🚩संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा" 🚩
दिनांक 18 जुन 1697संताजी घोरपडे यांचा स्मृतिदिन
. संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे सरसेनापती होते.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला संताजी व धनाजी यांनी वाचवले व पुढे अठराव्या शतकात जवळपास संपूर्ण भारतभर आपला दरारा निर्माण केला. छत्रपती शिवाजीराजांनी कर्नाटकात स्वारी केली त्यावेळी संताजी घोरपडे यांच्या बरोबर होते .पुढे कृष्णेच्या दक्षिणेकडील कर्नाटकाचा बहुतेक भाग घोरपडे यांनी जिंकल्यावर सोंडूर, गजेंद्रगड ,दत्तवाड ,कापशी , इत्यादी शाखा उत्पन्न झाल्या .संताजी घोरपडे यांना छत्रपती राजाराम महाराजांनी 1691 मध्ये सेनापती पद दिले .संताजींचे वास्तव्य नेहमीच शंभू महादेवाच्या डोंगरात असत. तेथूनच ते चारही दिशेत विजेसारखे चमकत राहिले.बादशहाने जिंकलेल्या विजापूर प्रांत संताजी घोरपडे यांनी लुटून फस्त केला.संताजी घोरपडे अत्यंत शूर व धाडसी होते ."बलाढ्य फौजा बाळगून आत्मविश्वासाने वावरणाऱ्या शत्रूच्या शूर सेनानीना आपल्या गनिमी युद्धतंत्राच्या विलक्षण कौशल्याने हमखास पेचात आणून दाती तृण धरावयास लावणारा सेनानी म्हणून दक्षिणेत संताजींची ख्याती होती " संताजी घोरपडे यांचे नाव ऐकताच मोगल सेनानींच्या उरात धडकी भरत असे. संताजींशी लढण्याचा प्रसंग आला तर भल्या भल्या सरदारांना कापरे भरत असे. संताजीराव घोरपडे हे मराठा साम्राज्याचे 1689 ते 1697 या काळात सरसेनापती होते .छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी मराठ्यांच्या राज्याची धुरा वाहिली .त्याच काळातले संताजी घोरपडे व धनाजी जाधव या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घकाळ म्हणजे सतरा वर्षे औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याचा सामना केला. मोगल सैनिकांमध्ये संताजी घोरपडे यांची प्रचंड दहशत होती . औरंगजेबाचा इतिहासकार खाफीखानाने लिहून ठेवले आहे की संताजीच्या या महान विजयाची कहाणी सर्वस्वी त्या काळातील शत्रु पक्षीय मोगल इतिहासकारांनी लिहून ठेवली हे विशेष .अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले ते संताजी घोरपडे यांनी .
संताजी घोरपडे यांचे लष्करी डावपेच व हालचाली अतिशय काटेकोरपणे आखल्या जात. हाताखालच्या सैनिकांना त्यांचे आदेश बिनचूक आणि बिनबोभाट पार पाडावे लागत. सन 1689 साली बादशहा औरंगजेब याने छत्रपती संभाजीराजे यांची वडू कोरेगावच्या छावणीत अमानुषपणे हत्या केली. त्याच छावणीत औरंगजेबबादशहा असताना काही मोजक्या लोकांना बरोबर घेऊन औरंगजेबाच्या छावणीवर संताजीने घोरपडे यांनी यशस्वी छापा घातला व तंबूचे सोन्याचे कळस कापून ते पन्हाळा किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुढे पेश केले. मराठ्यांच्या छत्रपतिची अमानुष हत्या झाल्याने सारी मराठी दौलत हादरून गेली असता संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाच्या छावणीवर घातलेला छापा मराठी सैन्याला एक नवसंजीवनी सारखा वाटला. या घटनेमुळे सार्यांच्या कामाला एक दिशा मिळाली. त्याचा पूर्ण अनुभव पुढील सतरा-अठरा वर्षे औरंगजेबाला घ्यावा लागला. मोगल बादशहाला मराठ्यांनी दे माय धरणी ठाय करून टाकले. त्याच्या मुळाशी संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाला दिलेले आव्हान होते.
संताजी घोरपडे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत वाढलेले व त्यांच्या राजकीय तत्त्वज्ञानाच्या मुशीतून तयार झालेले सेनानी होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत वाढलेल्या राजकीय तत्वज्ञानाचा मोठा प्रभाव असलेली शिकवण संताजी विसरले नव्हते .म्हणूनच स्वराज्याच्या पडत्या काळात त्यांनी स्वराज्यास पारखे होऊन मोगलांची बाजू धरली नाही. निराशेच्या घोर अंधकारात हे स्वराज्याचाच विचार करत राहिले.या सर्व मंडळीत संताजी घोरपडे यांचे स्थान प्रथम दर्जाचे मानले पाहिजे.20 /25 हजारांची जंगी फौज बाळगणारा हा मराठ्यांचा सेनापती प्रत्यक्ष शत्रूस केंव्हाच जाऊन मिळाला नाहि. गनिमी काव्याच्या युद्धाचे आद्य धडे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतच मिळाले. लढाईच्या कामी शिस्तीचे महत्व असते,हा धडा त्यांनी याच काळात घेतला. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात संताजींची कडव्या लष्करी शिस्तीचे सेनानी म्हणून जी प्रतिमा उदयास आली तिचा उगम या तालमीत तयार झाला आहे. पुढचा इतिहास असे सांगतो की संताजी सारखा प्रति संताजी मराठ्यांना परत निर्माण करता आला नाही .पुढे औरंगजेबाच्या मृत्युपर्यंत मराठी फौजा मोठ्या जिद्दीने व पराक्रमाने मोगलांशी गनिमी युद्ध करत राहिल्या.पण संताजी प्रमाणे एकामागून एक असे नेत्रदीपक विजय कोणाही मराठा सेनानीस कमविता आले नाहीत. संताजी ची महती यातच आहे.
जिंजी तंजावर पर्यंत पसरलेल्या कर्नाटकाचा विस्तिर्ण प्रदेश संताजी यांच्या कार्याचे खास क्षेत्र होते. मोहिमेत ठिक ठिकाणी मोगली सैन्याचा समाचार घेत विविध ठिकाणच्या चौथाईच्या खंडण्या वसूल करीत मराठ्यांचा हा सेनानी राजाराम महाराजांच्या दर्शनाला जात असत. संताजी मोगली फौजेचे हालचालींची व तिच्या सेनानीँच्या योजनांची बित्तंबातमी राखून असत यावरून संताजी घोरपडे यांच्या शौर्याची कल्पना येते .छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेले स्वराज्य पुढे अठराव्या शतकात आपल्या दरार्याने व अतुलनीय पराक्रमामुळे संताजी व धनाजी यांनी वाचवले .
'वाजल्या जरी कुठे टापा l
धुरळ्याच्या दिसती छाया ll
छावणीत गोंधळ व्हावा l
संताजी आया आया ll
एवढी संताजींची दहशत होती.औरंगजेबाला जर संताजींनी मारले असते तर पुढील शंभर वर्षाचा तरी भारत देशाचा इतिहास बदलला असता.
🙏"अशा या महान सेनानीला आज पुण्यतिथी निमित्त मानाचा मुजरा"🙏
लेखन ✒️
Dr. Suvarna Naik Nimbalkar
चित्रकार - Pramod Kallappa Morti दादा
No comments:
Post a Comment