विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 1 May 2020

मराठी इतिहासातील गमती-जमती


मराठी इतिहासात अनेक गमतीदार प्रसंग आहेत ज्यातून शत्रूची झालेली फजिती अगदी विनोदात्मक आहे. असाच एक प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घडला.

प्रत्येकवेळी युद्ध हे मैदानात शस्त्रास्त्र व रक्तपात करूनच होईल असे नसते. बरेचदा शत्रूस जेरीस आणायला मोठमोठ्या सत्ताधीशांनी युक्तीने त्यांना अर्थकारण करून अडकवले व शेवटी नमवलेही. त्याचेच पुढील उदाहरण आहे.
महाराजांनी १६७४ मध्ये आपला राज्याभिषेक सोहळा पार पाडल्यानंतर मोठ्या प्रमाणात तांबे विकत घेतले. बहुतेक तांब्याचे शिवराई हे नाणे पाडण्याकरिता घेतले असावे असा इतिहासकार मंडळींचा एक अंदाज आहे. हे तांबे त्यांनी मुंबईकर इंग्रज लोकांकडून खरेदी केले होते. इंग्रजांनी यापूर्वी स्वराज्यविरुद्ध बरेचदा उचापती केल्या असल्यामुळे महाराज यांच्यावर नाखूष होतेच.
तेव्हा महाराजांनी इंग्रजांना अद्दल घडवायला रायगडी रोख पैसे नाहीत अशी सबब सांगून त्यांना Bill Of Exchange म्हणजेच विपत्र विनिमय पत्र किंवा हुंडी दिली. या हुंडीनुसार महाराजांनी इंग्रजांना एक तरतुदीपर पत्र दिले. इंग्रजांनी त्या पत्रात नमूद केलेल्या स्थळी जाऊन पत्रात असलेली रक्कम तेथून घ्यावी अश्या आशयाचे ते पत्र होते.
पण ही हुंडी होती गोवळकोंड्याची जेथील कुतुबशहा स्वराज्यास ठराविक रक्कम खंडणी म्हणून देत असे. हुंडीत सांगितल्याप्रमाणे आता इंग्रजांना हवे असलेले पैसे गोवळकोंड्यास जाऊन घ्यायचे होते.
त्यावेळी मुंबईत जेरॉल्ड ऑंंजियर (Gerald Aungier, १६४०-३० जून १६७७) नामक अधिकारी होता. त्याकाळी मुंबई व गोवळकोंडा या शहरांमध्ये व्यापार चालत नसे. तेव्हा जेरॉल्ड ऑंंजियरने आपल्या वरिष्ठ लोकांना म्हणजेच सुरतला ही हुंडी घेण्यासाठी ते पत्र पाठवले. सुरत त्यावेळी मोठेच धनवान लोकांचे शहर असल्याने देशभरातून तेथे व्यापार व्हायचा व म्हणून इंग्रजांची माणसं आता हुंडीतील पैसे घ्यायला गोवळकोंड्यास गेले. गोवळकोंड्यास त्यावेळी स्वराज्याचे वकील म्हणून प्रल्हाद नीराजी असायचे ज्यांना त्या हुंडीनुसार पैसे देण्याचा अधिकार होता. पण जेव्हा इंग्रजी लोकं गोवळकोंड्यास गेले तेव्हा त्यांना कळले की प्रल्हाद नीराजी एका मंत्रणेसाठी रायगडी गेले आहेत व अजून काही काळ येणार नाहीत तेव्हा पैसेदेखील मिळणे खोळंबणार. म्हणून ते लोकं सुरतेस परतले व तेथून हुंडीचा कागद पुन्हा मुंबईस आला. यासर्वात इंग्रजांचा बराच वेळ वाया गेला.
जेरॉल्ड ऑंंजियर
आता जेरॉल्ड ऑंंजियरने हा वृत्तांत रायगडी सांगून तेथून पैसे घ्यायला आपला दुभाषी नारायण शेणवी पाठवला. नारायण शेणवीही मुंबई - अष्टम - इंदापूर - निजामपूर - गांगोळी करत अखेरीस पाचाड येथे आला. तेथे आल्यावर नारायण शेणवीने गोवळकोंडा, सुरत, मुंबई व ही पूर्ण भ्रमाणाची हकीकत सांगितली तेव्हा कळले की नेमके प्रल्हाद नीराजी आता पुन्हा गोवळकोंड्यास गेले व महाराज खुद्द गडावर नाही आणि ते कोठे आहेत याबद्दल कुणालाही माहिती नाही, कधी येतील याची शाश्वती नाही. शेणवी आता पेचात पडला व शेवटी गडावर महाराजांनंतर सर्वोच्च अधिकारी म्हणून पेशवे मोरेश्वर त्र्यम्बक अर्थात मोरोपंत पिंगळ्यांना भेटायला निघाला. मोरोपंत कामात आहेत असे सांगून त्याला एक महिना भेटलेच नाहीत.
शेवटी मोरोपंत आपली कामं आटोपून नारायण शेणव्यास भेटले. त्याने पंतांना हुंडीचा कागद वगैरे दाखवला पण पंतांनी गडावर पैसेच नाहीत असे कारण पुन्हा सांगितले पण इंग्रजांशी स्वराज्यास व्यवहार सुरू ठेवायचा आहे या नावावर त्याला दुसरा पर्याय दिला.
या पर्यायानुसार मराठ्यांनी आपल्या अलिबाग येथील ठाण्यात तेथील प्रजा कर म्हणून जे नारळ, सुपारी, भात वगैरे देते ते इंग्रजांना द्यावे.
पण हा निर्णय आपल्या अखत्यारीत नाही हे जाणून शेणवी परत मुंबईत येऊन पोहोचला व त्याने हा पर्याय जेरॉल्ड ऑंंजियरला सांगितला पण हा जेरॉल्ड ऑंंजियर मराठ्यांना चांगलाच ओळखून होता. त्याने हे जाणले की 'अश्या वेळी मराठे वरपांगी हुंडी तेथून घ्या म्हणून व्हराता काढतील आणि आपली ठाणी पुढे रिकामी ठेवतील. प्रजेस सांगून हाच कर ते दुसरीकडे आपल्या ठाण्यावर भरतील आणि इंग्रजांना मात्र काहीही देणार नाहीत ! तेव्हा रोख रकमेतच तांब्याचा मोबदला हवा. '
पुढे काही काळात महाराज गडावर आल्याची बातमी कळताच पुन्हा नारायण शेणव्यास पाठवायचे ठरले पण यावेळी सोबत एक गोरा/इंग्रज अधिकारी सोबत दिला ज्याचे नाव फ्रान्सिस मॉलीव्हेरेर असे होते. हे दोघे पुन्हा हा सर्व प्रवास करत रायगडी आले पण आता महाराजांनी कामात आहे असे सांगून यांना बराच काळ पाचाडला रोखून धरले. शेवटी इंग्रजांच्या सुदैवाने महाराज यांना भेटले व त्यांचे म्हणणे शिवाजी महाराजांनी ऐकून घेतले. महाराजांनी रोख पैसे रायगडी नाही सांगितले आणि सोबतच आता तिसरा पर्याय सुचवला.
याप्रमाणे इंग्रजांनी तांब्याच्या मोबदल्यात तेवढ्या रकमेची सोनं किंवा चांदी घ्यावी.
हा अधिकार या दोघांकडे नाही म्हणून नारायण शेणवी परवानगी घ्यायला मुंबईस परतला मात्र काहीतरी करू शकेल अश्या आशेने त्याने फ्रान्सिस मॉलीव्हेरेरला रायगडी ठेवले पण त्याचेही काही चालले नाही आणि तोही माघारी फिरला. रायगड यात्रेचे त्याचे त्याकाळी प्रवासवर्णन प्रसिद्धही झाले ज्यात तो म्हणतो I got nothing except hollow promises (मला पोकळ आश्वासनांव्यतिरिक्त काहीही मिळाले नाही).
शेवटी नारायण शेणव्यास तिसऱ्यांदा रायगडी पाठवले व कोणत्याही स्वरूपात का असेना मोबदला घ्यावा अशी सूचना जेरॉल्ड ऑंंजियरने दिली. शेणवी आता शेवटी रायगडी आला व चांदी घेण्याचे ठरले. महाराजांनी पेशवे मोरोपंत यांना जामदार खान्यातून त्या रकमेची चांदी देण्यास आज्ञा केली. मोरोपंतांनीही पुढचा डाव आखला. त्यांनी चांदीची किंमत जी बाहेर २३ रुपये शेर होती ती वाढवून २८ रुपये शेर करून टाकली. पण महाराजांनी आता या उपद्रवी टोपीकर इंग्रजांचे नाक चिमटीत बरोबर धरले होते आणि त्यामुळेच नाईलाजास्तव ही किंमत त्यांना मान्य करावी लागली.
१७७६ मध्ये याबद्दलचा अहवाल जेरॉल्ड ऑंंजियरने ब्रिटिश ईस्ट इंडिया कम्पनीला कळवला ज्यात त्याने शेवटी स्पष्ट नमूद केले की दीड वर्ष चाललेले हे प्रकरण शेवटी २२.५% नुकसान झेलून आज आम्ही मार्गी लावले आहे.
ज्यांना समुद्रात हरवणे जोखमीचे होते त्या इंग्रजांना महाराजांनी वेळोवेळी युद्धात तर वठणीवर आणलेच पण अश्या क्लृप्त्या करून मनस्तापही दिला.
सरीत्पतीचे जळ मोजवेना । मध्यान्हीचा भास्कर पाहवेना ।
मुठीत वैश्वानर साहवेना । तैसा शिवाजी नृप जिंकवेना ।
माहिती स्रोत : इंग्लिश रेकॉर्ड ऑन शिवाजीचित्र स्रोत : गुगल

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...