लेखन- ©सुमित अनिल डेंगळे.
त्रिंबकजी हा त्याची सासुरवाडी अहिरगाव (ता. निफाड जि. नाशिक) येथे राहत असल्याची खबर जयाजी पाटील याने 28 जून 1818 ला मालेगावला दिली त्यावेळी कॅप्टन ब्रिग्ज खानदेशात होता. त्याने कॅप्टन स्वान्स्टनला त्रिंबकजीला पकडण्यासाठी धाडले. स्वान्स्टनच्या नेतृत्वाखालील फौजेने त्रिंबकजीला कैद केले. काही काळानंतर त्याची रवानगी वाराणसी जवळच्या चुनारच्या किल्ल्यात करण्यात आली. 1818 ते 1829 अशी दहा-अकरा वर्षे चुनारला कैदेत असणाऱ्या त्रिंबकजीचा अखेर 16 ऑक्टोबर 1829 ला चुनारला दुर्दैवी मृत्यू झाला.
चुनारगड (जि.मिर्झापुर, उत्तरप्रदेश)
कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्रिंबकजीने स्वकर्तृत्वावर पेशवाईत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. ज्या काळात फितुरीची बीजे मुलुखभर रोवली गेली होती,अनेक मराठे सरदार इंग्रजांशी सुरुवातीपासूनच संधान ठेवून होते त्याकाळात त्रिंबकजी मराठेशाहीच्या स्वातंत्र्याचे स्वप्न बघत होते. इंग्रजांच्या कच्छपी लागून स्वतःची जहागीर वाचवणं त्रिंबकजीला अशक्यप्राय बिलकुल नव्हतं. या सामान्य माणसाने भारतभर फोफावत जाणाऱ्या इंग्रज सत्तेला काही काळ स्वतःच्या बळावर आव्हान दिलं परंतु त्याला सर्वस्वी अपयश आलं. आयुष्याच्या उत्तरार्धात चुनारच्या किल्ल्यावर त्रिंबकजी अत्यंत हलाखीचे जीवन कंठत होता.
त्रिंबकजीचे त्याच्या गावावर अत्यंत प्रेम होते.याबद्दल एल्फिन्स्टन त्याच्या रोजनिशीत म्हणतो की, ‘त्याच्या भरभराटीच्या काळातही तो त्याच्या गावाला विसरला नाही’. अनेक इतिहासकार त्रिंबकजीला ‘मराठेशाहीचा शेवटचा आधारस्तंभ‘ म्हणतात. नाना फडणीसानंतर इंग्रजांना त्रिंबकजीचा धाक असल्यामुळे अनेक इतिहासकार त्यास ‘सवाई नाना’ संबोधतात. न.चिं.केळकर आपल्या ‘मराठे व इंग्रज’ या पुस्तकात त्रिंबकजीविषयी लिहितात,
‘बाजीरावास पुष्कळ कुटिल मंत्री होते पण त्या सर्वांत त्रिंबकजी डेंगळे हा श्रेष्ठ होता. वास्तविक त्रिंबकजी हा अत्यंत शूर, धाडसी, हजरजबाबी, कल्पक व कर्ता असा पुरुष होता. पेशवाईच्या गादीची इतकी हलाखी झाली हे त्याला पाहावत नसे; या सर्वाला कारण इंग्रज हे त्यांच्या मनाने घेतले होते. इंग्रजांच्या वैराचा स्पर्श त्याला लागला नसता किंवा नाना फडणीसासारख्या मुत्सद्याच्या पदरी तो असता तर इतिहासात त्याचे मोठे नाव झाले असते.’
लेखन- ©सुमित अनिल डेंगळे.
संदर्भ-
- ‘History of mahrattas’- James grant Duff
- ‘Bajirao II and the East India Company’- Pratul Chandra Gupta
- ‘John briggs in Maharashtra’- Arvind Deshpande
- ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’-राजवाडे (खंड 4)
- ‘मराठे व इंग्रज’- न.चिं.केळकर
- ‘महाराष्ट्रातील स्वातंत्र्यलढे’- वि.गो.खोबरेकर
चुनारगड (जि.मिर्झापुर, उत्तरप्रदेश)
No comments:
Post a Comment