विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 21 June 2020

॥ हेन्री ऑक्झेंडन आणि शिवराय ॥●

◆॥ शिवराज्याभिषेक विशेष ॥◆

॥ हेन्री ऑक्झेंडन आणि शिवराय ॥●
भाग : ३. (अंतिम भाग)

ज्या तहाबद्दल आता पर्यंत विवेचन केले, त्यांची सर्व कलमे खुलासेवार पहावयाची असल्यास, ती Factory Records, Bombay, vol. 6, pages 124 to 128 वर अगर शिवकालीन पत्रसारसंग्रह पत्र १६४१ मद्धे पाहता येतील.

• एकूण कलमे अशी :-

(१) आजपासून छत्रपती शिवाजी राजे व इस्ट इंडिया कंपनी यांचा पक्का व अभंग सलोखा असावा.
(२) उभयतांत शत्रुत्व नसावें. उभयपक्षी कोठल्याही भागांत लुट करणे, छापे घालणे इत्यादीं प्रकारचे नुकसान करू नये.
(३) छत्रपती शिवाजींच्या राज्यांत इंग्रजांस संचार, रहाणे व व्यापारास पूर्ण स्वातंत्र्य असावे. इंग्रजांनी नित्याच्या जकाती द्याव्यात. छत्रपती शिवाजींच्या प्रजेस मुंबई बेटांवर त्याच सवलती असाव्यात.
(४) अडचणींमुळे आश्रयास आलेली एकमेकांची गलबते एकमेकांस जकात घेतल्याशिवाय परत द्यावीत. फुटून किनाऱ्याला लागलेली एकमेकांची गाबते एकमेकांस परत द्यावीत.
(५) जकातदारांनी एकमेकांस बक्षिसे इत्यादी प्रकारे लुबाडू नये.
(६) छत्रपती शिवाजींच्या प्रदेशांत इंग्रजांवर अन्याय झाल्यास त्वरित न्याय मिळावा. तसाच त्वरित न्याय शिवाजींच्या प्रजेस इंग्रज प्रदेशांत मिळेल.
(७) खाजगी व्यक्तींच्या आगळीकीमूळे सलोखा बिघडू नये. गुन्हेगारास शिक्षा व्हावी. जप्तीसारखा प्रकार होऊ नये.
(८) मोघल वगैरेच्या प्रदेशांतील इंग्रजी वखारी छत्रपती शिवाजींनी लुटू नये, उलट वाचवाव्यात.
(९) समुद्रात पकडलेला एकमेकांचा माल एकमेकांनी परत द्यावा.
(१०) इंग्रजांनी राजापुरास वाटेल तेव्हा राहावे. राजाने त्यास स्वखर्चाने वखारी साठी घर द्यावे. एकदा जकात दिल्यावर पुन्हा अन्यत्र त्याच मालावर जकात घेवू नये.
(११) आयात मालावर इंग्रजांस अडीज टक्के जकात असावी. लाकडावर जकात असू नये.
(१२) इंग्रजांस खरेदी-विक्रीवर बंधने नसावीत.
(१३) देशी व्यापारास खरेदी-विक्रीच्या बाबतीत इंग्रजांशी केलेले करार पाळण्यास छत्रपती शिवाजींच्या अधिकाऱ्यांनी भाग पडावे. तसे न केल्यास कर्जफेड व करारपूर्ती होईपर्यंत इंग्रजांनी देशी गुन्हेगारास आपल्या घरांत अडकवून ठेवावे.
(१४) राजापूरच्या वखारीच्या दुरुस्तीचा खर्च छत्रपती शिवाजींना मिळणाऱ्या जकातीतून इंग्रजांनी करावा.
(१५) इंग्रजांचे युरोपियन शत्रूशी युद्ध जुंपल्यास छत्रपती शिवाजीनी त्यांस मदत करू नये. त्याचेपासून इंग्रजी मालमत्तेचे व लोकांचे त्याने संरक्षण करावे. त्यांची इस्टेट जप्त होऊ देवू नये व छत्रपती शिवाजींच्या प्रदेशांत तसे होऊन नुकसान झाल्यास छत्रपती शिवाजींनी भरपाई करावी.
(१६) इंग्रज वखारीत छत्रपती शिवाजींच्या कोणीही अधिकाऱ्याने जबरदस्ती शिरू नये. देशी गुन्हेगारास छत्रपती शिवाजींनी शिक्षा करावी. इंग्रज गुन्हेगारास गव्हर्नरच्या स्वाधीन करावे.
(१७) छत्रपती शिवाजींचे इंग्रजप्रदेशांत पळून गेलेले नोकर, इंग्रजांनी परत द्यावेत.
(१८) मुंबईजवळच्या मराठी प्रदेशांतून इंग्रजांस सर्पण मिळावे.
(१९) परस्परांची नाणी परस्परांच्या प्रदेशांत चालवीत
(२०) इंग्रज मुंबईच्या लोकांस ज्या सवलती देतील, त्या छत्रपती शिवाजींनीही द्याव्यात.

या तहनाम्यात २० कलमे असली तरी सर्व मिळून चारच कलमे आहेत असा रियासतकारचा अभिप्राय आहे. चार कलमांपैकी दोन कलमे शिवाजीराजे यांनी मान्य केली व दोन फेटाळून लावली.
• शिवरायांनी मान्य केलेली कलमे :-
(१) महाराजांच्या राज्यांत इंग्रजांनी व्यापार करावा
(२) व्यापारी मालावर त्यास जकात माफ असावी. बाकी दोन कलमे शिवरायांनी फेटाळली;
ती नाणी व किनाऱ्यावरील वादळांत सापडलेली गलबते याबद्दल ची होत. नाण्याच्या बाबतीत शिवरायांनी प्रत्यक्ष विरोध केला नाही, ही गोष्ट इंग्रजांनी समाधानाची मानवी, असे निराजीपंताने ऑक्झेंडन यास सांगितले. शिवरायांचे म्हणणे असे होते की, इंग्लीशांची नाणी चांगली असली, म्हणजे त्यांतील धातूची किंमत व नाण्यांची छापील किंमत ही योग्य प्रमाणांत असली, तर लोक आपखुशीनेच ती घेतील; त्यास आपण उत्तेजन न दिले तरी विरोध करणार नाही. बंदाराशिवाय इतरत्र विनाजकातीने व्यापार करण्याची सवलत इंग्रज मागत होते, ती शिवरायांना पसंत न्हवती. आदिलशाहने राजापूर येथे वखार घालताना ज्या सवलती कंपनीस दिल्या, तेवढ्या सवलती देण्यास शिवराय तयार होते. छत्रपती शिवाजींच्या मते त्या सवलती थोड्या नव्हत्या. इंग्रजांच्या व्यापाराच्या वस्तू मिरी, सुपारी, नारळ यांचा पुरवठा त्यास बंदरांत पुरेसा आहे, असें शिवरायांचे म्हणणे होते.
तह पुरा करून घेण्याबद्दल ऑक्झेंडनने नारायण शेणवी आणि निराजीपंत यांच्या मागे निकड लावली. निराजीपंत आपणास अनुकूल आहे, असें पाहून ऑक्झेंडनने त्यास एक अंगठी भेट म्हणून दिली. तहाचे काम लवकर उरकावे, म्हणून कोणास काय नजराणे द्यावेत, याबद्दल निराजीपंतांजवळ चर्चा केली. निराजीपंतांनी सांगितले की ऑक्झेंडनने मोरोपंतांकडे स्वतः जावून नजराणा द्यावा. इतर प्रधानांकडे नारायण शेणवी याचेमार्फत नजराणा धाडून भागेल. मोरोपंतास ४ पामाऱ्या, दत्ताजीपंत वाकेनिवीस यास १२५ रुपयांची अंगठी, डबीर यास चार पामाऱ्या, शामजी नाईक मुद्राधिकारी व अण्णाजी पंडित यास प्रत्तेकी चार पामाऱ्या दिल्यास बरे, असें निराजीपंताने ऑक्झेंडन यास सांगितले त्याप्रमाणे ऑक्झेंडनने केले. प्रल्हाद निराजी बरोबर त्याने मोरोपंतांची भेट घेतली व नजराणा दिला.
राज्याभिषेक झाल्यावर ऑक्झेंडनने निराजीपंतांच्या पाठीशी लकडा लावला की आता यावर राजाची संमतीदर्शक सही घ्या. तहाच्या कलामांचे कागद त्याने सतत आपल्याजवळ बाळगले होते. ता. ११ जून रोजी शिवाजीराजे यांनी तहावर आपल्या मान्यतेची निदर्शक म्हणून सही केली. ता. १२ जून रोजी त्यावर सर्व अष्टप्रधानांच्या सह्या झाल्या. ऑक्झेंडन निराजीपंतांच्या घरी गेला; निराजी व ऑक्झेंडन यांचे भाषण झाले, ते स्नेहपूर्व होते. कलमाचे उतारे करून इत्यादी कामगिरी निराजीपंतांच्या पुतण्याने केली असल्याने ऑक्झेंडनने त्याला एक पामारी दिली.
प्रसन्न मनाने, ता. १३ जून रोजी ऑक्झेंडन रायगडावरून निघाला व ता. १६ जून रोजी मुंबईस येऊन दाखल झाला. शिवरायांसारख्या स्वातंत्र जाहीर करणाऱ्या राजाबरोबर स्वतंत्र रीतीने, बरोबरीचा तह करणाऱ्यांत ऑक्झेंडनचा मोठा राजनैतिक विजय होय.

- गड-किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र राज्य.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...