विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 18 June 2019

।।तारापुरचा रणसंग्राम।।


।।तारापुरचा रणसंग्राम।।
१६ व्या शतकाच्या आरंभी पोर्तुगीज सत्ता हात पसरवत होती आणि शतकाच्या अखेरीस जवळपास दमण ते गोवा हा भारताचा पश्चिम किनारा पोर्तुगीज राजवटी खाली आला होता. या प्रदेशाच्या संरक्षणार्थ बरेच किल्ले बांधण्यात आले. त्यापैकीच तारापुरचा किल्ला.
तारापुर हे गाव व्यापारीदृष्टया भरभराटीचे होते. कारण येथून लाकडाचा, तांदळाचा व्यापार गलबताने मोठ्या प्रमाणावर चालत असे.
इ.स.१५५९ मधे हबशांनी तारापुरावर हल्ला केला होता. पण तो असफल ठरला. तसेच इ.स.१५८२ मधे मोंगल सरदारांनी देखील तारापुर जिंकण्याचा प्रयत्न केला होता. तो देखील अयशस्वी ठरला.
दरम्यान भारताचा व्हाईसरॉय असलेला Matias de Albuquerque (कारकीर्द १५९१-१५९५)याने इ.स.१५९३ साली तारापुर येथे भक्कम किल्ला बांधण्यात यावा असा आदेश दिला. त्यानुसार १५९३साली किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले. सम्पूर्ण किल्ला १५९५साली बांधूंन पूर्ण झाला व् पोर्तुगीज अमलाखाली असलेल्या तारापुर किल्ल्याचा पहिला किल्लेदार होता Diogo de couto.
या काळात पोर्तुगीजांनी या भागात चांगलच वर्चस्व प्रस्थापित केलं होतं आणि आपल्या या वर्चस्वाचा फायदा त्यांनी धर्मप्रसारासाठी केला. बऱ्याच भुमिपुत्रांना बाटवण्यात आले, हिंदूंची देवालये पाडली गेली, बऱ्याच जणांना मृत्युदंड देखील ठोठावण्यात आला.
अशा या धुमश्चक्रीमध्ये, भिवंडीच्या गंगाजी नाईक यांनी आपल्या कुटुंबासहित थोडेसे सैन्य घेऊन पोर्तुगीजांना हाकलुन लावण्यास सतत २० वर्षे लढ़ा दिला. पण हे थोड्याशा सैन्यानी लढुन साध्य होणार नाही याची जाणीव नाइकाना होती. याकरता ते सतत पेशव्यांशी सम्बंध ठेवून होते. स्थायिक हिंदुंवर होत असलेले मानसिक तसेच शारीरिक अत्याचार त्यांनी पेशव्यांना पटवून दिले. तसेच जर पेशव्यांनी लगेचच काही कारवाई केली नाही तर पोर्तुगीजांचे वर्चस्व आणखी वाढेल असे सांगितले. परन्तु या दरम्यान पेशवे निजामाचा बंदोबस्त करण्यात गुंतले असल्याने त्यांना उत्तर कोकणाच्या किनारपट्टीकडे लक्ष देण्यास विलम्ब जहाला.
अखेर, पोर्तुगीजांचा कर्दनकाळ आला. इ.स.१७३८च्या अखेरीस चिमाजी आप्पा उत्तर कोकणात ससैन्य दाखल झाले.
आणि सुरु झाला त्या वीरांचा रणसंग्राम..
पालघर जवळील अनुक्रमे माहिम, केळवे, शिरगाव व् अशेरी हे किल्ले हस्तगत केल्या नंतर चिमाजी आप्पा १६ जानेवारी १७३९ रोजी फ़ौज घेऊन तारापुर येथे आले व् किल्ल्याला वेढा दिला. या स्वारीमधे बाजी भीमराव, रामचन्द्र हरी, बाळोजी चन्द्रराव, राणोजी भोसले, गणोजी शिंदे, मल्हारबा होळकर, अशी दिग्गज मंडळी देखील होती.
किल्ल्ला तसा बराच भक्कम त्यात तो भलताच अवाढव्य, किल्ल्याच्या उत्तरेकडे तारापुर ची खाड़ी,पूर्वेस किल्ल्याचे मुख्यद्वार, पच्छिमेस् दर्या अणि दक्षिणेला भक्कम तटबंदि असलेल्या किल्ल्याला अनन्य साधारण महत्व होते कारण हा किल्ला जसा भुइकोट होता तसाच त्याचा वापर समुद्री वाहतुकिसाठी देखील मोठ्या प्रमाणावर होत असे. पश्चिमेला असणाऱ्या तटबंदीवरन अरबिसागरकडे लक्ष ठेवता येत होते.आणि हेच मुख्य कारण होत, ज्यामुळे सहजासहजी पोर्तुगीज किल्ला सर होउ देत नव्हते.
छत्रपति शिवरायां मुळे सागरी किल्ल्यांना खुप महत्व प्राप्त झालं होत. म्हणून असे किल्ले गमवणे म्हणजे पोर्तुगीज सत्ता डगमग्नार याची कल्पना पोर्तुगिज़ाना होती.
किल्ल्याला वेढा दिल्यानंतर मराठ्यांनी चबूतरे बनवून त्यावर तोफा चढवल्या आणि तोफांचा जबरदस्त मारा सुरु केला. या वेळी लुइस वेलेजो नावाचा पोर्तुगीज किल्लेदार होता. तो टुटलेले बुरुज रातोरात बांधून काढत होता. शत्रु बऱ्यापैकी तयारीत असून तोफेने काम होत नाहीं, हे पाहून २३ जाने १७३९ रोजी तटाला सुरुंग लावण्यात आले. किल्ल्याच्या उत्तरेकडील तटाला चार सुरुंग लावण्यात आले.
दुसऱ्या दिवशी पहाटे दि. २४ जाने. १७३९ रोजी पहाटेस सुरुंगाना बरच्या देण्यात आल्या. चार पैकी २ सुरुंग फुकट गेले व दोन चांगलेच उड़ाले. त्या दोन सुरुंगमुळे टताला मोठे खिंडार पडल्याबरोबर लगेचच बाजी भीमराव, रामचन्द्र हरी, यशवन्तराव पवार यांसारखे बडे सरदार अपापले सैन्य घेऊन किल्ल्याकडे धावले आणि लढाईला सुरुवात झाली.
मराठा सैन्य द्वेषाने पुढे सर्कट होते. सुरुवातीला पोर्तुगीजांनी मराठ्यांचे काहीच चालू दिल नाही. अर्थात मराठा सैनिक अगदी असुरक्षित जागेतुन लढत होते तर पोर्तुगीज मात्र 30 फुटांवरून तोफेचा, बन्दुकिचा मारा करत होते. यात बरेच मराठे सैन्य पोळले गेले, त्यामुळे अधिक चिडून मराठे चवताळुन पुढे सरकत होते. पुढे पोर्तुगीजांचा प्रतिकार सम्पत आला.
मराठे एकाकी किल्ल्यात घुसले व् फिरंगी प्रतिकार मोडून किल्ला सर केला. मराठ्यांचे बरेच आदमी कामी आले, पोर्तुगीजांचे चार हजार सैन्य मराठ्यांच्या हाती लागले. त्यात डॉन फ्रांसिस डी अरूर नावाचा किलेदार देखील होता.
आणि यातच पेशव्यांचा विश्वासु आणि पराक्रमी सरदार बाजीराव भीमराव रेठरेकर तोंडाला गोळी लागून शहीद पावला. जीवाची बाजी लावून लढलेल्या बाजी भीमरावाच्या जाण्याने आप्पाना बरेच दुःख झाले. बाजीराव पेशव्यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, "तारापुर घेतले. फत्ते जाहली. परन्तु बाजी भीमरावास तोंडाला गोळी लागून ठार झाले.परमदुःख जहाले."
अशा रीतीने तारापुर किल्ला २४ जानेवारी १७३९ रोजी जिंकला गेला , पाठोपाठ सर्व वसई प्रांत आणि साष्टि प्रांत मराठ्यांचे ताब्यात आला. दि. २७ मे १७३९ रोजी किल्ल्याची हवालदारी मोरो नारोसिंह यांस तर फडनीशि महादजी दत्ताजी यांस सोपवण्यात आली.
-रत्नेश न किणी
सन्दर्भ ग्रन्थ- ठाणे जिल्हा गॅझेटर,
तारापुर चा लढ़ा- गो वि चिपलूणकर,
ठाण्यातील गड़किल्ले - गोनिदा,
प्राचीन महाराष्ट्र व् उत्तर कोंकण - फड़के,
प्राचीन तारापुर - रा.म.राउत.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...