त्रिंबकजी डेंगळे.
त्रिंबकजी डेंगळे ही असामी साधीसुधी नव्हती. जर तिसरं इंग्रज-मराठा युद्ध मराठ्यांनी जिंकलं असतं तर त्रिंबकजीचा नावलौकिक सवाई नाना फडणीस असा झाला असता हे तत्कालीन कागदपत्रं अभ्यासता सहज समजून येतं. थोडक्यात उदाहरण देतो-इ.स. १८१४ च्या मध्यावर एल्फिन्स्टन नाशिकला जाताना निमगाव जाळीत, म्हणजे त्रिम्बजीच्या गावात असताना त्याला त्रिंबकजीची महती कळली. यावेळी एल्फिन्स्टनला त्रिंबकजीबद्दल थोडीफार माहिती होती की हा श्रीमंतांच्या मर्जीतला आहे वगैरे. पण गावात आल्यानंतर त्याला जे दृश्य दिसलं त्यावर एल्फिन्स्टन त्रिंबकजी डेंगळ्यांबद्दल लिहितो- "त्रिंबकजी एवढ्या उच्चतेस पावला असून आपल्या पहिल्या आप्तइष्ट मंडळीला व गावच्या लोकांना स्मरतो आहे; आपल्या गावाला जपतो आहे; त्याच्या भवताली कोट बांधतो आहे; हे त्याला भूषण आहे असे कोणालाही वाटेल. त्याचे एकंदर वर्तन असेच असते म्हणजे बरे होते". शेवटच्या वाक्यात एल्फिन्स्टनला त्रिंबकजीचं राजकारण खटकू लागलं आहे याची आपल्याला चाहूल लागते.याच सुमारास काही दिवसांनी एल्फिन्स्टन कलकत्त्याला ईस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नर जनरलला लिहितो, "या नवीन दिवाणाची (त्रिंबकजीची) इच्छा इंग्रज सरकारचा आपल्यावर विश्वास बसवून घ्यावा अशी असल्याने आम्हाला तूर्त काही फायदे होतील; परंतु ते फार वेळ टिकणार नाहीत; आणि त्रिंबकजीच्या स्वभावावरून आणि वर्तनावरून मला अशी भीती उत्पन्न होते की, बाजीराव जे आपले हक्क हक्क म्हणत आहेत ते साधून देण्याची तो फार खटपट करील आणि आमच्या बेताच्या उलट ते वागू लागतील. तेव्हा आम्ही जी सल्लामसलत देऊ तिला आत्ताच्या दिवाणापेक्षा तो अगदी अयोग्य प्रकारे आडवा जाईल". यातला गर्भितार्थ असा, की साम-दाम-दंड-भेद उक्तीप्रमाणे त्रिंबकजी सुरुवातीला गोड बोलून इंग्रजांना वळवू पाहतो आहे. पण त्याच्या वर्तनावरून एल्फिन्स्टला भीती वाटत आहे की नंतरच्या काळात हाच मनुष्य आपल्याला जड जाईल.पुढे एल्फिन्स्टनची भीती खरी ठरली. त्रिंबकजी दिवाण झाल्यानंतर एके दिवशी त्याच्या रोजनिशीत लिहिलं आहे की, "त्याची नेमणूक झाल्यापासून तो मला भेटण्याकरिता किती एक वेळ आला. त्याने स्वतः आपल्या कृतीने व आडपडद्याच्या भाषणांनी, आणि चांगल्या प्रकारे वागण्याची वचने देऊन, माझी मर्जी संपादण्याची फार इच्छा दाखवली. आपली मुख्य दिवाणगिरीवर नेमणूक झाली तर ती इंग्रजी सरकारास मान्य होईल का नाही या संशयात तो आहे. ती जागा पटकावण्याला त्याला काय ती एवढी गरज वाटत आहे? एवढ्या थोरल्या पदावर विराजमान होण्याला तो खरोखर अगदी अयोग्य मनुष्य आहे. तो आधी अक्षरशत्रू आहे, वाचवायला सुद्धा शिकलेला नाही. त्याची रीतीभाती, समज, अक्कल वगैरे, तो ज्या वर्गातला आहे त्यातल्या इतर माणसांप्रमाणेच आहे. हिंदुस्थान देशाची स्थिती काय, आपले यजमान श्रीमंत पंतप्रधान यांची योग्यता काय, त्यांचे राज्य केवढे, त्यांचा आणि इंग्रज सरकारचा जो तहनामा झालेला आहे, त्याने उभयतांचा संबंध कोणत्या प्रकारचा झालेला आहे वगैरे गोष्टींची त्याला काही एक माहिती नाही. मराठे लबाड व बेईमान हे तर प्रसिद्धच आहे. परंतु त्यांच्यामध्ये देखील त्रिंबकजीचा या गुणाविषयी डंका वाजत आहे".आता या येथेच्छ शिव्या, थोडीफार मनातली खदखद आणि त्रिंबकजीविषयीचा एल्फिन्स्टनचा दुःस्वास सगळं काही स्पष्ट सांगून जातो. पुढे एल्फिन्स्टनने ५ ऑगस्ट १८३२ मध्ये व्हिलर्स नावाच्या अधिकाऱ्याला एक रिपोर्ट पाठवला होता (वा. सी. बेंद्रे यांनी तो प्रसिद्ध केला आहे- महाराष्ट्रेतिहासाची साधने, खंड २, लेखांक १०१०) त्यात त्याने वर जे त्रिंबकजीला दोष दिले आहेत त्याच दोषांचं इतरांच्या बाबतीत कौतुक केलेलं आहे. हे सगळं उघड आहे, की एल्फिन्स्टन आणि इतर इंग्रजी अधिकाऱ्यांच्या मराठी राज्य हडपण्याच्या ज्या हालचाली सुरु झाल्या होत्या त्यांना त्रिंबकजी केवळ आडवाच जात नव्हता तर त्यांना अडथळेही आणत होता. एल्फिन्स्टनच्या रोजनिशीत उताऱ्यांवरून आपल्याला त्याच्या मनातील हावभाव आणि अनेक ठिकाणी त्रिंबकजीबद्दल त्याला किती राग होता हे दिसून येईल. त्याची संपूर्ण रोजनिशी कोलब्रुक नावाच्या व्यक्तीने "लाईफ ऑफ द ऑनरेबल माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन" या नावाने दोन खंडात संपादित केलेली आहे.
No comments:
Post a Comment