विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 9 May 2020

अफझलखान वध :अफझलखानाच्या चाली






अफझलखान वध :अफझलखानाच्या चाली

अफझलखान वध हा महाराजांच्या इतिहासातील एक मोठ्ठा पराक्रम आहे. पण आपल्याला शिवाजी महाराज आणि अफझलखान शामियानात भेटले आणि महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला हा इतिहास माहित आहे. मागच्याच लेखात आपण अफझलखानाबद्दल वाचलं. एव्हढा पाताळयंत्री अफझल महाराजांच्या प्रतापगडाच्या पायथ्याशी 'जावळी' सारख्या ठिकाणी यायला तयारच कसा झाला? हे प्रथमदर्शनी एक आश्चर्य वाटतं. पण महाराजांच्या दूरदर्शी दृष्टीने, मुत्सद्देगिरीने आणि गोपीनाथपंत बोकिल यांच्या वकिलीने साधलेला हा चमत्कार? चमत्कार नव्हे एक अद्वितीय सत्य होतं. पण अफझल सरळ होता का? नाही. अफझलखान वध या संपूर्ण प्रकरणाचं विश्लेषण करायचं असेल तर प्रथम अफझलखानाने काय चाली खेळल्या, महाराजांनी त्याला कसे प्रत्युत्तर दिले, अफझलखान आणि महाराज भेटल्यावर काय झालं आणि शेवटी वधानंतर महाराजांनी काय केलं? या सर्वांचं विश्लेषण करावं लागेल. या लेखात अफझलखानाने नक्की काय काय केलं हे प्रथम पाहुयात
अफझलखानाच्या चाली:
१. तुळजापूर आणि पंढरपुरवर हल्ला:
सर्वप्रथम अफझलखानाने जर काही केलं असेल तर विजापूरहून निघून तो तुळजापूरकडे निघाला. आता खालील नकाशात दिसेल कि विजापूर ते वाई हे अंतर सरळच आणि जवळ आहे. सद्यघडीला ते २९५ किमी आहे. हेच अंतर जर विजापूर ते तुळजापूर ते पंढरपूर ते वाई असं पाहिलं तर ते सद्यघडीला ४२९ किमी आहे. मुळात तुळजापूर आणि पंढरपूर हे विजापूर ते वाई या रस्त्यात नाहीये. मग अफझलखान तुळजापूरला का गेला?
विजापूर ते वाई

विजापूर ते तुळजापूर ते पंढरपूर ते वाई

तर उद्देश अगदी सरळ होता. शिवाजी महाराजांच आणि समस्त महाराष्ट्राचं तुळजापूर हे आद्य दैवत आहे. भोसल्यांची तर ती कुलदेवता. त्यामुळे यालाच तोशीस पोहोचवल्यावर शिवाजी महाराज जर उघड्या मैदानात आले युद्धाला तर त्यांचा पराभव किंवा सर्वनाशाचं अगदी सहज शक्य होता अफझलला. तसंच अफझलखान मे महिन्याच्या आसपास कधीतरी विजापूर मधून निघाला आणि वाईत पोहोचेपर्यंत तसाही पावसाळा उगवणार होता त्यामुळे असंही 'वाईत' त्याला आत्ता पोहोचून काहीच कारवाया करता आल्या नसत्या पावसामुळे. अजून एक उद्देश म्हणजे दहशत निर्माण करणे. आमच्या राज्याविरुद्ध जर बंडखोरी केलीत तर त्याचे परिणाम तुमच्या धर्मस्थळांना भोगावे लागतील. या सर्व कारणांमुळे अफझलखानाने तुळजापूरची भवानी फोडली आणि पंढरपूरला त्रास दिला. याचा उल्लेख सभासद बखरीमध्ये आहे आणि शिवभारतात स्पष्ट उल्लेख नसला तरी ओझरता उल्लेख आहे.
सभासद बखर:

शिवभारत:
२. बजाजी निंबाळकर:
बजाजी निंबाळकर हे शिवाजी महाराजांच्या बायकोचे सईबाईंचे सख्खे भाऊ होते आणि ते फलटणला राहत होते. पंढरपुरवरून वाईला जाताना 'फलटण' मध्येच रस्त्यात होते. बजाजी स्वराज्यासाठी काम करीत नव्हते तर आदिलशाहाचे निष्ठावंत होते. तरीही अफझलखानाने बजाजी निंबाळकरांना फलटणला पोहोचल्यावर अटक केली. त्यांचा धर्म बदलण्याचा किंवा त्यांना मारण्याचा किंवा दोन्हीही करण्याचा अफझलखानाचा उद्देश होता. यामुळे शिवाजी महाराजांच्या परिवारावरच थेट खानाने हल्ला केला. बजाजी निंबाळकरांसारख्या लोकांना आपली निष्ठा कुठे असावी हे कधी कळलेच नाही.
३. महाराजांच्या प्रदेशावर हल्ला:
फलटणवरून पुढे निघताना अफझलखानाने आपल्याबरोबर जे सरदार आणले होते त्यांना शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर हल्ला करायला पाठवलं. शिवभारतात अध्याय २३ श्लोक ११ आणि १२ यामध्ये याचा उल्लेख आहे.

जाधवांनी सुपे प्रांतावर, पांडऱ्यांनी शिरवळ प्रांतावर, खराट्यांनी सासवडवर, सिद्दी हिलालने पुणे प्रांतावर आणि हबशी सैफखानाने तळ कोकणावर हल्ला करून ते प्रांत आपल्या कब्जात घेतले. महाराजांचे हे सर्व प्रांत अगदी थोडक्या प्रतिकाराने किंवा प्रतिकाराशिवायचं मिळाले. अफझलखानाला स्वर्ग अगदी दोन बोटांवर आला या बातमीने.
४. कृष्णाजीपंत भास्कर वकील:
अफझलखानाची सर्वात महत्वाची आणि शेवटची चाल म्हणजे कृष्णाजीपंत भास्कर वकील यांना धमकीच पत्र घेऊन पाठवणे. आत्तापर्यंत अफझलखानाने शिवाजी महाराजांच्या श्रद्धेवर घाव घातला, कुटुंबावर आघात केला, त्यांच्या प्रांतावर हल्ला केला. आत्तापर्यंत अफझलने शिवाजी महाराजांना तो काय करू शकतो हे दाखवून दिलं. आणि आता जर शिवाजी महाराज बधत नसतील तर आता मी काय करू शकतो हे या धमकीच्या पात्रातून सांगायची अफझलची इच्छा होती. ते अस्सल पत्र उपलब्ध नाही. परंतु त्याचा आशय शिवभारतात दिलेला आहे तो काहीसा खालीलप्रमाणे आहे.
"आपण आजकाल पावलोपावली जो उद्धटपणा करीत आहात तो आदिलशहाच्या हृदयात शल्यासारखा बोचत आहे. निजामशाहीचा मुलुख आणि जावळीही तुम्ही आपल्या कब्जात घेतली आहे. कल्याण भिवंडी घेऊन तिथल्या मशिदी पडल्यात. आता स्वतः तुम्ही चक्रवर्ती राजाची चिन्हही मिरवता, न्याय करता, स्वतंत्र होऊन अदिलशाहालासुद्धा मानत नाही. यासाठीच मला पाठवलेले आहे. आदिलशाहाचे सहा प्रकारचं सैन्य मला युद्धासाठी उद्युक्त करीत आहे. वेगवेगळे वीरसुद्धा मला युद्धासाठी प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे गुमान संधी कर आणि सर्व किल्ले आमच्या स्वाधीन कर".

हि अशी परिस्थिती आणि हे असं पत्र कोणत्या हलक्या हृदयाच्या माणसाच्या बाबतीत घडलं असत तर त्याने आत्महत्याच केली असती. अफजल खानाने सगळ्या चाली अगदी लबाडीने फेकल्या होत्या. मोकळ्या मैदानात लढाई करावी इतकी लष्करी शक्ती शिवाजी महाराजांकडे नव्हती तरीही महाराजांनी ते वेडं धाडस केलं असतं तर त्यांचा सर्वनाश निश्चित होता. म्हणजे तह कारण्याशिवाय महाराजांकडे अजून कोणताच पर्याय नव्हता. आणि तह करताना शिवाजी महाराजांना मारायचं असा निश्चय त्याने आधिच केला होता. त्यामुळे 'चितभी मेरी और पटभी मेरी' या विचाराने अफझल फारच निश्चिन्त होता.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...