विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 22 June 2020

छत्रपती शिवाजी महाराजांना रोमांचित करणारा आणि औरंगजेबाला अपमानित करणारा कविराज भूषण.

छत्रपती शिवाजी महाराजांना रोमांचित करणारा आणि औरंगजेबाला अपमानित करणारा कविराज भूषण.
(उपलब्ध ऐतिहासिक साधनांस प्रमाण राहून वाचकांस सोप्या भाषेत समजाविण्यासाठी लेख लिहिताना आवश्यक तिथे मी शब्द स्वातंत्र्य घेतलेले आहे. )
'शिवराज भूषण' ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरील रचलेल्या काव्य ग्रंथाचा 'कविराज भूषण' हा कर्ता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य आणि साहसाची मुक्त कंठाने शिवाजी महाराजांच्याच समोर स्तुती करणारा महान काव्य ग्रंथकार.
आजच्या उत्तर प्रदेशातील कानपुर जिल्ह्यातील यमुनेकाठच्या त्रिविक्रमपूर (तीकवपूर ) गावचा हा राहणारा. बिरबल घाटमपूरचा आणि कविराज भूषण त्रिविक्रमपूरचा. शेजारी शेजारी.
हिंदी भाषेतील दोन मुख्य भेद असलेल्या' ब्रिजभाषा ' आणि 'अवधी भाषा' ह्यांत बरेच काव्यग्रंथ लिहिले गेलेले आहेत. कवी भूषण याने त्याच्या कविता ह्या 'ब्रिजभाषेत' लिहिल्या आहेत. शिवाय ह्या वीर रस कविता ब्रिजभाषेत लिहिताना त्याने 'खडी बोली'चा वापर जास्त केलेला आहे.
ह्या कवि भूषणने छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर 'शिवराज भूषण' आणि 'शिव बावनी' हे दोन अत्यंत सुंदर ग्रंथ लिहिले. शिवाय ह्याने राजा छत्रसाल बुंदेलावर 'छत्रसाल दशक' नावाचा १० कवितांचा संग्रह ही तयार केला.
तसेच ह्याने 'भूषण हजारा' , 'भूषण उल्हास', आणि 'दूषण उल्हास' असे अजून ग्रंथही लिहिले होते. परंतु काळाच्या अंधारात गायब झाल्यामुळे भूषण हजारा, भूषण उल्हास, आणि दूषण उल्हास हे ग्रंथ आज आपल्यासमोर उपलब्ध नाहीत.
उपलब्ध माहितीनुसार,
कवि भूषण ह्याचे खरे नाव इतिहासात अज्ञात आहे. चित्रकूटचा राजा रुद्रराम सोळंकी नावाच्या हिंदू राजाने ह्याचे काव्यगुण पाहून ह्यास 'कवी भूषण' असे पदवी नाव दिले.
आता आपण मुख्य विषयाकडे वळू.
औरंगजेब हा इस्लाम धर्माचा कट्टर अभिमानी.
पण तरीही अकबरापासून मुघल दरबारी परंपरेने चालत आलेले हिंदी कवी ह्या औरंगजेबानेही आपल्या पदरी ठेवलेले होते. त्यातच ह्या कवी भूषणचा मोठा भाऊ 'चिंतामणी' हा ही औरंगजेब दरबारी 'राजकवी' म्हणून सेवेत होता.
(कवी 'गंग' हा अकबराच्या दरबारात होता त्याच प्रमाणे ज्याने 'गंगा लहरी' हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला तो पंडित जगन्नाथ राय हा संस्कृत कवीही शहाजहानच्या पदरी होता. )
राजकवी चिंतामणीकडून आपल्या ह्या धाकट्या भावाचे काव्य कर्तृत्व औरंगजेबाच्या कानावर गेले. त्यामुळे औरंगजेबाने ह्या ‘कवी भूषण' ह्यास दरबारात भेटायला घेऊन येण्याची इच्छा ‘राजकवी चिंतामणी' जवळ व्यक्त केली.
एके दिवशी औरंगजेबाने आपल्या दरबारातील सर्व कवींस प्रश्न केला कि, " तुम्ही तुमच्या कवितांमध्ये नेहमी माझे गुणगान गाता. तुम्हाला माझ्यात काही दोष दिसले नाहीत का?"
औरंगजेबाने अचानक विचारलेल्या ह्या प्रश्नाने सर्व कवी लोक चपापून गेले. 'न जाणो ह्या कपटी औरंगजेबाच्या मनात हे विचारण्यामागे काय कपट असेल? न कळे..' म्हणून सर्व कवी साशंकीत नजरेने औरंगजेबाकडे पाहू लागले.
स्तब्धतेचा एक क्षण असा ओसरताच; औरंगजेबाच्या इच्छेवरून औरंगजेबाच्या दरबारात त्याला भेटायला आलेला ‘कवी भूषण' उठून उभा राहिला आणि औरंगजेबास म्हणाला कि, " आलमगीर बादशहा स्तुती ही तर त्या देवालाही प्रिय असते. मग ती मनुष्याला प्रिय असावी यात नवल ते काय? तथापि दैवाच्या चमत्कारिक गोष्टी देवही ललाटात झाकून ठेवतो. म्हणून आम्ही कवी देखील फक्त 'मोठ्यांचे मोठेपणच' जगासमोर मांडीत असतो.
पण आपण आता विचारलेच म्हणून मला सांगावे वाटते कि दोष सांगणारे पुष्कळ सापडतील पण ते दोष ऐकून घेणारा एकही 'मर्द' सापडणार नाही. आपण आपले दोष ऐकण्यास तयार असाल तर मीही आपले दोष सांगण्यास तयार आहे."
(फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम हा लेख लिहिताना पुढे म्हणतात कि, “कवी भूषणने हुशारीने वापरलेल्या 'मर्द' शब्दामुळे औरंगजेबाची अडचण झाली आणि त्याला 'हो' असेच म्हणावे लागले. नाही म्हंटला असता तर औरंगजेब भर दरबारात नामर्द सिद्ध झाला असता.” )
कवी भूषणच्या ह्या 'शाब्दिक धाडसाचे' औरंगजेबाला मोठे कौतुक वाटले; आणि औरंगजेबाने त्याला दोष दर्शविण्याची आज्ञा दिली.
परंतु तरीही कवी भूषण ह्याने औरंगजेबास अभय-पत्र मागितले आणि त्यावर दरबारांतील ठाकूर, राव, वगैरे राजपुतांची ग्वाही घालून देण्यास सांगितले.
औरंगजेबाने कवी भूषणची ही विनंती मान्य केली.
आता कवी भूषण औरंगजेबाचे दोष सांगण्यास उभा राहिला तसे सगळा दरबार त्याच्याकडे उत्साहित होऊन मोठ्या कुतूहलाने पाहू लागला.
(ब्रिजभाषेतील त्याच्या खालील कवितेचा मराठी अर्थ कवितेच्या खाली लगेच दिला आहे. )
औरंगजेबाकडे पाहून त्याने पहिली कविता म्हंटली ती अशी,
किबले कि ठौर बाप बादशहा शहाजहान,
ताको कैद कियो मानो मक्के आग लाई है !
बडो भाई दारा वाको पकरी कै कैद कियो
मेहरहू नाही माँको जाये सगो भाई है !!
बंधू तो मुरादबक्ष बात चूक करीबेको!
बीचले कुरान खुदाकी कसम खाई है !!
भूषण सुकवी कहे सुनो नवरंगजेब
येते काम किन्हे तेउ पातसाही पाणी है !!
ह्या कवितेचा मराठी अर्थ असा:
तुझा पिता शहाजहान त्याला तू कैद केलेस
जणू मक्केला आगच लावण्यासारखे हे तुझे कृत्य आहे
वडील भाऊ दारा त्याला तू धरून कैद केले
परंतु तुझ्या हृदयात एवढीही दया आली नाही कि हा माझा सख्खा भाऊ आहे.
तुझा धाकटा भाऊ मुरादला फसविण्याकरिता
तू त्याच्यात आणि स्वतःच्यात कुरान ग्रंथ ठेऊन शपथ वाहिली.
हा भूषण कवी म्हणतो औरंगजेबा ऐक
इतकी पापे केली तेंव्हा तुला ही बादशाही मिळाली आहे.
हि कविता ऐकताना कवितेतील प्रत्येक शब्द औरंगजेबाला असंख्य सुया टोचाव्यात असे टोचत होते. हे कमी कि काय म्हणून कवी भूषण ह्याने अजून पुढे कवितेच्या चार ओळी औरंगजेबाला ऐकविल्याच.
त्या ओळी अश्या:
हाथ तसबीह लिए प्रात उठे बंदगीको !
आपही कपट रूप कपट सुजपके !!
आगरेमें जाए दारा चौक में चुन्हाय लीन्हो !
छत्र हु छिनायो मानो बूढ़े मरे बापके !!
कीन्हो हे सगोत घात सो तो मैं नाही कहो
पिल पै तुराये चार चुगलक गपके !!
भूषण भनत शठछंदी मतिमंद महा !
सौ सौ चूहे खायके बिलारी बैठी तप के !!
ह्या चार ओळींचा मराठी अर्थ असा:
औरंगजेबा तू रोज सकाळी उठून
हातात मण्यांची माळ घेऊन ईश्वरास प्रार्थना करतोस
परंतु हे केवळ तुझे ढोंग आहे. कारण तू स्वतः कपटाचे केवळ रूप
आहेस.
आग्ऱ्यास जाऊन दाराला भर चौकात तू चिणून टाकलेस.
तसेच चुगल्या करणाऱ्या लोकांच्या सांगण्यावरून किती गोत्रजांना तू
हत्तीच्या पायी दिलेस त्या सर्वांची नावे मी सांगू शकत नाही.
तू शठछंदी आणि धूर्त आहेस. शंभर शंभर उंदीर खाऊन पुन्हा
टपून तपश्चर्या करणाऱ्या मांजरी सारखा तू बसला आहेस.
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
"सौ सौ चूहे खायके बिलारी बैठी तप के.."
ही शेवटची कवितेची ओळ ऐकून औरंगजेबाच्या अहंकाराचा आणी संयमाचा ज्वालामुखीच फुटला. आपण दिलेले वचन विसरून रागाच्या भरात त्याने आपल्या जवळील तलवार उचलली आणि ती घेऊन तो कवी भूषण ह्यास मारावयास उठला.
हा प्रकार पाहताच दरबारातील अमीर उमरावांनी आणि राजपुतांनी घाई घाईने आर्जव करीत औरंगजेबास त्याने दिलेल्या वचनाची आठवण करून देऊन मोठ्या प्रयत्नाने त्यास शांत केले आणि कवी भूषणचे प्राण वाचले.
( हि वर सांगितलेली घटना किती खरी ह्या बाबत इतिहास संशोधकांत मत-भिन्नता आहे. काही अभ्यासकांच्या मते हि घटना दिल्लीत घडली तर काहींच्या मते आग्ऱ्यात. )
ह्या घटनेमुळे 'आग्ऱ्यात आपण फार काळ राहणे हे आपल्या जीवास अपायकारक आहे' असे वाटल्याने कवी भूषण औरंगजेबाचा शत्रू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात चालता झाला.
थांबा. आता इथं अजून एक गंमत आहे.
हा महाराष्ट्रात येण्याला अजून एक कारण होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा येथे जाऊन भर दरबारात औरंगजेबाचा अपमान केल्यानंतर आणि तेथील कैदेनंतर औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटल्यानंतर संपूर्ण हिंदुस्थानात औरंगजेबाचे नाक कापले गेले आणी त्याचे खूप हसे झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे तेज, प्रताप, धर्माभिमान पाहून औरंगजेबाचा सगळा दरबार अत्यंत प्रभावित झाला.
औरंगजेबाच्या दरबारातील हिंदू लोकांना छत्रपती शिवाजी महाराज हि अलौकिक व्यक्ती आहे ह्याचा साक्षात्कार झाला. ह्या आग्ऱ्यातील घडलेल्या घटनेपासून हा कवी भूषण कट्टर शिवाजी महाराजांचा भक्त झाला. आणि तो तडक शिवाजी महाराजांना भेटायला महाराष्ट्राकडे निघाला.
(काही इतिहासकारांच्या मते आग्ऱ्यातील लाल किल्यात जिथे शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा पान-उतारा करून त्याची लायकी काढली तेंव्हा हा कवी भूषण तिथे दरबारात उपस्थित होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्माभिमानी तेज पाहून हा कवी भूषण अत्यंत प्रभावित झाला होता.)
आपण ह्याला महाराष्ट्रात 'कविराज भूषण' ह्या नावाने ओळखतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी हा रायगडास आला होता.
रायगडला पोहचल्यावर विश्रांतीसाठी म्हणून हा रायगडावरील एका मंदिरामध्ये काही काळ थांबला. तिथे ह्याची शिवाजी महाराजांशी अकस्मात भेट झाली. पण ह्या वेळी कवि भूषण ह्यास 'हेच ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत' याची कुठलीही कल्पना नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांनी कवि भूषण ह्यास थेट उत्तरेतून इकडे रायगडास येण्याविषयीचे कारण विचारले आणि त्याचे सर्व वृत्तांत ऐकून घेतले.
(काही अभ्यासकांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज वेष पालटून ह्या घटनेच्या वेळी कविराज भूषण थांबलेल्या मंदिरात पूजेसाठी म्हणून आलेले होते. तिथेच त्यांना हा कवि भूषण भेटला.)
छत्रपती शिवाजी महाराजांनी कवि भूषण ह्यास म्हंटले कि, "कविराज आपण छान कविता करता असे म्हणालात. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात जाण्याअगोदर मला छत्रपती शिवाजी महाराजांवर एखादी कविता ऐकवू शकाल काय?
एका अज्ञात व्यक्तीने (म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी) आपल्याला सारख्या कवीला 'कविराज' असे म्हंटल्याने कवी भूषणच्या मनात आनंदाची लहर उसळली.
कविराज भूषण ह्याने छत्रपती शिवाजी महाराज पूर्वी कधी पाहिलेले नसल्याने त्याने 'हेच ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत' असे ओळखणे काही शक्य नव्हते.
त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांवरील कविता आपण कुणा अज्ञात ‘शिव-प्रेमी' व्यक्तीसच ऐकवत आहोत अश्या अविर्भावात कविराज भूषण याने; त्याने रचलेल्या शिवराज भूषण ग्रंथातील ५६ क्रमांकाची कविता मोठ्या खड्या आवाजात अत्यंत सुरील्या आवाजात गायली.
इन्द्र जिमि जंभ पर, बाडब सुअंभ पर,
रावन सदंभ पर, रघुकुल राज हैं।
पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर,
ज्यौं सहस्रबाह पर राम-द्विजराज हैं॥
दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर,
'भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं।
तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर,
त्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज हैं॥
ऊंचे घोर मंदर के अंदर रहन वारी,
ऊंचे घोर मंदर के अंदर रहाती हैं।
कंद मूल भोग करैं, कंद मूल भोग करैं,
तीन बेर खातीं, ते वे तीन बेर खाती हैं॥
भूषन शिथिल अंग, भूषन शिथिल अंग,
बिजन डुलातीं ते वे बिजन डुलाती हैं।
'भूषन भनत सिवराज बीर तेरे त्रास,
नगन जडातीं ते वे नगन जडाती हैं॥
छूटत कमान और तीर गोली बानन के,
मुसकिल होति मुरचान की ओट मैं।
ताही समय सिवराज हुकुम कै हल्ला कियो,
दावा बांधि परा हल्ला बीर भट जोट मैं॥
'भूषन' भनत तेरी हिम्मति कहां लौं कहौं
किम्मति इहां लगि है जाकी भट झोट मैं।
ताव दै दै मूंछन, कंगूरन पै पांव दै दै,
अरि मुख घाव दै-दै, कूदि परैं कोट मैं॥
बेद राखे बिदित, पुरान राखे सारयुत,
रामनाम राख्यो अति रसना सुघर मैं।
हिंदुन की चोटी, रोटी राखी हैं सिपाहिन की,
कांधे मैं जनेऊ राख्यो, माला राखी गर मैं॥
मीडि राखे मुगल, मरोडि राखे पातसाह,
बैरी पीसि राखे, बरदान राख्यो कर मैं।
राजन की हद्द राखी, तेग-बल सिवराज,
देव राखे देवल, स्वधर्म राख्यो घर मैं॥
ह्याच वरील कवितेचे काही अंश असे:
इन्द्र जिमि जंभ पर, बाडब सुअंभ पर,
रावन सदंभ पर, रघुकुल राज हैं।
पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर,
ज्यौं सहस्रबाह पर राम-द्विजराज हैं॥
दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर,
'भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं।
तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर,
त्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज हैं॥
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
ह्या कवितेचा मी केलेला मराठी अर्थ असा:
इंद्र जृंभकासुरावर, हनुमान सागरावर,
गर्वयुक्त रावणावर, रघुकुलपतिचे राज्य आहे ।
वायु जसा मेघावर, शंभु जसा मदनावर,
जसे सहस्रबाहुवर* राम अद्वितीय आहे ।
वणव्याच्या जाळ वुक्षांवर, चित्ता हरणांच्या कळपावर,
भूषण मदोन्मत्त हत्तीवर जसा मृगराज आहे.
तेजस्वी प्रकाश काळ्याकुट्ट अंधाराच्यावर, कृष्ण जसा कंसावर,
म्लेंच्छांच्या त्या वंशावर, शिवाजी महाराज सिंहासारखे विजयी आहेत.।
हि कविता ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
अत्यंत आनंदून जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या उत्सुकतेने कविराज भूषण यास तीच कविता 'पुन्हा' एकविण्याची इच्छा प्रदर्शित केली आणि कविराज भूषण याने 'पुन्हा' ती कविता गाऊन हि कविता ऐकणाऱ्या ह्या अज्ञात व्यक्तीची इच्छा 'पुन्हा' पूर्ण केली.
ह्या प्रमाणे १८ वेळा हीच कविता पुन्हा-पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी कविराज भूषण याच्याकडून म्हणवून घेतली.
शेवटी १९ व्या वेळी 'इन्द्र जिमि जंभ पर, बाडब सुअंभ पर..' हि कविता गाताना कविराज भूषण याच्या गळ्याला सूज आली आणि तो कविता गाताना अडखळून मध्येच थांबला.
ह्या व्यत्ययामुळे "माझ्या घश्याला सूज आल्यामुळे ह्या पुढे आता मला हि कविता तुम्हास गाऊन दाखविता येणार नाही.." अशी प्रांजळ कबुली कविराज भूषण याने ह्या अज्ञात व्यक्तीसमोर व्यक्त केली.
कविता ऐकून तृप्त झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मग मात्र ह्या वेळी आपली 'खरी ओळख' कविराज भूषण ह्यास सांगितली.
ज्या धर्माभिमानी राजाला शोधत आपण इतक्या दूर दक्षिणेत आलो तो साक्षात आपल्या समोर दत्त म्हणून उभा आहे आणि इतक्या वेळेस आपण ज्याला कविता ऐकविली ते दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द शिवाजी महाराजच आहेत हे कळल्यावर ह्या कविराज भूषणच आनंद गगनात मावेनासा झाला.
(फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम हा लेख लिहिताना म्हणतात कि, “ परम श्रद्धेने पांडुरंग आठवावा आणि साक्षात पांडुरंगाने आपल्या समोरच उभे राहावे असा हा सारा अद्भुत प्रकार होता. )
आनंदून जाऊन त्या कविराज भूषणने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर मस्तक ठेवले आणि आपले देहभान हरपून तो ह्या दूर देशी शोधत आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी लिन झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी कविराज भूषण ह्यास अत्यंत प्रसन्न होऊन म्हंटले कि, " कविराज, आम्ही मनात निश्चय केला होता कि आपण जितक्या वेळेस हि कविता आम्हास ऐकवाल तितक्या लक्ष सोन्याच्या मोहरा, तितकेच हत्ती आणि तितकीच गावे आम्ही आपणास इनाम द्यावे.
आपला योग १८ पर्यंतच होता. म्हणून आपणांस १८ लक्ष रुपये, १८ हत्ती, आणि १८ गावे इनाम देत आहोत. आता आपण आपल्या भविष्याची कोणत्याही प्रकारची चिंता न करिता आमच्या दरबारचे राजकवी म्हणून इथेच रायगडास राहावे."
(काही इतिहासकारांच्या मते कविराज भूषण ह्याची शिवाजी महाराजांशी ओळख दरबारात दुसऱ्या दिवशी झाली. सण १७०३ मधील लोकनाथ कवी हे कविराज भूषण यांना छत्रपती शिवाजी महाराजांकडून ५२ हत्ती मिळाल्याचा उल्लेख करतात.)
तर १७३४ मध्ये होऊन गेलेल्या 'दास' कवीने म्हंटले आहे कि, "कविराज भूषण याने आपल्या कवितेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांपासून विपुल संपत्ती मिळविली."
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बक्षिसाने संतुष्ट झालेल्या कविराज भूषण याने महाराजांस म्हंटले कि,
" महाराज मला तुमच्याकडून राज आश्रय मिळाला हे माझे भाग्यच आहे. तुम्ही ह्या कवीचा 'कविराज' केला. ह्यातच मी भरून पावलो. तुमचे शौर्य आणि धर्माभिमान पाहून मी तुमच्याकडे आलो. तुमच्यासारख्या शूर योध्याकडून यवनांचा निःपात आणि हिंदुस्थानचे स्वातंत्र्य पाहण्याची माझी प्रबळ इच्छा आहे."
कविराज भूषण इसवीसन १६६७ पासून इसवीसन १६७३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांकडेच थांबला. ह्या ६ वर्षात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरील 'शिवराज भूषण' हा अलौकिक काव्य ग्रंथ तयार केला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची परवानगी घेऊन कविराज भूषण आपल्या स्वगृही म्हणजे उत्तर प्रदेशातील कानपूरला गेला.
स्वगृही जाताना कविराज भूषण हा राजा छत्रसाल बुंदेला ह्यालाही भेटला आणि त्याच्यावरही त्याने 'छत्रसाल दशक' नावाचा १० कवितांचा संग्रह तयार केला.
तर अशी ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मा-भिमानी आणि शौर्या-भिमानी कार्याने प्रेरित झालेल्या कविराज भूषण याची हि थोडक्यात माहिती.
(वरील छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर गायलेल्या काव्याच्या मराठी भाषांतरात तुम्हीही शाब्दिक सुधारणा करून त्यास अजून चांगले बनवू शकता. परिपूर्ण आणि सर्वज्ञानी असे कोणीही नाही. मी हि नाही. )
लेख समाप्त.
लेखाविषयी तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये कळवा आणी आपल्या महाराष्ट्र धर्मवर मित्रमंडळींना 'Invite' (आमंत्रित) करा.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...