विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 1 April 2020

विठोजी चव्हाण (हिंमतबहाद्दर)

मराठ्याची धारातीर्थे ह्या ग्रंथातील हिंमतबहादूर विठोजीराव च्हाण यांचे पूर्ण प्रकरण.

* जन्म दिनांक- 1659 अंदाजे * मृत्यू दिनांक- 25 मे 1696
* समाधीस्थान- अज्ञात * नियोजित स्मारक- कसबे डिग्रज, जि.सांगली.
पंढरपूर तालुक्यातील तोंडले-बोंडले हे चव्हाणांचे मूळ गाव. इथे चव्हाणांचा जुना वाडा जीर्ण अवस्थेत आहे. चव्हाण घराण्याचे मूळ पुरुष वालोजी चव्हाण हे शहाजीराजे निजामशाहीत सरदार असताना त्यांच्या सैन्यात होते. 1626 मध्ये शहाजीराजे आदिलशाहीत दाखल होताच वालोजी चव्हाणही त्यांच्या सोबत होते. वालोजी चव्हाणांचा विजापूर येथे मृत्यू झाल्यानंतर त्यांचे पुत्र राणोजी चव्हाण ह्यांना शहाजीराजांनी शिवरायांकडे पाठविले. लढायांच्या प्रसंगात राणोजींचे शौर्य पाहून शिवरायांनी त्यांना पायदळाच्या तुकडीचे सरदार बनविले. शिवरायांच्या दुसर्‍या सूरत मोहिमेत राणोजीराव सामील होते. 1675 मध्ये शिवरायांनी सिद्दीच्या जंजिरा किल्ल्याला शह देण्यासाठी जंजिर्‍याच्या जवळच पद्मदुर्ग किल्ला बांधायला सुरुवात केली. ह्यावेळी गोवळकोट हा सिद्दीचा किल्ला जिंकण्यासाठी गेलेल्या राणोजी चव्हणांचा गोवळकोटच्या लढाईत रणांगणावर मृत्यू झाला. स्वराज्यासाठी राणोजींनी प्राणार्पण केले. राणोजींना दोन पुत्र होते. थोरले विठोजीराव व धाकटे मालजीराव. शिवरायांचे निकटवर्ती सरदार म्हाळोजी घोरपडे ह्यांच्या विनंतीवरुन शिवरायांनी राणोजींची सरदारी विठोजींना दिली त्यावेळी विठोजी जेमतेम 15-16 वर्षाचे होते. विठोजी नेहमी म्हाळोजींचे पराक्रमी पुत्र संताजी घोरपडे यांच्यासोबत असत.
शिवरायांच्या मृत्यूनंतर शंभूराजे छत्रपती झाले. फितुरीमुळे शंभूराजे मोगलांच्या हाती सापडले. औरंगजेबाने अत्यंत क्रूरपणे अमानुष हाल करुन शंभूराजांची हत्या केली. हा घाव मराठ्यांच्या जिव्हारी लागला. मराठे दिग्मूढ झाले. ह्या आणीबाणीच्या स्थितीत संताजी घोरपडेंनी औरंगजेबालाच संपविण्याचा ध्यास घेतला. औरंगजेबाच्या छावणीत घुसून थेट औरंगजेबावरच हल्ला करण्यासाठी संताजीनी एक अतिशय धाडसी योजना आखली. शायिस्तेखानावर जसा शिवरायांनी लाल महालात घुसून हल्ला केला तसाच हा हल्ला होता. पण इथे गाठ औरंगजेबाशी होतो. लाखभर फौजेच्या गराड्यात मध्यभागी असलेल्या औरंगजेबाच्या शाही तंबूवर हल्ला करणे ही अशक्यप्राय गोष्ट होती.
निवडक 2000 सैन्य घेऊन रात्रीच्या वेळी संताजी व त्यांचे बंधू बर्हिजी, मालोजी आणि विठोजीराव चव्हाण तुळापूर येथे औरंगजेबाच्या छावणीजवळ रात्र पडल्यानंतर आले. पहारेकर्‍यांना खोट्या सबबी सांगत, आपल्याबरोबरचे सैनिक जागोजागी पेरत वरील चार वीरांनी औरंगजेबाचा तंबू गाठला. ह्यावेळी औरंगजेब शामियान्यात नव्हता. चिडून जाऊन ह्या मराठा वीरांनी तंबूचे तणावाचे दोर कापून तंबू भुईसपाट केला आणि त्यावरील सोन्याचे दोन कळस कापून घेऊन आले तसे वार्‍याच्या वेगाने पसार झाले. मराठे अजून जिवंत आहेत हे एवढेच नव्हे तर खुद्द औरंगजेबाचे प्राणसुद्धा घेण्याएवढे ते निडर आहेत हे मोगल बादशहाला दाखवून हे वीर छत्रपती राजाराम महाराजांकडे आले. अत्यंत संतुष्ट झालेल्या राजाराम महाराजांनी ह्या वीरांना नावाजून त्यांना सन्मान व शौर्य निदर्शक पदव्या दिल्या. संताजींना ‘ममलकतमदार’, बर्हिजींना ‘हिंदूराव’, मालोजींना ‘अमील उल उमरा’ तर विठोजी चव्हाणांना ‘हिंमतबहादूर’ असे किताब मिळाले. (1689 जून)
महाराष्ट्रात मोगल सगळीकडे पसरले होते. त्यातच रायगड किल्ला कबजात घेऊन मोगलांनी शंभूराजांच्या पत्नी येसूबाई, पुत्र शाहूराजे इत्यादींना कैद केले. राजाराम महाराज ह्यापूर्वीच रायगडावरुन निसटले होते. अनेक जीवघेण्या संकटातून पार होत, अनेक तर्‍हेची वेषांतरे व बहाणे करुन राजाराम महाराज जिंजी येथे सुखरुप पोहोचले. मागोमाग औरंगजेबाने मोठी फौज पाठवून जिंजीला वेढा घातला. सेनापती संताजीनी महाराष्ट्रात, कर्नाटकात व तामिळनाडूत प्रचंड शौर्य गाजवून अनेक मोगल सरदारांचा पराभव केला. ह्या त्यांच्या मोहिमेत विठोजीराव त्यांच्याबरोबर असत. मोगलांचा जोर कमी होताच 1697 मध्ये राजाराम महाराज परत महाराष्ट्रात यायला निघाले. ह्यावेळी राजाराम महाराजांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात आणायची जबाबदारी विठोजी चव्हाणांनी स्विकारली. जवळपास 1100 किलोमीटरचा हा प्रवास मोगलांना चुकवून अत्यंत सावधपणे करुन छत्रपतींना महाराष्ट्रात आणण्याची अवघड जबाबदारी विठोजींरावांवर होती.
गुप्तता बाळगून प्रवास करायचा असल्याने राजाराम महाराजांबरोबर सैन्याची छोटी तुकडी व विठोजीराव इतर महत्वाच्या सरदारांसह होते. बेंगलोर येथे आल्यानंतर विश्रांतीसाठी छावणी पडली. ह्याचवेळी दक्षिणेत निघालेल्या एका मोगली सैन्याच्या तुकडीला ही बातमी समजली. तत्काळ मोगलांनी मराठ्यांवर हल्ला केला. विठोजीराव व त्यांच्याबरोबरच्या सैनिकांनी लढाईचा भार आपल्या अंगावर घेऊन मोगलांवर प्रतिहल्ला चढविला. ह्यामुळे राजाराम महाराज सुरक्षितपणे निसटले. अत्यंत प्रखर हल्ला करुन विठोजीरावांनी मोगली हल्ला उधळून लावला पण ह्या लढाईत तलवारींचे अनेक वार लागून विठोजीराव वीरगती पावले. (25 मे 1696 .).पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडेनी केलेल्या पराक्रमाच्या तोडीचा हा पराक्रम होता. राजाराम महाराज पुढे सुखरुप पन्हाळ्यावर पोहोचले.
विठोजीरावांचे सोळा वर्षाचे पुत्र उदाजीराव हे ह्या स्वारीत होते. विठोजीरावांची सरदारी राजाराम महाराजांनी उदाजीरावांना दिली. विठोजीरावांची बेंगलोर परिसरात अथवा इतर ठिकाणी कुठेही समाधी आढळत नसल्याने त्यांच्या वंशजांनी डिग्रज (जि.सांगली) येथे त्यांचे स्मारक उभारण्याचा संकल्प सोडला आहे.
मुद्रा ः श्रीराजा शंभुछत्रपती चरणी तत्पर ।
राणोजीसुत विठोजी चव्हाण हिंमतबहादूर ॥
विठोजी चव्हाण (हिंमतबहाद्दर)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...