सयिन्दक अर्थात शिंदे राजकुळाचा इतिहास
---------------
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख
..............✍️
शिंदे राजवंश हा मूळचा दक्षिणेतील राजवंश. सयिन्दक, सेंद्रक, सिंद, शिंद, शिंदे अशा नावाने इतिहासात दिसणारी सर्व आडनावे एकच वाटतात. त्यापासून शिंद शब्द तयार झाला असावा असे वाटते. सयिन्दक शब्दाचेच संस्कृत रूप सेंद्रक होते, यावरून सेंद्रक आणि शिंद हे बहुदा एकच असावेत असे दिसून येते.
श्लोक :
----------
'दृष्टीविषकुळतिळक फणामणिकिरणविभासुर नाग वंशोद्भव'
-----------
प्राचीन भारतातील इतिहासात वरील आडनावाने या घराण्यातील नोंदी सापडतात. इतिहासाची पाने चाळल्यानंतर या राजघराण्यातील राजे सामंत, महासामंत राहिलेले अधिक दिसतात. यांची स्वतंत्र एखादी मोठी राजसत्ता असल्याचे इतिहासातील या नोंदी पाहून दिसत नाही. या राजवंशातील अनेक राजांचे पराक्रम अणि इतिहास वाचायला मिळतात. शिंद यांचे 'भोगावतीपुरपरमेश्वर', 'बृहत' अशी काही बिरुदेही आढळून येतात.
सिंद यांची लिखित इतिहासातील पहिली नोंद इ.सनाच्या चौथ्या शतकात मिळते. त्यावरून सध्याच्या म्हैसूर राज्याच्या प्रदेशातच हे सिंद राजे राज्य करत असावेत असे दिसते. 'सयिन्दक' हा शब्द मयूरशर्माच्या चंद्रवली येथील शिलालेखात प्रथम आलेला आहे. त्याने सयिन्दक प्रदेश जिंकल्याचा उल्लेख केला आहे. यावरून सयिन्दक अथवा शिंद राजांनी इ. सन ३३० ते ३६० पूर्वी काही वर्ष तरी आपले राज्य स्थापन केले असावे. त्यांच्या राज्याचा निश्चित प्रदेश कोणता याचा उल्लेख केलेला नाही. डॉ. दिनेशचन्द्र सरकार यांनी सेंद्रक यांचा प्रदेश म्हैसूर राज्यात होता, पुढे तो कदंब राजांनी जिंकला म्हणून शिंदे राजांना त्यांचे मांडलिक व्हावे लागले असे म्हटले आहे. एका अभिलेखिय नोंदीनुसार कदंब राजा द्वितीय कृष्णवर्मा हा वैजयंती अर्थात वनवासी येथे जात असताना त्याने सेंद्रक जिल्ह्यातील पलमडी गाव दान दिल्याचा उल्लेख आहे. यावरून बनवासीच्या आसपास सेंद्रकांचा प्रदेश असावा असा अंदाज वाटतो.
चाळुक्य नृपती कीर्तीवर्मा पहिला याच्या सहाव्या शतकातील शिलालेखात अडुर येथे माधवती शिंद यांचे राज्य होते असे म्हटले आहे. यावरून शिंदे राजांचा प्रदेश धारवाडच्या आसपास असावा असे दिसते. कीर्तिवर्मन चाळुक्य याची राणी सेंद्रक वंशातील होती. बदामी नरेश पुलकेशी(।।) व वेंगी नरेश विष्णुवर्धन ही दोन्हीही तिचीच मुले. पुलकेशी चाळुक्य याने त्याचा नातेवाईक सेनानंदराज सेंद्रक(शिंदे) यास
उत्तर कोकणातील चिपळून विभागावर सर्वाधिकारी म्हणून नियुक्त केले होते.
पश्चिम गंग नृपती श्रीपुरुष-पृथ्वी-कोंगुणी त्याच्या एका अभिलेखिय साधनात सिंद विषयाचा उल्लेख आलेला आहे. रईस यांच्या म्हणण्याप्रमाणे हा प्रदेश म्हैसूरच्या उत्तरेला असून तो धारवाड विजापूरच्या काही भागापर्यंत पसरलेला होता. एका ताम्रपटातील नोंदीनुसार असे दिसते की इ.सन ८०५ मध्ये सिंद राजे त्या भोवतालच्या प्रदेशात राष्ट्रकूट सम्राटांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. 'श्रीशुगुट्टरू' ही बहुतेक सिंद राजवंशाची राजधानी असावी. तेथील शिंद राजा नागहस्ती याने शिंद कुळाला 'बृहत' हे विशेषण लावले आहे.
नागहस्ती या शिंद कुळातील राजाचे वर्णन एका ठिकाणी वाचायला मिळते. याचे फणींद्र वंशाच्या आकाशात विराजमान झालेला आदित्य (सूर्य), श्रीरिपुसेव्य (शत्रुकडून सेवेला पात्र असलेला), असे वर्णन केलेले आढळते. फणींद्र म्हणजे सर्पांचा राजा या पासून शिंदे वंशातील राजे आपली उत्पत्ती लावतात ही बाब इतिहासप्रसिद्ध आहे.
चाळुक्य नृपती सत्याश्रय याच्या एका शिलालेखात दुर्गशक्ती सिंदचा उल्लेख समकालीन म्हणून केलेला असून तो 'भुजगेंद्रान्वय' म्हणजे सर्प राजाच्या कुळातील विजयशक्तीच्या कुंदशक्ती नामक पुत्राचा मुलगा असल्याचे सांगितले आहे. एका शिलालेखात सिंद नारायण पुलीकाळ (चाळुक्य नृपती तैल दुसरा याचा समवयीन) याच्यापासून तो पोलसिंद याचा पुत्र सेव्यरस (चाळुक्य नृपती दुसरा सोमेश्वर याचा समकालीन) पर्यंत बागलकोट येथील सिंद राजकुळाचा सविस्तर वृत्तान्त आलेला आहे.
शिंद यांच्या ध्वजावर किंवा पताकेवर नागचिन्ह असते. त्यांचे लांछन व्याघ्राचे असून आपण सर्वश्रेष्ठ अशा भोगावतीचे परंपरागत स्वामी म्हणजे 'भोगावतीपुरपरमेश्वर' असे त्यांचे म्हणणे आहे. या कुळाचा मूळपुरुष अजानुबाहू शिंदे असून तो सिंधू नदीच्या प्रदेशातील अहिच्छत्र गावी धरणेंद्राला झालेला मानुष पुत्र होता. त्याचे पालनपोषण एका व्याघ्राने केले होते. कदंब राजकन्येशी त्याचे लग्न होऊन तिच्यापासून त्याला तीन मुले झाली त्यांनीच शिंद वंश रूढ केला.
शके ११६५ मधील एका लेखातही शिंदे कुळाचा इतिहास आला आहे. त्याच्यातही त्यांचा मूळ पुरुष अजानबाहू शिंद हाच दाखवला असून तो भगवान शिव व सिंधू नदी यांच्या मिलनातून जन्मलेला आणि नागराजाने वाघाच्या दुधावर वाढवलेला असे वर्णन आलेले आहे. त्याने कर्हाटक येथे स्वतःसाठी स्वतंत्र राज्य स्थापन केले. कर्नाटक भोवतालच्या प्रदेशावर त्याचे राज्य होते. अजून एका शिलालेखात सिंद कुळातील एका राजाच्या पदव्यांची मोठी यादी आली आहे. सिंद महाराजा शिंदवाडी, बेल्लारी भागात राज्य करत होता. दुर्दैवाने शिलालेखातील राजाचे नाव नष्ट झालेले आहे त्याच्या एका पदवी वरून दृष्टीविष म्हणजे तो नागाच्या वंशात जन्मलेला होता.
आदित्यवर्मा सिंद याची शाखा जुन्नर येथे राज्य करीत होती. तो स्वतःला 'दृष्टीविषफणीन्द्रवंशोद्भव सिन्दान्वयप्रसूत:' म्हणजे दृष्टी विष नागाच्या वंशातून उत्पन्न झालेल्या शिंद कुळात जन्मलेला म्हटले आहे. शिंद नारायण पुलिकाळ याने देखील स्वतःला 'दृष्टिविषकुलतिलक' म्हणून संबोधले आहे. यावरून आदित्यवर्माचा शिंदवंश हा शिंद नारायण पुलिकाळ याच्याच वंशाची शाखा असावी असे वाटते.
विक्रमादित्य चाळुक्य षष्ठ चा विश्वासू मांडलिक अचुगी सिंद याने इ.स.११२२ मधे होयसळाचा पराभव करून त्यास चाळुक्यांचे स्वामित्व स्वीकारावे लावले होते. शिवाय गंगवाडीचे होयसळ व गोव्याचे कदंबांनी चाळुक्य राज्याविरुद्ध केलेले बंड जगदेवकमल्ल(॥) याने सिंद परमार्डीदेवाच्या मदतीने
मोडून काढले होते.
शिंद राजवंशातील लोक दक्षिणेतील (मुस्लिम पूर्वकाळातील) चाळुक्य (साळुंखे), यादव (जाधव), शिलाहार (शेलार), काकतीय (काकडे), कदंब (कदम बांडे), कलचुरी (सुरवसे सूर्यवंशी), निकुंभ (निकम), राष्ट्रकूट इत्यादी उच्चकुलीन मराठा राजवंशाचे नातेवाईक दिसतात.
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
9422241339,
9922241339.
No comments:
Post a Comment