विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 23 June 2020

शिवरायांच्या आजोबांचे चित्र न्यूयॉर्कमध्ये

शिवरायांच्या आजोबांचे चित्र न्यूयॉर्कमध्ये


सिंदखेड प्रांताचे राजे, राजमाता जिजाऊ साहेबांचे वडील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा लखुजीराजे जाधव यांचे चारशे वर्षांपूर्वीचे चित्र अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे सापडले आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी काढलेले हे चित्र मराठ्यांच्या इतिहासातील सुरुवातीच्या एका महत्त्वाच्या व्यक्तीच्या पाऊलखुणा अधोरेखित करणार आहे. या चित्राबरोबरच व्यक्तीचित्रांसाठी प्रसिद्ध असणारा चित्रकार हाशिम याचीही माहिती इतिहास अभ्यासकांना मिळू शकेल.

न्यूयॉर्क येथील 'मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्ट' या राष्ट्रीय संग्रहालयात हे चित्र इतिहास अभ्यासक मनोज दाणी यांना सापडले आहे. या संग्रहालयामध्ये 'बादशाही अल्बम' नावाचा एक चित्रांचा संग्रह असून, त्यामध्ये लखुजीराजे जाधवांचे चित्र जतन करण्यात आले आहे. हा संग्रह जहांगीर बादशाहच्या काळात बनवण्यास सुरुवात झाली. शाहजादा खुर्रम म्हणजे शहाजहान याच्या काळात त्यात आणखी काही चित्रे जोडली गेली. औरंगजेबाच्या राज्यकाळात हा संग्रह पूर्ण झाला. या संग्रहावर असलेल्या शिक्क्यांवरून आणि सुरुवातीच्या 'शमसा' आणि 'उनवान' या नक्षीदार पानांवरून दाणी यांनी संग्रहाबद्दल माहिती संकलित केली आहे. ही चित्रे अनेक वर्षे दिल्लीत बादशाही संग्रहात होती. १७३९ मध्ये नादिरशहाच्या लुटीतून ती वाचली. १८०२ साली इंग्रजांनी मराठ्यांकडून दिल्ली घेतल्यावर जेम्स फ्रेझर आणि त्यांच्या बंधूनी स्थानिक मोगल चित्रकारांकडून जुन्या चित्रांच्या नवीन प्रती बनवून घेतल्या. त्यानंतर हा चित्रांचा संग्रह दिल्लीतील आर्ट डीलर यांच्याकडे होता. कालांतराने पाश्चात्य संग्राहकानी तो विकत घेऊन परदेशी नेला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी पाच वर्षे आधी म्हणजेच १६२२ मध्ये हे चित्र हाशिम नावाच्या एका मोगल चित्रकाराने काढले आहे. चित्रावर शाहजहान बादशहाच्या हस्ताक्षरात फारसीमध्ये 'शबह-ए जादून राय दखनी अमल-ए हाशिम' म्हणजे 'जाधवराव दखनी यांची प्रतिमा, हाशिमने काढलेली' असे लिहिलेले आहे. हाच मजकूर जाधवरावांच्या चित्रातील पांढऱ्या कपड्यांवर पायाजवळ बारीक अक्षरात लिहिलेला आहे. जादूराय अथवा जादूनराय (मराठीत जाधवराव) हा लखुजी जाधवराव यांना मिळालेला किताब होता. त्यांच्या मृत्यूनंतर तो किताब लखुजी जाधवराव यांचा नातू पतंगराव याला देण्यात आला असा उल्लेख 'माथीर-ए-अलामगिरी' या फारसी ग्रंथात आहे. किताब देण्याची ही पद्धत मोगल आणि दखनी सुलतान यांच्या दरबारात प्रचलित होती. शिवाय तीन मोगल फारसी हस्तलिखितांमधे जादूनराय यांचे इ. स. १६१४ ते १६२९ या काळातील उल्लेख आहेत. या विशेषनामाचा उल्लेख तुझुक-ए-जहांगिरी या जहांगीर बादशाहच्या आत्मचरित्रातही येतो. जादूनराय असा उल्लेख शहाजहानच्या बादशाहनाम्यातही आहे. तिथे 'शाहूजी भोंसला दामाद जादू राय' असा स्पष्ट फारसी उल्लेख मिळतो. या सर्व संदर्भांवरून हे चित्र लखुजीराजे जाधव यांचेच असल्याचा दावा, मनोज दाणी यांनी केला आहे.

कोण होता हाशिम?

या चित्राचा चित्रकार हाशिम याची बरीच माहिती संशोधकांनी निश्चित केली आहे. त्यावरून असे सांगता येते की हाशिम हा मूळचा दख्खनचा रहिवासी होता. त्याच्या चित्रकार-कारकिर्दीची सुरुवात अहमदनगर अथवा विजापूर इथे झाली असावी. त्यानंतर तो त्या काळातली मोगलांची दख्खनच्या सुभ्याची राजधानी बऱ्हाणपूर इथे होता. तिथून तो उत्तर हिंदुस्तानातील मोगल दरबारात आणि वेळप्रसंगी परत दक्षिणेत येत जात होता. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणाऱ्या आणि ठळक आणि ताकदवान रेषांनी काढलेल्या व्यक्तिचित्रांमुळे तो त्या काळातला एक श्रेष्ठ चित्रकार मानला गेला आहे. हाशिमने नजामशाही, आदिलशाही आणि मोगल दरबारातील अनेक बड्या सरदारांची चित्रे रेखाटली आहेत.

Maharashtra Times | Updated Jul 17, 2018

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...