शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक व निधनाच्या काळात स्वराज्याची सेना एक मातब्बर फौज बनली होती - घोडदळ आणि पायदळ मिळून २ लाखाच्या आसपास सैन्य स्वराज्याच्या पदरी होते. नक्कीच ह्या सैन्याला संभाजी महाराजांच्या काळात अजून बळकटी मिळाली असणार. त्यामुळे एक प्रश्न साहजिक मनात येतो - अशा जीवावर उदार होऊन लढणाऱ्या आणि अभूतपूर्व पराक्रम गाजवणाऱ्या मर्दानी फौजेनी संभाजी महाराज फितुरीने पकडले गेल्यावर त्यांच्या सुटकेचे काहीच प्रयत्न का केले नाहीत ? जवळपास सगळेच पुरातन ऐतिहासिक ग्रंथ ह्या प्रश्नावर मौन बाळगून आहेत - कुठेही असे काही प्रयत्त्न झाल्याचा भक्कम संदर्भ लागत नाही. त्यामुळे असे वाटते की ह्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच त्या वेळच्या घटनाक्रम आणि परिस्थती ह्यांच्या ओघात लपले असणार .
मोगलांविरुद्ध मराठा फौजेच्या बहुसंख्य आघाड्या
मोगलांनी आधीच सुमारे दोनच वर्षांच्या काळात बिजापूर आणि हैदराबाद काबीज केले होते - परिणामी आदिलशाही आणि कुतुबशाही संपुष्टात आणून त्यांचा बराचसा प्रदेश मोगलाईत जिंकून घेतला होता. आता मोगलांची सगळी शक्ती एकवटली होती ते केवळ एका ध्येया भोवती - स्वराज्यावर हल्ला करून ते गिळंकृत करणे. औरंगजेबाची छावणी ह्या काळात भीमा नदीच्या तीरावर अकलूज येथे होती. मोगल फौजा आता उत्तर सीमेवर साल्हेर, कल्याण-भिवंडी पासून पूर्वेला औरंगाबाद-अहमदनगर ते दक्षिणेला पन्हाळा आणि कर्नाटकातही तळ ठोकून होत्या. मराठा सैन्य ह्या सर्व आघाड्यांवर मोगल फौजेचा कडवा प्रतिकार करत होतं. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की संख्यात्मक द्रुष्टिने बघितले तर अवघी २ लाख मर्द मराठा फौज ५ लाख मोगल फौजेशी लढा देत होती. त्यातच स्वराजायचे अनेक वर्षाचे सरनोबत आणि फौजेचा आदर्श असलेले हंबीरराव मोहित्यांना जवळपास १ वर्षापूर्वीच वाईच्या लढाईत दुर्दैवी वीरमरण आले होते. त्यामुळे स्वराज्याची सेना आता एका नव्या सरनोबतांचा अधिपत्याखाली होती - शूर म्हाळोजी बाबा घोरपडे.
संगमेश्वर आणि शिर्के
संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी कैद करण्यात आले - संगमेश्वर - ती जागा लक्षात घेणे गरजेचे आहे. कोल्हापूर आणि सातारा खालचा सह्याद्रीचा प्रदेश - श्रुंगारपूर , संगमेश्वर, सध्याचा चांदोली अभयारण्याचा प्रदेश तसेच प्रचितगडचा भाग हा सह्याद्रीचे खर्या अर्थानी रौद्र रूप प्रदर्शित करणारा भाग. हा संपूर्ण प्रदेश उत्तुंग डोंगररांगा, अतिशय दुर्गम असे घाट रस्ते आणि गर्द जंगल-झाडीनी परिपूर्ण असा भाग आहे - इथे कुठलाही गनीम छत्रपतींवर कुरघोडी करेल ही कल्पनाही करवत नाही. परंतु ह्या दुर्गम डोंगराळ भागाचा ताबा अशा लोकांकडे होता जे खरे तर स्वराज्याचे मातब्बर सरदार, पण निदान त्या वेळी तरी त्यांचे छत्रपतींशी वितुष्ट होते - सरदार शिर्के. सरदार गणोजी शिर्के हे खुद्द संभाजी महाराजांचे मेव्हणे पण त्या वेळी दोघांचे संबंध बिघडले होते कारण शिर्क्यांना वतन बहाल करायला महाराजांनी नकार दिला होता. तरीही ह्या भागात गनिमाला स्वराज्याच्या आतून मदत मिळाल्याशिवाय संभाजी महाराजांवर कुरघोडी करणे शक्य नव्हते आणि दुर्दैवाने अगदी असेच घडले.
ऐतिहासिक लिखाण सांगते की संभाजी महाराज रायगड हुन शृंगारपूर-संगमेश्वर भागात आले ते शिर्क्यांशी भांडण मोडून काढायला. शिर्क्यांनी कवी कलशांवर हल्लाबोल केला होता आणि त्यांची परिस्थिती इतकी अवघड झाली की त्यांनी पळून खेळणा(विशाळगड) ला आश्रय घेतला.संभाजी महाराजांना त्यांच्या मदतीसाठी स्वतः तातडीने यावे लागलं. शिर्क्यांची आघाडी मोडून काढत संभाजी महाराजांनी मोगली आक्रमणाखाली असलेल्या व फितूरीला जवळजवळ बळी पडलेल्या पन्हाळ्याची व्यवस्था लावली. त्यानंतर ते काही दिवस विशाळगडावर होते.तिथली व्यवस्था लावून संभाजी महाराज, कवी कलश, म्हाळोजी घोरपडे आणि इतर लोकांनी संगमेश्वर गाठले. ह्या ठिकाणी बरेचसे समकालीन इतिहासकार असे म्हणतात की कवी कलश ह्यांनी बांधलेल्या भव्य वाड्यात महाराज ऐषोआरामात दंग होते - इतके की त्यांच्या गुप्तहेरांनी मोगल फौज येत असल्याची वर्दी देऊन ही त्यांनी त्याकडे कानाडोळा केला.एकूण त्यावेळच्या परिस्थितीचा विचार करता हे सगळं सपशेल खोटं आणि अशक्य वाटतं. खरंतर महाराज आणि इतर लोक त्या वेळी कसबा संगमेश्वरच्या सरदेसाई वाड्यात राहिले होते - इथेच त्यांना मुकर्रब खानाने कैद केले. सरदेसाई हे शिवाजी महाराजांच्या काळापासूनचे स्वराज्याचे कारभारी होते त्यामुळे त्यांचा वाडा हा ऐषोआरामाचा अड्डा असेल हि शक्यताच नाही.
ह्या सर्व घटनाक्रमाचा आधीची एक घटना खूप महत्वाची आहे. मोगल सरदार शेख निझाम हैद्राबादीला (ज्याला मुकर्रब खान हा खिताब बहाल होता) किल्ले पन्हाळा सर करायच्या मोहिमे वर रवाना करण्यात आले होते. त्याचा मुक्काम त्यावेळी कोल्हापूर भागात होता. अशी एक शक्यता वाटते की वरवर जरी पन्हाळा जिंकायची मोहीम असली तरी त्यात एक गुप्ता योजना असावी. शिर्क्यांनी काही कुरापत काढून संभाजी महाराजांना रायगड उतरायला लावायचा आणि त्यांच्याशी शृंगारपूर-संगमेश्वर भागात लढाई करायला भाग पडायचे.त्या नंतर त्यांच्याशी सला करून त्यांना थोडे दिवस ह्याच भागात राहायला भाग पडायचे. अगदी ह्याच सुमारास मुकर्रब खानाने कोल्हापूरहुन निघून काही फितुरांच्या मदतीने आंबा घाट उतरून संभाजी महाराजांना पकडायचा प्रयत्न करायचा. हि योजना खरी मानली तर ह्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते की थेट रायगड गाठण्या ऐवजी महाराज व इतर लोकं संगमेश्वरला एखाद दोन दिवस का होईना पण का घुटमळले . दुसरी शक्यता अशी की आधी सांगितल्या प्रमाणे हा प्रदेश इतका दुर्गम आणि अवघड होता कि त्यामुळे इथे गनिमा पासून धोका नाही असा साहजिक आति आत्मविश्वास बाळगला गेला. असे दिसते की संभाजी महाराजांनी संगमेश्वरला थांबून रयतेचे काही निवाडे निर्णयी लावले तसेच तळ कोकणात नुकत्याच फितूर झालेल्या काही देशमुख-सावंतांची खबर घेतली. एका रक्तरंजित चकमकीनंतर, ज्यात सरनोबत म्हाळोजी घोरपड्यांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले, संभाजी महाराज आणि कवी कलश ह्यांना २ किंवा ३ फेब्रुवारी १६८९ ला जिवंत कैद करण्यात आले.
राजेंना कैद केल्यानंतर मोगल सैन्याच्या हालचाली
संभाजी महाराजांना कैद केल्यावर पुढची नोंद आढळते कि त्यांना वर घाटावर आणून बहादूरगड ला नेण्यात आले. साहजिक वाटते की आल्या वाटेने - आंबा घाटाने - मुकर्रब खान परतला असणार. सध्याचा कोयनानगर - चिपळूण च्या घाटरस्त्यांनी वर येण्याची हिम्मत त्याला झाली नसावी - ह्याचे कारण प्रचितगड व साताराच्या डोंगराळ प्रदेशातील मराठा फौज. त्यांना ह्या घटनेची माहिती कळताच त्यांनी नक्कीच छत्रपतींची सुटका केली असती त्यामुळे हा धोका मुकर्रब खानाने पत्करला नाही. पकडलेल्या लोकांची ओळख पटू नये म्हणून त्याचे वेषांतर करण्यात आल्याबद्दल काही गोष्टी ऐकिवात येतात. काही असो मुकर्रब खानाने त्याच्या परतीच्या मार्गावर प्रचितगड आणि मलकापूरची स्वराज्याची पागा ह्या दोन्ही पासून चार हात अंतर ठेऊनच मार्गक्रमण केले हे नक्की. अजून एक प्रश्न असा येऊ शकतो कि जे लोक संगमेश्वरच्या चकमकीमधून निसटले त्यांनी कुठून कुमक आणून सुटकेचे प्रयत्न का केले नाहीत ? पण तसे प्रयत्न केले असते तरी सगळ्यात जवळची कुमक यायची शक्यता होती ती तळकोकण, चिपळूण किंवा घाटावर मलकापूर\विशाळगड इथून - आणि ह्या सगळ्या ठिकाणहून वेगाने मार्गक्रमण करणाऱ्या मुकर्रब खानाच्या तुकडीला गाठायला किमान १ दिवस लागला असता.
असे दिसते कि पन्हाळा मोहिमेतली बरीचशी फौज मुकर्रब खानाने पन्हाळा जवळ ठेवली होती - हे मुद्दामून केले असावे ज्यामुळे पन्हाळा वरच्या मराठा फौजेला संभाजी महाराजांना सोडवायचा मोकाच मिळू नये म्हणून. आंबाघाट चढून कोल्हापूर - कराड मार्गे पकडलेल्या लोकांना बहादूरगडला आणण्यात आले. औरंगजेबाने पण ह्या अटकेची बातमी ऐकून स्वतःचा तळ आधी म्हणलेल्या अकलूजहून हलवून बहादूरगडनजीक आणला होता. पकडलेल्या महारथी लोकांना सुरक्षित बहादूरगड पर्यंत आणायला त्याने हमीदुद्दीन खानाला धाडले होते. त्यामुळे मुकर्रब खानाचा कोल्हापूर ते बहादूरगड हा प्रवास हमीदुद्दीन खानाच्या सैन्याच्या भक्कम संरक्षणाखाली झाला.
ह्या सर्व परिस्थितीमुळे कराड भागातल्या खुल्या मैदानी प्रदेशात मराठा फौजेनी आक्रमण करून सुटकेचे प्रयत्न करणे हि बाब जवळजवळ अशक्यप्राय होऊन बसली.
महाराज बहादूरगडला अटकेत
बहादूरगड हा महाराष्ट्रातल्या पेडगाव तालुक्यातला भीमा नदीच्या काठावर वसलेला एक भुईकोट किल्ला. किल्ला भुईकोट असल्याने आणि जवळपास कुठेच डोंगर-टेकड्या नसल्याने हेतुपुरस्सर संभाजी महाराजांना ह्या किल्ल्यात बंदी म्हणून ठेवण्यात आले. औरंगजेबाची संपूर्ण छावणी आणि मोगल सैन्यसमूद्र बहादूरगडचे संरक्षण करत होता. अशा वेळी महाराजांना इथून सोडवायचे प्रयत्न म्हणजे जाणूनबुजून अजून जीव धोक्यात घालणे असं झालं असतं. काही असे किस्से ऐकिवात आहेत कि खंडो बल्लाळ, रायप्पा ह्यांनी सुटकेचे प्रयत्न करून बघितले - पण ह्या गोष्टींना कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही. मोगल सैन्याचे सोडून इतर लोकांचे जे काही घोडे होते त्यांना बहादूरगड पासून कित्येक मैल लांब रोखले जात होते - त्यांना छावणीत प्रवेश नव्हता. तसेच एकूणच पूर्ण भागात अहोरात्र अतिशय चोख गस्त होती. अशा प्रकारे संभाजी महाराजांना मोगली फौजेला अनुकूल आणि मराठा सैन्याला प्रतिकूल अशा खुल्या सपाट प्रदेशात अडकवून ठेवण्यात औरंजेबाला यश आलं
अशा रीतीने आपणास लक्षात येईल की बरीच कारणं होती जेणेकरून मराठा सैन्याला छत्रपतींची सुटका करायची संधीच मिळाली नाही. सैन्य अनेक आघाड्यांवर लढा देत होतं. सैन्याचे सरनोबत धारातीर्थी पडले आणि छत्रपतींना फितुरीने अटक झाली होती. ह्या अनपेक्षित घटनांमुळे आणि खंबीर नेता न राहिल्यामुळे फौजेत नक्कीच थोडा विस्कळीतपणा आला असणार. आधी म्हणल्याप्रमाणे बहादूरगड व तुळापूर भागातून सुटकेचे प्रयत्न करणे म्हणजे जाणूनबुजून अजून बर्याच जीवांना मृत्यूच्या दरीत ढकलणे ठरले असते. खुल्या प्रदेशातून कोणाचीही सुटका करणे हे फार अवघड कार्य होतं - जवळपास अशक्यच. अजून एक महत्वाची बाब म्हणजे रयतेचं मोगल आक्रमणापासून संरक्षण - ह्या घटनेनंतर मोगलांचे आक्रमण बळावणार होतं आणि त्याच्या विरुद्ध लढणे आणि त्याचा प्रतिकार करणे हे खूप महत्वाचं होतं. ह्या सर्व परिस्थितीच्या परिणामी मराठा सैन्य संभाजी महाराजांचा अत्यंत दुर्दैवी अंत टाळू शकले नाही. पण ह्या तेजस्वी बलिदानानी स्वराज्याला एवढी मोठी प्रेरणा दिली की परिणामी स्वराज्याने उठून पलटवार करत मोगल साम्राज्य थोडे वर्षांनी पार मोडकळीस आणले.
No comments:
Post a Comment