postsammbhar:-Ram Parjane
राज्याभिषेकानंतर नोव्हेंबर 1675 मध्ये शिवाजी महाराज साताऱ्याला आले असताना अचानक आजारी पडले. सुमारे दोन महिने महाराज आजारी होते. या काळात एका इंग्रज अधिकाऱ्याने लिहिलेल्या पत्रात "महाराजांचा मृत्यू झाला आणि तो शंभूराजांनी केलेल्या विशेष प्रयोगाने झाला" असे लिहिले. शंभुराजे रात्री-बेरात्री गडावरून खाली उतरत आणि कोण्या मंत्र्याच्या कन्येशी त्यांचा प्रेमसंबंध होता आणि महाराजांनी रागाने याबद्दल शंभूराजांना कडेलोट करून ठार मारण्याची आज्ञा दिली आणि याबद्दल रागावून म्हणे त्यांनी महाराजांवर विष प्रयोग केला, अशी ही दंतकथा होती.
परंतु त्यानंतरच्या पत्राने हा विषप्रयोग शंभूराजांनी केला नसून एका न्हाव्याने केला होता असा खुलासा केला आणि नंतर पुन्हा महाराज बरे असून कामी पूर्वीप्रमाणेच पाहत आहेत, असेही कळविले आहे. अशा या इंग्रजांच्या पत्रातून खोट्या झालेल्या बिनबुडाच्या आरोपांवरून शंभुराजांच्या चारित्र्य हननाला प्रारंभ झाला असे म्हणायला हरकत नाही. हाच मुद्दा पुढे बखरकारांनी उचलून धरला. याच भाकड कथेतील ब्राम्हणकन्येला करण्याला गोदावरी असेही नाव पुढे बहाल करण्यात आले.
राज्याभिषेकानंतर महाराजांनी शंभुराजांचे उपनयन गुरुवार, दिनांक 4 फेब्रुवारी 1675 रोजी करून घेतले व नंतर त्यांच्यावर अधिकाधिक जबाबदाऱ्या टाकायला सुरुवात केली. पुढे शंभूराजे महाराजांच्या अनुपस्थित विविध दाव्यांचे निकाल देऊ लागले. शंभूराजे त्यांना अन्याय दिसणाऱ्या प्रत्येक प्रकरणात लक्ष घालून रयतेला न्याय मिळवून देत. गरीब रयतेला कधीकधी करमाफी करवित.
शंभूराजांचे वाढते व्यक्तिमत्व प्रधान मंडळालाही टोचत होते. "राज्यकारभार चालवायला पैसा लागतो. अशा प्रकारे ज्याला-त्याला सारा माफ करायला सुरुवात केली तर लोक दुष्काळाचा कांगावा करतील आणि सारामाफी मिळतील. मग राज्य कसे चालावे?" असा सुरवणीस अण्णाजी दत्तो यांचा प्रश्न असे.
तसेच राज्यारोहनानंतर सोयराबाईंच्या मनातही अण्णाजी दत्तो यांसारख्या मंत्र्यांच्या सांगण्यावरून कैकयीने प्रवेश केला होता. अण्णाजी दत्तो नी सोयराबाईंचे सावत्र पण जागृत केले होते. राज्यारोहनाप्रसंगी शंभूराजे युवराज म्हणून जाहीर झाल्याने आपल्या पुत्राला राजारामाला काहीच मिळणार नाही, या कल्पनेने त्यांना ग्रासले.
या साऱ्या गोष्टींमुळे शंभुराजांच्या विरुद्ध सोयराबाई, अण्णाजी दत्तो आणि अन्य काही अष्टप्रधानमंडळातील मंडळी या मातब्बराचा एक गट तयार झाला. त्यांनी शंभुराजेंची बदनामी करण्यास सुरुवात केली.
तसेच शंभूराजांच्या चारित्र्याला काळिमा फासण्याचे काम इतिहासात अनेकांनी केले आहे. त्यांचे जनक म्हणजे मल्हार रामराव चिटणीस साहेब…. यांनी घडवलेली बखर 'चिटणीस बखर' म्हणून प्रसिद्ध आहे. चिटणीस बखर ही शंभूराजेच्या बाबतीत सूडबुद्धीने लिहिलेली व केवळ कल्पना शक्तीवर अवलंबून असलेली आहे. शंभू राजांच्या मृत्यूनंतर एकशे बावीस वर्षांनी लिहिलेली बखर पुढील काळातील इतिहासकारांनी संदर्भसूची म्हणून वापरली.
मल्हार रामराव चिटणीस हा बाळाजी आवजी यांचा वंशज आहे. बाळाजी आवजी हे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात सुरवणीस पदावर होते. शिवरायांच्या नंतरच्या काळात शंभूराजांच्या जीवावर उठलेल्या काही नेत्यांमध्ये बाळाजी आवजी यांचे नाव रोवल गेलं आणि अनावधानाने शंभूराजांनी त्यांना हत्तीच्या पायी देण्याची शिक्षा केली. यावर शंभूराजांनी आपल्या हातून केवळ अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी देखील उत्तरीय पत्रात व्यक्त केली आहे.
परंतु मल्हार रामराव चिटणीस यांनी शंभूराजांनी आपल्या पूर्वजांच्या केलेल्या हत्येच्या सूडबुद्धीने आपल्या चिटणीस बखरीत शंभुराजांची बदनामी केली. पुढे याच इतिहासातील चुका रिसायतकार सरदेसाई यांनी जसेच्या तशा स्वीकारल्या आणि नाटककार व आधुनिक इतिहासकारांनी त्याकडे घडीत इतिहास म्हणून बघितले व अनेक साहित्य लिहिले.
अशाप्रकारे संभाजीराजांची दुर्दैवीपणे साहित्यातून बदनामी करण्यास सुरुवात झाली.
No comments:
Post a Comment