विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 29 May 2020

प्रजादक्ष शिवकल्याण राजा शिवछत्रपती!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रावर सुमारे साडेतीनशे पेक्षा जास्त वर्ष पारतंत्र्याची आणि अन्याय-अत्याचाराची काळी छाया होती. संपूर्ण महाराष्ट्र हा गुलामगिरी, पारतंत्र्य, उपेक्षा, अवहेलना, दु:ख आणि भीतीचा भयंकर काळोखा खाली होरपळत होता. या भीषण काळोखाला छेद देणारा तेजस्वी सूर्यकिरण सह्याद्रीच्या कुशीत शहाजीराजे आणि जिजाऊ यांच्या पोटी शिवाजी महाराज्यांच्या रूपाने महाराष्ट्राला लाभला.

खडतर सह्याद्रीच्या पर्वतरांगात असलेल्या अजिंक्य, अभेद्य, बुलंद दुर्गांच्या आश्रयाने, गनिमी काव्याच्या युद्ध तं‌त्राने महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य रयत, अठरा पगड जातीच्या भूमीपूत्र आणि शेतकऱ्यांच्या सहाय्याने शिवरायांनी परकीय सत्ताधिशांविरुद्ध स्वातंत्र्याचा अग्नी धगधगत ठेवला.

तत्कालीन आक्रमकांच्या अन्याय्य अत्याचाराच्या गुलामगिरीत पिचलेल्या महाराष्ट्रातील जनतेची मने आणि मनगटे स्वतंत्र आणि लोकशाहीचा मूळ गाभा असलेल्या स्वराज्याच्या प्रेरणेने जिवंत आणि मजबूत बनवली. त्यावेळच्या तरूणांना त्यांनी फक्त एकत्र केलं नाही तर शत्रु कितीही बलाढय असला तरी उत्कृष्ट सेनापतीत्वाखाली त्याला नामोहरम करता येऊ शकतं याची जाणीव करून दिली. यांच्या सारख्या महान शिलेदारांच्या असीम त्याचमुळे च स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि स्वराज्याचेही स्वप्न साकार झाले.

सामान्य रयतेला आपलं वाटावं असं स्वतःचं राज्य निर्माण व्हावं. हेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य कारभाराचे मुख्य धोरण होते. स्वराज्य हे वतनदारांच्या कल्याणासाठी नव्हे तर रयतेच्या हितासाठी आणि कल्याणासाठी आहे ही त्यांची भावना केवळ पत्रातूनच नाही तर प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त झालेली दिसून येते.

म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडे “केवळ आणि केवळ रयतेच्या हितासाठी झटणारा एकमेव राजा’ म्हणून पाहिले जाते. स्वराज्याच्या प्रत्येक व्यक्ती वर पोटाच्या पोराप्रमाणे काळजी घेतली. या कसोटीला छत्रपती शिवाजी महाराज उतरतात म्हणूनच ३९० वर्षानंतर देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती जनतेचे अपंरपार प्रेम अजुनही दिसून येते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांना संरक्षण दिले. शेतात ज्या प्रमाणे गोफण फिरवून आपल्या पिकांचं संरक्षण केलं त्याच शेतकऱ्यांना त्याच गोफणीच्या साहाय्याने मोगल, आदिलशाही, निजामशाही, फिरंगी अशा अनेक परकीय आक्रमकांना स्वराज्यातून हुसकावून दिलं. अश्या कर्तृत्ववान धारकऱ्यांना शिवाजी महाराजांनी संरक्षण दिलं.

“लोकशाही” आणि “धर्मनिरपेक्षता’ ही आत्ताच्या काळातील आधुनिक संकल्पनेचा गाभाच मुळात स्वराज्य स्थापनेमध्ये दिसून येतो. शिवरायांनी हिंदू धर्माचे रक्षण केले हे जितके सत्य आहे तितकेच अन्य धर्मीयांचा जाणीवपूर्वक असा छळ देखील केला नाही. एक शिवकालीन शाहीर आपल्या कंदनात म्हणतो, “शिवरायांच्या तळ्यात पाणी पिती सर्व जीव जाती। तेथे नाही भेदभाव।।

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याची सुव्यवस्थित घडी बसविण्यासाठी कर्तृत्व दाखविणाऱ्या अनेक निर्भीड व्यक्तींची निवड केली. स्वराज्यामागचे मुख्य सूत्र प्रजाहित असल्याने त्यांनी काटेकोर आणि कडक धोरण अवलंबले होते. त्यांनी सैन्यात शिस्त निर्माण केली.

छत्रपती शिवाजी महाराजांना माणसांची अचूक पारख होती. त्यांचे अष्टप्रधान मंडळ, सहकारी, सेनाधिकारी अशी कितीतरी माणसे त्यांनी पारखुनच आपल्या जवळ केली होती. महाराजांनी सतत निर्व्यसनी व्यक्ती, आपले कर्तव्यदक्ष सेनानी, स्त्रिया, संत महंत यांचा सन्मान केला त्यांना सन्मानाची वागणूक देऊन राज्यव्यवस्थेत योग्य ते स्थानही दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याकडचे अपुरे सैन्यबळ, त्यांची क्षमता, दऱ्याखोऱ्या डोंगररांगाची भौगोलिक परिस्थिती, मर्यादित अशी लढाईची साधनसामुग्री, मर्यादित आर्थिक बळ ह्या गोष्टी विचारात घेऊन महाराजांनी आपली स्वतंत्र युद्धनीती आखलेली होती आणि स्वराज्याचा विस्तार वाढवला. कोणताही राष्ट्रीय नेता जनतेच्या संपूर्ण पाठबळाशिवाय आपले कार्य पूर्णत्वास नेऊ शकत नाही.

शिवाजी महाराजांचे पहिले कार्य म्हणजे महाराष्ट्रातील सर्व थरांतील लोकांची एकजूट करून त्यांची एकसंघ समाज म्हणून निर्मिती करणे हे होते. शिवरायांनी लोकांमध्ये ध्येयाची आणि जीवनाची एकरूपता उत्पन्न केली.

राष्ट्र निर्माता म्हणून मान्यता पावणे यासारखे मनुष्याच्या आयुष्यात कोणतेही श्रेष्ठ विधिलिखित असू शकत नाही. नेमके हेच महत्कृत्य शिवरायांनी करून दाखवले आहे. शिवाजी महाराज झालेच नसते तर मराठी माणसांच्या आयुष्याची दिशा वेगळ्याच दिशेने मार्गक्रमण करत गेली असती आणि आजच्या भारताच्या इतिहासालाही एक वेगळेच वळण लागले असते; हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...