छत्रपती घराणे, तुकोबारायांचे वंशज आणि देहू !!
१६८२-८३ स्वतः आलमगीर औरंगजेब हा लाखोंचे सैन्य घेऊन दक्षिणेकडे उतरला, १६८० मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी तुकाराम महाराजांचे पुत्र महादेवबाबा यांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेले वर्षासन चालू ठेवले होते. १६८९ साली औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांची निर्घृणपणे हत्या केली त्यानंतरही छत्रपती घराण्याने वारकरी संप्रदायाची शिकवण निरंतर पुढे चालावी यासाठी तुकोबारायांच्या वंशजांना वेळोवेळी अनेक माध्यमातून सहाय्य केलेले दिसून येते.
छत्रपती राजाराम महाराज तुकाराम महाराजांचे पुत्र नारायणबाबा यांना येलवाडी हे गाव इनाम दिले होते, त्या सनदेमधील संक्षिप्त मजकूर असा " राजश्री तुकोबा गोसावि यांचे पुत्र रा. नारोबा गोसावि बहुत थोर संत पुरुष विश्ववंद्य वास्तव्य मौजे देहू पमपुणे याचा महिमा अलौकिक आहे. त्यांचे दर्शनापे करून राजश्री छत्रपती स्वामींचे कल्याण त्यासी स्वामींचे दर्शनास कित्येक तडी तापडी येताती. त्यांसी अन्न दाने गोसावि करिताती, कित्येकास प्रसाद घालावा लागतो व यात्रा महोत्सव प्रत्यही होतो. तेथे कित्येक व्यये होतो येसी यासी स्थळी राजश्री स्वामींचे राजीयांचे वंशावळी उत्तरोत्तर कल्याण आहे " सनदेमधील हा मजकूर पाहता छत्रपती घराणे आणि तुकोबारायांचे वंशज यांचा संबंध कसे होते हे आपल्याला समजून येते..
औरंगजेब प्रचंड शस्त्रसामग्रीसह लाखोंचे सैन्य घेऊन स्वराज्यात उतरल्याने युद्धसदृश्य स्थितीत सैन्याच्या हालचाली होत असत, शत्रूसह मराठा सैन्याच्या हालचालीमुळे पंढरपूर तसेच देहू याठिकाणी यात्रेस उपद्रव होत असे. हा उपद्रव नाहीसा व्हावा म्हणून तुकाराम महाराज यांचे पुत्र नारायणबाबा यांनी छत्रपती राजाराम महाराज यांना पत्रे लिहली होती, त्या पत्राचे उत्तर देखील छत्रपती राजाराम महाराज यांनी दिले होते, ते उत्तर खुप वाचनीय आणि महत्वपूर्ण आहे. छत्रपती राजराम महाराज यांनी आपल्या सैन्याला पत्रे पाठवून यात्रेकरू तसेच भाविकांना उपद्रव होऊ नये असा आदेश दिला होता. रामचंद्र अमात्य यांनी लिहलेल्या पत्रात नारायणबाबा यांनी देहू येथून प्रसाद पाठवल्याचा उल्लेख आहे.
छत्रपती राजाराम महाराज यांच्यानंतर छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी देखील तुकाराम महाराजांचे वंशजांची काळजी घेतलेली दिसते. नारायणबाबा महाराज यांना नवीन देऊळ बांधण्यासाठी मदत म्हणून छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी 5000 रुपये दिले होते याकामात निंबाळकर आणि दाभाडे या मराठा सरदारांनी देखील मदत केली होती. धामनी येथे एका मंदिरातील मूर्तीच्या संदर्भात नारायणबाबा यांनी कवी गोपाळदास यांच्या माध्यमातून छत्रपती थोरले शाहू महाराज यांना तक्रार केलेली दिसते. छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी देवाकरिता किन्हई गाव दिल्याची नोंद देखील आहे शिवाय नारायणबाबा यांचे शिष्य सखोबा गोसावी यांची साताऱ्यास ये जा असे आणि नारायणबाबा यांचे पुतणे उद्धवबाबा हे साताऱ्यात राजवाड्यात राहत असत..
छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतरही तुकोबारायांची समतेची, बंधुत्वाची शिकवण पुढे चालत रहावी यासाठी छत्रपती घराण्याने तसेच मराठा सरदारांनी देखील तुकोबारायांच्या वंशजांना तसेच देवस्थान, अन्नछत्र इत्यादी बाबींमध्ये सहाय्य केले होते..
संदर्भ - श्रीतुकाराम महाराज पालखी सोहळा उगम व विकास..
- राज जाधव
No comments:
Post a Comment