★ स्वराज्याचा शिलेदार तानाजीराव मालुसरे !! ★
_________________________________________
शिवकालीन इतिहासातील गाजलेली व महत्वाची लढाई म्हणजे सिंहगडाची लढाई.
४ फेब्रुवारी १६७० साली मराठ्यांनी पुरंदरच्या तहात मोगलांकडे गेलेला सिंहगड किल्ला जिंकला व या युद्धाचे नेतृत्व केले होते वीर तानाजी मालुसरे यांनी.
इतिहास म्हणले की पुरावे आले. पुराव्यानिशी मांडलेला इतिहासचं खरा मानला जातो. मराठ्यांचा इतिहास सांगणारी काही समकालीन पुरावे आहेत. त्यानंतर काही बखरी व पोवाडे सुद्धा आहेत. अनेक बखरी या उत्तरकालीन आहेत. म्हणजे घटना घडून गेल्यानंतर काही वर्षांनी लिहिलेल्या आहेत.
तानाजी मालुसरे व सिंहगड युद्ध याची माहिती सांगणारी साधने म्हणजे "सभासद बखर" व "तुलसीदासचा पोवाडा".
■ तुलसीदासाचा पोवाडा --- हा नक्कीच उत्तरकालीन आहे. इतिहास शास्त्रानुसार पोवाड्यामध्ये सांगितला गेलेला इतिहास हा पूर्णतः विश्वसनीय नसतो. शिवकथाकार श्री. विजयराव देशमुख यांच्या मते, हा पोवाडा अतिशयोक्तीपूर्ण आहे.
■ सभासद बखर --- कृष्णाजी अनंत सभासद यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या (शिवपुत्र राजाराम महाराज) काळात लिहिली आहे. म्हणजे शिवरायांच्या मृत्युनंतर अंदाजे २० ते २५ वर्षांनी. ही बखर छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेने लिहिली गेली.
माझ्या मते, तानाजींचा इतिहास सांगणाऱ्या या दोन सांधनांपैकी सभासद बखरच विश्वसनीय म्हणता येईल.
_________________________________
■ सभासद बखरीतील उल्लेख/ मजकूर खालीलप्रमाणे,
राजियांनी मावळे लोकांस सांगितले की, "गड घेणे." त्याजवरून तानाजी मालसुरा म्हणून हजारी मावळियांचा होता. त्याने कबूल केले की, "कोंडाणा गड आपण घेतो," असें कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढविले. जैसे वानर चालून जातात, त्याचप्रमाणे कड्यावर चालून गेले आणि कडा चढून, गडावर जाऊन, तेथून माळ लावून वरकड लोक देखील तानाजी मालसुरा चढून गडावरि तीनशें माणूस गेले. गडावरि उदेभान रजपूत होता. त्यास कळलें की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरबस्ता होऊन, हाती तोडा बार घेऊन, हिलाल, चंद्रज्योती लावून बाराशें माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, पटाईत, सुऱ्या, आड हत्यारी ढाला चढवून चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी 'श्रीमहादेव!' असे स्मरण करून नीट फौजेवर रजपुतांचे चालून घेतलें मोठें युद्ध एक प्रहर जालें. पांचशें रजपूत ठार जालें. उदेभान खासा त्यांशी व तानाजी मालसुरा सुभेदार यांशी गांठ पडली. दोघे मोठे योद्धे, महाशूर, एक एकावर पडले. वार करीत चालले. तानाजीचे डावे हातची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाहीं. मग तानाजीनें आपले डावे हाताची ढाल करून, त्याजवरि वोढ घेऊन, दोघे महारागास पेटले. मोठे युद्ध केलें. एकाचे हातें एक तुकडे होऊन फिरंगीच्या वारें पडले. दोघे ठार जाले. मग सूर्याजी मालसुरा, तानाजीचा भाऊ, यानें हिंमत धरून, कुल लोक सांवरून, उरले राजपूत मारिले. कित्येक रजपूत कडे उडोन पळोन मेलें. असे बाराशें माणूस मारिले. किल्ला काबीज केला. आणि गडावर पागेचे खण होते त्यांस आग लाविली. त्याचा उजेड राजियांनी राजगडाहून पाहिला आणि बोलले कीं, "गड घेतला, फत्ते जाली !" असे जाहालें. तों जासूद दुसरे दिवशीं वर्तमान घेऊन आलाय कीं, "तानाजी मालसुरा यांनी मोठे युद्ध केलें, उदेभान किल्लेदार यास मारिलें आणि तानाजी मालसुराही पडला." असे सांगितले. गड फत्ते केला असें सांगताच राजे म्हणूं लागले कीं, "एक गड घेतला, परंतु एक गड गेला!" असे तानाजीसाठीं बहुत कष्टी जाहाले. पुढें गडावरि ठाणें घातलें. सूर्याजी मालसुरा भाऊ नावाजून त्याचा सुभा त्यास सांगितला. धारकरी लोकांस बक्षिसें सोन्याची कडीं दिलीं. द्रव्य अपार दिलें. वस्त्रे जरी कुल लोकांस दिलीं. ये जातीनें प्रथम कोंडाणा घेतला.
सभासद बखरी मधील वर्णनानुसार खालील तपशील कळतो,
१) सिंहगडाची भौगोलिक परिस्थिती पाहता, शिवरायांनी सिंहगड जिंकण्याची जबाबदारी पायदळावर सोपवली.
२) तानाजी मालूसुरे पायदळाचे एक हजारी अधिकारी होते. तानाजींनी या मोहिमेसाठी निवडक ५०० मावळे निवडले ज्यामध्ये दोन मावळे कडा चढण्यात पटाईत होते.
३) (४ फेब्रुवारी १६७०) रात्री गडाच्या कड्याखाली सगळे मावळे गेले व दोन मर्द मावळे कडा चढले. हे दोघे वानर चढून जातात तसे कडा चढून गेले, त्यांनी सोबत दोर नेले होते, वरती जाताच त्यांनी दोर खाली सोडला. या दोराच्या साह्याने तानाजींसह ३०० मावळे वर चढले.
४) सर्व मावळे वर पोचताच उदयभान किल्लेदाराच्या लक्षात आले की मराठे आले आहेत.
५) गडावर १२०० रजपूत विरुद्ध ३०० मराठे असा विषम सामना चंद्रज्योतिच्या प्रकाशात सुरू झाला. 'श्रीमहादेव' अशी गर्जना करत मराठे आवेशाने शत्रूवर तुटून पडले.
६) युद्ध एक प्रहर म्हणजे तीन तासपावेतो चालले. त्यात ५०० रजपूत ठार झाले. उदयभान व तानाजी मालुसरे हे एकमेकांस भिडले. दोघेही अतिशय पराक्रमी होते. दोघांमध्ये जोरदार युद्ध झाले. एकमेकांवर खूप वार होत होते. यामध्ये तानाजींची डाव्या हातातील ढाल तुटली. त्यांना दुसरी ढाल वेळेत मिळाली नाही. उदयभानचे वार त्यांनी डाव्या हातावर झेलले आणि अखेर तानाजींचा मृत्यू झाला व त्याचवेळी उदयभानही ठार झाला.
७) उदयभान पडल्यावर रजपूत सैन्य कड्यावरून पळून गेले परंतु तानाजींचे भाऊ सूर्याजी यांनी हिम्मत धरून मावळ्यांना धीर देऊन उरलेले रजपूत मारून टाकले आणि विजय मिळवला.
८) विजय मिळताच, सुर्याजीने गवताच्या गंज्या पेटवून गड जिंकल्याचे शिवरायांना राजगडावर सूचित केले. हे पाहून शिवराय बोलले "गड जिंकला, फत्ते झाली"!!!
९) दुसऱ्या दिवशी खबरी गडावर (राजगडावर, शिवरायांना बातमी देण्यासाठी) बातमी देण्यासाठी गेला, त्याने संपूर्ण हकीकत सांगितली. ..."तानाजी मालसुरा यांनी मोठे युद्ध करून किल्लेदार उदयभान यास ठार केले आणि तानाजी मालसुराही पडले".... हे पाहून शिवराय उद्गारले,
"एक गड घेतला परंतु एक गड गेला"!!!
_________________________________
■ तुलसीदासाचा पोवाड्यामध्ये खालील तपशील आहे,
१) सिंहगड जिंकण्याची इच्छा जिजाऊसाहेबांनी शिवरायांना बोलून दाखवली.
२) तानाजींना रायबा नावाचा मुलगा होता ज्याचे लग्न ठरले होते. असे असतानाही तानाजीराव लग्न बाजूला सारून मोहिमेवर गेले.
३) तानाजींनी आपल्याबरोबर १२००० फौज नेली. या फौजेत ८० वर्षांचे शेलारमामाही होते.
४) उदयभान हा मोगल होता व किल्ल्यावर १८०० पठाण होते.
५) कल्याण दरवाज्यावरून तानाजींनी 'यशवंती' नावाची घोरपड किल्ल्यावर पाठवली. अर्ध्यावरून ती परत आली, तेव्हा खांडोळ्या पाडून शिळ्या भाकरीसंगे खाण्याची धमकी तिला तानाजींनी दिली म्हणून ती पुन्हा वर गेली नखे रोवून बसली.
६)दांडपट्टे तोंडात धरून तानाजीराव व ५० मावळे वरती गेले. दोर तुटल्याने उरलेले (११९५०) मावळे खालीच राहिले.
७) उदयभान यावेळी रतिक्रीडा करण्यात दंग होता. युद्ध झाले व त्यामध्ये उदयभानाने तानाजींना मारले व शेलारमामांनी उदयभानला मारले.
८) सूर्याजी मालुसरे उरलेल्या मावळ्यांना घेऊन कल्याण दरवाज्यातून आत
शिरले व त्यांनी कापाकापी सुरू केली. शेवटी मराठ्यांची फत्ते झाली.
_________________________________
तानाजींचा मृत्यू झाल्यानंतर, शिवरायांनी कोंडाण्याची सुभेदारी तानाजींचे भाऊ सूर्याजी यांच्याकडे दिली. धारकरी मावळे लोकांना सोन्याची कडी बक्षीस दिली.
तानाजींच्या सिंहगडाच्या मोहिमेवरील तपशील एवढाच उपलब्द आहे. (माझ्या वाचनात एवढेच आहे, जर नवीन काही संशोधन झाले असल्यास कृपया सांगावे) आता कोणता विश्वसनीय मानायचा हे वाचकांनी ठरवावे. या लढाईबद्दल सुंदर वर्णन "वेध महामानवाचा" या पुस्तकात चांगले केले आहे, नक्की वाचावे.
सिंहगडाचा नकाशा याच पुस्तकातून घेतला आहे.
-----------------------------------------------------------------------
#Subhedar_Tanaji_Malusare 🚩
Tanaji Malusare was a military assistant of Maratha King Chhatrapati Shivaji. A local poet Tulsidas, wrote a powada describing Tanaji's heroics and sacrifice of life in the Battle of Sinhagad, which has since made him a popular figure in Marathi folklore.
The Battle of Sinhagad took place during the night on 4 February 1670 on the fort of Sinhagad (then known as Kondhana after the sage Kaundinya, near the city of Pune, Maharashtra, India.
The battle was fought between Tanaji Malusare, commander of the Maratha Empire under Chhatrapati Shivaji and UdayBhan Singh Rathore, a Rajput fortkeeper under Jai Singh I who worked for the Mughal emperor Aurangzeb.
During the siege, Malusare scaled a steep cliff that led to the fort through the assistance of a monitor lizard called Yashwanti (also referred to as ghorpad in marathi). This type of lizard was tamed since the 15th century and Yashwanti was trained to pull the rope up the cliffs for Malusare and wind it around the fort's bastion. Climbing up the fort, the Marathas were intercepted by the garrison and combat ensued between the guards and the few infiltrators that had managed to climb up by this time. Udaybhan and Tanaji engaged in single combat. Udaybhan struck and broke Tanaji's shield to compensate for which he wrapped his turban cloth on his forearm and continued the battle, shortly afterwards Udaybhan cuts his forearm.But Tanaji fought him ,which both were killed in the battle but the overwhelmed Maratha forces managed to capture the fort after the reinforcements penetrated the gateway of the fort from another route.
A bust of Tanaji Malusare was established on the fort in the memory of his contribution to the battle. The fort was also renamed Sinhagad to honor his memory.
No comments:
Post a Comment