विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 10 March 2020

!!!..."भारतीय स्वातंत्र्य युद्धातील महाराज सयाजीराव गायकवाड यांचा सहभाग या विषयीची माहिती"...!!!



!!!..."भारतीय स्वातंत्र्य युद्धातील महाराज सयाजीराव गायकवाड यांचा सहभाग या विषयीची माहिती"...!!!
#बडोदा_संस्थान #महाराज_सयाजीराव_गायकवाड
संकलन : संतोषराजे गजाननराव गायकवाड


१८०२ व १८१८ मध्ये बडोदा संस्थान व ईस्ट इंडिया कंपनी मध्ये चांगले संबंध प्रस्थापित झाले होते व त्या संबंधाना चांगले वळण मिळाले होते. बडोदा संस्थान व ब्रिटिश राजसत्ता यांच्यात १६ मार्च, ६ जून व २९ जुलै १८०२ मध्ये एकंदर ३ मैत्रीचे करार झाले होते. परंतु ते असे लक्षात आले होते की ६ जूनच्या मूळ कराराच्या मराठी अनुवादामध्ये गायकवाड संस्थानला संरक्षण आणि सल्ला देण्याचा कोणताही संदर्भ नव्हता परंतु त्या कराराच्या इंग्लिश प्रति मध्ये त्याचा उल्लेख होता. या एका प्रमुख मुद्द्या मुळे बडोदा राजदरबार व ब्रिटिश राजसत्ता यांच्यात वारंवार संघर्ष निर्माण होत होते. ब्रिटिश सरकारच्या आडमुठेपणा मुळे बडोदा राजसत्तेच्या मनात असंतोष निर्माण झाला होता. व याच असंतोषा मुळे पुढे बडोदा संस्थानने कायम क्रांतिकारी संघटनांना व क्रातिकारकांना मदत केली
हिंदुस्थान व विलायतेतील क्रांतीकारकांना मदत :
१९ व्या शतकाच्या मध्य व उत्तरार्धात देशभर ब्रिटीश सत्तेविरुद्ध असंतोषाचे वातावरण पेटले होते. जानेवारी १८८५ मध्ये "मुंबई प्रेसिडेन्सी असोसिएनची" स्थापना झाली. फिरोजशहा मेहता, दिनशा वाच्छा बदरुद्दीन तैय्यबजी हे संस्थापक सदस्य होते. याच वर्षी डिसेंबर मध्ये "आखिल भारतीय काँग्रेसची" स्थापना झाली. या दोन्ही संस्थांच्या प्रमुख संस्थापक सदस्यांन बरोबर महाराज सयाजीराव यांचे निकटचे संबंध होते. याच पैकी मुंबई प्रेसिडेंसीच्या प्रमुख ३ सदस्यांना विलायतेला जाण्यासाठी अडीच हजार रुपयांची मदत महाराज सयाजीराव यांनी केली होती. काँग्रेसची स्थापना झाल्यापासून होणाऱ्या प्रत्येक काँग्रेस अधिवेशनात ते उपस्थित राहत असत. त्यांच्या बरोबर बडोदा संस्थानचे रावबहाद्दर मधवलाल नंदलाल, अब्बास तैय्यबजी, सुमंत मेहता, दिवाण अम्बालाल साकरलाल हरीलाल हर्षदराय हे सुद्धा उपस्थित राहत असत.
राष्ट्रीय काँग्रेसचे दादाभाई नौरोजी हे १८९२ मध्ये इंग्लंडच्या फिन्सवारी भागातून "हाऊस ऑफ कॉमन्स" साठी लिबरल पार्टीचे उमेदवार म्हणून उभे होते. त्यावेळी महाराजांनी निवडणूक खर्चासाठी १५००० रुपयांची मदत केली होती. त्या निवडणुकीमध्ये दादाभाई निवडून आले होते परंतु पक्षाने त्यांच्याकडे पक्षनिधी म्हणून मोठ्या रकमेची मागणी केली होती परन्तु दादाभाई तो निधी देवू शकत नव्हते म्हणून त्यांनी पक्ष सदस्यत्व सोडण्याचा निर्णय घेतला. हि गोष्ट सयाजीराव महाराजांना समजताच पुन्हा १५००० रुपयांची मदत केली. त्याच बरोबर १८९५ च्या पुणे काँग्रेस अधिवेशनासाठी महाराजांनी दोन हजारांची मदत केली होती. १८९७ मध्ये लंडनमधील वेल्वि कमिशन समोर भारताची बाजू मांडण्यासाठी ३ सदस्यांचे प्रतिनिधी मंडळ पाठवण्याचे ठरले. त्यामध्ये नामदार गोपालकृष्ण गोखले हे सुद्धा सामील होते. ना. गोखले हे इंग्लंडला जाण्यापूर्वी सयाजीराव महाराजांना बडोदा येथे जाऊन भेटले व त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी ना. गोखले यांना प्रवास खर्चासाठी अडीच हजार रुपयांची मदत केली. १९०२ मधील अहमदाबाद व १९०९ मधील कलकत्ता येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनातील उद्योग व सामाजिक अधिवेशनाचे अध्यक्ष सयाजीराव महाराज होते. सयाजीराव महाराज यांचे न्यायमूर्ती रानडे यांच्या सारख्या राष्ट्रीय नेत्यांशी जवळचे संबंध होते.
महाराज सयाजीराव गायकवाड यांनी देशातीलच नव्हे तर विलायतेतील क्रांतिकारकांना सुद्धा मदत केली होती. महाराजांचे जवळचे नातेवाईक खासेराव हे विलायतेत असताना त्यांचे संबंध हे श्यामजी वर्मा, अरविंद घोष, केशवराव देशपांडे यांच्या सारख्या क्रांतिकारकांना बरोबर आले व ते या लंडन मधील क्रांतिकारकांच्या गटात ओढले गेले. जाधव हे बडोद्यास परतल्यावर त्यांच्या मुळे महाराजांच्या गाठीभेटी या इंडिया हाऊस व इंडियन मजलीसच्या क्रांतिकारकांन बरोबर होत गेल्या. यामधूनच १८९२ साले लंडन येथे अरविंद घोष यांनी महाराजांची भेट घेतली. आय. सी. एस. परीक्षा पास झालेल्या व ब्रिटिश सत्तेच्या नोकरीची चौकट नाकारणाऱ्या या क्रांतिकारकाला बडोद्यास येण्याचे निमंत्रण दिले. पुढे १८९३ ला अरविंद घोष हे बडोदा संस्थानात रुजू झाले. येथे असतानाच अरविंद घोष यांनी त्यांचे मित्र केशवराव देशपांडे संपादक असलेल्या "इंदूप्रकाश" या साप्ताहिकात "न्यू ल्यम्स फॉर ओल्ड" हि लेखमाला लिहिली. या लेखमालेमुळे राष्ट्रीय काँग्रेस व ब्रिटिश सरकार यांच्यात फार मोठी खळबळ उडाली. सयाजीराव महाराजांनी खासेराव जाधव व अरविंद घोष यांना सांगून केशवराव देशपांडे यांना बडोदा संस्थांमध्ये नोकरीस बोलावले.
सयाजीराव महाराज हे लंडन मध्ये असताना श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या बरोबर हाईड पार्क मध्ये अनेकदा फिरायला जात असत. महाराजांनी श्यामजी वर्मा यांचे देशप्रेम बघून त्यांना मदत करण्यास सुरुवात केली व येथेच त्यांच्या भेटीगाठी मादाम कामा, बीपिनचंद्र पाल, तरकनाथ दास या क्रांतिकरकांबरोबर होऊ लागल्या. परंतु या गोष्टी ब्रिटिश सरकारच्या नजरेत येऊ लागल्या. त्यासंबंधीचे महाराजांच्या विरिधातील अहवाल वरिष्ठांकडे इंग्लडला जाऊ लागले. या सर्व बाबींमुळे ब्रिटिश सरकारने महाराज सयाजीराव यांच्यावर गुप्तहेरांची नेमणूक करून त्यांच्यावर परदेश प्रवासात व हिंदुस्थानात पाळत ठेवणे चालू केले.
क्रांतिकारकांचे आश्रयस्थान जुम्मादादा आखाडा :
बडोदा येथील जुम्मादादा व्यायाम मंदिराचे प्रमुख माणिकराव हे क्रांतिकारक व महाराज यांच्या मधील दुवा होते. त्याकाळी बडोद्यामध्ये "पुढारी' 'चाबूक' " सयाजी विजय ' बदोडा वत्सल" या सारखी वृत्तपत्र प्रकाशित होत असत. या सर्व वृत्तपत्राच्या माध्यमातून राष्ट्रीय व क्रांतिकारक विचार प्रसार करण्याचे काम होत गेले. या सर्व वृत्तपत्रांना महाराज सयाजीराव हे आधार व मदत करत होते. परंतु ब्रिटिश सरकारने दबाब आणुन 'पुढारी' 'चाबूक' हि वृत्तपत्रे बंद पाडली. परंतु अशा परिस्थिती अरविंदबाबु , प्रो. माणिकराव, खासेराव जाधव, केशवराव देशपांडे या महाराजांच्या विश्वासू अधिकाऱ्यांच्या व स्नेह्यांच्या मदतीने बडोद्यात क्रांतिकारक संघटनांचे मुळे घट्ट होत गेली. कारण या गोष्टींना महाराज सयाजीराव यांचा भक्कम आधार व मदत होती. त्यावेळी बडोद्यात "तरुणसंघ" ह्या नावाची संघटना मोठ्या प्रमाणावर काम करत होती. बडोदा संस्थानाच्या सेवेतील अनेक अधिकारी वर्ग व इतर सेवक हे या संघटनेचे सभासद होते. सयाजीराव महाराज हे नेहमीच देशभक्त क्रांतिकारी, अधिकारी यांच्या शोधात असत. देशभक्त क्रांतिकारकांना बडोदा संस्थान मध्ये त्यांना सेवेत घेऊन ते ब्रिटिध सत्तेची झोप उडवत असत. याच प्रकारे महाराजांनी प्रसिद्ध बंगाली आय. सी. आय अधिकारी रमेशचन्द्र दत्तांना बडोदा संस्थान मध्ये सेवेत बोलावले होते. बडोद्यामधील क्रांतिकारक घडामोडींना जो जोर होता त्यामागे सयाजीराव महाराज यांचे प्रोत्साहन, मार्गदर्शन व पाठिंबा होता.
महाराजांचे बडोदा संस्थानमध्ये खासेराव जाधव, केशवराव देशपांडे हे क्रांतिकारकांच्या बरोबरीने काम करत होते ते जेथे जेथे राज्यात नोकरी करत तेथे तेथे क्रांतिकारक चळवळींना मदत करत असत. बडोदा संस्थान हे क्रांतिकारकांना सुरक्षित राज्य बनले होते. स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांचे बडोद्यामधील भाषण व त्यांची महाराज सयाजीराव यांची भेट ब्रिटिश राजसत्तेला आवडली नाही. अरविंद बाबू यांचे छोटे बंधू वरिंद्र कुमार घोष हे सुद्धा बडोद्यास काही काळ येऊन गेले होते. बडोदा मुक्कामी असताना त्यांनी छोटू भाई पुराणी या क्रांतिकारकाला बॉम्ब बनविण्याची कला शिकवली होती.
गंगनाथ राष्ट्रीय विद्यालय:
बडोदा संस्थानाच्या क्रांतिकारी इतिहासातील महत्वपूर्ण घटना म्हणजे गंगानाथ राष्ट्रीय विद्यालय. महाराज सयाजीराव यांच्या सूचनेनुसार नर्मदाकाठी गंगानाथ राष्ट्रीय विद्यालय सुरु करण्यात आले. याचे संचालक महाराजांचे अधिकारी अरविंद घोष, खसेराव जाधव, केशवराव देशपांडे तसेच प्रा. माणिकराव हे कार्यरत होते. या ठिकाणी शिक्षण, शाररिक शिक्षण, सांस्कृतिक वारसा आणि शस्त्रांची शिकवण दिली जात असे. या सर्वांसाठी येथील ब्रह्मानंद स्वामी यांचे मोलाचे सहाय्य लाभले होते. चांणोदमधील हे राष्ट्रीय विद्यालय हे ब्रिटिश व्हाईसरॉय व रेसिडेंट यांना राजद्रोह वाटू लागला. याच सुमारास बडोदा संस्थानच्या सेनेमधील मेजर माधवराव जाधव यांना विशेष सैन्य प्रशिक्षणासाठी स्वीस अकादमीत पाठवण्यात आले. या मागची प्रेरणा होती ती महाराज सयाजीराव व अरविंद बाबू यांची परंतु या सगळ्या मागचा उद्देश वेगळा होता. मेजर माधवराव जाधव यांनी स्विझर्लंड मध्ये बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेणे तसेच क्रांतीसाठी मोठा शस्त्र संग्रह करणे हा मोठा उद्देश त्यांना स्विझर्लंडला पाठवण्यात होता. ऑक्टोंबर १९०६ मध्ये महाराज सयाजीराव हे युरोप दौऱ्यावर असताना लंडन मध्ये त्यांची भेट श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याशी होत असे. पांडुरंग महादेव बापट हे क्रांतिकारी विचारानी भारावलेले विध्यार्थी हिंदुस्थानातील क्रांतिकारी विचारांच्या विध्यार्थ्यांना भेटू लागले. येथेच मदनलाल धिंग्रा, मिरझ अब्बास, नाशिकचे आर. जी प्रधान, कोरोगावकर या तरुणांशी ओळख झाली. यातूनच आर. जी प्रधान यांनी महाराज सयाजीरावांची भेट घडवून आणली. व भेट झाल्यानंतर महाराजांनी त्यांना बडोदा संस्थानात येण्याचे सुचविले. हेच पांडुरंग महादेव बापट कालांतराने गंगनाथ राष्ट्रीय विद्यालयात येऊन गेले. त्यावेळी त्यांनी येथील विद्यार्थ्यांना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिले. पुढे जाऊन हेच बापट "सेनापती बापट" या नावाने ओळखले जावू लागले.
१९०७ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन सुरत येथे झाले होते. यात प्रामुख्याने बडोदा संस्थानातील महाराजांचे अधिकारी व निकटवर्तीय यांनी पुढाकार घेतला होता. अरविंदबाबू घोष, खासेराव जाधव, प्रो माणिकराव व केशवराव देशपांडे हे अधिकारी प्रामुख्याने यात अग्रभागी होते. यांचे हे कृत्य सहन न होऊन ब्रिटिश राजसत्तेने गंगनाथ विद्यालय बंद करण्यास भाग पाडले. १९०८ मध्ये हे विद्यालय बंद करून बडोद्यातील अलकापुरीतील कशी विश्वेश्वर मंदिरात सुरु करण्यात आले. बडोद्यात हे विद्यालय सुरु करण्यामागे महाराज सयाजीराव यांचा फार मोठा वाट होता.
व्हाइसरॉय लॉर्ड मिंटो व अहमदाबाद बॉम्ब स्फोट:
१९०९ मध्ये व्हाइसरॉय मिंटो याने हिंदुस्थानातील सर्व राजांना पत्र पाठवून आपआपल्या राज्यांमधील राजद्रोहात्मक कारवायांचा बंदोबस्त करावा असे आदेश दिले. या आदेशाला महाराज सयाजीराव यांनी उलट कळवले कि "आमच्या राज्यात या प्रकारच्या घटना आढळत नाहीत. वरिष्ठ राजसत्तेला या उपरही काही आढळल्यास आमच्या निदर्शनास आणून द्यावे. कायद्यानुसार त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल". ब्रिटिश राजसत्तेला महाराज सयाजीराव यांचे हे उत्तर आवडले नाही. या प्रकारामुळे व्हाइसरॉय याने महाराज सयाजीराव यांच्या विरुद्ध एक प्रदीर्घ आरोपपत्र ब्रिटन मधील भारत मंत्र्याकडे पाठविले.
या सगळ्या घडामोडी घडत असताना व्हाइसरॉय मिंटो याने बडोदा दौरा आयोजित केला. व्हाइसरॉय मिंटो व त्याची बायको हे बडोदा भेटीस येत असताना ते अहमदाबाद येथे एक दिवस मुक्कामी होते. येथे मुक्कमी असताना त्यांच्यावर क्रांतिकारकांच्या कडून बॉम्ब फेकला गेला होता. परंतु या मध्ये काहीच जीवित हानी झाली नाही. येथून दुसऱ्याच दिवशी मिंटो बडोदा संस्थान मध्ये पोहोचले. अहमदाबाद येथे जो बॉम्ब हल्ला झाला त्या मागे बडोदा संस्थांन मधील कार्यरत लोकांचा हात आहे असा निष्कर्ष ब्रिटिश पोलिसांनी काढला. या संदर्भात ब्रिटिश सरकारच्या मुंबई पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे घातले. पण या छाप्यांन मध्ये पोलिसांच्या हाती ठोस असे काहीच मिळाले नाही. यानंतर पोलिसांनी प्रो. माणिकराव यांच्या गाडोद्यातील आखाड्यावर मध्यरात्री छापा घातला. आखाड्यातील पूर्ण माथी खोदून काढून शोध घेतला तसेच आखाड्या शेजारील विहिरीतील पाणी हि ढवळून काढले पण त्यांच्या हाती काहीच सापडले नाही. या छाप्यामध्ये अरविंदबाबू घोष यांनी लिहिलेल्या "भवानी मंदिर" या पुस्तकाच्या प्रति मात्र जप्त केल्या.
व्हाइसरॉय मिंटो हा त्याच्या २ दिवसांच्या बडोदा भेटीत तो पूर्णपणे कसा व्यस्त राहील या दृष्टीने महाराज सयाजीराव यांनी कार्यक्रमाची आखणी केली होती. २ दिवस लॉर्ड मिंटो हा पूर्णपणे व्यस्त राहिला व शेवटच्या दिवशी जाण्या अगोदर महाराजांना म्हणाला "मला आपणाशी महत्वाच्या बाबींवर बोलावयाचे आहे". यावर महाराजांनी चाणाक्षपणे लॉर्ड मिंटोला म्हणले "आपण मला क्षमा करा. लागलीच मला एका महत्वाच्या कामासाठी जाणे अत्यावश्यक आहे. तुम्हाला जे काही बोलायचे व सांगावयाचे आहे, ते माझ्या सेक्रेटरी जवळ लिहून द्या. मी लगेच त्यावर कारवाई करेण." यातून हेच महत्वाचे दिसते कि व्हाइसरॉय लॉर्ड मिंटो याला सर्वसामान्य इतर माणसांन सारखे महाराज सयाजीराव यांनी वागवले व त्याला कुशलतेने टाळले.
बडोद्यातील पेपर मध्ये व इतर ठिकाणी लेखन करणारे व छापणारे तसेच राष्ट्रीय विद्यालय या ठिकाणी काम करणारी सगळी मंडळी हि बडोदा संस्थान मध्ये अधिकारी व सेवक म्हणून कार्यरत होते. याच दरम्यान ब्रिटिश पोलिसांनी देशभर वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून जवळपास १६७ क्रांतिकारी पुस्तके व पुस्तिका जप्त केल्या होत्या. या पुस्तिकां पैकी १७ पुस्तके हे बडोद्यातील वेगवेगळ्या प्रेस मध्ये छापले होते. या वरूनच ब्रिटिश पोलिसांनी असे अनुमान व निष्कर्ष काढला कि राजद्रोही घटनांच्या मागे महाराज सयाजीराव व त्यांच्या पदरी नोकरीस असलेले खासेराव जाधव, अरविंदबाबू घोष, केशवराव देशपांडे व प्रो. माणिकराव हि मंडळी आहेत. या सर्वांच्या विरोधात महाराजांनी कडक व ठोस कारवाई करावी असा दबाव रेसिडेंट कडून येऊ लागला. हि गोष्ट महाराज सयाजीराव यांना आवडली नाही. महाराजांनी आपल्या दिवाणांन करवी त्यांनी रेसिडेंटला पत्र लिहिले " जो पर्यंत ब्रिटिश इंडियात गायकवाड किंवा बडोदा संस्थांनच्या विरोधात जो अप्रचार चालू आहे तो आपण बंद करणार नाही तोपर्यत आमच्या कडून या लोकांच्या विरोधात कोणतेही कारवाईचे पाऊल उचलले जाणार नाही". ब्रिटिश पोलीस ज्या ठिकाणच्या घटनांवर कारवाई करा म्हणून मागे लागले होते तेथील बडोदा संस्थानच्या जिल्हांचे कलेक्टर हे खासेराव जाधव व केशराव देशपांडे हे होते. या आपल्या दोन्ही राष्ट्रप्रेमी अधिकाऱ्यांच्या मागे महाराज सयाजीराव हे मोठ्या हिमतीने व ठामपणे उभे होते.
मुंबईहून ब्रिटिश सी. आय. डी. प्रमुख व्हिसेन्ट गायकवाड नवसारीत आहेत. तेथे त्यांनी कलेक्टर केशवराव देशपांडे रहात असलेल्या बंगळ्याजवळील विहिरीतुन "वनस्पतींनी दवाओ" या पुस्तकाच्या प्रति जप्त केल्या. या पुस्तकाचे हे फसवे मुखपृष्ठ होते. परंतु आतमध्ये अरविंद बाबूघोष यांनी लिहलेल्या "Which Way Freedom?" या इंग्रजी पुस्तकाचा हुजराती अनुवाद होता. या पुस्तकात अरविंद बाबू यांनी क्रांतिकारकांसाठी कमी सूत्रे लिहली होती. त्यात एक महत्वाचे सूत्र आडे होते "To slay white officials is a merit not a sim" याचा अर्थ असा होतो "गोऱ्या अधिकाऱ्यास मारने हे पाप नाही तर ते पुण्य कर्म आहे." यावर ब्रिटिश पोलीस अधिकारी व्हिसेट हे खासेराव जाधव जे नवसरीचे कलेक्टर होते त्यांना भेटले व त्यांना सगळे सांगून पोलिसांची मदत करा असे सांगितले. यावर खासेराव गायकवाड याना विचारणा केली कि "गायकवाड महाराजांच्या संस्थानात तुम्हाला छापा घालायचा परवाना तुमच्याकडे आहे काय? तो आधी दाखवा". असे विचारताच व्हिसेट यांना धक्का बसला यावर बडोदा संस्थान कडून मुंबई गव्हर्नरकडे व्हिसेटच्या कडक निषेधाचे पाठवले व ह्या सगळ्या प्रकारांवरून ब्रिटिश सरकारला या सगळ्याच्या मागे महाराज सयाजीराव आहेत असेच वाटले. खासेराव जाधव व केशवराव देशपांडे हे महाराजांचे दोन्ही कलेक्टर राजद्रोही चळवळीच्या लोकांना मदत व संरक्षण देतात म्हणून महाराजांनी त्यांची चौकशी करावी म्हणून व्हाइसरॉय व गव्हर्नर यांच्याकडून महाराजांवर दबाव वाढू लागला. यातच प्रसिद्ध अशी दिल्ली दरबारची घटना घडली होती. महाराजांवर चहू बाजूने संकटांचा जोर वाढू लागला होता. व्हाइसरॉय याने तर खासेराव जाधव व केशवराव देशपांडे याना सेवेतून काढून टाकावे असे आदेशच दिले. बडोद्यातील क्रांतिकारी घडामोडींना खूप मोती गती मिळाली होती. तसतसा ब्रिटिश सरकारचा महाराजांच्या विरुद्धचा राग व द्वेष बाधत चालला होता. अरविंद बाबू घोष यांनी जी क्रांतीची मशाल पेटवली होती ती अखंड तेवत ठेवण्याचे काम खासेराव जाधव, केशवराव देशपांडे, प्रो. माणिकराव हे महाराजांचे विश्वास अधिकारी व तसेच बडोदा संस्थानमधील इतर अनेक कार्यकर्ते करत होते. चांनादे येथील गंगानाथ भारतीय राष्ट्रीय विद्यालय, अरविंद घोष यांचे भवानी मंदिर हि राष्ट्रप्रेमाची संकल्पना तसेच प्रो. माणिकरावांचा आखाडा यात खासेराव जाधव व केशवराव देशपांडे यांचा महाराजांच्या सहाय्याने मोठा सहभाग होता. या सगळ्या राष्ट्रद्रोही गोष्टींकडे ब्रिटिश सी. आय. डी. व रेसिडेंट कॉब हे फार बारीक लक्ष्य ठेवून होते. उरावे समोर असल्याने रेसिडेंट याने देशपांडे यांना सेवेतून मुक्त करण्याची मागणी सुरु केली. महाराजांनी आपला रुबाबदार बाणा दाखवत विना चौकशी त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यास नकार दिला. ब्रिटिश सरकार हे या प्रकरणावर खूप मोठा जोर लावत होते व ते हातघाईवर आले होते. महाराजांनी एक तेरा सदस्यांची चौकशी समिती या प्रकरणी चौकशी करण्यासाठी नेमली व देशपांडे यांना या समितीपुढे आपली बाजू मांडण्यास सांगितले. चौकशी समितीने देशपांडे यांना निर्दोष जाहीर केले. यावर महाराजांनी देशपांडे यांना महसूल विभागातून न्याय विभागात पाठवले. यावर ब्रिटिश सरकार आणखी चिडले. आपल्यामुळे महाराजांवर वरिष्ठ सत्ता नाराज आहे व आपल्यामुळे महाराजांवर संकटे व त्रास वाढू नये म्हणून देशपांडे यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. राजीनामा बघून महाराज खूप दुःखी झाले व राजीनामा स्वीकारताना त्यांनी हुकूम काढला की "केशवरावांनी राज्याची एकनिष्ठ प्रामाणिक सेवा केली आहे. त्या कामाबाबत त्यांना आजच दोन तासात दहा हजार रुपये देऊन मुक्त करावे." दुसरे अधिकारी खासेराव जाधव याना सेवेतून मुक्त करण्याचे आदेश महाराजांनी साफ फेटाळून लावले व खासेराव जाधव यांची दुसऱ्या खात्यात बदली करून त्यांची दोन वर्ष वार्षिक पगारवाढ राखण्याचे नाटकी आदेश काढले.
महाराज ठरल्याप्रमाणे आपल्या परदेश दौऱ्यावर निघून गेले. ४सप्टेंबर १९०६ च्या पत्रात महाराज म्हणतात " ब्रिटिश सरकारने मला जी अपमानास्पद वागणूक दिली आहे यामुळेच असे वागण्याचा मी निर्णय घेतला आहे. मी आशा करतो यापुढे सरकार माझ्या पुढील हालचालींवर बंधन घालणार नाही. मी जो प्रवास करतो आहे तो माझ्या प्रजेच्या कल्याणकरता मला अभ्यास करायचा असतो आणि त्यातच माझा आनंद आहे. ब्रिटिश राजसत्ता व अधिकारी यांनी जे राजद्रोहाचा आरोप महाराजांवर केले होते ते त्यांनी साफ धुडकावून लावले. महाराज म्हणतात " या असंतोषाला मी फार महत्व देत नाही. चहाच्या कपातल्या एखाद्या वादळा सारखे आहे ते. काही संशयी लोकांची ती निर्मिती आहे. याचा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर जगातील सुधारलेल्या देशांना भेटी द्या. आज हिंदुस्थानला अधिक लिबरल गव्हर्नमेंटची गरज आहे". यावरून हेच लक्षात येते की महाराज सयाजीराव हे पन्नास वर्ष ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध हुशारीने लढा देत होते व इतिहासलादेखील हे मान्य करावे लागेल.
राजद्रोहाचा आरोप:
वरील सर्व प्रकारांमुळे ब्रिटिश पोलीस, गुप्तहेर व राजसत्ता महाराजांच्या विरुद्धच्या राजद्रोहाच्या घटना शोधू लागले. एकेक प्रकरणाचे कागद वाढत चालले होते. या सर्वांचा शंभर पानी छापील असरोप पत्र व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज कडे सादर करण्यात आले. व्हाईसरॉय याने या सर्व आरोपांचा अभ्यास केला तसेच लंडन येथील भारत मंत्री लॉर्ड क्रु यांनी महाराजांविरुद्ध चोवीस पानांचे चार्जशीट तयार केले. आरोपपत्रात सयाजीराव हे एकमेव राजे देशद्रोही घटनांना व क्रांतिकारकांना साथ देत आहेत असा निष्कर्ष काढला. तसेच सयाजीराव हे ब्रिटिश सत्तेला या पुढे डोकेदुखी होऊ शकतील असे त्यांचे अनेक वर्षाचे वर्तन आपल्या समोर आले आहे. ते सार्वभौम सत्तेशी कृती आणि विचारांनी बेईमान आहेत. ज्या गोष्टी संस्थानिकांनी करू नयेत आडे सरकार सांगते त्या नेमक्या गोष्टी सयाजीराव मुद्दाम करतात असे स्पष्ठपणे आरोपपत्रात नमूद केले होते. अरविंद बाबू घोष, खंडेराव जाधव, दादाभाई नौरोजी, केशवराव देशपांडे, प्रा. माणिकराव, न्यायमूर्ती रानडे, लाला लजपतरॉय, वि. दा. सावरकर, टिळक या धोकादायक मंडळींना बडोदा संस्थानात आश्रय दिला जातो व या सर्व क्रांतिकारकांना सयाजीराव मदत करतात तसेच हिंदुस्थानाबाहेरील तारकनाथ, मादाम कामा, श्याम कृष्ण वर्मा, बीपीनचंद्र पॉल या ब्रिटिश सत्तेविरुद्ध राज्यद्रोही चळवळ करणाऱ्यांशी महाराज सयाजीराव यांचे संधान आहे व ते सतत त्यांना मदत करतात तसेच देशद्रोही साहित्य छापण्याचे केंद्र हे बडोदा असून त्यांना बडोदा संस्थानमधील मोठे अधिकारी मदत करत असतात व त्यांना सयाजीराव महाराज यांचे अभय आहे असे सुद्धा आरोपपत्रात स्पष्ठपणे सांगितले होते.
मुंबईच्या गव्हर्नरने हिंदुस्थानमधील सगळ्या संस्थानिकांची बैठक पुण्यात आयोजित केली होती. यावेळी महाराज सयाजीराव हे इतर संस्थानिकांसोबत या बैठकीत हजर होते. त्यावेळी कार्यक्रम झाल्यावर महाराज व त्यांचे जवळचे मित्र प्रिन्स आगाखान हे गप्पा मारत बसले असताना प्रिन्स आगाखान यांनी वेचले की "हिंदुस्थानात ज्या चळवळी चालू आहेत त्यांच्याशी तुमचे नाव जोडले जात आहे या बद्दल तुम्ही काय सांगाल. यावर महाराज सयाजीराव पटकन म्हणाले की" हिंदुस्थानात ज्या स्वातंत्र चळवळी चालू आहेत त्याने ब्रिटिश सत्ता जाईल असे मला वाटत नाही. पण येत्या काही वर्षात जगभरातील सार्वभौम सत्तेविरुद्धचे वातावरण हळूहळू तप्त जाईल. या जगभरातील उद्रेकाला कोणीही थांबवू शकणार नाही व असे घडत गेले की ब्रिटिशांना हिंदुस्थान सोडून जावे लागेल. हे उत्तर ऐकून प्रिन्स आगाखान यांनी आश्चर्यचकित होऊन महाराजांना विचारले की "ब्रिटिश गेल्यावर या देशातील शेकडो संस्थानिकांचे काय होणार?" यावर महाराजांनी उत्तर दिले की "एकछत्री हिंदुस्थान होण्यासाठी कुत्र्याच्या छत्रीसारखी वेगवेगळी संस्थाने विसर्जित करून एकसंघ राष्ट्र निर्माण करणे हा एकच पर्याय आहे आणि यात बडोदा संस्थान पहिले असेल."
महाराजांनी ब्रिटिश राजसत्तेच्या उद्दामपणाला आपल्या कणखर व रुबाबदार बाण्याने व स्वाभिमानी वर्तनाने वेळोवेळी उत्तर दिले होते व अंतःस्थ पाने तर कधी उघडपणे स्वातंत्र्य चळवळीला व क्रांतिकारकांना मदत केली होती. यावरून हेच लक्ष्यात येते की महाराज सयाजीराव यांनी स्वातंत्र्यापूर्वी ३९ वर्ष एकसंघ भारताचे स्वप्न पहिले होते. यातूनच महाराजांचे राष्ट्रप्रेम, देशप्रेम व द्रष्टेपणा दिसून येतो.
#बडोदा_संस्थान #महाराज_सयाजीराव_गायकवाड
संकलन : संतोषराजे गजाननराव गायकवाड
संदर्भ : १) श्रीमंत सयाजीराव गायकवाड - गणेश अग्निहोत्री २) श्रीमंत सयाजीराव गायकवाड - वि. पा. दांडेकर ३) लोकपाळ राजा सयाजीराव गायकवाड - बाबा भांड ४) श्री अरविंदांची जीवनकथा – तेहमि ५) Letters of H. H. Maharaj Sayajirao Gaekwad – G. S. Sardesai.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...