भोर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे.
भोर हे एक राजाची सत्ता असलेले एक जुन्या काळचे संस्थान होते. आजही आपणास राजवाडा तसेच संस्थानाच्य्हा अस्तित्वाच्या खाणाखुणा पाहावयास मिळतात. भोर तालुक्यात एकूण 196 गावे असून, सर्व गावाना चहूबाजूंच्या डोंगरांमुळे निसर्गसौन्दर्य लाभले आहे.
भोरची लोकसंख्या पाच लाख असून येथील सर्व कारभार नगरपालिका पाह्ते. सन २००१ च्या जनगणने प्रमाणे पुरुषांची लोकसंख्या ५१% तर स्त्रियांची लोकसंख्या ४९% आहे. भोर तालुक्याची शैक्षणीक पात्रता ७८% असून पुरूषांची शैक्षणिक पात्रता ८३% व स्त्रियांची शैक्षणिक पात्रता ७३% आहे.
भोरमध्ये काही चांगल्या शिक्षणसंस्था आहेत. भोर हे बहुतांश शैक्षणीक संस्थांचे माहेरघर आहे, इथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालय आहेत. प्रामुख्याने इथे दोन शाळा आहेत, राजा रघुनाथराव विद्यालय आणि शिवाजी विद्यालय तसेच अनंतराव थोपटे महाविद्यालय हे महाविद्यालय आहे. राजा रघुनाथराव विद्यालय हे भोरचे राजे पंत-सचिव राजा रघुनाथराव शंकरराव यांनी १८९८ साली बांधले व या विद्यालयाला आता १२० वर्ष पुर्ण झाली आहेत. वाढत्या शैक्षणिक संस्थांच्या संख्येमुळे तांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्था सुध्दा इथे आढळतात. या संस्था म्हणजे,
* रायगड ज्ञानपीठाचे कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाची स्थापना १९९२ साली झाली. आधी इथे डिप्लोमा कोर्स शिकवले जायचे. १९९४ पासून इथे बॅचलर्स अॅफ फार्मासीचे डिग्री कोर्सेस शिकवले जातात.
* अभिनव शैक्षणिक संस्थेच्या अभियांत्रिकी व तंत्रिकी महाविद्यालयाची (Abhinav Education Society's College of Engineering and Technology) स्थापना सन २००६ मध्ये वडवाडी येथे झाली. या महाविद्यालयामध्ये तिन वर्षाचे डिप्लोमा व चार वर्षांचे डिग्री कोर्सेस शिकवले जातात.
* युनिव्हर्सल कॉलेज अॉफ इंजिनिअरिंग, ससेवाडी व
* नायगाव मधील नवसह्याद्री शैक्षणीक संस्थेचे महाविद्यालय (Navsahyadri Education Society's Group of Institutions).
ही भोर मधील काही महाविद्यालये आहेत.
पुण्यावरून साताऱ्याला जाणाऱ्या राष्ट्रिय महामार्गावरील हे गाव आहे. हे एक ब्रिटिश भारतातील इंग्रजांची सत्ता असलेले गाव होते. इथले शासक जरी हिंदू असले तरी मुळ शासक इंग्रज असायचे. ब्रिटिश कालीन भारतामध्ये हे गाव बॉंबे प्रेसिडेन्सीच्या पुना पॅलिटीकल एजन्सी हद्दीमध्ये होते त्या नंतर डेक्कन स्टेट एजन्सी कडे गेले. अक्कलकोट, औंध, फलटण व जतप्रमाणे भोरही साताऱ्याच्या जहागिरीमध्ये होते. इथले शासनकर्ते राजे जातीने देशस्त ब्राम्हण होते ज्यांना पंत-सचिव म्हंटले जायचे.
भोर हे सह्याद्रीच्या पश्र्चिम घाटामध्ये वसलेले गाव आहे व यांचे क्षेत्रफळ ३८६२ चौ.कि. इतके आहे. भोरच्या जवळपास भाटघर आणि नीरा देवघर ही दोन धरणे आहेत. भोरच्या धरणांच्या परिसरात पावसाळ्यात पर्यटकांची खूप गर्दी असते. पावसाळ्यातील निसर्ग पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. भोर जवळच राजगड, तोरणा हे किल्ले व रायरेश्वर पठार आहे. पावसाळ्यात येथे गिरिभ्रमणासाठी तरुणांची खूप गर्दी असते.
नीरा देवघर : नीरा देवघर हे धरण भोर मधुन वाहणाऱ्या नीरा नदीवर बांधले आहे. याची स्थापना महाराष्ट्र सरकारने सन २००० मध्ये केली. पाणी सिंचनासाठी या धरणाचा उपयोग होतो.
भाटघर धरण : भाटघर धरण हे येळवंडी नदीवर आहे. भाटघर धरण हे ब्रिटिश सरकारने बांधले आहे. या धरणाचा मुख्य उद्देश शेतीला पाणी पुरविणे व जलविद्युतनिर्मिती करणे हा आहे. येथे विद्युत केंद्र आहे. या धरणाचे दरवाजे स्वयंचलित आहेत.
नेकलेस पॉइंट : पुण्यावरून साताऱ्याला जातांना रोड वर असलेल्या कापूरहोळवरून भोर कडे जाण्यासाठी उजवी कडे वळले की सुरुवात होते ती निसर्गराजाच्या साम्राज्याची. पावसाळा असेल तर मग निसर्गाच्या सौदर्याची उधळणच……आजूबाजूला शिवारातील पिके, दुथडी भरून वाहणारे ओढेनाले, रस्त्याच्या दुतर्फा असलेली गर्द झाडी हे जणू आपल्या स्वागतासाठीच नटलेली असतात. भोरच्या अलीकडे एका अगदी छोट्या घाटाच्या सपाटीवर एक नयनरम्य दृश्य आपले लक्ष वेधून घेते आणि ते म्हणजे नेकलेस पॉइंट. पावसाळ्यातील याचे निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून दिसते. येथूनच उजव्या बाजूला बघितले तर भाटघर धरणाची भींत दिसते. नेकलेस पॉइंट च्या पुढे छोटासा घाट उतरून पुढे गेलो कि दोन वाटा आपल्याला दिसतात. डावीकडे रस्ता भोर शहरा कडे जातो तर उजवीकडील रस्ता निसर्गदेवतेच्या अदभुत सौंदर्याने भुरळ पाडणारा भाटघर धरणा जवळील परिसराकडे. भोरच्या अलीकडे २-३ किलोमीटरच्या अंतरावर येळवंडी नदीवर १५० फुट उंचीचा ‘भाटघर धरण’ येणाऱ्या जाणार्या प्रवाशांना एक प्रसन्न अनुभूती देतो. पावसाळ्यात हिरव्या डोंगरावर पांघरलेली पांढ-याशुभ्र धुक्याची चादर, डोंगरातून झेपावणारे शुभ्र धबधबे, हिरव्यागार सृष्टिचा सहवास आणि निसर्गाच्या सान्निध्यात मनाला नवी चेतना देणारा वाऱ्याचा स्पर्श….हे सारं विलोभनीयच आहे.
भोरेश्वर मंदीर : भोरच्या ऐतिहासिक पर्यटणाला भार घालणारे, भोरच्या राजवाड्याच्या अगदी मागे असलेले हे शंकराचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये शिवलिंग, नंदी मंदीर, विरभद्रेश्वराची मुर्ती आहे. तसेच गणपती मंदिर, पाषाणापासून बनवलेली नागदेवतेची मुर्ती आहे. इथे दोन पाण्याचे कुंड आहेत. मंदिरामध्ये दगडाचे कोरलेले कासव आहे. या भोरेश्वराच्या मंदिरावरून गावाला भोर नाव दिले गेले आहे.
नऱ्हे गाव : नऱ्हे गाव हे भाटघर धरणाजवळ वेलवंडी नदीच्या काठावर वसलेले एक सुंदर व रमणीय गाव आहे. इथे मराठी व हिंदी चित्रपटांची शुटिंग होत असते.
अंबवड्याचा झुलता पूल : भोरच्या नैर्ऋत्येस सु. १५ किमी. वर असलेले अंबवडे गाव पर्यटनस्थळ असून येथे एक झुलता पूल-जिजीसाहेब झुलता पूल-आहे. १९३६ मध्ये हा पूल बांधण्यात आला.
भोरच्या राजवाडा : पंतसचिवांच्या घराण्याच्या वैभवाची साक्ष देणारा, कलाकुसर व वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेला भोरचा राजवाडा हे महाराष्ट्राचे आकर्षण आहे. हा राजवाडा केवळ राजवैभवाचे प्रतीक नव्हे तर यशस्वी व्यवस्थापनाचा आणि कारभाराचा नमुना आहे. जनमानसात आदराचे स्थान असणाऱ्या या महाराष्ट्राच्या या अनमोल वारशाला २०२० मध्ये दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. भारतातील व राज्यातील छोटी संस्थाने स्वातंत्र्यपूर्व काळात आपले वैशिष्ट्यपूर्ण वैभव होते. तेथील संस्थानिकांनी, राजांनी रयतेच्या सुखासाठी अनेकविध सोयीसुविधा निर्माण केल्या. राज्यातही अनेक संस्थानिकांनी जनतेवर मुलासारखे प्रेम केले आणि जनकल्याणार्थ अनेक योजना राबविल्या. पुण्यापासून दक्षिणेकडे ५० किमी अंतरावर भोर संस्थानाचे वैभव अजूनही वास्तुरूपात राजवाड्याच्या रूपाने उभे आहे. ब्रिटिश सरकारच्या संस्थाने खालसा करण्याच्या धोरणामध्ये या एकमेव संस्थानाला ब्रिटिश सरकार खालसा करू शकले नाही.ब्रिटिशकालात वाडा बांधल्यामुळे पेशवेकालीन शैली आणि व्हिक्टोरियन शैली यांचा मिलाफ या वास्तूत दिसतो. पूर्वाभिमुख वाड्याला चार मजले असून, त्याचे क्षेत्रफळ सुमारे ४४ हजार चौरस फूट आहे. अप्रतिम लाकूडकाम, दगडकाम, वीटकाम यांचा सुरेख संगम वाड्याच्या बांधकामात आहे. वाड्याचा आकार इंग्रजी एल अक्षरानुसार आहे. नगारखान्यासहित लाकूडकामातील महिरपींनी परिपूर्ण असे मोठे प्रवेशद्वार आहे. त्यातील प्रमाणबद्धता व लाकूडकामाच्या कारागिरीची सुबकता नजरेत भरते. प्रथम चौकात प्रवेश केल्यावर पेशवेकालीन व व्हिक्टोरियन शैलीची कलाकृती दिसून येते. उंच जोत्यासाठी पायऱ्यांची रचना, उभे खांब यातून ऐटबाज प्रवेशद्वाराची प्रतिमा अनुभवास येते. दुसऱ्या चौकात प्रवेश केल्यानंतर वास्तुकलेचे डोळे दिपवणारे रूप दिसते. दुमजली चौकाच्या मध्यभागी दुप्पट उंचीचा दरबाराचा भव्य शामियाना आहे. एकसंध लाकडातील दुप्पट उंचीचे खांब, महिरपी आणि शामियान्याच्या बाजूने चौकात डोकावणारा प्रकाश या चौकाचे सौंदर्य द्विगुणीत करतात. शामियान्याच्या बाजूच्या इमारतीतील ओसऱ्या, नक्षीदार कमानीची गॅलरी शामियान्याच्या सौंदर्यात भर घालतात. ओसऱ्यांमधील गुळगुळीत जमीन चुन्यामध्ये बाभळीच्या बिया घोटून तयार करण्यात आली आहे. ही जमीन आजही सुस्थितीत आहे. दक्षिणेकडील चौकाभोवती राहण्यासाठी दालने, स्वयंपाकघर व भोजनघर आहे. चौकामध्ये उघडणाऱ्या कमानीच्या खिडक्यांमुळे दोन्ही मजल्यांवर भरपूर प्रकाश व खेळती हवा यांचा आनंद घेता येतो. तळमजल्यावरील ऐसपैस स्वयंपाकघरात धूर कोंडू नये म्हणून छतामधून अत्यंत कौशल्याने छोटी छोटी धुराडी उभारली आहेत. दक्षिणेकडील भागात मोकळे पटांगण आहे. या पटांगणाकडील भिंतीमध्ये काही नक्षीदार खाचांची रचना आहेत. वाड्याच्या पश्चिमेकडील दालने व चौक पार केल्यावर मागील बाजूस विहीर आहे. विहिरीत टप्प्याटप्प्यावर उतरणाऱ्या काळ्या पाषणातील पायऱ्या आहेत. पूर्वेकडील पहिल्या मजल्यावरील दालनात सुरुदार खांबांनी बैठक सजली आहे. उत्कृष्ट लाकूडकामातील महिरपी, वेलबुट्यांनी सजलेले छत, हंड्या, झुंबरे आहेत. तीन चौकाभोवती गुंफलेली राजवाड्याची संरचना प्रत्येक चौकाचे वेगळे वैशिष्ट्य राखून आहे. एक एकरापेक्षा अधिक जागेत बांधकाम असलेल्या वाड्यात आता सरकारी व राजकीय पक्षांची कार्यालये आहेत.
रोहिडेश्वर (विचित्रगड) : सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजेच ‘किल्ले रोहिडेश्वर’. रोहीडखोरे हे नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भागात वसलेले आहे. या खोऱ्यात ४२ गावे होती. त्यापैकी ४१ गावे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात. रोहिडेश्वर किल्ला हे रोहीड खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते. रोहिडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे ६ मैलांवर आहे. रोहिडेश्वर किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असे देखील संबोधले जाते.
भोर मध्ये शिटी बाबा, नाथाचे मंदिर, वेताळ, कानिफनाथाचे मंदिर, लक्ष्मि मंदिर, भोलावड्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, अशी इतरही मंदिरं आहेत. भोरला दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीला शंकराजी नारायण (पंतसचिव घराण्यातील मूळ पुरुष) यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक उत्सव साजरा केला जातो. १८८५ साली येथे भोर नगरपालिकेची स्थापना झाली. संस्थानी काळात शहराची विशेष प्रगती झाली. शंकरराव चिमणाजी ऊर्फ रावसाहेबांनी येथील देवालये, धर्मशाळा यांचा जीर्णोद्धार केला.भोर मध्ये एक सरकारी रुग्णालय व पशुवैद्यक चिकित्सालय असून श्रीमंत गंगुताई सार्वजनिक ग्रंथालय व राजवाड्यात एक खाजगी संग्रहालय आहे. भोर औद्योगिक दृष्ट्याही प्रगत झालेले असून येथे रंगाचा कारखाना, सोलापूर सूत गिरणी, बाँबे नेट व भोर इंडस्ट्रीज हे कारखाने आहेत. भोर तालुका शेतीप्रधान असून येथील मालाला बाजारात भरपूर मागणी आहे.
No comments:
Post a Comment