**शनिवारची नौबत**
**शनिवारची नौबत**
————————————————————-
मराठी राज्यात दुफळी निर्माण करण्याच्या दृष्टीकोनतून शाहू महाराजांची मोगली कैदेतून सुटका करण्यात आली. शाहू महाराजांनी महाराष्ट्राच्या दिशेने प्रयाण केल्यानंतर अनेक मोठमोठ्या लोकांचा त्यांस पाठिंबा मिळाला. शाहू राजांनी धैर्य, तडफ, निश्चय, मुत्सद्देगिरी इ. गुण प्रकट केले की, त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात सर्वत्र मोठा आदर उत्पन्न झाला. याचमुळे ताराबाईंचे मनोरथ ढिले पडले. नगर मुक्कामी राहून शाहू महाराजांनी आपला जम बसविला आणि ताराबाईंच्या फौजा चालून येतात असे कळताच सप्टेंबर(१७०७) अखेर दसऱ्याचे मुहूर्तावर शाहू राजांनी नगरहून पुढे प्रयाण करून खेडवर मुक्काम केला. नदीपलीकडे कडूस येथे धनाजी जाधव, परशुराम त्रिंबक इ. ताराबाईंचे सरदार लढाईस सज्ज होऊन राहिले. आश्विन शुद्ध पक्षात बहुधा धनत्रयोदशी म्हणजे ता. १२ ऑक्टोबरचे सुमारास खेड येथे लढाई होऊन शाहू राजांस विजय मिळाला. खेडच्या लढाईच्या पूर्वी शाहू राजांनी भेद करून, ताराबाईंच्या पक्षातील लोकांची मने आपल्या बाजूस वळविण्याचे काम केले होते.
खेडच्या लढाईचा रंग ओळखून परशुरामपंत प्रतिनिधी पळून गेल्याने हस्तगत झाले नाहीत. प्रतिनिधींनी चाकणास मुक्काम करून पुनः लढण्याचा बेत केला, पण फितव्याच्या वाटाघाटी उघड सर्वांस कळल्यामुळे प्रतिनिधींचे लोक लढण्यास पुढे जाईनात, असे पाहतांच प्रतिनिधी लगेच परत साताऱ्यास जाऊन किल्ला बळकावून युद्धास सिद्ध जाहला. शाहू राजांचा पाडाव करण्यासाठी ताराबाईंनी फार शिकस्त केली हे स्पष्टच आहे.
खेड येथे जय मिळाल्यानंतर शाहू राजांनी पुढच्या चालीची सिद्धता केली. आळंदी, तुळापुरावरून शाहू राजे पुण्यास आले. तेथून सुपे, जेजुरी या गावावरून झटपट शिरवळ येथे आले. त्यानंतर शाहू राजे चंदन-वंदन किल्ल्याजवळ दाखल झाले. आगोदरच तेथील हवालदारांस पत्रे पाठविली होती, ते येऊन भेटले. त्यांचा सन्मान करून किल्ले घेतले. तेथून लगेच सातारा हवाली करण्याची पत्रे प्रतिनिधीस पाठविली. आता शाहू राजांचा उत्तम जम बसलेला होता, त्यामुळे सातारा लढवण्याची जबाबदारी ताराबाईंनी प्रतिनिधींवर सोपविली व आपण मुलासह पन्हाळ्याकडे निघून गेल्या.
सातारा किल्ल्याचा हवालदार वाईचा शेख मिरा लढण्यास सज्ज झाला. शाहू राजांनी त्याला किल्ला स्वाधीन करण्यास सांगितले होते, पण शेख मिराने ते मान्य केले नाही. त्याची मुले माणसे वाईहून पकडून आणून त्यांस तोफेने उडवून देतो असा शाहू राजांनी शेख मिऱ्यास धाक घातला. त्यावरून शेख मिऱ्याने प्रतिनिधीस साताऱ्याचा किल्ला शाहू राजांच्या हवाली करण्यास सांगितले. ते प्रतिनिधी यांनी मानले नाही. त्यानंतर शेख मिऱ्यानेच प्रतिनिधीस पकडून किल्ला शाहू महाराजांच्या हवाली केला. किल्ला आठ दिवसात घेण्याचा संकल्प शाहू राजांनी केला होता व तो सिद्धीस देखील गेला. या संकल्पाविषयी नागपूरकर भोसल्यांच्या बखरीत माहिती आली आहे.
साताऱ्याच्या किल्ल्याला वेढा पडल्यावर शनिवारचे दिवशी प्रातःकाळी शाहू राजे व धनाजी जाधव एकत्र बसले होते. तेव्हा शाहू राजे म्हणाले की, ‘आजचे आठवे दिवशी याच वेळेस किल्ला घेऊ’ हे ऐकून जाधवराव हसले. औरंगजेबाने साताऱ्याच्या किल्ला घेण्यास बरीच मेहनत घेतली होती व त्यावेळेस देखील परशुरामपंतच गडावर होते(बहुधा याची आठवण धनाजी जाधवांनी शाहू राजांस करून दिली.) त्यावेळेस शाहू राजांनी उत्तर केले की, ‘मामा साहेब आजचे आठवे दिवशी किल्ला या वेळेस आला हे जाणावे.’
त्यानंतर आठच दिवसात शाहू राजांनी साताऱ्याचा किल्ला सर केला. त्यावेळी धनाजी जाधवांस देखील आश्चर्य वाटले. शाहू राजे पाच हजार फौजेनिशी जातीने किल्ल्यावर गेले. तो पहिला प्रहर दिवसाचा आला. फत्तेची नौबत तेथेच वाजवली. त्या दिवसांपासून मराठ्यांच्या राज्यात शनिवारची नौबत वाजत होती.
संदर्भ:-
१. का.सं.प.या.ले
२. मराठी रियासत खंड ३
३. नागपूरकर भोसल्यांची बखर
#ऐतिहासिक_सत्यकथा
#इतिहासाच्या_पाऊलखुणा
No comments:
Post a Comment