाला.त्याचा अमानुष वध केल्या गेला.देवगिरीचे वैभव,स्वातंत्र्य आणि संस्कृति टिकावी म्हणून जीवापाड प्रयत्न करणारा हा शेवटचा योद्धा होता.
यानंतर मात्र देवगिरी मधे फार मोठ्या प्रमाणावर धार्मिक,सांस्कृतिक बदल झाले.कित्येक मंदिरे परकीय आक्रमकांनी पाडली.देवगिरीचे नाव बदलून कुटुबाबाद ठेवले.आणि या घटनेचे स्मरण म्हणून नाणीही पाडन्यात आली.
पुढे मुहम्मद तुघलक याने तर आपली राजधानीच दिल्लीहुन या दुर्गम दुर्गावर हलवली.नागरिकांनी दिल्ली सोडावी म्हणून त्याने केलेल्या अत्याचारांच्या नोंदी वाचल्यास भयान दृश्य नजरेसमोर उभे राहते.एका आंधळ्या माणसाने दिल्ली सोडण्यास नकार दिला तर त्याला देवगिरी पर्यंत फरफटत आणले.इब्नबतूता,लेनपुल यांनी त्यावेळेस मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नोंदी ठेवल्या होत्या.राजधानी हलवन्याचा त्याचा विचार मूर्खपणाचा ठरला आणि इतिहासाने त्याची नोंद ‘वेडा तुघलक’ अशी केली.
खरेतर,एका बाजूने विचार केल्यास त्याचा निर्णय योग्यही वाटेल.बरानी म्हणून एक फ़ारसी इतिहासकार होता.त्याने त्याच्या नजरेत आलेली एक साधी गोष्ट लिहून ठेवली.
दिल्ली,गुजरात,लखनऊ,तेलंगन या ठिकानाहुन देवगिरी सरख्याच अंतरावर (1500km) आहे.
दक्षिण भारताच्या मोक्याच्या जागेवर असणारा हा किल्ला,अतिशय विस्तीर्ण प्रदेशावर नियंत्रण ठेऊ शकतो.तसेच,दिल्ली इतकीच भव्य ही राजधानी होऊ शकली असती,पण उत्तरेत असणारे दिल्लीचे महत्त्व आणि सतत होणाऱ्या परकीय आक्रमानांमुळे त्याचा हा निर्णय मात्र चुकीचा ठरला.त्याच्याच काळात ‘देवगिरी’ चे नामकरण झाले ‘कूवत-उल-इस्लाम’..!!
यादव,ख़िलजी,तुघलक,बहमनी,निजामशाही,मुघल,मराठे आणि हैदराबादचा निजाम एवढ्या सत्तांनी देवगिरीवरून कारभार हाकला.
या किल्ल्यांवर राहिलेल्या मातब्बर मंडळींपैकी मुहम्मद तुघलक,मालिक अंबर,फत्तेखान,हसन गंगू बहमनी,हुसेनशहा,खानझमान,शाहिस्तेखान,शाहजहान,औरंगजेब आणि त्याचा पुत्र अकबर,निज़ामशाह ही काही मुस्लिम सत्ताधीश होते.
राजकीय कैद्यांच्या बाबतही या किल्ल्याचा इतिहास मोठा आहे.काकतीय राजा गणपती,निजामुद्दीन,मूर्तझा निज़ामशाह,त्याची आई खुँजा सुलतान,मुलगा हुसेन,मीर जुमला,अबुलहसन तानशाह आणि शेवटचा आदिलशाह….
तसेच,शंभूछत्रपती यांच्या पत्नी महारानी येसूबाई राणी साहेब आणि त्यांचे पुत्र थोरले शाहू छत्रपती यांनाही येथे काही काळ चीनी महालात ठेवण्यात आले होते.
ज्यांच्या पूर्वजांनी या किल्ल्यावर राहून शासन केले,त्यांच्याच वधाने ही पावन भूमी मात्र दुर्भागी झाली.हरपालदेव याचा झालेला शिरच्छेद,त्याच्या देहाची केलेली विटंबना आणि लखुजी जाधवराव,त्यांचे पुत्र अचलोजी,रघोजी आणि यशवंतराव यांची भरदरबारात केलेली हत्या..
केवळ यदुवंशीयच नव्हे,तर अनेक महत्वाच्या मुस्लिम अधिकार्यांनाही मरण याच किल्ल्यावर आले.यामधे,झीन बंडा,पिसार थानेसरी (दिल्लीचे अधिपती),मूर्तझा निज़ामशाह ही काही महत्वाची नावे..
इब्नबतूता,फरिश्ता,बर्नी,एसामि,वस्साफ,लाहोटी,थेवनोट,ट्रावेर्निअर,स्टुअर्ट पिगोर्ट आणि सिडने टॉय या प्रवाशांनी देवगिरीच्या पुराणकाळातील इतिहासाला आपल्या लेखणीने जिवंत ठेवले आहे.
कोलंबिया मधे एक दंतकथा आहे. “एल-डोराडो” नावाच्या सुवर्ण साम्राज्याची..त्या धर्तीवर त्या प्रवासवर्णन लिहिणाऱ्या लोकांनी देवगिरीला त्या कल्पित साम्राज्याची उपमा दिली.यावरूनच आपल्याला देवगिरी साम्राज्याच्या वैभवाची आणि भवयतेची कल्पना येते..!!
या किल्ल्याच्या स्थापत्यावर इयत्ता चौथीमधे आम्हाला एक धडा होता,ह्यामधे सहलीच्या माध्यमातून गडाच्या विविध भागाची माहिती दिली होती.तेव्हापासून या किल्ल्याचे आकर्षण आहे.किल्ल्याच्या रचनेपेक्षा त्याच्या राजनैतिक कालखंडाकडे सर्रास कुणाचे लक्ष जात नाही,म्हणून ही पोस्ट केवळ त्या भागाला समर्पित..!!
दुर्गमाती दुर्गम..
किल्ले देवगिरी..!!
©आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची
फोटो :
1 - दुर्ग देवगिरी
2 - Hessel Gerritzs यांनी lake parima या एल डोराडो या कल्पित कहानीतील तलावाचा तयार केलेला 1625 चा नकाशा
3 - 17व्या शतकाच्या अखेरीस काढलेले अल्लाउद्दीन ख़िलजी चे छायाचित्र
4 - अल्लाउद्दीन ख़िलजीचे देवनागरी लिपीमधे पाडलेले नाणे
(देवनागरी मधे ‘अलाउदीन’ लिहीले आहे)
5 - 19व्या शतकाच्या अखेरीस इजिप्त मधे प्रदर्शित झालेले ‘इब्नबतूता’ याचे पेंटींग.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...