हे उच्चश्रेणीतील परंपरागत वतनदार असून वंशपरंपरेने आपली कामे सांभाळीत. देशमुखी म्हणजे लष्करी व फौजदारी अधिकारी होत. गावाचे संरक्षण जसे पाटील करी, तसे परगण्याचे संरक्षण देशमुख करी. लढाईच्या प्रसंगी पाटील व देशमुख-देशपांडे यांनी अमूक एवढे सैन्य सरकारास पुरवावे, असे करार असत. गावात वसाहत करणे, शेती व उद्योगधंदे सुरू करणे आणि मध्यवर्ती सत्तेला विशिष्ट सारा गोळा करून देणे, ही देशमुखांची प्रमुख कामे असत. कर्नाटकात देशमुख-देशपांडे यांनाच अनुक्रमे ‘नाडगावुडा’आणि ‘नाडकर्णी’ म्हणत. हे परागण्यातील सर्व जमाबंदीचा हिशोब ठेवीत आणि वसुलीवर देखरेख ठेवीत. यांच्याजवळ थोडीफार शिबंदी (सैन्य) असे आणि त्या लष्करी बळावर गढ्या, कोट बांधून त्यांत ते वास्तव्य करीत व आसपासच्या मुलाखात दंडेलगिरी करीत किंवा मध्यवर्ती सत्ता दुर्बळ असल्यास प्रदेशविस्तारही करीत. शिवाजीनी देशमुख−देशपांडे वतनदारांना काबूत आणण्यासाठी काहींची वतने काढून घेतली, तर काहींशी समझोता करून त्यांना आपल्या स्वराज्याच्या कार्यात सामावून घेतले.
देशमुख−देशपांडे यांचा शासकीय शेतसाऱ्यावर दोन ते पाच टक्क्यांपर्यंत हक्क असे. त्यास ‘रूसूम’ म्हणत. कुठेकुठे धान्यावरही यांचा तीन टक्के व रोख रकमेवर सात टक्के हक्क असे. याशिवाय त्यांना इनामी जमिनी असत. पाटील−कुलकर्ण्यांप्रमाणेच परागण्याच्या पंचायतीत त्यांना हक्कबाबी असत. भेट, तोरण, घट, जोडा, पासोडी, तूप, तेल वगैरे वस्तू बलुत्याप्रमाणेच त्यांनाही अधिक प्रमाणात मिळत असत. परागण्याच्या जमाबंदीचे सर्व दप्तर देशपांड्यांच्या ताब्यात असे. त्यांच्या हाताखाली ‘मोहरीर’ नावाचा एक कारकून हे काम पाही. निरनिराळ्या वहिवाटदारांचे, वतनदारीचे हक्क व जमिनीची प्रतवारी, तिचे वर्णन इ. बारीकसारीक बाबींची नोंद या हिशोबात केलेली असे. देशपांडे विविध गावांच्या कुलकर्ण्यांनी पाठविलेले सर्व हिशोब संकलित करून सर्व परगण्यांचा ताळेबंद तयार करीत असे. कोकणात व कर्नाटकात हे काम देसाई हे वतनदार करीत. कोकणातील प्रभुपणाचा हुद्दाही देसायांच्याच जोडीचा असे. काही वेळा प्रभुदेसाई असा वतन-हुद्याचा उच्चार करीत. देशपांडे-देसाई हे देशमुखाच्या हाताखालील वतनदार असत. काही ठिकाणी देशपांड्यासच देशकुलकर्णी असेही म्हटले आहे. मुसलमानी अंमलात वतनाच्या घालमेली झाल्या. त्यावेळी मराठे पाटील व मराठे देशमुख हे बरेचसे स्थानभ्रष्ट होऊन त्यांच्या जागी ब्राम्हण देशमुख आले. वतनाप्रीत्यर्थ मुसलमान झालेले देशमुख−देशपांडे, परगणे−नाईक क्वचित काही ठिकाणी दृष्टोत्पत्तीस येतात. अव्वल ब्रिटिश अंमलात देशमुख−देशपांडे यांचे वतनदारी अधिकार कमी करण्यात आले; मात्र त्यांचा रूसूम चालू होता.
No comments:
Post a Comment