विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 25 July 2019

” शंभूछत्रपती ” 【 स्वराज्याचे धाकले धनी 】

” शंभूछत्रपती ” 【 स्वराज्याचे धाकले धनी 】

|| राजमाता जिजाऊंचा विजय आहे ||
” शंभूछत्रपती “
【 स्वराज्याचे धाकले धनी 】
छत्रपती शंभूराजांच्या , छत्रपती बनण्याला एक
पार्शवभूमी आहे , ह्या विशेष लेखात , युवराज शंभराजे ते छत्रपती शंभूराजे हा संभाजी महाराजांच्या आयुष्यातील एका महत्वपूर्ण प्रवासाचा आढावा घेणार आहोत .
■ स्वराज्याचा वारस कोण ? : –
शंभूराजे दि. २१ डिसेंबर
१६७९ रोजी , मामुरखानाच्या ( दिलेरखानाच्या ) मोगली गोटातून बाहेर पडले , पुढे दि. १३ जानेवारी १६८० रोजी , युवराज शंभूराजे सरनौबत हंबीरराव ( हंसाजी मोहिते ) , यांसोबत किल्ले पन्हाळ्यावर आले होते . खानाच्या छावणीत जाणे , हा छत्रपती शिवराय आणि युवराज शंभूराजे यांच्या प्रभावी राजकारणाचा एक भाग होता , वास्तविक बखरकारांनी त्याचा वेगळा अर्थ काढून शंभुराजांवर , ‘ फितूरीचे ‘ आरोप केले , परंतु सत्यापुढे कोणाचे काहीच चालले नाही . पुढे शिवरायांनी , किल्ले पन्हाळगडावर जाऊन शंभूराजांची भेट गेली , पिता – पुत्रांमध्ये मसलत झाली , पुढची दिशा ठरली . छत्रपती शिवरायांनी शंभूराजांच्या दिमतीस म्हळोजी घोरपडे नावाचा विश्वासू आणि अनुभवी सरदार दिला होता .
त्यानंतर राजारामराजेंच्या विवाहाकरिता , शिवराय राजधानीकडे रवाना झाले . नंतर राजारामराजांचे , दि. १५ मार्च रोजी , लग्नकार्य हे स्व. सरनौबत प्रतापराव गुजर , यांची कन्या , जानकीबाई ह्यांबरोबर झाले , समारंभ निर्विघन पार पडले .
आता प्रश्न असा , कि स्वराज्याचा वारस कोण ? , “
छत्रपती शिवरायांचं , त्या प्रसंगावेळी वय ५० वर्षे पुर्ण होते , ह्याचा अर्थ कि राजे वृद्ध झाले नव्हते , त्यामुळे वाटणीचा प्रश्नच उरत नाही [ कोणत्याही समकालीन साधनात वाटनिचा उल्लेख नाही ] .
आणि जर प्रश्न असेल तर जन्माने आणि कर्माने स्वराज्याचे वारस हे , ” युवराज शंभूराजे ” च होते .
पुढे दि. २४ मार्च १६८० रोजी , राजे आजारी पडले , व दि. ३ एप्रिल १६८० रोजी छत्रपती शिवरायांचे
राजधानीत , अकाली महानिर्वाण झाले . ह्या ह्रयदद्रावक प्रसंगाने संपूर्ण स्वराज्य हबकले .
शिवरायांच्या मृत्यूचे संशोधन व्हायला हवे , त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत , आणि पुराव्याद्वारे सत्य माहिती लवकरच प्रकाशित करणार आहोत . ” इतक्यात काही लिखाण करणे योग्य ठरणार नाही ” .
◆ महानिर्वाणाचा प्रसंग : – दि. ३ एप्रिल १६८० , शनिवार ,
सूर्योदयानंतर दोन प्रहरांनी राजांनी किल्ले रायगडावर देह ठेविला . राजांचे अंत्यविधी सुरू झाले , ” शिवरायांच्या पवित्र देहाला अग्नी देण्याचे कार्य हे भोसले घराण्यातील दूरचा नातेवाईक साबाजी भोसले याने केले ” . मुळात शंभूराजांच्या अनुपस्थित अग्नी देण्याचे महापुण्याचे कार्य राजारामराजेंनी करावयास हवे होते ; परंतु सत्ताप्राप्तीसाठी त्यांनी केले नसावे किंवा करून दिले नसावे ; हिंदूसंस्कृतीनुसार मृत्यू झाल्यावर , परिवारास सुतक लागते , व १२ दिवस परिवारातील व्यक्तींनी काही व्यवहारीक कार्ये तसेच महत्वाची कार्ये करायची नसतात , पण परिवारातील राजकुमार असेल तर सिंहासनाच्या शास्त्रानुसार पुढील राजास सुतक लागता कामा नये , आणि जास्ती काळ सिंहासन रिकामे ठेवता येत नाही , राजाच्या मृत्यूनंतर लगेचच नवीन राजाच्या नावाची ग्वाही दिली जाते , हि एक प्रथा आहे ; कदाचित या प्रथेनुसारच साबाजी भोसले यास राजांच्या पवित्र देहाला अग्नी द्यायला सांगितले असावे . पुढे १५ दिवसांनी , आबासाहेब गेल्याची बातमी शंभुराजांना कळली , नंतर मंत्रीमंडळामार्फत सोयराराणी आणि कपटी अनाजीने , दि. २१ एप्रिल १६८० रोजी , राजरामास मंचकी बसविले वा मंचकरोहण केले , आणि सर्वत्र नव्या राजाची ग्वाही फिरवली . पुढे लगेचच प्रधानमंडळी ( अनाजी , मोरोपंत ) ५ हजार फौझेसह शंभुराजांना अटक करण्यास निघाले , रायगडहून प्रधानमंडळी तळबीडला गेले , त्यांच्या पक्षात हंबीररावांना सामील करण्याच्या हेतूने ते गेले होते .
सरनौबत हंबीररावांसमोर पेच : –
हंबीररावांनी प्रधानांचे
योग्यप्रकारे आदरातिथ्य केले , त्यांचं बोलणं एकूण घेतलं . हंबीररावांच्या बरोबर रंगोजी ( रुपाजी ) भोसले , महादू भोपाळकर गुजर , हे सेनानी होते . शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेब दक्षिण जिंकण्यासाठी मोठ्या लवाजम्यासह येणार आहे अशी बातमी , सरनौबतांना मिळाली होती , तशीच चिन्हे दिसत होती . औरंगजेबाचे आव्हान फक्त शंभूराजेच परतवू शकत होते , हे हंबीररावांना ठाऊक होते ; त्यामुळे हंबीररावांनी सोयराबाई आणि प्रधानांच्या पक्षास साथ न देता , स्वराज्यहित जाणून , शंभुराजांना साथ द्यायचे ठरविले होते . सरनौबतांनी प्रधानांना गाफील ठेवून योग्य संधी मिळता , कैद करून , युवराज शंभुराजांसमोर हाजीर केले , शंभूराजांनी प्रधानांना आणि हिरोजी फर्जंद यांस कैद केली , पन्हाळगडाचे कारभारी जनार्दन हणमंते ह्यास आधीच कैद केले होते .
पुढे शंभूराजांनी स्वराज्याचा कारभार तेथुनच सुरू केला , सर्व गडावर खलिते पाठविले , नंतर सरदार
पिलाजी शिर्के यांस १५ हजाराची फौज देऊन रायगडाचा
बंदोबस्त करण्यासाठी पाठविले .
■ युवराज शंभूराजे रायगडावर : –
जेधे शकावलीतील
नोंदीनुसार राजशक ७ , रौद्र ( दि. ३ जून १६८० ) , पन्हाळगडावरून शंभूराजे , सातारा – कराड मार्गे किल्ले प्रतापगडावर गेले , व भवानी देवीचे दर्शन घेऊन पूजा केली आणि आषाढ शुद्ध २ शुक्रवारी , शंभूराजे दि. १० जून ला रायगडावर आले , राज्य करू लागले .
शंभूराजे रायगडाच्या पायथ्याशी आल्यानंतर त्यांनी प्रथम राजमाता जिजाऊंच्या पवित्र समाधीचे दर्शन घेतले , जवळजवळ ३ वर्षे शंभूराजे रायगडापासून दूर होते , नंतर शंभूराजांनी सोयरामातोश्री , पुतळामातोश्री आणि अन्यदोन मोतोश्रींचे सांत्वन केले , त्यांना धीर दिला , राजारामराजेंना भेटले , राज्यकारभारास प्रत्यक्ष प्रारंभ केला .
रायगडावर , युवराज शंभूराजांनी पुन्हा शास्त्रानुसार विधिपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांची
उत्तरक्रिया केली . क्रियेच्या १०व्या दिवशी , दि. २७ जून १६८० रोजी , श्रीमती पुतळाराणीसाहेब सती गेल्या .
◆ युवराज शंभूराजांचे मंचकारोहण : –
शके १६०८ रौद्र संवत्सरे श्रावण शुद्ध पंच ( नागपंचमी ) म्हणजेच दि . २० जुलै १६८० ( मंगळवार ) रोजी , युवराज शंभूराजे यांचे
मंचकारोहण झाले आणि ” राजा ” झाल्याचे जाहीर केले . पुढे सर्वमुख्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून , प्रधानांना नजरकैदेतून मुक्त केले ( रायगडावर आल्यावर प्रधानांना , त्यांच्या वाड्यावरच नजरकैदेत ठेवले होते ) . पुढे दि . २९ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी देह ठेविला . शंभूराजांनी मंचकारोहणानंतर कोकणामध्ये , राजापूर येथे नव्या सुभेदाराची नेमणूक केली .
•■• शंभुराजेंचा राज्याभिषेक : –
सन १६८१ हे साल चालू झाले , राजधानीत शंभूराजांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली . राज्याभिषेकविधीपूर्वी करावयाचे प्रायःश्चित विधी , तुलादान विधी हे विधी याआधीच म्हणजे , दि. ३० डिसेंबर १६८० रोजी पार पाडण्यात आले होते ; त्यानंतर शुभमुहूर्तावर शंभूराजे किल्ले प्रतापगडावर जाऊन , ” श्री आदिशक्ती तुळजाभवानी मातेचे पूजन ” , करून आले .
शके १६०८ , रौद्रनाम संवत्सरे जानेवारी १४ , १५ , आणि १६ , इ.स. १६८१ रोजी शंभुराजांना विधियुक्त राज्याभिषेक झाला , ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले . मुख्य राज्याभिषेकविधी व समारंभ , दि. १६ जानेवारी रोजी झाला . शिवरायांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम भव्यदिव्य झाला . रायगडावर भरपूर प्रमाणात मंडळी उपस्थित होती . जेवण , दानधर्म मोठ्या प्रमाणात झाले .
काही बखरकारांनी , राज्याभिषेक समारंभावेळी काही अपशकून झाल्याचे उल्लेख केलेत , ते पुढीलप्रमाणे : –
१. संबंध दिवस आकाश अभ्राच्छादित असल्याने , सूर्यदर्शन झाले नाही .
२. शंभूराजांचा रथ मोडला .
३. दानधर्माच्या गर्दीत ब्राह्मण चिरडून मृत्यू पावले .
असं काहीही घडलं नाही , बखरकारांनी आपल्या कल्पनेतून हे असं काही मांडलं आहे .
छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा : –
श्री |
शंभो शिव जातस्यमुद्रादयौ रिव राजते |
यदं |
क सेविनो लेखा |
वर्तते कस्यनो परि |
मराठीमध्ये अर्थ : – छत्रपती संभाजीराजांची राजमुद्रा सूर्याच्या तेजप्रमाणे शोभते आणि राजमुद्रेची आश्रित असलेली लेखा कोणावरही अंमल गाजविते अशी हि शिवपुत्र शंभूची मुद्रा प्रकाशित आहे .
★ छत्रपती संभाजी राजांची मर्यादा : –
” मर्यादेयं विजयते “
हि छत्रपती संभाजीराजांची ” मर्यादा ” आहे , संभाजीराजांची आणखी एक मुद्रा असल्याचे म्हटले जाते , पण ती कोठेही वापरता आलेली दिसत नाही .
°■° छत्रपती संभाजीमहाराजांचे मंत्रीमंडळ : –
■ छत्रपती : – संभाजी महाराज .
■ महाराणी येसूबाई : – छत्रपती संभाजी महाराजांच्या
अनुपस्थितीत रायगडाचे सर्व
अधिकार ह्यांकडे असतील .
पेशवे : – निळो मोरोपंत पिंगळे .
◆ अमात्य / मुजुमदार : – अनाजी दत्तो .
◆ डबीर : – जनार्दनपंत .
◆ सुरनिस : – आबाजी सोनदेव .
◆ सरनौबत : – हंबीरराव मोहिते .
◆ चिटणीस : – बाळाजी आवजी .
◆ दानाध्यक्ष : – मोरेशवर पंडितराव .
◆ वाकेनवीस : – रामचंद्र .
◆ छंदोगामात्य : – कवी कलश .
◆ न्यायाधीश : – प्रल्हादपंत .
अशाप्रकारे युवराज शंभूराजे , स्वराज्याचे “धाकले धनी” झाले आणि आहेत .
संदर्भ ग्रंथ : –
छत्रपती संभाजी महाराज ( वा. सी. बेंद्रे ) , शिवपुत्र संभाजी , संभाजी , ज्वलनज्वलंतेजस संभाजी राजा , बखरी , शिवकाल १६३० -१७०७ , ऐतिहासिक कागदपत्रे .

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...