थोरल्या आऊ- जिजाऊ
जिजामाता असे म्हटले की आपले डोके आपोआपच आदराने झुकले जाते. स्वराज्य स्थापनेच्या मार्गदर्शक असणाऱ्या जिजामाता यांचा विचार करताना त्या कुठल्या मुशीतुन घडल्या असतील असा विचार सहजच मनात येतो. अनेक पातळ्यावर संघर्ष केलेली ही संघर्षयात्री आपल्या पराक्रमाने, विचारांनी फक्त छत्रपतींच्या माता न राहता सर्व महाराष्ट्राच्या माँसाहेब झाल्या.
जिजाऊंचा जन्म झाला तो काळ प्रचंड उलथापालथ असलेला काळ होता. महाराष्ट्रात पाच शहा होते. निजामशहा, आदिलशहा, ईमादशहा, बेरदशहा आणि कूतूबशहा आणि या सर्वांच्या वर मुघल बादशहा.
हे सर्व सुलतान अतिशय जुलमी होते आणि त्यांच्या साठी लढत होती महराष्ट्रातील अनेक शूर घराणी. त्यातील एक घराणे म्हणजे सिंदखेडराजा येथील जाधव घराणे. त्यातील एक म्हणजे लखुजीराव जाधव हे निजामशाही मध्ये मोठे नामांकित सरदार होते.त्यांच्या पत्नीचे नाव म्हाळसाबाई. या दोघांच्या पोटी 12 जानेवारी 1598 ला जिजाबाईंचा जन्म सिंदखेडराजा इथे झाला.
लखुजी राजे मोठे सरदार असल्यामुळे त्यांची 10000 ची फौज कायम सिंदखेड येथे असे.
अनेक सरदार अधिकारी यांचे त्यांच्याकडे येणे जाणे असे. जहागीर ही मोठी होती. त्यामुळे या सर्व वातावरणात आवश्यक ते सर्व संस्कार आपोआपच जिजाऊंवर होत होते.जिजाऊंना आपल्या वडिलांकडून शस्त्र शिक्षणही मिळाले होते. अश्वारोहन आणि विविध शस्त्र चालवण्यात त्या पारंगत होत्या. तेज नजर आणि तल्लख बुद्धी यामुळे मूळच्या सुंदर असलेल्या जिजाऊचे व्यक्तिमत्व अजूनच खुलून येत असे. 'राधामाधव विलास चंपू ' या ग्रंथा मध्ये जयराम पिंडे यांनी त्यांच्या सौंदर्याचे खुप छान वर्णन केले आहे.
॥जशी चंपकेशी खुले फुल्लजाई
भली शोभली ज्यास जाया जिजाई
जिचे कीर्तीचा चंबू जम्बुद्वीपाला
करी साउलीसी माउलीसी मुलाला ॥
अगदी यथार्थ असे हे वर्णन आहे.त्याच वेळी वेरुळ येथे मालोजीराजे भोसले आणि विठोजी राजे भोसले हे दोघे भाऊ आपली पाटीलकी सांभाळत जहागिरी ही सांभाळत होते. त्यांचा आणि लखुजी रावांचा चांगला स्नेह होता. यातीलच मालोजीराजे भोसले यांचे पुत्र म्हणजे शहाजी राजे भोसले.दोन्ही घराच्या स्नेहातून शहाजी राजे आणि जिजाऊ यांचा विवाह जुळून आला आणि या विवाहाच्या निमित्ताने ही दोन्ही मातब्बर घराणी 1605 साली एकत्र आली.
ही दोन घराणी एकत्र तर आली.दोन्ही घराणी निजामशाही मध्ये उच्च पदावर होती. शहाजी राजे ही मोठे सरदार होते. निजामशाहा हुशार होता अशी मोठी घराणी एकत्र आलेली त्याला परवडणार नव्हते. असेच एक दिवस निजामशाहचा दरबार भरला होता. दरबार सुटला आणि सर्व सरदार बाहेर पडू लागले. इतक्यात सरदार खंडागळे यांचा हत्ती पिसाळलला आणि फौजेला तुडवत पळू लागला.हत्तीला आवरण्यासाठी दत्ताजी जाधराव म्हणजे जिजाबाई चे भाऊ धावले तर दुसऱ्या बाजूने शहाजी राजांचे चुलत भाऊ संभाजीराजे उतरले. हत्ती बाजूलाच राहिला आणि तिथेच लढाई चालू झाली. स्वतः लखुजी राजे व शहाजी राजे एकमेकांविरुद्ध लढू लागले. शेवटी दत्ताजी जाधवराव आणि संभाजी राजे दोघंही लढता लढता ठार झाले आणि ही दोन घराणी एकमेकांची कायन दुश्मन झाली. निजाम शहा मात्र किल्ल्यावर बसून हसत होता. त्याचे काम बिनबोभाट झाले होते.
काय अवस्था झाली असेल जिजाबाईची. भाऊ वारला म्हणून दुःख करायचे की दीर वारले म्हणून शोक करायचा. याहून भयानक म्हणजे दोन्ही घराण्यात आलेला दुरावा. जिजाऊंचे तर माहेरच दुरावल्या सारखे झाले. हा प्रकार इथेच थांबला नाही तर पुढे 1629 मध्ये निजामशहाने भर दरबारात लखुजी राजे जाधव आणि त्यांचे तीन पुत्र अचलोजी राघोजी आणि यशवंत राव यांची दगलबाजीने हत्या केली. फक्त एक पुत्र बहादुरजी तेव्हडे तिथे नसल्यामुळे वाचले. असे होते सुलतान.
या वेळी जिजाऊ शिवनेरीवर होत्या आणि त्या गरोदर होत्या. काय वाटले असेल त्यांना ही बातमी ऐकून. किती व्याकुळ झाल्या असतील, काय काय विचार त्यांच्या मनात आले असतील सर्व काही विचार करण्याच्या पलीकडे आहे. शहाजी महाराज सतत मोहिमा मध्ये गुंतलेले, ज्येष्ठ पुत्र संभाजी ही शहाजी राज्यांबरोबर आणि जिजाबाई अवघडलेल्या अवस्थेत शिवनेरीला.
अशाच सगळ्या वातावरणात शिवाजी महाराजांचा 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी वर जन्म झाला.झालेल्या अनेक घटनांनी जिजाऊ खचून तर गेल्या नव्हत्या पण त्यांनी मनाशी नक्की काही तरी ठरवले होते. या आधी शहाजी महाराजांनी स्वतंत्र राज्य स्थापनेचा प्रयत्न केला होता पण तो फसला होता. तीही प्रेरणा जिजाऊंना होतीच.
त्या द्रुष्टीने त्यांनी शिवाजी राजांना लहान पणापासूनच तयार करण्यसाठी प्रयत्न चालू केले.रामायण, महाभारत तर सांगितलेच पण इतिहासातील अनेक दाखले देऊन त्यांना स्वराज्य निर्मितीचे महत्वही पटवून दिले. अगदी लहान वयातच अनेक प्रकारचे संस्कार त्यांनी शिवबावर केले. पुण्यात लाल महाल बांधून घेतला. कान्होजी शिर्के आणि इतरांच्या मदतीने सर्व जहागीर फिरून दाखवली. पुणे शहर वसवताना लोकांना कौल देऊन गावे बसवणे, रयतेशी सलगी करणे, त्यांचे सुख दुःख जाणून घेणेप्रसंगी कठोर होणे, माघार घेणे हे सगळे शिक्षण त्यांनी शिवरायांना दिले आणि त्यातूनच महाराष्ट्राला अष्टावधानी असे छत्रपती मिळाले.शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळातील मोहिमा म्हणजे सगळे नियोजन जिजाऊंचे होते. त्यातूनच महाराजांचे राजकीय कौशल्य, युद्धकौशल्य, रणनीती,स्त्री आदर हे सर्व गुण तयार होत होते. हे सर्व करत असतानच फडावरचा कारभार ही जिजाऊ सांभाळत होत्या. त्यातूनही महाराजांचे शिक्षण चालू होते.
माणसे कशी जोडायची, नवीन संबध कसे तयार करायचे, सैन्याशी आणि रयतेशी सलगी कशी करायची असे सगळे शिक्षण जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली महाराज घेत होते.अफजलखान वधाच्या वेळीही महाराज दुःखा त होते कारण नुकतेच सईबाई चे निधन झाले होते त्यावेळी ही त्यांना मानसिक आधार देत त्यांचे मनोबल तर उंचावलेच पण संभाजी राजांची जबाबदारीही आपल्यावर घेतली. खरे तर त्या आधीच काही दिवस ज्येष्ठ पुत्र संभाजी राजे यांच्या युद्धातील मरणाला अफजलखान कारणीभूत ठरला होता. ते दुःख खुप मोठे होते पण स्वतः चे सर्व दुःख जिजाऊंनी बाजूला ठेवले होते. शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकून पडले तेंव्हा ही त्या स्वतः समशेर घेऊन निघाल्या होत्या. महाराज आग्र्याला अडकून पडले तेंव्हा तर जिजाऊंची खरी कसोटी होती. मुलगा आणि नातू दोघेही शत्रूच्या मगर मिठीत अडकलेले पण याचा कुठलाही परिणाम होऊ न देता सर्व राज्य जिजाऊंनी अतिशय उत्तम रीत्या सांभाळले. महाराज नसताना ही त्यांनी स्वराज्याचा एकही किल्ला जाऊ दिला नाही उलट तीन चार नवीन घेतले.
त्यांच्या जागी असलेला हा बाणेदारपणा, धीरोदत्त अशी व्रुत्ती, धाडस या सर्व गुणांमुळे स्वराज्य उभारणे सोपे झाले. याच वेळी परत एक मोठे संकट त्यांच्यावर ओढवले.
इ. स. 1664 साली शहाजी राजे कर्नाटक मध्ये होदेगैरी च्या जंगलात शिकारी मागे जात असताना घोड्याचा पाय अडकून खाली पडले आणि त्यातच त्यांचे निधन झाले.जिजाऊंवर दुःखाचा डोंगर कोसळला. राजगडावर बातमी आली तेंव्हा शिवाजी महाराज सुरते च्या स्वारीवर होते. जिजाऊंनी सती जायची तयारी केली होती. पण तेव्हड्यात महाराज वापस आले आणि महत्प्रयसाने महाराजांनी जिजाऊंना सती जाण्यापासून रोखले.औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्यानंतर महाराज आणि जिजाबाईंनी अत्यंत शांत आणि धोरणी पणाने तहामध्ये गेलेले राज्य तर मिळवलेच पण राज्याची सीमा अजून दूरपर्यंत वाढवली. इ. स. 1670 मध्ये शिवरायांनी आपली राजधानी राजगड वरून रायगडला हलवली आणि जिजाऊंना आयुष्यभर जपलेले स्वराज्याचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणारा याचा अंदाज येऊ लागला. शिवरायांनी राज्याभिषेक करून घ्यावा असे जिजाऊंचे ही मत होतेच. त्यादृष्टीने तयारी चालू झाली. हा सोहळा अभूतपर्व असा असणार होता. कारण महाराज चक्रवर्ती राजा होणार होते. महाराष्ट्राच्या भूमीला आपला हक्काचा राजा मिळणार होता. यातही अनेक अडचणी होत्या. पण शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांनी अत्यंत हुशारीने या सर्व अडचणी वर मात केली.दि. 6जून 1674 महाराज सिंहासनाधीश्वर झाले. महाराष्ट्रात स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. महाराजानी यवनी विळख्यातून महाराष्ट्राला मुक्त करून स्वराज्य अधिक्रुत रीत्या स्थापन केले. जिजाऊंच्या आयुष्यातला हा सर्वोच्च क्षण होता. शहाजी महाराजांची संकल्पना, जिजाऊंचे मार्गदर्शन आणि छत्रपतींच्या पराक्रमाणे अंमलबजावणी अशी ही साखळी होती. छत्रपतींवर राज्याभिषेक होत असताना जिजाऊंचे डोळे भरून येत होते. आयुष्यभर केलेल्या कष्टांची आज इष्टा पत्ती होत होती. हे भरलेले डोळे म्हणजे आनंद आणि आठवण यांचे संयुक्त मिश्रण होते. शिवराय राजे झाल्याचा आनंद होता तर शहाजी राजे, थोरले संभाजी राजे,सईबाई, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, प्रतापराव गुजर अशा अनेक विरानी दिलेल्या आहुतीची आठवण होती. शिवरायांचे तर आपल्या आईवर अतिशय प्रेम होते. त्यांच्यासाठी आई म्हणजे सर्वस्व होते. जिजाऊंना रायगडावरील थंड हवा मानवत नाही म्हणून महाराजांनी गडाखाली पाचाड येथे जिजाऊंसाठी वाडा बांधून घेतला होता.
राज्यभिषेक पाहून जिजाऊंना आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते. या आनंदात असतानाच जिजाऊंची तब्येत बिघडली. राज्याभिषेक प्रसंगी खुप श्रमही झाले होते. अनेक उपचार झाले पण तब्येत बिघडत गेली आणि राज्याभिषेकानंतर अवघ्या बाराव्या दिवशी म्हणजे 17 जून 1674 रोजी जिजाऊंसगळ्या महाराष्ट्राला, जनतेला शिवरायांना शंभुराजाना पोरके करून अनंता च्या प्रवासाला निघून गेल्या.
डॉ. आर. आर. देशमुख
No comments:
Post a Comment