कदम इंद्रोजी - कदम घराण्यांतील एक शाखेंत कंठाजी कदमाच्याच काळांत इंद्रोजी कदम या नांवाचा एक प्रख्यात मराठा सरदार होऊन गेला. हा सातारा जिल्ह्यांतील साप गांवचा राहणारा असून, आपल्या पराक्रमाच्या जोरावर फार योग्यतेस चढला होता. शाहू महाराज दक्षिणेंत येऊन त्यांनीं सातारा येथील छत्रपतींच्या गादीवर आरोहण केलें त्यावेळीं इंद्रोजी कदम याचें प्राबल्य महाराष्ट्रामध्यें इतकें होतें कीं त्याचें नांव केवळ कर्दन काळासारखें वाटत होतें. त्याच्या शौर्यप्रभावाप्रमाणें त्याचें वैभव व थाटहि फार मोठा होता. त्याच्या जवळ ७०० निवडक सैन्य असून घोडेस्वारहि बरेच होते. तो आपल्या शौर्यप्रभावाच्या योगानें इतका गर्विष्ठ व प्रमत्त झाला होता कीं, त्यास आपल्यापुढें सर्व जग तुच्छ दिसत असे. एवढेंच नव्हे तर त्यानें आपल्या पागेंतील खाशा घोड्यांस रुप्याचे नाल लावून, असा हुकूम सोडला होता कीं, हे रुप्याचे नाल पागेंतील लोकांनीं न घेतां, शत्रूच्या हद्दींत पडूं द्यावे व ते परक्या लोकांनीं पाहून आपल्या वैभवाचें कौतुक करावें. एके वेळीं शाहू महाराजांच्या कानांवर इंद्रोजी कदम याच्या गर्विष्ठपणाची हकीकत सादर झाली. तेव्हां त्यानीं मुद्दाम त्यास निमंत्रण करून सातार्यास बोलाविलें. इंद्रोजी कदम मोठ्या थाटानें आपल्या सैन्यानिशीं सातारा येथें आला व आदितवार पेठेंतील माळावर तळ देऊन राहिला. त्यानें शाहू महाराजांस असा निरोप पाठविला कीं, ''तुमचे पेशवे मुख्य प्रधान तुम्हांस भेटावयास आले म्हणजे लष्करच्या नौबदी व नगारे बंद करितात, त्याप्रमाणें मी करणार नाहीं. मी माझ्या सर्व इतमामानिशीं डंकेनौबदी वाजवीत तुमच्या भेटीस येईन.'' शाहूमहाराजांनीं त्याप्रमाणें त्यास परवानगी दिली व त्याची रंगमहाल राजवाड्यांतील मुख्य दरबारांत भेट घेण्याची योजना केली. इंद्रोजी कदम यास आपल्या वैभवाचें प्रदर्शन करण्याची फार हौस असल्यामुळें, तो आपल्या सर्व सैन्यास कडीतोडे घालून व आपण स्वतः नाना प्रकारचे रत्नालंकार परिधान करून शाहूमहाराजांचे भेटीसाठीं नगारे व नौबदी वाजवीत राजवाड्यांत आला. शाहूमहाराजांस त्याचा हा डामडौलपणा पाहून फार तिरसकार वाटला. परंतु त्यांनीं तो व्यक्त न करतां, मुद्दाम त्याचा गर्वपरिहार करण्याच्या उद्देशानें आपलें स्वतःचें जडजवाहीर व रत्नालंकार आपल्या खंड्या कुत्र्याच्या अंगावर घातले आणि आपण अगदीं साधा सफेत पोषाख घालून दरबारास आले. इकडे इंद्रोजी कदम मोठ्या थाटानें व दिमाखानें आपल्या रत्नालंकारांचें प्रदर्शन करीत शाहूमहाराजांच्या भेटीस आला. त्याची अशी कल्पना होती कीं, शाहूमहाराजांच्या दरबारांतील अष्टप्रधान व उमराव हे माझें बहुमूल्य जवाहीर पाहून दिपून जातील आणि खुद्द शाहूमहाराज माझें वैभव पाहून खालीं मान घालतील. परंतु दरबारांत प्रवेश करितांच सर्व सरदार लोक व खुद्द शाहूमहाराज यांचा साधेपणा व शुभ्र पोषाख पाहून त्यास फार आश्चर्य वाटलें, व खंड्या कुत्र्याखेरीज दुसर्या कोणाच्याहि अंगावर अलंकार नसलेले पाहून तो मनांत फार ओशाळला व लज्जित झाला. आणि शाहूमहाराज छत्रपति हे केवळ अवतारी पुरुष आहेत, त्यांचा मी विनाकारण अपमान करण्याची पापबुद्धि मनांत धरिली, असा पश्चात्ताप पावून त्यानें शाहूमहाराजांच्या पायांवर डोई ठेविली आणि त्यांची क्षमा मागितली. शाहूमहाराजांनीं क्षमा करून त्याचा योग्य आदरसत्कार केला. इंद्रोजी कदम यानें शाहूमहाराज यांस सोन्याच्या मोहरांचें सिंहासन करून त्यांजवर बसविलें व आपल्या जवळचें जडजवाहीर त्यांस अर्पण केलें. महाराजांनीं त्यास व त्याच्या पदरच्या लोकांस मोठी मेजवानी देऊन पोषाख बक्षीस दिले. तेव्हांपासून इंद्रोजी कदम याचें नांव सातारच्या दरबारांत फार प्रसिद्धीस आलें. शाहूमहाराज मनुष्याची परीक्षा करण्यांत कसे चतुर असत व दुसर्या कोणाचाहि गर्व कसा युक्तीनें परिहार करीत ह्याची ह्या आख्यायिकेवरून साक्ष पटते. इ.स. १७३७ (मार्च) मध्ये बाजीराव साहेबांनीं झील तलाव (दिल्ली) येथें दिल्लीकर मोगलांचा जो पराभव केला, त्या लढाईंत ''इंद्रोजी कदम यांसी बोटास गोळी लागोन दोन बोटें उडोन गेलीं.'' या वेळीं इंद्रोजी हा राणोजी शिंदे यांच्या हाताखाली सरदार होता. पुढें रामराजे यांनां बार्शी पानगांवहून आणविण्याकरितां जी पेशव्यांची विश्वासाची मंडळी गेली होती. तीत इंद्रोजीहि होता (जानेवारी १७५०) (इ.सं. ५.७; म.रि.म.वि.).
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Tuesday, 10 December 2019
Subscribe to:
Post Comments (Atom)
“कोरलाईचा किल्ला”.
१३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
*राणूबाई भोसले-जाधव* राणूबाई म्हणजे शंभूराजांची दुसरी आईच.शंभूराजांचा जन्म झाला त्या दिवशी बेभान होणाऱ्या म्हणजे "राणूबाई".त्यां...
-
## धनगर व माळी समाजातील लढवय्ये ## दामाजी थोरात postsaambhar:Udaykumar Jagtap ## ## ## नायगाव ,तालुका -पुरंदर जिल्हा -पुणे , गा...
No comments:
Post a Comment