विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 25 July 2019

” हंबीररावांची स्वामीनिष्ठा “

” हंबीररावांची स्वामीनिष्ठा “

” हंबीररावांची स्वामीनिष्ठा ”
( एका महापराक्रमी वीराची सत्यगाथा )
” हंबीररावांची स्वामीनिष्ठा ” , ह्या चरित्रात्मक लेखात , सरनौबत हंबीरराव मोहित्यांचे , हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील योगदान , यावर महत्वपूर्ण माहिती जाणणार आहोत .
हंसाजींचा जन्म : –
मोहिते घराणे हे महाराष्ट्रातील कर्तृत्ववान घराण्यांपैकी , एक होते . हंसाजींचे वडील , संभाजी मोहिते हे हि पराक्रमी होते . सन १६३१ मध्ये , सुप्याच्या गढीमध्ये , हंसाजींचा जन्म झाला असावा . तसेच संभाजी मोहिते यांस हरिफराय , हंसाजी व शंकराजी ही अपत्ये होती .
संभाजींनी , हंसाजींस उत्तम पद्धतीचे लष्करी शिक्षण दिले होते , म्हणोनच पुढील काळात ,
हंसाजीराव स्वराज्याचे सरनौबत झाले होते .
■ हंसाजींचा सैन्यात प्रवेश : –
हंसाजी मोहितेंचा , मराठा सैन्यात , ‘मावळा’ म्हणून प्रवेश कधी झाला , याबाबत अजूनतरी पुरावा उपलब्ध नाही , इतिहास अद्यापतरी मौन बाळगून आहे .
हंसाजी , संभाजी मोहिते यांच्या देखरेखे –
– खाली लहानाचे मोठे झाले , त्यांनीच युद्धविषयक शिक्षणाकडे स्वतः विशेष लक्ष दिलेले होते . याखेरीज युद्धविषयक शिक्षण सरनौबत नेतोजी पालकरांच्या हाताखाली पूर्ण झाले . नंतरच्या काळात शिवरायांच्या प्रत्येक मोहिमेत सोबत राहून युद्धनीती व डावपेच हंसाजीने आत्मसात केलेले होते . गनिमी काव्याच्या युद्धतंत्रामध्येही , ते तरबेज झाले होते ; म्हणोनच पुढे जाऊन , हंसाजी स्वराज्याच्या चतुरंग सैन्याचे ” सरनौबत ” झाले .
सरनौबत प्रतापराव गुजर आणि हंसाजी : –
हंसाजी मोहिते , यांनी हिंदवी स्वराज्याचे तिसरे सरनौबत प्रतापराव ( कुडतोजी ) गुजर , यांच्या मार्गदर्शना – खाली , प्रत्येक मोहिमेत सहभाग घेऊन , एक उत्तम योद्धा म्हणून कार्य केले . सरनौबतांचा हंसाजींवर खूप विश्वास होता .
◆ नेसरीचे युद्ध आणि हंसाजी : –
आदिलशाह , स्वराज्याची भूमी जिंकण्याकरिता सतत प्रयत्न करीत होता , अशातच
सन १६७३ मध्ये , आदिलशाहीतील महाकपटी सरदार , पन्हाळा परिसराचा सुभेदार , बहलोलखान पठाण , १० हजारांची कडवी फौज घेऊन किल्ले पन्हाळ्यावर चालून आला , ‘ हि खबर लागताच , शिवरायांनी सरनौबत प्रतापराव यांच्या नेतृत्वाखाली १५ हजार सैन्य व आनंदराव , विठोजी शिंदे , कृष्णाजी भास्कर , विसो बल्लाळ , सिद्दी हिलाल या नामांकित आसामी बरोबर दिल्या होत्या . पुढे उंबराणी येथे , दि. १५ एप्रिल १६७३ रोजी , दोन्ही सैन्यात प्रचंड मोठी लढाई झाली , उत्तम रणनीतीमुळे , मराठ्यांचा विजय झाला . सरनौबतांनी , बहलोलखानाकडून मोठी खंडणी घेतली ; परंतु खानाला सोडून दिले ( कपटयाने डाव साधला ) .
हि खबर , शिवरायांना समजताच , राजांनी सरनौबतांना पत्र लिहले , ” तुम्ही लष्कर घेऊन जाऊन बहलोलखान येतो , यांशी गांठ घालून बुडवून फत्ते करणे नाहीतर आम्हांस तोंड न दाखविणे ” , असा निरोप प्रतापरावांना मिळताच , हे शब्द त्यांच्या जिव्हारी लागले . पुढे सात महिने हुबळी व कोलपुरच्या भागात मोहीम चालू करून हुबळीची धनाढ्य पेठ लुटली . याचकाळात बहलोलखान पठाण पुन्हा स्वराज्यावर , कोल्हापूर येथे येत असल्याची खबर सरनौबतांना मिळाली . प्रतापरावांनी गडहिंग्लजजवळ १ मैलावर नेसरीच्या खिंडीत खानाच्या फौझेला सामोरे गेले , ” त्यावेळी प्रतापरावांसोबत मात्र ७ वीर होते ” , मराठी सेना मागे होती . ह्या शूरवीरांनी अनेक गनीम कापले ; परंतु अखेर सैन्यबलामुळे खानाने त्यांस पकडले , व कौर्याने सरनौबत प्रतापरावांस ठार मारले , ” एका महान वीराचा दुर्दैवाने अंत झाला ” .
यावेळी हंसाजी मोहिते , धनाजी जाधव , संताजी घोरपडे यांनी तात्काळ रणनीती आखून बहलोलखानावर आक्रमण केले . या युद्धाचे वर्णन ग्रँड डफ असे करतो कि , ” हंसाजी मोहितेच्या सैन्याने अतुलनीय पराक्रम गाजविल्याने बहलोलखानाच्या सैन्याला पळ काढावा लागला ” , पुढे हंसाजींनी पार विजापुरपर्यंत आदिलशाही फौझेचा पाठलाग करून , जहागिरीची नासधूस केली . कित्येक गनिमांची कत्तल केली , फार मोठी लूट मारली . यानंतर , शिवाजी महाराजांनी हंसाजी रावांस नेसरीच्या युद्धमधील केलेल्या अतुलनीय पराक्रमाबद्दल मानाची वस्त्रे आणि ” हंबीरराव ” हा किताब दिला , व दि. ८ एप्रिल १६७४ रोजी , चिपळूण येथे शिवरायांनी हंबीरराव यांस , स्वराज्याचे सरनौबत केले . हंबीरराव स्वराज्याचे चौथे सरनौबत झाले .
■ हंबीरराव : –
नेसरीयेथील पराक्रमाबद्दल राजांनी , हंसाजींना ” हंबीरराव ” हा किताब दिला . हंबीरराव हा शब्द अमीरराव या अर्थाने रूढ आहे . अमीर म्हणजे श्रीमंत नव्हे तर शौर्यवान , कर्तृत्वसंपन्न या अर्थाने ओळखला जातो .
पुढे राज्याभिषेकानंतर सरनौबतांनी बहादूरगडाची मोहीम , मोगली प्रदेशात लूट , विजापुरशी संघर्ष अशा निरनिराळ्या मोहिमांवर जाऊन विजयश्री मिळविला तर पवित्रा कायम ठेविला , आणि पुढे दक्षिणदिग्विजयात बहुमोलाचे कार्य केले .
■ हंबीरराव , नेतोजी पालकर आणि दक्षिणदिग्विजय : –
हंबीरराव ( हंसाजी ) , सुरुवातीपासून हुशार होते , सैन्यात दाखल झाल्यापासून त्यांचे उत्तम गुण दिसून येत होते , तेच गुण हेरून शिवरायांनी नेतोजी रावांस , त्यांना विशेष प्रशिक्षण द्यावयास सांगितले . नेतोजींनी हंसाजींस गनिमी कावा , कृष्णकावा , इंगित जाणण्याची कला , निरनिराळे शस्त्र चालवीन्याचे शिक्षण , कट्यारीचा प्रसंगी ढालीप्रमाणे उपयोग , हेरगिरी , वेषांतर अशा अनेक विद्या शिकविल्या , व हंसाजींनी उत्तमरीत्या आत्मसात करून घेतल्या . पुढे दक्षिण दिग्विजयासमयी , हंबीररावांचा महापराक्रम पाहून , नेतोजी पालकरांचे मन भरून आले , दिलेल्या शिक्षणाचे सोने झाले , त्यामुळे हंबीररावांस त्यांनी
आपली एकबानी कट्यार भेट म्हणून दिली ( हंबीरराव यांनी अखेर पर्यंत हि कट्यार सोबत ठेवली होती ) , गुरू – शिष्याची हि महान जोडी इतिहासात अजरामर झाली [ ; परंतु खंत हि आहे कि , आम्हा त्यांच्या वारसदारांना ह्याची भ्रांतसुद्धा नाही ] .
तेजोनिधी मावळला : –
दक्षिणदिग्विजयानंतर , हंबीरराव मोगली प्रदेशांवर हल्ले करून ते प्रदेश लुटत होते , खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी जालनापूर लुटले . अशातच युवराज शंभूराजे स्वराज्यात परतले . पुढे किल्ले पन्हाळ्यावर शिवरायांची आणि शंभूराजांची भेट झाली . पिता – पत्रांमध्ये चर्चा झाली , पुढचं नियोजन ठरलं , व युवराजांवर कोल्हापूर प्रांताचा आणि दक्षिणदिग्विजयात जिंकलेल्या प्रांताचा कारभार तसेच जबाबदारी सोपवून , शिवराय राजधानी रायगडावर परतले . न सरनौबत मोगल प्रदेशाची लूट रायगडावर सोपवून , तळबीडला आले .
यानंतर दि. ३ एप्रिल १६८० , शनिवार , सूर्योदयानंतर दोन प्रहरांनी राजांनी किल्ले रायगडावर देह ठेविला . राजांचे अंत्यविधी सुरू झाले , ” शिवरायांच्या पवित्र देहाला अग्नी देण्याचे कार्य हे भोसले घराण्यातील दूरचा नातेवाईक साबाजी भोसले याने केले ” . मुळात शंभूराजांच्या अनुपस्थित अग्नी देण्याचे महापुण्याचे कार्य राजारामराजेंनी करावयास हवे होते ; परंतु सत्ताप्राप्तीसाठी त्यांनी केले नसावे किंवा करून दिले नसावे ; हिंदूसंस्कृतीनुसार मृत्यू झाल्यावर , परिवारास सुतक लागते , व १२ दिवस परिवारातील व्यक्तींनी काही व्यवहारीक कार्ये तसेच महत्वाची कार्ये करायची नसतात , पण परिवारातील राजकुमार असेल तर सिंहासनाच्या शास्त्रानुसार पुढील राजास सुतक लागता कामा नये , आणि जास्ती काळ सिंहासन रिकामे ठेवता येत नाही , राजाच्या मृत्यूनंतर लगेचच नवीन राजाच्या नावाची ग्वाही दिली जाते , हि एक प्रथा आहे ; कदाचित या प्रथेनुसारच साबाजी भोसले यास राजांच्या पवित्र देहाला अग्नी द्यायला सांगितले असावे . पुढे १५ दिवसांनी , आबासाहेब गेल्याची बातमी शंभुराजांना कळली , नंतर मंत्रीमंडळामार्फत सोयराराणी आणि कपटी अनाजीने , दि. २१ एप्रिल १६८० रोजी , राजरामास मंचकी बसविले वा मंचकरोहण केले , आणि सर्वत्र नव्या राजाची ग्वाही फिरवली . पुढे लगेचच प्रधानमंडळी ( अनाजी , मोरोपंत ) ५ हजार फौझेसह शंभुराजांना अटक करण्यास निघाले , रायगडहून प्रधानमंडळी तळबीडला गेले , त्यांच्या पक्षात हंबीररावांना सामील करण्याच्या हेतूने ते गेले होते .
सरनौबत हंबीररावांसमोर पेच : –
हंबीररावांनी प्रधानांचे योग्यप्रकारे आदरातिथ्य केले , त्यांचं बोलणं एकूण घेतलं . हंबीररावांच्या बरोबर रंगोजी ( रुपाजी ) भोसले , महादू भोपाळकर गुजर , हे सेनानी होते . शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेब दक्षिण जिंकण्यासाठी मोठ्या लवाजम्यासह येणार आहे अशी बातमी , सरनौबतांना मिळाली होती , तशीच चिन्हे दिसत होती . औरंगजेबाचे आव्हान फक्त शंभूराजेच परतवू शकत होते , हे हंबीररावांना ठाऊक होते ; त्यामुळे हंबीररावांनी सोयराबाई आणि प्रधानांच्या पक्षास साथ न देता , स्वराज्यहित जाणून , शंभुराजांना साथ द्यायचे ठरविले होते . सरनौबतांनी प्रधानांना गाफील ठेवून योग्य संधी मिळता , कैद करून , युवराज शंभुराजांसमोर हाजीर केले , शंभूराजांनी प्रधानांना आणि हिरोजी फर्जंद यांस कैद केली , प्रधानांचे सोबती पन्हाळगडाचे कारभारी जनार्दन हणमंते ह्यास आधीच कैद केले होते .
पुढे शंभूराजांनी स्वराज्याचा कारभार तेथुनच सुरू केला , सर्व गडावर खलिते पाठविले . हंबीररावांनी
न्यायाची बाजू घेतली , आणि आपली स्वामिनिष्ठा दाखविली . नंतर दि. १६ जानेवारी १६८१ रोजी ,
शंभूराजांचा राज्याभिषेक झाला , शंभूराजे स्वराज्याचे द्वितीय छत्रपती झाले .
■ अजय सेनापती : –
सरसेनापती हंबीरराव मोहिते , हे
सुरुवातीपासून म्हणजे सन १६७४ पासून ते अखेरपर्यंत १६८७ पर्यंत सर्वच आघाड्यांवर विजयश्री घेऊन होते . विशेष म्हणजे सन १६८२-१६८७ या काळांत प्रत्येक
मोगल – मराठा युद्धात , छत्रपती शंभूराजांच्या मार्गदर्शनाखाली , उत्तम रणनीतीच्या आधारे त्यांनी विजय मिळविला . यावरून हंबीरराव हे एक अजय सेनापती होते , हे सिद्ध होते .
जिंकलेल्या काही महत्वाच्या मोहिमा : –
• बुर्हाणपुरची मोहीम .
• औरंगाबादची मोहीम .
• रामशेजचा लढा .
• कुलीचखानावर मात .
• शहजादा आज्जम वर विजय .
• फिरोजजंग चा पराभव .
• शहाबुद्दीन खानावर विजय .
[ सरनौबत हंबीररावांनी कित्येक नामचीन मोगली
सेनापतींना यमलोकी धाडले . मोगल सेना त्यांपुढे
हतबल झाली होती . ]
वाईची लढाई – अखेरचा लढा : –
दक्षिण हिंदुस्तानच्या इतिहासाला , सन १६८७ हे वर्ष कलाटणी देणारे वर्ष म्हणून ओळखले जाते ; कारण ह्याच वर्षी स्वराज्याचे मैत्री राष्ट्र म्हणून ओळखले जाणारे , कुतुबशाही राज्याचा शेवट झाला , स्वराज्यनिष्ठ सरनौबत हंबीरराव मोहिते यांचा वाईच्या येथे लढाईत मृत्यू झाला ; ह्या लढाईचा वृत्तांत दुर्दैवाने मराठी साधनांमध्ये उपलब्ध नाही . हंबीरराव यांच्या जाण्याने , संभाजी महाराजांचा उजवा हात नाहीसा झाला ; त्याचे शंभराजांस मोठे दुःख झाले . सरनौबत हंबीररावांनी निर्भयपणे , हिंदवी स्वराज्याची अविरत सेवा आणि रक्षण केले होते .
छत्रपती संभाजीराजे नेहमी म्हणत , ” सबुरीचे शिवतंत्र हे मात्र , मामासाहेबांकडेच होते ” .
अशा महापराक्रमी , स्वामिनिष्ठ , अजय योध्यास माझा मानाचा मुजरा ….
■ संदर्भ ग्रंथ : – शिवचरित्र , छत्रपती संभाजी महाराज ( वा. सी. बेंद्रे ) , शिवपुत्र संभाजी , संभाजी , ज्वलनज्वलंतेजस संभाजी राजा , बखरी , शिवकाल १६३० -१७०७ , ऐतिहासिक कागदपत्रे .

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...