विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 8 July 2020

कोपरगाव व रघुनाथराव पेशवे-------------1


कोपरगाव व रघुनाथराव पेशवे-------------1
लेखन- © सुमित अनिल डेंगळे
कोपरगाव’ शहर गोदावरी काठी वसलेले एक प्राचीन शहर असून अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. नगर-मनमाड महामार्गालगत असणारे हे शहर शिर्डी पासून (उत्तरेला) सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे.
कोपरगावचे जुने नाव ‘कर्पूरग्राम’. दक्षिणगंगा समजल्या जाणाऱ्या गोदावरीच्या उत्तर काठावर शहर वसलेले आहे. नदीच्या दक्षिण भागाला ‘बेट कोपरगाव’ म्हणतात. नदी येथे दोन प्रवाहात विभागली गेल्याने हा भाग चहूबाजूंनी पाण्याने वेढलेला असे. सध्या मात्र बेट अस्तित्वात नाही. या भागास ‘बेट कोपरगाव’ अथवा ‘कचेश्वराचे बेट’ म्हणतात. बेटाला पुरातन महत्व असून बेट कोपरगाव ही दैत्यगुरू शुक्राचार्यांची कर्मभूमी समजली जाते. येथे शुक्राचार्यांचा प्राचीन मंदिर असून ते जगातील एकमेव शुक्राचार्यांचे मंदिर असल्याचे मानले जाते. त्याजवळच संजीवनी पार असून याठिकाणी कचेश्वराला शुक्राचार्यांनी संजीवनी विद्या (मृत व्यक्तीला जिवंत करण्याची विद्या) दिली. येथे शुक्राचार्य व कचेश्वर लिंगरूपात आहेत. त्यालगतच गणपती, श्रीविष्णु, शिवशंकर इत्यादी दैवतांची मंदिरे आहेत. बेटातील बहुतांशी मंदिरे यादवकालीन आहेत.
कोपरगावास एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले ते पेशवाईच्या काळात रघुनाथराव पेशव्यांमुळे. रघुनाथराव हे पहिल्या बाजीराव पेशव्यांचे पुत्र व नानासाहेबांचे धाकटे बंधू. अटकेपार मराठेशाहीचे झेंडे फडकवणारे पराक्रमी पुरुष. त्यांना राघोबादादा, राघोभरारी अथवा दादासाहेब या नावांनी ओळखले जाते. दादांना गोदाकाठ फारच आवडे. दादा अधूनमधून पुण्याहून कोपरगावला वास्तव्यास येत. त्यांचे दोन वाडे कोपरगावात होते. एक बेट-कोपरगाव येथे शुक्राचार्य मंदिराच्या जवळ असून दुसरा शहरात होता. बेटातील वाडा सध्या अस्तित्वात नाही. दुसरा वाडा शहरात आहे. तसेच 1783 मध्ये कोपरगावजवळील ‘हिंगणी’ येथे एक वाडा बांधण्याचे काम त्यांनी सुरू केले होते परंतु तो पूर्ण होऊ शकला नाही.
17 मे 1782 ला इंग्रज व मराठे यांच्यात सालबईचा तह झाला त्यानुसार इंग्रजांनी राघोबादादास महादजींच्या स्वाधीन केले. राघोबादादांनी कोपरगाव हे ठिकाण पुढील वास्तव्यासाठी निवडले. त्यांना पेशव्यांकडून दरसाल तीन लक्ष रुपये पेन्शन मंजूर करण्यात आले. 1783 मध्ये दादासाहेब कोपरगाव आले व पत्नी आनंदीबाई, पुत्र अमृतराव (दत्तक) व बाजीराव यांच्यासोबत कोपरगावी राहू लागले.
पुढे थोरल्या वहिनी गोपिकाबाई (श्रीमंत नानासाहेबांच्या पत्नी) यांची भेट घेण्याची इच्छा दादांनी त्यांच्याकडे व्यक्त केली. नाशिकमध्ये वास्तव्यास असणाऱ्या गोपिकाबाईंनी तत्पूर्वी त्यांना नारायणरावांच्या खुनाबद्दल प्रायश्चित्त घेण्यास सांगितले. दादांनी 4 ऑगस्ट 1783 रोजी गोदावरी व दारणा संगमावरील ‘सांगवी’ येथे यथाविधी प्रायश्चित्त घेतले. नंतर नाशिकजवळील गंगापूर येथे उभयतांची भेट झाली. दादा कोपरगावी परतले. त्यानंतर दादांची प्रकृती खालावली व काही महिन्यांतच आजाराने 11 डिसेंबर 1783 ला बेटातील वाड्यात दादांचे निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार हिंगणी येथे करण्यात आले. दादांच्या निधनावेळी आनंदीबाई गरोदर होत्या. पुढे त्यांनी 30 मार्च 1784 ला कोपरगावातील वाड्यात मुलाला जन्म दिला. त्याचे नाव ‘चिमणाजी’ ठेवण्यात आले. आनंदीबाई मुलांसमवेत कोपरगावातील वाड्यात राहू लागल्या. 1792 पर्यंत कोपरगावात राहिल्यानंतर त्या ‘आनंदवल्ली’ येथे गेल्या व मार्च 1794 मध्ये त्यांचा तेथे मृत्यू झाला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...