पुण्याच्या पेठांमधील काही मंदीरं :
postsaambhar :Yogesh Bhorkar
पुण्यात अनेक देवांची मंदिरे आहेत. ते देव आणि ती देवळे त्या खास नावानेच ओळखली जातात. पुण्याच्या सदाशिव, नारायण, शनिवार, अशा पेठांमधील काही मंदीरांची माहिती या लेखात देत आहे :-
१) मोदी गणपती :
नारायण
पेठ मधील मोदी गणपती. या गणपतीची मुर्ती खुशरोशेठ मोदी यांच्या शेतामध्ये
सापडली, त्यामुळे या गणपतीला मोदी गणपती म्हणतात. मोदी गणपतीला बोंबल्या
गणपती असे नाव सुध्दा आहे पण हे जास्त करुन कोणाला माहित नाही. या गणपती
जवळ मासे विकणारे, बोंबिल विकणारे बसायचे म्हणून या गणपतीला बोंबल्या गणपती
हे नाव पडले.
हे सन १८११ पासूनचे पेशवेकालीन मंदिर आहे. हे मंदिर भट
या कोकणस्त ब्राम्हण कुटुंबीयांनी बांधले आहे. भट हे मुळचे रत्नागिरीचे
होते. नंतर हे पुण्यामध्ये स्थाइक झाले व त्यांनी हे मंदिर बांधले.
मंदिरातील गणेशमूर्ती दोनशे वर्ष जुनी आहे. या मंदिराचा गाभारा व कळस
प्रथम बांधला गेला व तदनंतर सन १८६८ मध्ये मंदिराचा सभामंडप बांधण्यात आला.
या मंदिराचे प्रशासन व व्यवस्थापन गुरवांकडे आहे व इथे त्यांची रहायची
सोय सुध्दा आहे.
हे एक पेशवेकालीन सुंदर कलाकृतीचे मंदिर आहे. या
मंदिराच्या भिंतीवर गणपतीची सुंदर चित्र रंगवलेली आहेत व मंदिरामध्ये
गणपतीच्या विविध रुपांचे फोटो लावले आहेत. मंदिराचा कळस देवळी पध्दतीचा
आहे. मंदिराच्या सभामंडपाचे छत कौलारू आहे. मंदिराचा सभामंडप लाकडी
कलाकुसर व लाकडी खांब आहेत. गणपतीच्या मूर्तीला पितळ्याचा देव्हारा आहे.
ही गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे बनवलेली नाही.
२) त्रिशुंड गणपती :
त्रिशुंड्या गणपती हे पुण्यातील सोमवार पेठेत असलेले एक मंदिर आहे.
पुण्यातील सर्व गणपती मंदिरांमधले शिल्पकलेने नटलेले हे सर्वोत्तम देऊळ
आहे. हे मंदिर गिरी गोसावी पंटाचे आहे.
ह्या तीन सोंड्या गणपतीच्या
देवळातल्या मूर्तीच्या खाली तळघरात मंदिराचे संस्थापक महंत श्री दत्तगुरू
गोस्वामी महाराज यांची समाधी आहे. मूर्तीवर अभिषेक केला की, तळघरात
असलेल्या समाधीवर ते जल ओघळते.
हे मंदिर गिरिगोसावी पंथीयांच्या
तंत्रमार्गीयांचे असल्याने सर्वसामान्य भाविकजन इथे फिरकत नव्हते. मंदिरात
सध्याची मुख्य मूर्ती त्रिशुंड गजाननाची असली तरी शिवमंदिर उभारण्याची मूळ
कल्पना असावी.
मंदिराची मांडणी करताना वर मंदिर व खाली तळघर, समाधी व
हठयोग्यांची पाठशाळा चालावी, अशी योजना होती. सर्व दिनचर्येची सोय तळघरात
होती. प्रातर्विधीसाठी नागझरीजवळ जाण्याची भुयारी पाऊलवाट होती. विहिरीच्या
भिंतीत पाण्याच्या पातळीवर एक मोठी खोली होती. तेथे तंत्रसाधकांच्या
प्रमुख गुरुवर्यांसाठी स्नानाचा संगमरवरी चौरंग होता.
तळघरातील
खोल्यांना दरवाजे व खोल्यांच्या भिंतींना कोनाडे आहेत. खोलीच्या छताला
दगडात दोन खाचा असून त्या खोबणीतून दोराच्या साह्याने छताला उलटे टांगून
घेऊन पेटत्या निखार्यावर काही ठरावीक वनस्पतींचा धूर करून तो तोंडावर
घ्यावयाचा, हा धूर साधनेचा विधी असे.
मंदिराचे गर्भगृह, दर्शनमंडप,
सभामंडप असे तीन भाग आहेत. मंदिर जमिनीपासून साडेतीन फूट उंच चौथर्यावर
आहे. सभामंडप व मूळ गर्भगृह खोलवर आहे.
३) खुण्या मुरलीधर :
रेखीव चिरेबंदी दिंडी, काळ्या पाषाणातून साकारलेला गाभारा, श्रीकृष्णा आणि
राधा यांची संगमरवरी मूर्ती, प्रशस्त लाकडी सभामंडप आणि दुर्मिळ चित्रे आदी
वैशिष्ट्ये असणाऱ्या पुण्याच्या सदाशिव पेठेतील प्रसिद्ध पेशवेकालीन
खुन्या मुरलीधर मंदिराचा रंजक इतिहास आहे.
खुन्या मुरलीधर मंदिरात
तत्कालीन वास्तुकलेची वैशिष्ट्ये दिसून येतात. मंदिराचा मुख्य गाभारा
काळ्या पाषाणातून साकारलेला आहे. सभामंडपाचे कोरीव कामही पाहण्यासारखे आहे.
मुरलीधराच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती फक्त एक पाय आणि
दुसऱ्या पायाचा अंगठा यावर उभी आहे. आधारासाठी मूर्तीला प्रभावळ नाही.
सभामंडपात मुरलीधरासमोर हात जोडून उभा असलेला गरूडही पाहण्यासारखा आहे.
सदाशिव रघुनाथ ऊर्फ दादा गद्रे यांनी मंदिराची उभारणी केलेली आहे. ते
पेशव्यांचे सावकार होते. एके दिवशी दादा गद्रे यांना श्री मुरलीधराने
स्वप्नात दर्शन देऊन हा मूर्ती घडविण्याचा आदेश दिला. मूर्ती बनविण्याचे
काम जयपूरचा शिल्पकार बखतराम याच्याकडे सोपविले गेले. या मूर्ती दुसऱ्या
बाजीरावास आवडल्याने त्याने त्यांची मागणी गद्रे यांच्याकडे केली.
वेदमूर्ती नारायणभट्टांनी म्हणजेच ६ मे १७९७ रोजी मुहूर्तावर गद्रे
वाड्यातून मूर्ती हलविल्या आणि सकाळी धार्मिक विधी सुरू केले. या कारणावरून
गद्रेंचे अरब सैनिक आणि पुण्यात इंग्रजांची नुकतीच आलेल्या तैनाती फौजेशी
पेशव्यांची चकमक झाली. त्यात काही माणसे मरण पावली. आत अभिषेक सुरू असताना
हे खून पडले. त्यामुळे ‘खुन्या मुरलीधर’ असे नाव मंदिराशी जोडले गेले.
गद्रेंनी नंतर मंदिराची व्यवस्था खरे घराण्याकडे सोपवली ती आजपर्यंत सुरू
आहे.
४) कसबा गणपती :
कसबा गणपती म्हणजे पुण्याच्या कसबा पेठेत
असलेल्या देवळातला गणपती. कर्नाटकातील इंडी येथून आलेल्या ब्राह्मणांच्या
आठ कुटुंबांपैकी ठकार नावाच्या कुटुंबाने, कसबा गणपतीची स्थापना केली.
जिजाबाई म्हणजेच शिवाजी महाराजांची आई यांनी हे देऊळ बांधले. हा गणपती एका
दगडी गाभार्यात असून तांदळा स्वरूपात आहे. तांदळा म्हणजे हात-पाय वगैरे
अवयव नसणारी मुखवटावजा मूर्ती. पुणे शहरात अशा प्रकारच्या मूर्तीचे हे
एकमेव देऊळ असावे. राजमाता जिजाबाई आणि गणेशभक्त ठकार यांना झालेल्या
दृष्टांतानुसार जमीन खणल्यावर ही मूर्ती सापडली अशी आख्यायिका आहे.
गणपतीच्या या मूर्तीच्या डोळ्यात हिरे आणि नाभिस्थानी माणिक बसवलेले आहेत.
शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक स्वारीपूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असत.
म्हणून या गणपतीला ’जयति गणपति’ असे म्हणतात. आजही घरात होणार्या मंगल
कार्याची पहिली अर्पणपत्रिका या गणपतीपुढे ठेवण्यात येते, आणि लग्नकार्य
पार पडल्यावर वधूवरांना लगेचच या गणपतीच्या दर्शनाला आणतात. या गणपतीला
पुण्यात प्रथम पूजेचा व ग्रामदैवताचा मान आहे. पुणेला गणपतीच शहर म्हंटल
जात. जुन्या काळी गणपतीचे कार्यक्रम शनिवारवाड्यात होत असे. मंदिरास लाकडी
सभामंडप असून उजव्या बाजूस ओवऱ्या दिसतात.
५) अष्टभुजा देवी मंदिर :
हे बुधवार पेठेतील मंदिर फरासखान्याकडून पासोड्या विठोबाकडे जाणार्या
रस्त्यावर, पासोड्या विठोबाच्या मंदिराच्या जरा अलीकडे उजव्या हाताला आहे.
येथील अष्टभुजा देवीची मूर्ती अंदाजे अडीच फूट उंच आहे. डोक्यावर मुकुट
आहे, ढाल तलवार, त्रिशूळ, धनुष्य-बाण, कमळ, शंख अशी आयुधे तिच्या हातात
आहेत. वरचे दोन हात उंचावलेले असून तर खालच्या डाव्या हाताने महिषासुराची
शेंडी पकडली आहे. उजव्या हातात त्रिशूळ आहे, डावा पाय महिषासुरावर ठेवला
आहे. मगे सिंह असून त्याने महिषासुराला पकडले आहे. मूर्तीमागे एक प्रभावळ
आहे. प्रभावळीत कुणाचा तरी एक झिजलेला चेहरा दिसतो. अष्टभुजा देवीची ही
मूर्ती सुरेख आणि प्रमाणबद्ध आहे.
पुण्याच्या बुधवार पेठेतील हे
अष्टभुजा देवीचे छोटेसे देऊळ १९ व्या शतकातले असावे. चापेकर नावाच्या
महिलेने स्थापन केलेल्या या देवळाची व्यवस्था खोडके कुटुंबीय पाहतात.
६) लक्ष्मि-नरसिंह मंदिर :
लक्ष्मि-नरसिंह मंदिर हे पेशवेकालीन मंदिर सदाशिव पेठेतील जोशी
वाड्यामध्ये आहे. गणेशभट्ट जोशी यांनी हे मंदीर सन १७७४ मध्ये स्थापन
केले. हे मंदिर वाड्यामध्ये दक्षिण-पुर्व दिशेस बांधले आहे. मंदिराची
लांबी ७५ फूट व रुंदी २८ फूट आहे.
लक्ष्मि-नरसिंहाची मुर्ती नाशिकच्या
पंचवटी वरुन आणलेली आहे. ही मुर्ती संगमरवराची असून मुर्तीला चांदीचे
दागिने आहेत. मुर्तीचा शेषशाही नागही चांदीचा आहे.
७) नागेश्वर मंदिर :
सोमवार पेठतील नागेश्वर मंदिर हे तेराव्या शतकातील यादवकालीन मंदिर आहे.
मंदिराचा सभामंडप लाकडाचा असून गाभारा पुर्णपणे पाषाणाच्या बनवलेला आहे.
हे मंदिर यादवकालीन व पेशवेकालीन कलाकुसरीचा उत्तकृष्ट नमुना आहे. या
मंदिरामध्ये विष्णु, मारुती, दत्तात्रेय,ई. देवांची लहान मंदीरं आहेत. या
मंदिरामध्ये दोन दिपमाळ व एक पवित्र पाण्याचे कुंड आहे.
या मंदिराच्या भोवती इमारततींमुळे हे मंदिर आत दडले गेले आहे. हे शिवलिंग स्वयंभू आहे.
८) तांबडी जोगेश्वरी :
पुण्याचे ग्रामदैवत कोणते म्हणाल तर तांबडी जोगेश्वरी आहे. ग्रामदेवता ही
साधारणपणे गावाबाहेर वेशीपाशी असते, कारण तिने शत्रू आला तर त्याला
वेशीबाहेर अडवून त्याचा संहार करायला पाहिजे. पण तांबड्या जोगेश्वरीचे देऊळ
हे पुण्याच्या शहर भागात गजबजलेल्या वस्तीत येऊन ठेपले आहे. ज्या काळात
मूर्ती बसवली गेली तेव्हा ती वेशीबाहेर, म्हणजे त्या काळच्या पुण्याबाहेर
होती. तेव्हा मंदिरही नव्हते. नुसती पाषाणाची मूर्ती.
तीनशे
वर्षांपूर्वी, आजच्या पुणे शहराच्या अगदी मध्यावरून, अत्यंत गजबजलेल्या
गर्दीच्या भागातून आंबील ओढा वाहत होता. हा ओढा सदाशिव, शुक्रवार, बुधवार व
शनिवार या पेठांच्या भागामधून वाहात जाऊन मग मुठा नदीला मिळत होता.
जोगेश्वरी तेव्हा ओढ्याच्या काठी होती.
जोगेश्वरीचे उल्लेख पुराणातही
सापडतात. पुण्याची योगेश्वरी म्हणजेच जोगेश्वरी ताम्रवर्णी म्हणजेच तांबडी
आहे. म्हणून तिला तांबडी जोगेश्वरी असे नाव प्राप्त झाले. ‘देवी भागवत’,
‘मार्कंडेय पुराण’, ‘गाथा सप्तशती’ या ग्रंथांत ताम्रवर्णी जोगेश्वरीची कथा
आहे. त्यानुसार आर्यांनी भरतखंडात वसाहती केल्या तेव्हा रेवाखंड,
दंडकारण्य, अंगवंगादी प्रांतांत त्यांचे अनेक संघर्ष झाले. त्यात तिने
महिष्मती नगरीतील मुख्य महिषासुराचा पराभव केला! म्हणून ती महिषासूरमर्दिनी
नावानेही ओळखली जाते. महिषासूराचे अंधक, उध्दत, बाष्कल, ताम्र वगैरे बारा
सेनापती होते. त्या सेनापतींपैकी ताम्रासुराचा वध करणारी ती ताम्र
योगेश्वरी, म्हणजेच पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी. म्हणजे शेंदूर
चर्चिला जातो म्हणून तिचे नाव तांबडी जोगेश्वरी असे पडले नसून ताम्रासुराचा
वध करणारी पराक्रमी देवता म्हणून तिचे नाव तसे पडले आहे.
तांबड्या
जोगेश्वरीची मूर्ती स्वयंभू आहे असे म्हटले जाते. ती चतुर्भुज आणि उभी आहे.
ती मातेश्वरी, सावित्री आणि चामुंडा अशी देवत्रयात्मक आहे. तिच्या वरच्या
उजव्या व डाव्या हातांत डमरू व त्रिशुळ आहे. खालच्या हातात मुंडके व
पानपात्र आहे. ती मूर्ती कुठल्याही वाहनावर नाही; उभी आहे. सव्वा हात
उंचीची मूर्ती सुटी नसून तिच्या पाठीमागे पाषाण आहे.
९) गुंडाचा गणपती :
पुणे शहरातील कसबा पेठेत शिंपी आळीच्या शेवटाला गुंडाचा गणपती नावाचे पेशवे कालीन देऊळ आहे.
पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणीस यांचा नागोजी गुंड नावाचा सहकारी होता.
‘त्याच्या घराजवळील गणपती’ असा जो दुसरे बाजीराव पेशवे यांच्या १८१०-११
सालामधील रोजनिशीमध्ये उल्लेख आहे, तोच गणपती आज "गुंडाचा गणपती‘ म्हणून
प्रसिद्ध आहे. पुण्यातले कसबा गणपतीप्रमाणेच कसब्यातील गणपतीचे दुसरे जागृत
स्थान म्हणजे गुंडाचा गणपती होय. या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर
मूर्तीवरील नजर हटत नाही आणि दर्शनाचा परिणाम दीर्घ काळ मनावर राहतो.
दर्शनातच आनंद देणारी ही मूर्ती आहे. हत्तीचे शिर मानवी शरीरावर ठेवल्यावर
तंतोतंत दिसेल अशी ही मूर्ती आहे. हत्तीच्या शिरोभागातील गंडस्थळे, मोठे
कान आणि प्रशस्तपणा या मूर्तीमध्ये पूर्णपणे उतरला आहे. सुमारे साडेचार-पाच
फूट उंचीची ही मूर्ती पूर्णपणे दगडाची असून शेंदरी रंगात आहे. चतुर्भुज,
दोन्ही पाय खाली सोडून बसलेला गजानन, अशी ही मूर्ती आहे. डाव्या खालील
हातात मोदक, वरच्या दोन्ही हातांत पाशांकुश आणि उजवा खालील हात अभयहस्त असे
मनमोहक रूप आहे. नागयज्ञोपवित, तसेच अंगभर पीतांबर असलेली मूर्ती दगडी
बैठकीवर असून, अत्यंत प्रभावी अशा नजरेने पाहत असल्याचे दिसते. ३ एप्रिल
१९७५ रोजी जुन्या मूर्तीचे कवच निघाले, तेव्हा आत अतिप्राचीन सुंदर मूर्ती
भंगलेल्या अवस्थेत मिळाली. त्या वेळी या मूर्तीची पाहणी भारत इतिहास संशोधन
मंडळ आणि डेक्कन पुरातत्त्व महाविद्यालयातील तज्ज्ञांनी केली होती. तेव्हा
ही मूर्ती चौदाव्या शतकातील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
त्यामुळे नवीन मूर्तीची स्थापना करण्यासाठी काका वडके यांच्या
अध्यक्षतेखाली मंडळाची स्थापना करण्यात आली होती. गणेश मूर्तीवरील थर काढून
४ फेब्रुवारी १९७६ रोजी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर
मूर्तीच्या कवचाचा एक साचा केळकर संग्रहालयाला भेट देण्यात आला. त्यानंतर
केशव रघुनाथ देशपांडे यांनी पाषाणातून हुबेहूब मूर्ती तयार केली. या
मूर्तीसाठी वारजे येथील गणपती माळावरून दोन टन वजनाचा दगड निवडण्यात आला
होता. त्याच नवीन मूर्तीची आज पूजा केली जाते (१८७६पासून). मूळ मूर्ती
गाभार्याच्या मागे ठेवलेली आहे.
१०) पासोड्या विठोबा :
पासोडी
हे अंगावर पांघरायचे एक ऊबदार वस्त्र म्हणून पुर्वी प्रचलित होते आणि या
पासोड्या विकणारे लोक व दुकाने इथल्या मारुतीच्या मंदिराजवळ बसत. म्हणून
इथल्या मारुतीला पासोड्या मारुती म्हणत. व या मारुती जवळील हे विठ्ठलाचे
मंदिर म्हणून त्यालाही पासोड्या विठोबा हे नाव दिले. शिवाजी महाराजां
पासून अस्तित्वात असलेले हे मंदिर आहे. या ठिकाणी पुर्वी एक प्राचीन
शिवलिंग असलेली घुमटी व त्याच्या समोर पाण्याचा सार्वजनिक हौद होता, अशी
नोंद इतिहासात सापडते. त्या वरुन हे स्थान पेशवाईत शिवमंदिर होते हे सिध्द
होते. इंग्रजी अंमलात येथे विठ्ठल-रखुमाईच्या प्रतिमांची स्थापना झाली.
१९२८ मध्ये जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला.
११) श्री राम मंदिर तुळशीबाग :
तुळशीबाग राम मंदिर हे पुण्यातील पेशवेकालीन राम मंदिर आहे. ते पुण्यातील शुक्रवार पेठेत तुळशीबाग भागात आहे.
पुणे शहरातील हे वैभवशाली असलेले राम मंदिर कै. श्रीमंत नारो आप्पाजी खिरे (तुळशीबागवाले) यांनी स्थापन केले.
सन १७५० पासून १७७५ पर्यंत पुण्याच्या सर-सुभेदारी पदावरून नारो आप्पाजीने
एक निष्णात, निःस्वार्थी, निस्पृह व स्वामिभक्त प्रशासक म्हणून लौकिक
मिळविला. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत पुणे प्रांताची सर-सुभेदारी एकही
आक्षेप न येता अत्यंत व्यवस्थित पार पाडली. राज्य व्यवस्थेबरोबरच त्यांनी
सार्वजनिक, धार्मिक व लोकोपयोगी कामाकडेही तितकेच लक्ष दिलेले आहे. पुण्यात
असलेली तुळशीबाग आणि तेथील राममंदिर ही त्यांचीच देन आहे.
तुळशीबागेतील राम मंदिराचे बांधकाम इ.स. १७६१ मध्ये सुरू झाले, परंतु ते
सुमारे १७९५ पर्यंत चालू होते. मंदिराचे आवार सुमारे एक एकर आहे. उत्तर,
दक्षिण व पश्चिम अशा तिन्ही दिशांना प्रवेशद्वारे आहेत. सन १८३२ मध्ये
सभामंडपाचा काही भाग निसटल्यामुळे दुरुस्त केला. सध्या (२०१७ साली) असलेला
सभामंडप हा सन १८८४ मध्ये नंदरामजी नाईक यांनी बांधला
श्रीराम, लक्षमण व
सीता या तिन्ही मूर्ती पांढर्या पाषाणाच्या असून वल्कले नेसलेल्या,
जटायुक्त व धनुर्धारी आहेत. सीतेच्या एका हातात कमळ असून दुसर्या हातांत
कलश आहे. तिन्ही मूर्ति संगमरवरी असून अतिशय नाजूक, रेखीव व प्रमाणबद्ध
आहेत. १७६७ रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. या मूर्ती उमाजी बाबा
पंढरपूरकर यांच्याकडून करवून घेतल्याची नोंद आढळते.
१२) नवा विष्णु मंदिर :
बाजीराव रस्त्यावरील नवा विष्णु मंदिर हे गणेश जोशी यांनी सन १८६८ मध्ये
बांधले. त्या वेळेस पुण्यामध्ये विष्णुची जास्त मंदिरं नव्हती फक्त
बेलबागचे लक्ष्मि-नारायण मंदिर व पर्वती वरील विष्णु मंदिर होतं. त्यामुळे
याला नवा विष्णु मंदिर असे नाव दिले. या मंदिरामध्ये गणेश जोशींच्या
पत्नी बायकांना हळदी-कुंकू समारंभासाठी बोलवत असे, येथे हळदी-कुंकू समारंभ,
बायकांचे समारंभ व्हायचे. त्यामुळे या मंदिराला बायक्या विष्णू असेही नाव
पडले. या मंदिरामध्ये जास्तीत जास्त बायकांचा सहवास होता.
१३) बेलबाग विष्णु मंदिर : लक्ष्मि रस्त्यावरील बेलबाग विष्णु मंदिर ( लक्ष्मि-नारायण मंदिर, बेलबाग) हे पेशव्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी नाना फडणवीस यांनी बांधले सन १७६९ मध्ये बांधले. अजुनही त्यांचे वंशज या मंदिराची देखभाल करतात.
१४) माती गणपती :
माती गणपती हा
पुण्यातील मोठी मूर्ती असलेला एक गणपती आहे. नारायण पेठेत असलेल्या या
गणपतीची मूर्ती संपूर्ण मातीची आहे असे सांगितले जाते. मातीच्या
मूर्तींपैकी ही सर्वात जुनी, म्हणजे इसवी सनाच्या अठराव्या शतकातील मूर्ती
आहे. मूर्तीचा आणि मंदिराचा इतिहास ज्ञात नाही.
माती गणपतीची ही मूर्ती
चार ते साडेचार फूट उंच असून दोन ते अडीच फूट रुंद आहे. तिच्या चार
हातांपैकी डावा खालच्या बाजूचा हात, दुमडलेल्या डाव्या पायावर ठेवलेला असून
त्याच हातावर सोंड टेकलेली आहे. गणपती उजव्या हाताने अभय देतो आहे. वरच्या
हातांमध्ये शस्त्रे नाहीत.
देवळाच्या गाभार्यासमोर प्रशस्त सभामंडप आहे. सभामंडपात शिवलिंग व विष्णू-लक्ष्मीच्या मूर्ती आहेत.
इ.स. १९९८मध्ये देवळाचा जीर्णोद्धार झाला. पानशेतच्या पुरात संपूर्ण मंदिर
पाण्याखाली गेले असताही गणपतीच्या या मातीच्या मूर्तीला काहीही झाले नाही;
तसेच देवापुढील शंख आणि घंटाही हलली नाही.
या माती गणपतीच्या देवळाची मालकी श्रोत्री कुटुंबाकडे आहे.
१५) चिमण्या गणपती :
पुण्याच्या सदाशिव पेठेतील हे एक प्रसिद्ध देऊळ आहे. देवळातली गणपतीची
मूर्ती सुमारे तीन फूट उंचीची, डाव्या सोंडेची व अंगभूत मुकुट असलेली आहे.
या मूर्तीच्या स्थापनेचा इतिहास अज्ञात आहे. हे मंदिर शास्त्री
कुटुंबाच्या मालकीचे आहे. पूर्वी हे मंदिर पटवर्धन व त्याहीपूर्वी काळे
यांच्या मालकीचे असल्याचा उल्लेख सापडतो. येथे तांदूळ टिपण्यासाठी खूप
चिमण्या येत असत व त्यावरूनच या गणपतीचे नाव चिमण्या गणपती पडले असावे.
अशी बरीच मंदिरे पुण्याच्या पेठांमध्ये आहेत.
No comments:
Post a Comment