विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 28 July 2020

यावनी आक्रमण: भाग १


यावनी आक्रमण: भाग १
postsambhar :Prashant Babanrao Lavate-Patil ____________________
शिवरायांच्या आणि शिवरायांनंतर अगदी ब्रिटिशांनी भारतावर सत्ता स्थापन करेपर्यंत मराठ्यांचा पराक्रमी इतिहास आहे. हा संपूर्ण लढा राष्ट्रनिष्ठेचा आहे. वॉरन हेस्टिंगने असे म्हंटले आहे की "संबंध भारतामध्ये केवळ मराठ्यांकडेच राष्ट्रीय वृत्ती किंवा राष्ट्रीय भावना आढळून येते" याचा पाया भरला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी.
शिवपूर्वकाळात भारतावर नजर टाकली तर बहुतांश सत्ता ही मुस्लिम राजकर्त्यांची होती. जे मूळचे तुर्क व अरब या भागातले होते. हे स्वतःला इस्लामाचे अनुयायी म्हणत व त्यांचे आक्रमण हे लष्करी तर होतेच व त्याच बरोबर धार्मिकही होते. यामागे धर्म हा एवढाच मनसुबा नसून भारतीयांना मानसिक दृष्ट्या हतबल करायचे जेणेकरून विरोधच होणार नाही. धर्म हा नक्कीच एक प्रतिष्ठेचा विषय असतो आणि कोणत्याही समाजाचा मूळ मानला जातो. जर मुळावरच घात केला तर मग लोकांच्या मनात भयानक भय बसते व लाचारी पत्करली जाते.
मराठे ज्यांच्याबरोबर लढले त्यामध्ये आम्हा सामान्य माणसाला औरंगजेब बादशहा हा एकच जास्त ओळखीचा आहे कारण तो शिवकाळात आणि शंभुकाळात आहे. अजून मागे गेला तर मग शहाजहान. त्याचे मुख्य कारण म्हणजे ताजमहाल. यावनी आक्रमण या लेखन मालिकेत मुहम्मद बिन कासीम ते औरंगजेब या मधील काळात अनेक तुर्क आणि अरब घराण्यांनी भारतावर राज्य केले ज्यांचा इतिहास संक्षिप्त स्वरूपात मांडण्याचा एक प्रयत्न करणार आहे. ही आक्रमणं म्हणजे काळजाचा थरकाप उढवणारी होती. यांच्या आक्रमणात जे काही भारतीय जनतेवर अत्याचार झाले ते जोवर समजणार नाही तोवर मराठे नक्की कोणाशी लढले हे समजणार नाही.
यावनी आक्रमणांपूर्वी सुद्धा भारतावर परकीय आक्रमणे झाली होती आणि भारतीय संस्कृतीने ती पचवली सुद्धा. अरब आणि तुर्क मात्र इथे आल्यावर जसे आगोदर होते तसेच नंतर राहिले. ते कधीही इथल्या जनतेचे राजे झाले नाहीत. धार्मिकतेत आणि नितीसबंधात ते नेहमीच परके राहिले. इथल्या रयतेच्या मनावर ते कधीच राज्य करू शकले नाहीत.
काबूल, झाबुल आणि सिंध ही तीन हिंदू राज्ये भारताच्या वायव्य सरहद्दीवर होती. अरबांनी इ. स. ६४३ मध्ये इराण व्यापला आणि ते ६५० मध्ये काबूलकडे वळले. काबूल आणि झाबुल या राज्यांवर अरबांनी जबरदस्त हल्ले केले परंतु हिंदू राजांनी त्याला जोरदार प्रतिकार केला व सर्व हल्ले बऱ्यापैकी परतवून लावले.
■ काबुल व झाबुलवर झालेले हल्ले:
१) अरबांचा सेनापती अब्दुल्ला-बिन-अमीर याच्या आज्ञेनुसार झियाद या सेनापतीने इ. स. ६५० साली झाबुलवर हल्ला केला. झाबुलची राजधानी झारंग धोक्यात आल्यासारखी झाली परंतु प्रतिकार जोरदार झाल्याने त्याला माघार घ्यावी लागली. असे हल्ले सारखे केले परंतु नेहमी अरबांना माघार घ्यावी लागली.
२) तीन वर्षांनी, म्हणजे इ.स. ६५३ मध्ये अब्दुल रहिमान या सेनापतीने पुन्हा झाबुलवर हल्ला केला. त्यालाही जोरदार प्रतिकार झाला परंतु काही प्रदेश जिंकण्यात त्याला यश आले. जिंकलेल्या प्रदेशात कत्तली आणि बायकामुलांना त्याने गुलाम केले. अरबांचा पुन्हा त्रास नको म्हणून त्याच्याशी भली मोठी खंडणी देऊन तह करण्यात आला परंतु अरब थांबले नाहीत. पुढे अब्दुल रहिमानने कबुलपर्यंत हल्ले केले आणि माघारी फिरला.
३) तो माघारी फिरताच हिंदूंनी त्याने जिंकलेला भाग पुन्हा जिंकला. हे कळताच अब्दुल रहिमान इ. स. ६८३ मध्ये पुन्हा चालून आला. त्याने पुन्हा सीस्तान जिंकले आणि तिथल्या क्षत्रपाला अटक केले. परंतु पुढे युद्धात रहिमान मारला गेला आणि अरब सैन्याची कापाकाप झाली आणि अरबांनी सीस्तान गमावले.
४) इ. स. ६९२ मध्ये अब्दुल्ला नावाच्या एका सरदाराची खलिफाणे नेमणूक केली. त्यानेही स्वाऱ्या केल्या परंतु हिंदू राजांनी गनिमीकावा करून त्याच्या दळणवळणाचे मार्ग बंद करून टाकले. यामुळे अब्दुल्लाच्या सैन्याची भयानक उपासमार सुरू झाली त्यामुळे अब्दुल्लाला शरण येणे भाग पडले व भली मोठी खंडणी देऊन स्वतःची मुक्तता करून घ्यावी लागली. (म्हंटले जाते की ती खंडणी ७ लाख दिनार एवढी होती)
४) अब्दुल्लाच्या अपयशामुळे खलिफा खचला नाही (त्यावेळी हज्जाज नावाचा खलिफा होता) आणि त्याने उबेदुल्ला नावाच्या सरदाराची नेमणूक केली. याचाही पराभव झाला आणि त्याला आपली तीन मुले काबूलच्या राजाकडे ओलीस ठेऊन माघार घ्यावी लागली. यामुळे इ. स. ७१३ मध्ये हज्जाजला काबूलच्या राजाशी तह करावा लागला.
५) इ. स. ७४९ मध्ये खिलाफतीत मोठा बदल झाला. उमाईद घराण्याची जागा आता अब्बासिद घराण्याने घेतली. खलिफा अली मन्सूर हा इ. स. ७५४ ते ७७५ या काळात गादीवर होता. परंतु यालाही काबुल आणि झाबुल प्रांत जिंकता आला नाही.
जवळ जवळ दोन -अडीचशे वर्षे हिंदू राजांनी या खिलफतीशी जोमाने झुंज दिली आणि आपले स्वातंत्र्य राखण्यात यशस्वी झाले.
परंतु एका मोठ्या साम्राज्याला जे दोन दशके आक्रमणे करून जे जमले नाही ते एका जहागीरदाराने करून दाखवलं. हा चमत्कार करणारा जहागीरदार म्हणजे 'याकूब लायेथ'!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■ याकूब लायेथ:
हा एक सीस्तान मधील डाकू. हळूहळू आपल्या प्रसिद्धीमुळे इराणच्या साम्राज्यातील एका जहागिरीचा तो मालक बनला. इकडे कबुलमध्ये अंतर्गत वाद आणि आपापसातील भांडणांमुळे राज्य कमकुवत होत चालले होते. यामुळे इ.स. ८७० मध्ये 'लागतुरमान' या राजाचा त्याचा वजीर कल्लर याने पायउतार केला व स्वतः राजा बनला. परंतु त्यानंतर एकाच वर्षात याकूबने काबूलवर हल्ला केला. हा हल्ला एवढा जोरदार होता की कल्लरला प्रतिकार करणे अशक्य झाले आणि त्याने काबूलमधून पळ काढला. अशाप्रकारे काबुल मध्ये इस्लाम सत्ता स्थापन झाली.
आता याकूब झाबुलकडे वळला. इथे त्याने कपटीपणा अवलंबला. झाबुलच्या राजाला निरोप पाठवला आणि "आम्ही आपल्याला शरण येत आहोत. तरी तुमी आमच्या सैन्याची मानवंदना स्वीकारावी" असा निरोप पाठवला. त्यावेळी झाबुलचा राजा हा रुसूल होता आणि तो हिंदू राजा होता. ठरल्याप्रमाणे मानवंदना साठी राजा आला आणि त्याचे सैन्य एकदम गाफील होते. राजाला मुजरा करण्यासाठी याकूब खाली वाकला आणि क्षणातच त्याने झडप घालून राजावर वार केला आणि त्याला ठार केले. बघता बघता सारे सैन्य कापून काढले. रुसूल राजाच्या बेसावध सैन्याची अगदी क्रूरपणे कत्तली केल्या. याकूबच्या सैन्याने देशभर नुसता हैदोस घातला आणि लाखो हिंदूंच्या कत्तली केल्या. झाबुल अक्षरशः निस्तानाबूत झाले. काबुल-झाबुल म्हणजे आजचा अफगाणिस्तान या प्रदेशातील हिंदूंची सत्ता कायमची संपुष्टात आली.
आता वायव्य सरहद्दीवरील एकमात्र हिंदू राष्ट्र उरले होते ते म्हणजे "सिंध". सिंध म्हणजे "भारताचे नाक". यामध्ये काय झाले ते आपण पुढच्या भागात पाहू.
क्रमशः
#यावनी_आक्रमण #अरब_तुर्क_आक्रमण #जागर_इतिहासाचा #प्रबल

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...