विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 7 March 2020

कोण होती रायबागन

कोण होती रायबागन?


     
“माहूरचा रामगड किल्ला”



       ई. स. १६५८ मध्ये औरंगझेबाने आपल्या बापाविरुद्ध बंड पुकारले. त्याच्या दिमतीला बरेच राजपूत सरदार होते. मुघल साम्राज्यात दोन गट पडले, एक दारा शुकोहचा तर दुसरा औरंगझेबाचा. औरंगझेबाच्या बाजूने माहूरच्या उदाजीराम याचा मुलगा जगजीवन लढत होता. आग्र्याजवळ समुगढ येथे  दारा आणि औरंगझेब यांच्यात निर्णायक लढाई झाली. या लढाईत जगजीवन मारला गेला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सैन्याचे नेतृत्व एका स्त्रीने केले. सैन्यात लढणाऱ्या एकमेव स्त्रीला औरंगझेबाने बघितले असावे. तिच्या असामान्य शौर्याने तो प्रभावित झाला.  त्या लढाईत औरंगझेबाचा विजय झाला. त्या लढणाऱ्या स्त्रीचा लौकिक सर्वत्र पसरला होता. औरंगझेबाने रीतसर गादीवर स्वतःला बसवून घेतल्यानंतर त्या स्त्रीस बोलाविण्याची आज्ञा केली. त्या प्रमाणे ती स्त्री दरबारात हजर झाली. ज्ञात झाले की ती माहूरचे मुघल सरदार राजे उदाजी राम यांची पत्नी आहे. तिचे नाव सावित्रीबाई. डोळ्यासमोर पोटच्या मुलाचा मृत्यू झालेला बघून देखील खचून न जाता ती प्राणपणाने लढली होती. औरंगझेबाने तिला “रायबागन” हा खिताब बहाल केला. रायबागन चे संस्कृत रूप म्हणजे राजव्याघ्री ( राज्याची वाघीण ). कवींद्र परमानंद कृत श्री शिवभारत या ग्रंथात तिचा याच नावाने उल्लेख केलेला आहे.
        ई.स. १५९५ मध्ये जेव्हा अकबराने माहूर किल्ला ताब्यात घेतला, तेव्हा तेथे इंद्रजीव नावाचा राजपूत जमीनदार होता. अकबराने त्याच्याकडून किल्लेदारी तसेच जहागीर काढून ती राजे उदाराम यांना दिली होती. हरचंदराय इंद्रजीवच्या कुळातला असावा. राजे उदाराम यांच्या मृत्यूनंतर सावित्रीबाईने अल्पवयीन जगजीवनरावच्या नावाने शहाजहान कडून जहागीर मिळवून घेतली होती. त्या जहागिरीसाठी हरचंदरायाने माहूरवर आक्रमण केले, तेव्हा त्याला सावित्रीबाईने प्रतिकार केला. आपल्या भाल्याला चोळी बांधून  ती लढण्यास सज्ज झाली. तिने तिच्या सैन्याला लढण्याचे आवाहन केले. “तुमच्या बहिणीची लाज राखा !” असे म्हणून तिने तिच्या सैन्याला उत्तेजीत केले. लढाई झाली, त्यात सावित्रीबाई स्वतः लढली आणि तिने हरचंदरायाचा पराभव केला. ही घटना ई. स.१६३२ ते ई. स. १६३७ दरम्यान घडली. या घटनेमुळे सावित्रीबाईंच्या शौऱ्याची खबर साऱ्या साम्राज्यात पसरली. जगजीवनच्या मृत्यूनंतर आपला नातू बाबुराव ह्यास हाताशी धरून ती जहागीर सांभाळू लागली.
        औरंगझेबाने आपला मामा शाहिस्तेखान यास दख्खनचा सुबेदार नेमले. शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले असता त्याने पुणे, सुपे , चाकण, इंदापूर वगैरे परगणे काबीज केले.  यावेळी शाहिस्तेखानाला सहाय्य करण्यासाठी रायबागनला पुण्याला पाठविण्यात आले. शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटून आले. त्यानंतर शाहिस्तेखानाने कहारतलब खानासोबत रायबागन हीस नेमले आणि चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल काबीज करण्यास मोठ्या फौजेनिशी त्यांना पाठवले. २ फेब्रुवारी, १६६१ ला  उंबरखिंडीत मुघली सैन्याला गाठून तिचा मराठ्यांनी धुव्वा उडविला. लढण्यात काहीही अर्थ नाही हे जाणून रायबागन ने काहारतलबास शिवाजीस शरण जाण्याचा सल्ला दिला. त्यावेळी ती काहारतलबास म्हणाली, “ शिवाजीरुपी सिंहाच्या आश्रयाखाली असलेल्या वनात सैन्यासह प्रवेश केलास हे तू वाईट काम केलेस. दिल्लीपती चे सैन्य तू तुझ्या गर्विष्ठाने सिंहाच्या जबड्यात आणून सोडले ही दुःखाची गोष्ट होय. आजपर्यंत दिल्लीपती ने जे काही यश मिळविले ते सारे तू ह्या अरण्यात बुडविले ! पहा ! मागे व पुढे, उजवीकडे व डावीकडे उभे असलेले शत्रू आनंदाने लढू इच्छित आहेत. हे पटाईत असलेले तिरंदाज तुझे सर्व सैनिक चित्रातील मनुष्यांप्रमाणे अगदी स्तब्ध आहेत. खेदाची गोष्ट ही की दिल्लीपतीच्या त्या मूर्ख सेनापती शाहिस्तेखानाने शत्रूच्या प्रतापरुपी अग्निमध्ये तुला सैन्यासह टाकले. शत्रू तुला ताबडतोब जिवंत पकडून नेऊ इच्छित आहे, तू मात्र कोंडला गेला असून आंधळ्या प्रमाणे युद्ध करू इच्छित आहेस. फलनिष्पत्ती होत असेल तरच पुरुषाच्या उद्योगाचा या जगात उपयोग, नाहीतर तेच साहसाचे कृत्य खरोखर उपहासास कारणीभूत ठरते. म्हणून तू लगेच त्या राजास शरण जाऊन आपणास सैन्यासह मृत्युपाशातून सोडीव.” तिचा सल्ला ऐकून काहारतलब खानाने शिवाजी महाराजांकडे दुत पाठविला, खंडणी दिली, क्षमा मागितली आणि आपली सुटका करून घेतली. पुढे काही दिवसांत ई. स. १६६३ मध्ये महाराजांनी लाल महालावर हल्ला केला. त्या प्रसंगी शाहिस्तेखानाची बोटे कापली. तीन महिन्यांनंतर खान पुणे सोडून गेला. त्याला बंगालला पाठविण्यात आले.रायबागनला मराठ्यांच्या कारवाया थांबवण्यासाठी पुणे प्रदेशातच नेमण्यात आले.
         ई.स. १६६४ साली महाराजांनी पहिल्यांदा सुरत लुटली. त्यावेळी रायबागनच्या सैन्यात आणि मराठ्यांच्यात चकमक झाली. तीत रायबागनचा पराभव झाला. तिला कैद करण्यात आले. शिवाजी महाराजांनी तिला मनसबदाराचा मान देऊन गौरव करून परत पाठवून दिले.  तथापि सुरत लुटीच्या कथेला सबळ पुरावा नाही. त्यामुळे यात इतिहासकारांचे दुमत आहे असे दिसते.





संदर्भ सूची :
१. कवींद्र परमानंद कृत शिवभारत
२. Indian historical records commission, Vol. XIV
© विनीत राजे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...