लेखन- ©सुमित अनिल डेंगळे.
त्रिंबकजी इंग्रजांविरुद्ध फौज गोळा करण्याचा प्रयत्न करु लागले. प्रारंभी त्यांनी खानदेशात जाऊन तेथील भिल्ल समाजाला संघटित केले. त्रिंबकजी स्वतः भिल्ल जमातीत जाऊन त्यांना जुलमी ब्रिटिश सरकारविरुद्ध उठवण्याचे प्रयत्न करू लागला. सुमारे 8,000 भिल्लांनी खानदेश व बागलाण भागात इंग्रजांविरुद्ध उठाव केला (हा महाराष्ट्रातील पहिला उठाव). पुढे त्रिंबकजी साताऱ्याकडील शंभू महादेवाच्या डोंगररांगांत येऊन तेथे फौजेची जमवाजमव करू लागले.
इकडे इंग्रज रेसिडेंट एल्फिन्स्टन बाजीरावाकडे त्रिंबकजीला पकडण्यासाठी दबाव आणू लागला. बाजीरावाने त्रिंबकजीसाठी सिंहगड,रायगड व पुरंदर किल्ले इंग्रजांकडे ठेवले तसेच त्रिंबकजीला शोधून देणाऱ्यास इनाम जाहीर केले परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. कोणीही पुढे येऊन त्रिंबकजी विषयी माहिती दिली नाही. पेशवे अप्रत्यक्ष त्रिंबकजीला या कार्यासाठी मदतच करत होते. पुण्याजवळील फुलगाव येथे त्रिंबकजीने दुसऱ्या बाजीरावाची गुप्त रूपाने भेट घेतल्याचेही म्हटले जाते.
1817 च्या उत्तरार्धात दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध आरंभिले. खडकीच्या लढाईनंतर पेशवे ब्राह्मणवाड्यास असता त्रिंबकजी उघडउघड पेशव्यांना फौजेनिशी मिळाला. कोरेगाव भीमा च्या युद्धात त्रिंबकजी प्रत्यक्ष सहभागी झाले. बापू गोखले व त्रिंबकजी डेंगळे यांनी लढाईत पराक्रम गाजवला. पुढे पंढरपूर जवळील आष्टीच्या युद्धात (20 फेब्रुवारी 1818) सेनापती बापू गोखले मारले गेले. पेशव्यांची हार झाली. पुढे पेशवे वऱ्हाडात नागपूरकर भोसल्यांच्या प्रांतात गेले. पेशव्यांबरोबरच्या अनेक सरदारांनी पेशव्यांची साथ सोडून दिली. शेवटपर्यंत त्रिंबकजी पेशव्यांबरोबर होते. अखेर 3 जून 1818 ला अशीरगडाजवळील ‘धुळकोट’ येथे श्रीमंत दुसरे बाजीराव जनरल माल्कमच्या स्वाधीन झाले व मराठेशाहीचा अस्त झाला. त्यानंतर त्रिंबकजी पसार झाले. इंग्रज सरकारने त्यांना शोधण्यासाठी त्यांच्यावर इनाम लावले.
No comments:
Post a Comment