विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 10 May 2020

राजर्षी शाहू छत्रपतींनी घडवले बालगंधर्व

राजर्षी शाहू छत्रपतींनी घडवले बालगंधर्व

' नारायण राजहंस ' नावाच एक पोरग घरच्या गरीब परिस्थितीमुळे आपल्या आजोळी कोल्हापूरला रहायला आले. या पोराचे आजोबा आप्पाशास्त्री बेलेकर महाराजांच्या सेवेत होते. महाराजांचा उदार व दयाळू स्वभाव व कलेची आवड याला शास्त्रीबुवा चांगलेच परिचित होते , एक दिवशी आपल्या नातवाला घेऊन शास्त्रीबुवा महाराजांच्या दर्शनाला पोहचले मग मुजरा करून म्हणाले "महाराज माझा नातू फार सुरेख गातो ". झाले, हुजूरांनी आज्ञा केली आणि खरच पोराने उत्तम गाण गायल मग काय महाराजांची स्वारी खुश झाली. संधीचा फायदा घेत शास्त्रीबुवांनी आपला नातू एका कानाने अधू असल्याचे महाराजांना सांगितले. एवढं सुरेख गाणार पोरग एका कानाने बहिर आहे म्हणटल्यावर कनवाळू महाराजांना फार वाईट वाटले. महाराजांनी त्या मुलाला डाॅ. काशिनाथपंत गाडगीळ व फौजदार बळवंतराव म्हैसकर यांच्या सोबत मिरजेच्या मिशन हाॅस्पिटला त्यावेळचे सुप्रसिद्ध डाॅ. व्हेल यांच्याकडे उपचारासाठी स्वखर्चाने पाठवून त्या मुलाचा बहिरेपणा घालवला. इतकेच नव्हे तर या पोराला संगीताच्या योग्य शिक्षणासाठी नामवंत गायक

' अल्लादियाखाँसाहेब ' जे की महाराजांच्या दरबारात रुजू होते त्यांच्या हवाली केले. या मुलाने संधीच सोन केले, त्याचा लौकिक फार पसरला.

मग महाराजांनी किर्लोस्करांच्या नाटक कंपनीकडे नारायणची शिफारस केली, याच्या आधी एकदा किर्लोस्करांनी या पोराला काम द्यायला नकार दिला होता. महाराजांची शिफारस आल्यावर त्याला संधी देण्यात आली. नारायणने शकुंतलेची भूमिका केलेला ' शाकुंतल ' चा पहिला प्रयोग मिरजेस होता. नारायणचे भाग्य असे की दस्तुरखुद्द महाराजसाहेब प्रयोगाला उपस्थित होते. अतिसुंदर व नाजूक असलेल्या नारायणाने त्या स्त्री भूमिकेत जीव ओतला. महाराज बेहद्द खूश झाले व म्हणाले " शाब्बास बेटा, नाव राखलंस, असेच यश मिळव. मी तुझ्या पाठीशी आहे." महाराजांच्या आकाशा एवढ्या उपकाराने नारायणच्या डोळ्यात पाणी आले. हाच नारायण पुढे महाराष्ट्राच्या रंगभूमीवरचा ' नटसम्राट ' झाला.

— अभिजीत वसंतराव जाधव

( लेखन संदर्भ : शाहूंच्याआठवणी, लेखक नानासाहेब साळुंखे )*

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...