लेखन- © सुमित अनिल डेंगळे.
कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्रिंबकजींनी स्वकर्तुत्वावर पेशवाईत स्वतः चे वेगळे स्थान निर्माण केले. बाजीरावांचे विश्वासू व पुढे पेशव्यांचे कारभारी बनले. मराठेशाहीच्या उत्तरार्धात त्यांनी शिंदे, होळकर, भोसले, पेंढारी इ.ना इंग्रजांविरुद्ध एकत्र आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्रिंबकजींचं वाढतं वर्चस्व इंग्रजांना असह्य होऊ लागलं. गंगाधरशास्त्री खूणप्रकरणाशी त्यांचा संबंध जोडून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं. ठाण्याच्या तुरुंगातून पलायन केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी भिल्ल, रामोशी इ. ना संघटित केले व इंग्रजांविरुद्ध उठाव केले. मोठ्या फौजेनिशी पेशव्यांना मिळून 1817-18 च्या इंग्रज-मराठा लढायांत पराक्रम गाजवला. आष्टीच्या लढाईनंतर अनेक मराठी सरदारांनी पेशव्यांची साथ सोडून दिली. अशावेळी निष्ठावंत त्रिंबकजी अखेरपर्यंत पेशव्यांसोबत होते. धुळकोटला नाईलाजाने पेशव्यांना इंग्रजांसमोर शरणागती पत्करावी लागली व बापू गोखलेंनी 5 नोव्हेंबर 1817 ला ब्रिटिश रेसिडेंसीवर हल्ला करून सुरू केलेला हा दीर्घकाळापर्यंत चाललेला संघर्ष समाप्त झाला. इंग्रजांनी ‘त्रिंबकजींना आम्ही केवळ जीवदान देऊ शकतो’ असे सांगितले. पेशव्यांनी ब्रम्हावर्ताची वाट धरली. इतर अनेक मराठमंडळींच्या जहागिऱ्यांना इंग्रजांनी अभय दिले, सरंजाम कायम ठेवले. मात्र आयुष्यभर त्रिंबकजींना येथून हजार किलोमीटर दूर चुनारच्या किल्ल्यावर कारावासात राहावं लागलं. शिवछत्रपतीस्थापित मराठी राज्य वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या त्रिंबकजींचा संघर्ष इतिहासाच्या पडद्याआड राहिला ही खरोखरचं मोठी शोकांतिका आहे.
त्रिंबकजींचा मृत्यू कसा झाला?
मृत्यूपूर्वी त्रिंबकजींना दुर्धर आजारांनी ग्रासले होते. त्यांनी कलकत्त्याला गव्हर्नर जनरलकडे विनंती केली होती की मला येथून काशीला जावू द्यावे. तिथे मरण आल्यास मोक्ष मिळतो असे आमच्या धर्मात म्हणतात, परंतु ती याचिका फेटाळण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांनी 16 ऑक्टोबर 1829 ला चुनारगडावर त्रिंबकजींचा मृत्यू झाला.
लेखन- © सुमित अनिल डेंगळे.
संदर्भ-
1. History of Mahrattas – James Grant Duff
2. Bajirao ll and the East India Company – Pratul Chandra Gupta
3. The Asiatic Journal & Monthly register for british and foreign India, China and Austrelia -1835
4. Narrative of a Journey through the Uppar Provinces of India from Culcutta to Bombay (1824-25) – Bishop Reginald Heber
चुनारगडावर त्रिंबकजींना ठेवलेले संभाव्य ठिकाण
No comments:
Post a Comment