विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 26 April 2020

महाराणी सईबाई


महाराणी सईबाई
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अतिशय महत्वाचे स्थान असलेल्या सईबाई विषयी फारसे लिखाण कुठे आढळत नाही.खरे तर जिजाऊ साहेबांनंतर महाराजांच्या जीवनात यांचे खूप जास्त महत्व होते पण केवळ 26 वर्ष आयुष्य लाभलेली ही महाराणी इतक्या कमी आयुष्यात सुध्दा खुप मोठे काम करून गेली.
फलटणचे राजे श्री.मुधोजीराव निंबाळकर आणि रेऊबाई निंबाळकर यांच्या पोटी सईबाई।यांचा जन्म इ. स. 1633 साली फलटण येथे झाला. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी त्या काळातील पध्हतीप्रमाणे त्यांचे शिवाजी महाराजांबरोबर लग्न झाले आणि सईबाई पुण्याला जिजाऊंच्या छत्रछायेखाली आल्या.गौर वर्ण चुणचुणीत आणि मुळातच हुशार असणाऱ्या सईबाई च्या हुशारीला जिजाऊच्या छायेत अजूनच धार चढली .
हा काळ तसा खुप धामधुमीचा होता. शिवरायांचा स्वराज्य स्थापनेचा उद्योग जोरात चालू होता. त्यांचा पाय घरात ठरत नव्हता.सतत लढाई ,घोडदौड ,मोहिमा चालू होत्या.या काळात नवीनच आकाराला येत असणाऱ्या स्वराज्याचे फडावरील काम जिजाबाई पाहत होत्या आणि त्या हा सर्व पसारा यशवीपणे सांभाळत असताना त्यांच्या हाताखाली सईबाई तयार होत होत्या.
या नवीन आकाराला येत असणाऱ्या स्वराज्या मध्ये अनेक अडचणी होत्या. अनेक वेळी महाराजांना कुठे माघार घ्यावी लागायची ,कधी स्वकीयांचा त्रास ,कधी पैशाची कमतरता कधी सैन्याची कमतरता आणि समोर असलेले मुघल ,आदिलशहा आणि कूतूबशहा सारखे प्रबळ शत्रू .अशावेळी महाराजांना मानसिकरित्या खंबीर पाठिंबा जिजाऊंसाहेवा सोबत तितक्याच ताकदीने सईबाई ही देत होत्या. लहान वय ,नाजूक तब्येत याचा कुठलाही परिणाम त्यांच्या कर्तबगारी वर होत नव्हता.जिथे जिथे गरज लागेल तिथे आवश्यक तो सल्ला देणे , महाराजांचे माघारी जिजाऊंच्या सोबत सगळा कारभार पाहणे हे सर्व त्या अगदी समर्थपणे करत होत्या.
सईबाई ना एकूण चार अपत्य झाली. सखुबाई ,राणुबाई, अंबिकाबाई आणि छत्रपती संभाजी महाराज.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मावेळी त्यांना बाळंतव्याधी चा रोग जडला आणि शिवाजी महाराजांचा हा भावगड ढासळायला चालू झाला.अगदी संभाजी महाराजांना दूध पाजण्यासाठी म्हणूनही कापूर होळ गावच्या धाराऊ नावाच्या दूध आई ला आणावे लागले.स्वतः च्या मुलाला दूध न पाजता येण्याचे दुःख , तोळामासा झालेली तब्येत,अफजल खानाच्या रूपाने स्वराज्यावर आलेले संकट ,महाराजांची वाढत चाललेली चिंता सगळीच परिस्थिती भयावह होती. महाराज अफजल खान स्वारी च्या निमित्त अखंड बाहेर होते पण त्यांचे मन मात्र झूरत चाललेल्या त्यांच्या लाडक्या सई भोवती रुंजी घालत होते. काळजावर दगड ठेऊन महाराज सर्व कर्तव्य पार पाडत होते.एकीकडे संकटात सापडलेले स्वराज्य, लहान संभाजी राजे आणि दिवसागणिक क्षीण होत चाललेल्या सईबाई. असेच महाराज प्रतापगडावर असताना सईबाई ची तब्येत बिघडल्याची बातमी आली आणि महाराजानी धावतपळत राजगड गाठला.सईबाई अखेरच्या घटका मोजत होत्या. महाराज आले त्यांनी सईबाई चा हात हातात घेतला.काहीही बोलण्याची गरज नव्हती.नुसत्या स्पर्शातुन एकमेकांची मने दोघानाही कळत होती. सईबाईना काळजी होती लहानग्या शंभुराजांची.महाराजांना काही सुधरत नव्हते ,नुकतेच कुठे स्वराज्य आकाराला येत होते आणि अशावेळी सुखात सुख आणि दुःखात दुःख अशी पूर्णपणे त्यांच्या मध्ये विरघळून गेलेली सई अर्धा डाव सोडून निघाली होतq. महाराजानी संभाजी राजांना आणि तीनही मुलींना नीट सांभाळण्याची सई ना खात्री दिली त्यांची चिंता कमी करण्याचा प्रयत्न केला पण सईबाई महाराजांकडे पाहत असतानाच कधीच आपल्या कधीही एन संपणाऱ्या प्रवासाला निघून गेल्या होत्या. लहान पणाची सवंगडी ,तरुणपणीची भार्या, अनेक संकटात खंबीर पणे मागे असलेली सई महाराज संभाजी राजे, सखु, राणूआणि अंबिका यांना पोरके करून निघून गेल्या होत्या.महाराजांच्या, जिजाऊंच्या दुःखाला पारावार नव्हता. हि काळीकुट्ट तारीख होती 5 सप्टेंबर 1659.
महाराणी सईबाई ची समाधी राजगड येथे आहे. या राणीला त्रिवार मुजरा.
डॉ. आर. आर. देशमुख

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...