विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 8 July 2020

🚩🚩मोगलांचा शकुनी मामा मिर्झा राजा जयसिंग.🚩🚩

🚩🚩मोगलांचा शकुनी मामा मिर्झा राजा जयसिंग.🚩🚩

🚩🚩हा शकुनी मामा कसा हे हा लेख वाचल्यावर कळेल.

होय शकुनी मामाच.
ह्या मिर्झा राजा जयसिंगाने जितके कष्ट मोगलाईसाठी घेतले तितके कष्ट कुठल्याही हिंदूने मोगलांच्या सल्तनतीसाठी घेतले नसतील.

मराठ्यांच्या इतिहासात ह्या व्यक्तीला अनन्यसाधारण महत्व आहे.
का?
कारण छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या बाहेर केवळ आणि केवळ एकाच व्यक्तीवर विश्वास ठेऊन पाऊल उचलले आणि ती व्यक्ती म्हणजे मिर्झा राजा जयसिंग.
आग्रा प्रकरणाच्या वेळी.

महाराजांनी हे विश्वास ठेऊन उचललेले पाऊल पुढे महाराजांना कसे अडचणीत घेऊन गेले हे सर्वमान्य आहेच.

पण ह्या पलीकडे मिर्झा राजा जयसिंग ह्या व्यक्तीची आपल्याला फारशी माहिती नाही.
चला तर मग शोध घेऊयात...
ह्या मिर्झा राजा जयसिंगचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर आपल्याला राजस्थानमधील आमेरच्या इतिहासात थोडं खोलात जावे लागेल.
त्यामुळे आपणास राजपूत आणि मुघलांचे जुने नाते- संबंध लक्षात येतील.

राजस्थानमधील आमेरचा (अंबर) इतिहास:-
आमेर येथे पृथुराज नावाचा एक फार पराकामी राजा झाला.
हा सिंधुनदीवर यात्रेकरिता गेला असता पृथूराजास त्याचा मुलगा भीम याने ठार मारले.

नंतर पृथुराजाचा पुत्र बिहारीमल ( भारमल ) यास आमेरची गादी मिळाली.
ह्या बिहारीमलाच्या वेळेस बाबराने दिल्लीत मुगलांची सत्ता स्थापन केली होती. सुरवातीस हा बिहारीमल मुगलांशी लढाई करण्याच्या तयारीत होता.
पण राजस्थानमधील आमेरचा मुलुख हा दिल्लीपासून जवळ असल्याने मोगलांचे आपल्यावर वरचेवर हल्ले होणार हे ओळखून बिहारीमल याने बाबरास आपला कारभार देऊन त्याच्याशी सख्य केले.

बाबरानंतर त्याचा मुलगा हुमायूं मुगलांच्या गादीवर बसला.
ह्या हुमायूंने बिहारीमल ( भारमल ) यास 'आमेरचा महाराजा' अशी पदवी दिली.

हुमायूंनंतर त्याचा मुलगा अकबर गादीवर बसला.
अकबराचीही ह्या बिहारीमलवर विशेष मर्जी होती.
बिहारीमलने त्याची मुलगी जोधाबाई (पर्शियन नाव: मरियम उझ झमानी ) अकबरास दिली. अकबरापासून ह्या जोधाबाईच्या पोटी सलीम म्हणजे जहांगीर जन्माला आला.

ह्या बिहारीमलच्या पश्चात त्याचा मुलगा भगवानदास हा आमेरचा राजा झाला. ह्या भगवानदासाने अकबराचा मुलगा सलीम (जहांगीर) यास आपली मुलगी मानबाई दिली.
म्हणजे आत्या जोधाबाईच्या घरात मुलगी दिली.
हे लग्न १३-०२-इ. स. १५८५, रोजी झाले.
तिच्या राजपुत्र पोटी खुस्त्रू जन्मला.
ह्या मानबाईने अफू सेवन करून आत्महत्या केली.

एकनिष्ठपणाने चाकरी केल्यामुळे अकबरावर ह्या भगवानदासाचे फार वजन होते.
ह्या सेवेबद्दल पंजाब प्रांताची सुभेदारी भगवानदासास मिळाली.
हा भगवानदास लाहोरला सन १५८९, साली मरण पावला.
ह्या भगवानदासाला मुलगा नव्हता म्हणून त्याने आपल्या भावाचा मुलगा मानसिंह ह्यास दत्तक घेतले.

हा मानसिंह फार शूर होता.
ह्याने ओढ्या व आसाम हे प्रांत जिंकून मुगल सल्तनतीस जोडले. अकबराच्या ११, मोठ्या मोहिमांच्यापैकी निम्म्या मोहिमांचे ह्या मानसिंगनेच नेतृत्व केलेले होते.

मेवाडचा (उदयपूर) महाराणाप्रतापसिंह  ह्याच्याशी ह्या मानसिंगचे वाकडे होते.
अकबराने जेंव्हा महाराणाप्रतापच्या मेवाडवर आक्रमण केले तेंव्हा मेवाडवरील आक्रमणांत हा मानसिंगच आघाडीवर होता.
१८, जून इ. स. १५७६, रोजी हल्दीघाटीची लढाई झाली.
ह्या लढाईत अकबराने अत्यंत क्रूरपणे ६, वर्ष वयाच्या वरील अंदाजे २८, ते ३०, हजार सर्व स्त्री-पुरुषांची आणि वयस्कर व्यक्तींची कत्तल केली.

अकबराच्या मृत्यूसमयी मानबाईचा मुलगा राजपुत्र खुस्त्रू ह्यास राज्य मिळावे म्हणून मानसिंगने बरीच खटपट केली.
पण त्यामुळे अकबराचा मोठा मुलगा सलीम (जहांगीर) हा मानसिंगवर नाराज झाला.
पण मानसिंग अतिशय शक्तिशाली असल्यामुळे मानसिंगच्या विरोधात न जाता सलीमने मानसिंगास मोठं-मोठी आश्वासने देऊन आपल्याकडे वळवून घेतले.
हा मानसिंग इ. स. १६१५, त मरण पावला.

आता इथून पुढे महत्वाचे.
ह्या मानसिंगचा मुलगा ‘महासिंह’ हा पराक्रमी नसल्यामुळे मोगलांच्या दरबारी जयपूरचे वजन कमी होऊ लागले आणि जोधपूरचे वजन वाढू लागले.

पुढे मानसिंगचा भाऊ जगतसिंह ह्याचा नातू ‘जयसिंह’ ह्यास जहांगीरने (सलीम) आपली आई जोधाबाईच्या सल्ल्यावरून आमेरच्या गादीवर बसविले.

मुगल बादशहा जहांगीरने ह्या जयसिंहला सुरवातीस दोन हजारी मनसबदारी दिली.

जयसिंह हा कछवाह वंशाचा राजा.
ह्याचा जन्म इ. स. १६११, साली आमेर येथे झाला.

पुढे जहांगीरच्या मुलगा शहाजहाँ याच्या पदरी जयसिंहाने फार मेहनत घेतली म्हणून ‘मिर्झा’ हि उपाधी शहाजहाँने इ. स. १६३८, मध्ये रावळपिंडीस बोलावून जयसिंहास दिली.

मिर्झा हे नाव नाही.
*हि पदवी आहे
हिचा अर्थ होतो  ‘राजपुत्राच्या दर्जाचा व्यक्ती.’*
(Rank of a royal prince)

हाच जयसिंह इतिहासात पुढे मिर्झा राजा जयसिंह म्हणून प्रसिद्ध झाला.

शहाजहाँ च्या मृत्यूनंतर शहाजहाँची चार मुले सत्तेसाठी भांडू लागली.
हा चार भावांच्यापैकी औरंगजेबाची बाजू चालाख जयसिंहाने उचलून धरली.
ह्या मिर्झा राजा जयसिंहाच्या मदतीमुळे राजपुतांची सगळी फौज ह्या सत्तांतरात औरंगजेबाच्या पाठीशी उभी राहिली आणि रजपुतांच्या बळावर औरंगजेब आता मुगल सल्तनतीचा बादशहा बनला.

मिर्झा राजा जयसिंह ह्या औरंगजेबाचा अत्यंत भरवशाचा आणि अत्यंत ताकदवर सेनानी होता.

हा मिर्झा राजा जयसिंह औरंगजेबाला सात वर्षांनी मोठा होता.
औरंगजेबाच्या आयुष्यात जिथं औरंगजेबाला यश मिळणार नाही अशी श्यक्यता असायची तिथल्या ठिकाणी औरंगजेब मिर्झा राजा जयसिंहाची नेमणूक करायचा.

मिर्झा राजा जयसिंह हा अत्यंत मातब्बर आणि अनुभवी लढवय्या होता.
ह्या त्याच्या अनुभवाचा औरंगजेबाने पुरेपूर फायदा उठविला.
विजापूरचा सेनापती अफझलखानाचे पोट फाडल्यावर आणि मामा शाहिस्तेखानाची बोट तोडल्यावर औरंगजेबाच्या लक्षात आले काही शिवाजीराजा हा काही अश्या-तश्याला ऐकणाऱ्यांपैकी नाही. शिवाजी राजास आपल्याला जिंकायचे असेल तर आपल्याला मिर्झा राजा जयसिंहा शिवाय पर्याय नाही.

आणि म्हणून औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंहास विजापूरचे राज्य जिंकून घेण्यासाठी आणि त्याचबरोबर छत्रपती श्री शिवाजीराजांचा मोड करण्यासाठी दक्षिणेवर पाठवायचे नियोजन केले.

ह्या बद्दल आपली सभासद बखर छान माहिती देते.
हि अत्यंत महत्वाची माहिती आहे.
ती जशीच्या तशी मूळ भाषेत देतो.
सभासद बखरीतील मजकूर असा:-
पुढे कोण सरदार पाठवावा? कोण फत्ते करून येईल? असा विचार करून सरदार निवडता औरंगजेब दिल्लीचा पातशहा यानी तजवीज केली जे मातब्बर तोलदार फौज जबरदस्त असा कोणता शहाणा? इतक्यात मनात योजिले; मिर्झा राजा जयसिंह.
त्यास आणून, घुशलखान्यात ( गुप्त गोष्टी करायची खोली) बसोन औरंगजेब पातशहाने नानाप्रकारे सांगितले कि, 'शिवाजीवर तुम्ही जावे. आपण स्वतः पातशाही जावे किंवा तुम्ही जावे असे जाणों तुम्हास रवाना करतो.
बरोबरी फौज देतो.
नाना हुन्नरे शिवाजी हस्तगत करून बरोबरी घेऊन येणे.'
म्हणोन हत्ती, घोडे, ढाला-फिरंगा, तर्कश-कमान, दौलत, इजाफा देऊन नावाजून, तैसेच बरोबरी लढाईच्या तशरीफा देऊन रवाना केले.

दिलेरखान पठाण उमराव वजीर मोठा जोरावर त्यास बादशहाने कुल फौजेची हरोली देऊन, ५, हजार पठाण बरोबरी दिले. दिलेरखानासही हत्ती घोडे वस्रे दिली.

मिर्झा राजा जयसिंहास ८०, हजार स्वार बरोबरी दिल्हे.
या खेरीज जेजाला तोफखाना असे नाना जातीचे दिले.
स्वार पठाण-उन्माद राजपूत रवाना केले.
औरंगजेब पातशाहाने दिलेरखानास वेगळे वाटेने अंतस्थ बोलावून आणून सांगितले कि, ' मिर्झा राजा राजपूत आहे व शिवाजी हा हिंदू आहे.
मिळून दोघे काही फितवा करतील.
त्यासी तुम्ही आपले इतबारी, पातशहाचे खानदाज़ाद आहा.
आपला इतबार राखून दगा न खाणे.' 
ऐसे सांगितले आणि पाठविले.

मिर्झा राजा जयसिंह कुर्निसात करून बोलिला जे "पातशहाचे निमकाशी सर्वकाही. अंतर होणार नाही."

“जेंव्हा ते दिल्लीहून निघाले तेंव्हा पूर्वी शास्ताखान चालला त्याप्रमाणे दळभार निघाला.
भूमी-आकाशापर्यंत एकच धुराळा उडाला.
ऐसा सेनासमुद्र दक्षिणेस चालला.
मजला दार मजला चालिले.
मुक्काम होय तेथे दीड गाव लांब व एक गाव रुंद लष्कर राहत असे.

तेंव्हा मिर्झा राजा जयसिंह याने मनात विचार केला कि शिवाजी मोठा दगेबाज, मोठा हुन्नरवन्त आणि मर्दाना शिपाई, आंगाचा खासा आहे. अफझलखान अंगे मारिला शास्ताखानाच्या डेऱ्यात शिरून मारामारी केली आपणास यश कसे होईल?
म्हणून चिंता केली.

तेंव्हा मोठमोठे ब्राम्हण पुरोहित यांनी उपाय सांगितला.
देवी प्रयोगी अनुष्ठाने करावी आणि ११, अकरा कोटी लिंगे करावी म्हणजे यश येईल असे सांगितले.
मग मिर्झा राजा बोलिला कि, कोटीचंडी कामनाथ बगळामुखी कालरात्रीप्रित्यर्थ जप करावा.

असे अनुष्ठान करावे.
मग मिर्झा राजाने चारशे ब्राम्हण अनुष्ठानास घातले.
प्रत्ययही अनुष्ठान चालले.
अनुष्ठानासाठी २, दोन कोटी रुपये अलाहिदा काढून ठेविले.
*आणि ३, तीन मास अनुष्ठान चालून सिद्ध केले.

अनुष्ठानाची पूर्णाहुती होउन, ब्राम्हणांस दान दक्षिणा देऊन संतर्पण केले.
मग चालिले."

म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे अ-हीत करण्यासाठी अघोरी विद्येचा प्रयोग मिर्झा राजा जयसिंहाने केला.

ह्या पुढचा इतिहास सर्वाना माहीतच आहे. पुरंदरला येऊन छत्रपती श्री शिवाजी महाराजांना २३, तेवीस किल्ले पातशहास देऊन मिर्झा राजा जयसिंहशी तह करावा लागला आणि तहानुसार आग्र्याला जावे लागले.

छत्रपती श्री शिवाजी महाराज आग्र्यात औरंगजेबाच्या कैदेत असताना, इकडे दक्षिणेत  मिर्झा राजा जयसिंहाने आता विजापूरवर हल्ले सुरु केले.
पण ह्या हल्यांत मिर्झा राजाला सारखा पराभव पत्करावा लागत होता.

एका मागून एक पराभव होत असतानाच आग्ऱ्यातून ३, तीन महिने काळ लोटल्यावर छत्रपती श्री शिवाजी महाराज औरंगजेबाला चकवून महाराष्ट्रात सहीसलामत सुटून आले अशी बातमी मिर्झा राजास मिळाली आणि त्याचे दैवच फिरले.

आणि इथून पुढे मिर्झा राजा जयसिंहाचा अत्यंत वाईट काळ सुरु झाला.
छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या सुटकेच्या धक्याने मिर्झा राजा आता निराश-हताश झाला होता.
औरंगजेब बादशहा मिर्झा राजावर नाराज झाला होता.
ह्या म्हाताऱ्या सिंहाची आता औरंगजेबाला गरज उरली नव्हती.

छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या आग्ऱ्यातून सुटकेमुळे संबंध हिंदुस्तानामध्ये औरंगजेबाचे नाक कापले गेले होते.
हा सगळा राग औरंगजेबाने मिर्झा राजांवर काढला.

औरंगजेबाच्या दरबारातील मिर्झा राजाचे सगळे शत्रू एक होऊन मिर्झाराजा विषयी कान भरायचे काम औरंगजेबाजवळ जोमाने करत होते.

आग्रा प्रकरणामुळे मिर्झा राजाचा मुलगा रामसिंहाची सगळी मनसब औरंगजेबाने जप्त केली, त्याला दरबारातही येण्यास मनाई करण्यात आली ही बातमी मिर्झाराजास इकडे दक्षिणेत कळाल्यावर त्याला अतिशय दुःख झाले.

औरंगजेबाने आता भलताच संशय घेतला.
त्याला असे वाटले कि हा मिर्झा राजा जयसिंह आणि मराठे आतून एक झाले असून विजापूरकरांच्या मदतीने मिळून हे सगळे शत्रू आता मुघल सल्तनतीवरच हल्ला करणार आहेत.

आणि म्हणून अतिशय गुप्तपणे औरंगजेबाने आता मिर्झा राजाची हत्या करायचे नियोजन केले.
ह्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजांचा अत्यंत विश्वासू सल्लागार उदयराज मुन्शीची गुप्तपणे मदत घेतली.

हे सगळे हाताबाहेर जाणारे प्रकरण सावरण्यासाठी आता मिर्झा राजे अतिशय वेगाने दिल्लीस जाण्यास निघाले.

बीडहून कूच करून ते औरंगाबादला पोहचले.

औरंगाबादहून मिर्झा राजे बऱ्हाणपुरास आले.
दिनांक २८, ऑगस्ट इ. स. १६६७, च्या रात्री बऱ्हाणपुरास मुक्कामी असलेल्या मिर्झा राजा जयसिंहाची उदयराज मुन्शीने विष देऊन हत्या केली.

मिर्झा राजांचा धाकटा मुलगा किरतसिंगला याचा संशय येऊन त्याने बापाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी  उदयराज मुन्शीला जीवे मारण्यासाठी वेगवान हालचाली सुरु केल्या.
पण उदयराज मुन्शी निसटला आणि सरळ बऱ्हाणपुरच्या मोगल सुभेदाराच्या आश्रयाला गेला.
तिथं जाऊन ह्या उदयराज मुन्शीने लगेच हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्मात प्रवेश केला आणि आपला जीव वाचविला.

मुस्लिम झालेल्या उदयराज मुन्शीला हात लावायची किरतसिंगची हिम्मत झाली नाही.

मिर्झा राजा जयसिंहाच्या मृत्य नंतर औरंगजेबाने मिर्झा राजांचा मुलगा रामसिंह ह्याची जप्त केलेली मनसब त्यास परत केली.

मिर्झा राजाची छत्री बऱ्हाणपुरच्या तापी नदीच्या किनारी आजही आहे.
हिला 'राजा जयसिंह कि छत्री' असे म्हणतात.

वयाच्या दहाव्या वर्षांपासून सतत ४६, वर्ष अत्यंत वफादारपणे, प्रामाणिकपणे मुगल सल्तनतीसाठी दिवस -रात्र एक एक करून सेवा केलेल्या मिर्झा राजांची औरंबागजेबाने अतिशय क्रूर हेटाळणी करून हत्या केली.

छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पश्चात पुढे छत्रपती श्री संभाजी महाराजांनी मिर्झा राजांचा मुलगा रामसिंहाशी गुप्त पत्रव्यवहार करून औरंगजेबा विरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न केला.
पण रामसिंहाने तिथेही कच खाऊन छत्रपती श्री संभाजी महाराजांस ह्या प्रकरणात मदत केली नाही.

अत्यंत महत्वाचे:-
वाचकांनी काही गोष्टी इथे लक्षात घेतल्या पाहिजेत.
त्या म्हणजे,
मिर्झा राजा ८०, हजार मुघल फौज घेऊन छत्रपती श्री शिवाजी महाराजांशी काही मैत्री करायला महाराष्ट्रात आला नव्हता.

छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जर तह केला नसता तर मिर्झाराजाने शिवाजी राजांशी लढाईच केली असती.
(मिर्झा राजाने तशी सुरवात पुरंदरवर हल्ला करून केलेलीच होती.)

मिर्झा राजाच्या शब्दावर विश्वास ठेऊन छत्रपती श्री शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते.

औरंगजेबाचा कपटी स्वभाव मिर्झा राजा चांगले ओळखून होते तरीही त्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांना आग्र्याला पाठविले.

मराठ्यांचे कुठलेही हित मिर्झा राजाने केलेले नाही.
तसा पुरावा आजून तरी उपलब्ध नाही.

आग्रा प्रकरणात गुप्तपणे मिर्झा राजांच्या सांगण्यावरून रामसिंगाने छत्रपती श्री शिवाजी महाराजांस मदत केल्याचे कुठलेही पुरावे पत्र रूपात किंवा आजून कुठल्या रूपात उपलब्ध नाहीत.
त्यामुळे मिर्झा राजा  शिवाजी महाराजांना अनुकूल होते हे म्हणणे पूर्णतः खोटे आहे.

मिर्झा राजा केवळ हिंदू आणि राजपूत आहेत म्हणून त्यांच्या विषयी मनात सहानुभूती ठेवण्याचे काहीही कारण नाही.

'शिवाजी राजाच्या जीवाचे काही बरे वाईट होऊ नये म्हणून रामसिंग तू काळजी घे' असे जरी मिर्झा राजाने रामसिंगास सांगितले असले तरीही औरंगजेबाच्या क्रूर आणि कुटील बुद्धीची कल्पना असतानाही मिर्झा राजाने छत्रपती श्री शिवाजी महाराजांना आग्ऱ्यास पाठविले.
शिवाय रामसिंगाने  शिवाजी राजासाठी ठेवलेला  जामीन काढून घेतल्याबद्दल 'हायसे वाटल्याची पत्रे'  मिर्झा राजाने रामसिंगास लिहिलेली उपलब्ध आहेत.

मुघल सल्तनतीच्या हितासाठी मिर्झा राजाने जे जे म्हणून शक्य होते ते ते सगळे केले.
त्याचाच परिणाम म्हणून छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेनंतर मिर्झा राजाने ताबडतोब नेताजी पालकर यांस अटक करून बंदोबस्तात आग्ऱ्यास पाठविले.

आमेरच्या ह्या घराण्याचे मुगलांशी रोटी-बेटीचे व्यवहार झालेले असल्यामुळे राजस्थानातील इतर राजपूत हे आमेरच्या घराण्याला वचकून असत.

महाराणाप्रतापचे गुणगान गावे तेव्हढे थोडे आहे. अत्यंत चिकाटीने ह्या राणाने मुगलांशी टक्कर दिली.
अभिमान बाळगावा तर तो महाराणाप्रतापचा बाळगावा.

आग्ऱ्यास असताना रामसिंगच काय पण इतर सर्व राजपूत सरदार शिवाजी राजांच्या उदात्त धोरणाशी सहमत होते.
मिर्झा राजा जयसिंहाने मात्र आपल्या म्हातारपणी दक्षिण्यांकडून हीनतर प्रतिष्ठेच्या कलंकाने गडबडून जाऊन रामसिंगाला व शिवाजी राजांना खाली पाहावयास लावले.
शिवाजी राजा निसटून गेला.
रामसिंगाला मात्र फुकट आपल्या बापाच्या दुट्टपी धोरणामुळे दुर्धर अपमान सहन करावा लागला व शपथेपासून च्युत झाल्याबद्दल हळहळ करीत राहावे लागले.

शकुनी मामाच्या बुद्धीने मिर्झा राजा जयसिंहाने औरंगजेबाशी वफादार राहून हर एक प्रयत्नाने मराठ्यांचे अ-हित करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
ह्या विषयावरील मिर्झा राजाने वजीर जाफरखानाला लिहिलेले पत्र तर अत्यंत धक्कादायक आणि मराठ्यांना अपमानित करणारे आहे.
पण शब्द विस्तार भयास्तव ते इथे देत नाही.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आणि पुढील मराठा राज्यकर्त्यांनी स्वराज्याबाहेरील व्यक्तीवर परत असा विश्वास पुढे कधीही ठेवला नाही.🚩🚩

☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀

श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...