पानिपतची ३री लढाई.
युद्धाचे परिणाम:
मराठ्यांची दुर्दशा: पानिपतचे
तिसरे युद्ध हे भारताच्या इतिहासात निर्णायक व दूरगामी परिणाम करणारे
ठरले. इंग्रज इतिहासकार एल्फीस्टनच्या मते पानिपतमध्ये मराठ्यांचा जसा
सर्वांगीण व पूर्ण पराभव झाला असा क्वचितच कोणाचा झाला असेल, त्यामुळे
मराठ्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. या पराभवाच्या धक्क्यातून पेशवा व
त्याचे मराठा राज्य हे कधीच सावरले गेले नाही. १४ जानेवारी १७६१ हा दिवस
मराठ्यांच्या दृष्टीने महाप्रलयच ठरला. दुसरे दिवशी अनुपगीर गोसावी व
काशीराज यांनी रणक्षेत्राला भेट दिली. तेव्हा त्यांना प्रेतांचे ३२ ढीग
दिसून आले. त्यात २८ हजार प्रेते होती, दूरपर्यंत प्रेतांचे खच पडले होते.
या लढाईत ९० हजार स्त्रियांना व मुलांना गुलाम बनविण्यात आले. भाऊसाहेब,
विश्वासराव, इब्राहीमखान, यशवंतराव पवार, तुकोजी शिंदे, जनकोजी शिंदे ही
मातब्बर मंडळी मारली गेली. मराठ्यांची कर्ती पिढीच या लढाईत नष्ट झाली.
पानिपतमधून वाचलेले मराठे १५ दिवसांनी ग्वाल्हेरला पोहोचले. सुरजमल जाटने
२० हजार नग्न मराठ्यांना घोंगड्या व प्रत्येकी २ रूपये दिले. इतकी दुर्दशा
मराठ्यांची झाली होती. पानिपतमधील पराभवामुळे उत्तरेत मराठ्यांच्या
तलवारीचा धाकही नष्ट झाला.
अब्दालीचा शेवटचा विजय:
या लढाईत अब्दालीला मोठा विजय प्राप्त झाला असला तरी त्याला फार मोठा लाभ
झाला असे म्हणता येणार नाही. उपासमारीने मरणार्या मराठ्यांच्या छावणीत
द्रव्याची लूट कोठून मिळणार? दिल्लीतही संपत्ती आधीच लुटली गेल्यामुळे तेथे
जाऊनही अब्दालीच्या हाती फारसे काही लागले नाही. उजाड झालेल्या व भयानक
उदासीनता पसरलेल्या उत्तरेत अधिक काळ राहण्यास अब्दालीच्या सैन्याने नकार
दिला. अब्दालीला मात्र सधन पंजाब कायमस्वरूपी आपल्या ताब्यात असावा असे
वाटत होते. त्यामुळे मायदेशी जातांना तो पंजाबमध्ये गेला असता त्याला
शीखांचा प्रचंड प्रतिकार सहन करावा लागला. शीखांनी अब्दालीशी १७६७ पर्यंत
संघर्ष करून पंजाब मुक्त केला. अब्दालीचे सर्व परिश्रम वाया गेले. १४
एप्रिल १७७२ मध्ये त्याचा मृत्यु झाला.
नानासाहेबांचा मृत्यु :
पानिपतमध्ये भाऊ संकटात असल्याची खबर पेशव्यांना उशिरा समजली तरीही
त्यांनी उत्तरेत जाण्याची तयारी केली. मार्गक्रमण करीत असता उत्तरेतील
बातम्या येणेच बंद झाल्याने नानासाहेब चिंतातुर झाले. भेलसा येथे मुक्कामी
असताना २४ जानेवारीस पानिपतच्या पराभवाची बातमी मिळाली. त्यांना मिळालेल्या
सांकेतिक पत्रात दोन मोती गळाले, २७ मोहोरा गमावल्या, चांदी व तांब्याची
नाणी किती गेली याची गणतीच नाही, असा निरोप होता. भाऊ, मुलगा व अनेक
नातेवाईकांच्या मृत्युचा नानासाहेबांना मोठा धक्का बसला, त्यांची मनःशांती
नष्ट झाली. दिल्लीत न जाता त्यांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला. पानिपतवर
कुचराई केल्याबद्दल पेशव्यांनी शिंदे, होळकर, पवार यांच्या महालांची जप्ती
केली पण ती काही काळापुरतीच! दिवसेंदिवस नानासाहेब भ्रमिष्ठ होऊन तब्येत
खालावत गेली. त्यातच २३ जून १७६१ रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि मराठेशाहीला
आणखी एक धक्का बसला.
मोगलांची दुर्दशा:
पानिपतच्या विजयानंतर अब्दालीने दिल्लीचा ताबा घेतला. मोगल बादशहा शहाआलम
हा दिल्लीतून पळून गेला होता व त्याने अलाहाबादमध्ये आश्रय घेतला होता.
रक्षणकर्त्या मराठ्यांचा नाश झाल्याने मोगल सत्तेला जबरदस्त धक्का बसला.
अब्दाली मायदेशी निघून गेल्यानंतर दिल्लीची सत्ता नजीबखानाने मिळवली. मोगल
साम्राज्य माधवरावाच्या काळात पुन्हा सत्तेवर आले असले तरी केवळ ते
नाममात्रच होते.
इंग्रजांचा वाढता प्रभाव:
नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत मराठे संपूर्ण हिंदूस्थानात अंमल बसवीत
असतांना मोगल साम्राज्याती सधन अशा बंगाल सुभ्यात इंग्रज आपल्या बुद्धीने व
हिंमतीने राज्यसाधना करीत होते. पानिपतच्या लढाईमुळे मोगली राज्यासाठी
भांडणार्या मराठे व मुसलमान सत्ता दुर्बळ झाल्या व त्याचा फायदा नवी उदय
पावणार्य इंग्रजी सत्तेला मिळाला. मराठ्यांच्या पराभवामुळे उत्तर
हिंदूस्थानात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्याचे कार्य
इंग्रजी सत्तेने केले.
शीखांची सत्ता स्थापना:
पानिपतच्या लढाईपूर्वी पंजाबमध्ये मोगल, मराठे, अब्दाली व शीख यांच्यात
प्रखर सत्तास्पर्धा सुरू होती. पंजाबचे मूळ मालक शीख असूनही पंजाब
त्यांच्या मालकीचा होऊ शकत नव्हता. कधी मोगलांच्या, कधी अब्दालीच्या तर कधी
मराठ्यांच्या ताब्यात जात होता. सरहद्दीवरील प्रदेश असल्यामुळे सतत परक्या
आक्रमणाचा धोका असल्याने शीखांना त्यांच्या अत्याचारांना कायम तोंड द्यावे
लागत होते. पानिपत युद्धामुळे ही परिस्थिती बदलली. मराठ्यांचा पराभव झाला व
अब्दालीही अफगाणमध्ये निघून गेला त्यामुळे पंजाबमध्ये शीखांची सत्ता
स्थापन होऊ शकली.
हैदरअलीचा उदय:
पानिपतच्या पराभवामूळे कर्नाटकातून मराठ्यांचा पाया उखडला गेला.
मराठ्यांनी कर्नाटकचा प्रदेश पूर्णपणे जिंकला होता. पानिपतच्या पराभवामुळे
पुढे काही काळ त्यांना कर्नाटककडे लक्ष देण्यास सवड मिळाली नाही. याचा
फायदा घेऊन म्हैसुरच्या हिंदू राजाची सत्ता नष्ट करून महत्त्वाकांक्षी व
धाडसी हैदरअलीने आपली सत्ता स्थापन केली. हैदरअलीच्या उदयामुळे
मराठ्यांच्या शत्रूंमध्ये आणखी एका शत्रूची वाढ झाली कारण पुढील काळात
हैदरअलीने हयातभर व त्याच्यानंतर त्याच्या मुलाने टिपू सुलतानने मराठ्यांना
कायम त्रास दिला. पानिपतचे युद्ध झाले नसते किंवा या युद्धात मराठ्यांचा
विजय झाला असता तर मराठ्यांनी हैदरला डोके वर काढून दिले नसते हे सुद्धा
तितकेच खरे आहे.
माधवराव पेशव्यांचा उदय:
नानासाहेबांना विश्वासराव, माधवराव व नारायणराव ही तीन मुले होती.
परंपरेनुसार नानासाहेबांनंतर पेशवेपदावर त्यांचा मोठा मुलगा विश्वासरावचा
अधिकार होता. परंतु नियतीला ते मान्य नव्हते. पानिपतच्या संग्रामात
लढता-लढता विश्वासराव ठार झाला व लवकरच नानासाहेबांचाही मृत्यु झाला.
त्यामुळे दरबारात नानासाहेबांच्या दुसर्या मुलाला म्हणजे माधवरावला
पेशवेपद देण्याचा निर्णय घेतला गेला आणि माधवरावाने आपल्या कर्तबगारीच्या
जोरावर अत्यंत कमी काळात पानिपतच्या पराभवाचा कलंक पुसून टाकला.
No comments:
Post a Comment