फक्त मूठभर मावळ्यांनी ३०००० मुघल सैन्याची अक्षरशः धूळधाण केली.
शिवाजी राजे व मुघल सरदार कारतलब खान ह्यांच्यात २ फेब्रुवारी १६६१ रोजी ही लढाई झाली. उत्तर कोकण काबिज करण्यासाठी निघालेल्या मुघल सैन्याला शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने उंबरखिंडच्या दरीत गनिमी कावा पद्धतीने हल्ला करुन मुघल सैन्याचा पूर्ण पराभव केला.
२ फेब्रुवारी इ.स.१६६१ ला कारतलब खानाच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्य पुण्याहून निघून लोहगडाच्या बाजूने बोर घाटाकडे न जाता घाटमाथ्यावरुन उंबरखिंडीच्या दिशेस उतरु लागले. नळीसारख्या बारिक वाटेने मुघल सैन्य सह्याद्री डोंगर उतरत होते. घाट उतरुन मुघल सैन्य पुढे उंबरखिंडीत आले. उंबरखिंडच्या घनदाट अरण्यात लपून बसलेल्या शिवाजी राजांच्या सैन्याने मुघलांवर बाणांच्या वर्षावाने व तोफांच्या गोळ्यांनी हल्ला सुरू केला.
मुघल सरदार मित्रसेन व अमरसिंह यांनीही मराठा सैन्याचा बाणांचा हल्ला करुन प्रतिकार करण्यास सुरुवात केला. जंगलात व डोंगरावरुन गनिमी कावा पद्धतीने युद्ध करणार्या मराठा सैन्याला घाबरुन मुघल सैनिक मार्ग मिळेल तेथे पळत होते. पण सर्व मार्ग शिवाजी राजांच्या सैन्याने अडवून धरले होते. मुघल सैन्याचे मराठा सैन्याकडून प्रचंड हाल होत असताना रायबाघण यांच्या सल्लावरुन कारतलब खानाने तह करण्यासाठी शिवाजी राजांकडे दूत पाठवला.
पाठीवर बाणांचे भाते , एका हातात धनुष्य व दुसर्या हातात भाला , कमरेला तलवार , मस्तकावर शिरस्त्राण, शरीरावर चिलखत व ढाल ह्या युद्धसज्ज वेशात शिवाजी राजे घोड्यावर बसलेले होते.
कारतलब खानाचा दूत शिवाजीराजांकडे आला व "कारतलब खान पूर्ण शरणागती पत्करतो आहे व ह्या प्रदेशातून बाहेर पडण्यासाठी परवानगी मागत आहे." हा संदेश दुताने शिवाजी राजांना दिला. शिवाजी राजांनी विनंती मान्य करुन , कारतलब खानाला मुघल सैन्यासह निघून जाण्यास सांगितले. हा संदेश दूताने कारतलब खानाकडे पोहोचवला. तेव्हा कारतलब खान, मित्रसेन व इतर मुघल सरदारांनी शिवाजी राजांना खंडणी पाठवली. मुघलांकडून महाराजांना मोठ्या प्रमाणात घोडे, हत्यारे, दारुगोळा खंडणी स्वरूपात मिळाला. उंबरखिंडीच्या वेगवेगळ्या भागात लढत असलेल्या मराठा सैन्याला युद्धबंदीचा संदेश देण्यात आला व मुघल सैन्याला आल्या वाटेने परत पाठवण्यात आले.
युद्धात हरलेल्या मुघलांनी परत हल्ला केला तर त्यांचा बंदोबस्त करता यावा म्हणून शिवाजी राजांनी सेनापती नेताजी पालकर यांना उंबरखिंडच्या परिसरात म्हणजेच उत्तर कोकणात ठेवले व शिवाजी राजे स्वतः दाभोळ, शृंगारपुर च्या दिशेस दक्षिण कोकणच्या मोहिमेवर गेले.
No comments:
Post a Comment