विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 25 July 2019

शिवरायांची कांचनबारीची निर्णायक लढाई ★★

शिवरायांची कांचनबारीची निर्णायक लढाई ★★

★ शिवरायांची कांचनबारीची निर्णायक लढाई ★★
________________________________________

_________________________________________
शिवराय म्हंटले की एक बात जी आपल्या साऱ्यांच्या डोक्यात येते ती म्हणजे ‘गनिमी कावा’. सह्याद्रीच्या डोंगर-दऱ्यांचा फायदा घेऊन लपून-छपून वार करून शत्रूला बेजार करून अगदी कमीतकमी सैन्यानिशी शत्रूला शिकस्त द्यायची. बऱ्यापैकी लढाया या गनिमिकाव्याने झाल्या, परंतु शिवरायांच्या इतिहासात अशा काही लढाया आहेत जिथे मराठे अगदी समोरासमोर रणांगणात येऊन लढले आणि जिंकले सुद्धा. साल्हेरची लढाई जी बऱ्यापैकी आपल्याला माहीत आहे. अशीच एक दुसरी लढाई आहे ती म्हणजे ‘कांचनवारीची लढाई’. इतिहास अभ्यासकांना आणि वाचकांना नक्कीच ही लढाई माहीत असेल पण माझ्यासारख्या सामान्य माणसांना माहीत असावे म्हणून म्हणलं जरा लिहावं.
~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~
१६६६, ज्यावेळी महाराज आग्र्याहून परत आले त्यानंतरचा जो काळ आहे तो महाराजांच्या आक्रमकतेच्या धोरणांचा आहे. आग्र्याहून परत आल्यानंतर औरंगजेबाला पत्र पाठवून काही काळ शांततेत जावा म्हणून औरंगजेबाशी तहाचे बोलणे सुरू केले. तिकडे औरंगजेबाला इराणच्या शहाच्या स्वारीची भीती होती त्यामुळे त्यालाही महाराजांशी काही काळ युद्धामध्ये गुंतून रहायचे नव्हते आणि तहाला होकार दिला. पण दोघांनाही माहीत होते की हा तह काय जास्त दिवस टिकणारा नव्हता आणि झालेही तसेच. १६७० उजाडले आणि फेब्रुवारीमध्ये तानाजी मालुसरे यांनी सिहगड घेतला आणि मग पुढे पुरंदरच्या तहात दिलेले सर्व किल्ले घेण्याचे काम सुरू झाले. स्वराज्याची घडी पुन्हा नव्याने बसवायची फार मोठी जबाबदारी आता महाराजांवर होती कारण अफझलखानानंतर पुढची सात एक वर्षे फार जिकिरीची गेली होती आणि मिर्झाराजे जयसिंगची स्वारी म्हणजे स्वराज्याचे कंबरड मोडण्याचा प्रकार झाला होता. पुन्हा घडी बसवयाची म्हणजे खजिना गरजेचा होता. पैसा बक्कळ लागणार होता हे महाराजांना माहीत होते. ‘रक्कम हाय .. तर भक्कम हाय’ हा कोणत्याही राज्याचा पहिला नियम असतो. आता रक्कम पाहिजे तर मग एकच ठिकाण होते ते म्हणजे ‘सुरत’ आणि अगोदरचा अनुभव होताच. त्यामुळे महाराजांच्या पुढे आता सुरत नाचू लागली होती. सप्टेंबर १६७० च्या सुमारास महाराज पंधरा हजाराची फौज घेऊन कल्याणला आले होते. इंग्रजांना महाराजांचा मनसुबा कदाचित समजला होता आणि महाराज सुरतेवर हल्ला करणार याची बातमी त्यांनी सुरतेला पाठवली होती. सुरतेच्या सुभेदाराने याकडे दुर्लक्ष केले. कारण शिवाजी महाराज सुरतेवर हल्ला करणार आहेत अशा बातम्या अनेकदा त्याला मिळाल्या होत्या त्यामुळे ह्या सर्व अफवा आहेत असे समजून त्याने इंग्रजांची बातमी सुद्धा अफवाच आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले व गाफील राहिला. त्याच्याकडे फक्त ३०० सैन्य होते. अफवा पसरवणे व शत्रूस गाफील ठेवणे हा महाराजांच्या युद्धनीतीचा एक भागच होता हे कदाचित त्या सुभेदाराला माहीत नसावे. पण गडी फसला आणि २ ऑक्टोबर १६७० रोजी महाराज सुरतेमध्ये हजर झाले. सुरतेपासून २० मैलाच्या अंतरावर असताना महाराजांनी सुभेदाराला व काही व्यापाऱ्यांना पत्र पाठवून एकूण महसुलाच्या चौथ्या हिश्श्याची मागणी केली. नक्कीच, ही मागणी मान्य होणार नव्हती आणि सुभेदार सुरतेला जो तट बांधला होता त्यावर विश्वास ठेवून बसला होता. (पहिल्या स्वारीनंतर औरंगजेबाने सुरक्षिततेच्या कारणामुळे सुरतेला एक तट बांधून घेतला होता). मराठे जास्तवेळ वाट बघत बसले नाहीत, तट चढून सगळे सुरतेत घुसले व सुरतेवर छापा टाकला. ४ ऑक्टोबर, लक्ष्मीपूजेचा दिवस, महाराजांना अंदाजे एक कोटींचा खजाना मिळाला. जाळपोळ झाली. जेवढा खजाना मिळाला तो घेऊन महाराजांनी त्वरित सुरत सोडली.
~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~
खजाना, पंधरा हजारांचे सैन्य आणि शेकडो घोडे, बैल वगैरे घेऊन महाराजांनी सुरत सोडली. घोड्यांच्या आणि बैलांच्या पाठीवर खजिना लादला होता. सुरतेच्या पूर्वेला सह्याद्री घाट आहे. तो चढून नाशिकच्या सटाण्याच्या दिशेला तो येतो. त्यामागे महाराज स्वराज्यात येणार होते. साल्हेर-मुल्हेर-सटाणा-वणी-नाशिक-सिन्नर-जुन्नर-खेड मार्गे राजगड असा एकंदरीत परतीचा मार्ग होता. सातमाळची डोंगररांग आडवी येत होती (नाशिक जिल्यातुन सह्याद्रीला भेदत पूर्व-पश्चिम डोंगररांग जाते ती म्हणजे सातमाळ). या डोंगररांगेच्या दक्षिणेला व उत्तरेला मोठी सपाट मैदाने आहेत. या रांगेत अनेक किल्ले आहेत जसे हातगड, धोडप, कांचना वगैरे किल्ले. या रांगेतील ‘कांचन’ किल्ला ज्याच्या पश्चिमेला एक घाट आहे ज्याला ‘कांचनबारी’ असे म्हणतात थोडक्यात खिंड. आजूबाजूचा सर्व भाग आणि बरेचसे किल्ले हे मोगलांकडे होते त्यामुळे कोणाच्याही नजरेत न येता प्रवास करण्याच्या हेतूने महाराजांनी कांचनबारीची खिंड निवडली होती.
महाराज आता मुल्हेरच्या पायथ्याला आले होते. पायथ्याची पेठ महाराजांनी लुटली. मुल्हेरचा किल्लेदार होता नेकनामदार खान. हा गडी काय गडावरून खाली उतरला नाही कारण त्याला माहित होते की आपण मराठ्यांचा सामना करू शकणार नाही. इकडे औरंगाबादला दक्षिणेचा सुभेदार होता खुद्द औरंगजेबाचा मुलगा ‘शह जादा मुअज्जम’. याची महाराजांच्या प्रत्येक हालचालीवर नजर होती आणि वेळोवेळी त्याला बातम्या पोहचत होत्या. त्याने बुऱ्हाणपूरला असलेला मातब्बर मोगल सरदार दाऊदखान कुरेशी याला महाराजांचा समाचार घेण्यासाठी पाठवले. प्रचंड सैन्य घेऊन दाऊदखान मुल्हेरच्या दिशेने निघाला. याच्याबरोबर भीमसेन सक्सेना सुद्धा होता कारण तो त्यावेळी दाऊदखानाचा अधिकारी होता. दाऊदखान येतोय ही बातमी मिळताच महाराजांनी मुल्हेरचा तळ उठवला व दक्षिणेच्या वाटेला लागले. मराठ्यांना जर दक्षिणेत जायचे असेल तर सातमाळ कुठेतरी ओलांडावी लागणार हे दाऊदखानाला माहीत होते परंतु नक्की कुठून ओलांडणार याची खात्री करण्यासाठी तो चांदवड (म्हणजे सातमाळेचे पूर्वेचे टोक) येथे आला. बागीखान हा चांदवडचा फौजदार होता. मराठे कांचनबारी किंवा कांचनमंचनच्या घाटाने सातमाळ ओलांडून नाशिककडे जाणार आहेत ही बातमी त्याला समजली आणि त्याने मराठ्यांना कांचनबरीच्या दक्षिणेला रोखायचे असे ठरवले.
~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~
युद्ध हे होणारच हे महाराजांना अचूक ठाऊक होते. प्रश्न एकच होता की सुरतेवरून आणलेला खजिना कसा राखायचा. खजिन्यासकट पळ काढणे हे शक्य नव्हते आणि काही लोकांना खजिना घेऊन पुढे जाण्यास सांगणे हे ही शक्य नव्हते कारण खजिना पुढे पाठवायचा म्हणजे घोडदळ सोबत द्यावे लागेल कारण पायदळ लवकर पुढे जाणार नाही. जर घोडदळ पुढे पाठवले तर दाऊदखानाचा सामना फक्त पायदळानिशी करणे ही सोपे नव्हते, आणि आपल्या सैनिकांना सुद्धा याची भनक लागू द्यायची नव्हती. शेवटी शिवराय ते शिवरायच, शेवटच्या क्षणाला कोणाच्या डोक्यात कधी येऊच शकणार नाही असे निर्णय घेण्याचे त्यांचे कौशल्य कामी आले. १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री त्यांना समजले की पहाटेच्या वेळी आपली व दाऊदखानाच्या सैन्याची गाठ पडणार. म्हणून रात्रीच्या वेळी खजिना वाहणारी घोडी व बैले पायदळासोबत सप्तशृंगी व वणीच्या मार्गाने पाठवली आणि मुख्य सैन्य दाऊदखानाच्या दिशेने पाठवले.
महाराजांकडे दहा हजारांचे घोडदळ होते आणि घोडदळ प्रमुख प्रतापराव गुजरही सोबत होते. महाराजांचे नियोजन असे होते की काही तासात दाऊदखानाचा फडशा पडायचा आणि दिवस मावळेपर्यंत खजिन्याचा दिशेने निघायचे.
~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~
दाऊदखानाने आपल्या सैन्याचे दोन भाग केले होते. इखलासखान घोडेस्वारांची एक मोठी तुकडी घेऊन कांचन किल्ल्याच्या पायथ्याला आला होता. एका उंचवट्यावर उभे राहून त्याने पाहिले तर मराठे युद्धाच्या तयारीने उभे असल्याचे त्याला दिसले आणि खुद्द शिवाजी महाराज चिलखत घालून , दोन्ही हातात पट्टे चढवून फिरत होते. या युद्धाचे नेतृत्व स्वतः शिवाजी महाराज करत होते. (हे वाक्य वाचल्यावर माझ्यातरी अंगावर काटा येतो बर का ).
या युद्धामध्ये मराठयांना मुख्य धोका हा खानाच्या तोफखान्याचा होता. इखसालखानाने आपला तोफखाना पुढे आणून हंड्या डोंगराच्या खालच्या पठारावर उभा केला होता. आपल्या उजव्या हाताला मोगलांचा तोफखाना उभा राहत आहे हे महाराजांच्या लक्षात येताच एक तुकडी पाठवून मोगलांचा संपूर्ण तोफखाना उध्वस्त करून टाकला. इखसालखानाला बसलेला हा मराठ्यांचा पहिला फटका होता जिथे त्याचा मुख्य डावच फसला होता.
महाराजांनी या युद्धात ‘तुलूघ्मे’ पद्धतीचा वापर केला. म्हणजे शत्रूला चारी बाजूने कोंडीत पकडायचे. महाराजांनी आपल्या घोडदळाचे चार भाग केले. इखलासखान आपल्या सैन्यासोबत खिंडीच्या दक्षिण बाजूस होता. महाराजांनी आपली एक तुकडी पश्चिमेच्या बाजूने वळसा घालून खानाच्या पिछाडीला धाडली. दोन तुकड्या खानाच्या सैन्याच्या उजव्या व डाव्या बाजूने पाठवल्या, आणि शेवटची तुकडी जिचे नेतृत्व राजे स्वतः करीत होते खिंडीतच खानाचा समोरून सामना करण्यासाठी थांबली. मराठ्यांनी चारी बाजूने एवढे वेगवान हल्ले केले की, ना खानाला ना त्याच्या सैन्याला समजले की आपण कोंडले गेलो आहोत. खान तसा निडर होता तो जोमाने मराठ्यांवर धावून गेला परंतु त्याच्यावर तलवारीचे अनेक वार झाले व तो जखमी होऊन घोड्यावरून खाली पडला. पहाटेच्या वेळी हे युद्ध सुरु झाले होते आता सूर्य उजाडला होता. दाऊदखान सुद्धा आपली दुसरी तुकडी घेऊन कांचन किल्ल्याच्या पायथ्याला आला होता. आता नव्या दमाच्या सैन्याचा मराठ्यांवर हल्ला होणार होता. परंतु हे सैन्य सुद्धा चारी बाजूने कोंडले गेले. मराठे दाऊदखानाच्या सैन्याच्या भोवती घिरट्या घालू लागले. दाऊदखानाने मोठ्या हिमतीने आपल्या तुकडीनिशी हल्ला करून जखमी इखलासखानाला बाहेर काढले. पण दाऊदखानाच्या सैन्याचा मराठ्यांपुढे टिकाव लागला नाही. दाऊदखानाची फौज खचली होती. मोगलांचे २००० सैन्य मारले गेले,काही पळून गेले. आता मराठ्यांनी मोगलांच्या तोफखान्यावर हल्ला केला. तोफखान्याचे निशाण व घोडे काबीज केले. हे युद्ध अंदाजे सहा तास चालले. उरले सुरले मोगल आपल्या तळावर पळून गेले पण मराठ्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांचे तळ लुटले आणि हे युद्ध जिंकले. सुरतेवरून आणलेल्या खजिन्यात आणखीन भर पडली.
या युद्धामध्ये महाराजांबरोबर प्रतापराव गुजर, मकाजी, आनंदराव, बंकाजी दत्तो, मोरोपंत पिंगळे, निळोपंत, अण्णाजीपंत, दत्ताजीपंत व बालप्रभु चिटणीस अशी मंडळी होती.
दाऊदखानाबरोबर मीर अब्दुल मबुद, इखसालखान मियाना, राय मकरंद खत्री, गालीबखान, नारोजी, बसवंतराय, शेख सफी, संग्रामखान घोरी, भान पुरोहित अशी काही सरदार मंडळी होती.
~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~
हे युद्ध अतिशय महत्वाचे असे होते. या युद्धाचे वैशिष्ट्य म्हणजे, मोगलांशी समोरासमोर झालेली व जिंकलेली अशी ही लढाई. याचे नेतृत्व खुद्द महाराजांनी केले होते. या युद्धाची रणनीती अतिशय जबरदस्त होती. शत्रूच्या मुलखात जाऊन समोरासमोर ही लढाई महाराजांनी केली. दाऊदखानासारखा मातब्बर मोगल सरदार सुद्धा या युद्धनीतीपुढे टिकू शकला नाही. दाऊदखान म्हणजे मोगलांचा दक्षिणेतला प्रबळ सेनानी होता. तो हरल्यामुळे आता दक्षिणेत मोगलांचा एकही सेनापती अथवा सुभेदार नव्हता जो मराठ्यांपुढे उभा राहील. म्हणून कदाचित स्वतः औरंगजेब पुन्हा दक्षिणेत उतरला असावा. ही लढाई तशी निर्णायक लढाई होती कारण या लढाईनंतर मोगलांचा एकही मातब्बर सरदार उरला नव्हता जो महाराजांच्यावर चालून जाईल. या लढाईमुळे दक्षिणेतील मोगलांची विश्वनियता कमी झाली. यानंतर महाराजांनी मोगलांच्या अनेक प्रदेशावर छापे टाकून ती जिंकून घेतली आणि अगदी बुऱ्हाणपूरपर्यंत आपल्या फौजा नेल्या. वऱ्हाडातील कारंजा या संपन्न शहरावर हल्ला करुन ते जिंकले व त्यातून जवळपास एक कोटींचा खजिना स्वराज्याच्या तिजोरीत आला.
कांचनबारीच्या लढाईचा नकाशा सोबत जोडला आहे ज्यामध्ये महाराजांनी केलेली मोगलांची चारी बाजूने कोंडी समजू शकेल.
संदर्भ: वेध महामानवाचा, शककर्ते शिवराय.
#जागर_इतिहासाचा

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...