खेळ व मनोरंजन : महाराष्ट्रात खेळ, व्यायाम व मनोरंजन यांची प्रदीर्घ परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली असून, ती एकूण लोकजीवनास व समाजस्वास्थ्यास सातत्याने उपकारक ठरली आहे. प्राचीन संतवाङमयात ⇨ आट्यापाट्या, हुतुतू, गोट्या इ. खेळांचे जे रूपकात्मक उल्लेख सापडतात, त्यावरून ते खेळ तत्कालीन समाजजीवनात रूढ असावेत असे दिसते. इतरही अनेक खेळांचे व रंजनप्रकारांचे उल्लेख तत्कालीन लोकगीते, लोकनृत्ये यांतून आढळतात.
महाराष्ट्रात वैदिक काळात द्यूतक्रीडा, ⇨ फाशांचे खेळ, ⇨ धनुर्विद्या, ‘मृगया’ म्हणजे ⇨ शिकार इ. खेळ प्रचलित असल्याचे उल्लेख आढळतात. तसेच यज्ञ,समनादी उत्सवप्रसंगी घोड्यांच्या वा रथांच्या शर्यती, सामूहिक नृत्ये इ. होत असत. सातवाहन काळापासून विविध प्रकारचे करमणुकीचे खेळ महाराष्ट्रात रूढ असल्याचे दिसून येते. सातवाहनकालीन लोक सोंगट्या खेळत असत. ⇨ कुस्ती हा महाराष्ट्राचा खास देशी प्रकार सातवाहन काळाइतका प्राचीन आहे. गाथासप्तशतीत (इ. स. पहिले-दुसरे शतक) मल्लयुद्धाचे निर्देश आढळतात.
यादवकाळात गारूडी व कोल्हाटी (डोंबारी) लोकांचे ⇨ कसरतीचे खेळ, ⇨ कळसूत्री बाहुल्यांचा खेळ इ. रंजनप्रकार लोकप्रिय होते. द्यूत वा सारिपाट हाही लोकप्रिय होता. कुस्ती,कोलदांडू, ⇨ लगोऱ्या, चेंडूचे खेळ,हमामा,सूरकांडी (सूरपारंबी) हे खेळ मुलांमध्ये प्रिय होते. लहान मुलामुलींच्या खेळण्यांमध्ये मातीची व लाकडी खेळणी, बाहुल्या,चित्रे इत्यादींचा समावेश असे. बैठ्या खेळांमध्ये भिंगरी,तारांगुळी,चिंचोरे,कवड्या इत्यादींचे उल्लेख सापडतात. बहमनीकाळात उत्तर भारतातून काही खेळ महाराष्ट्रात आले, त्यांपैकी ⇨ बुद्धिबळ हा खेळ जास्त लोकप्रिय ठरला. प्राचीन काळी तो ‘चतुरंग’ या वेगळ्या नावारूपाने खेळला जात होता. त्याशिवाय चौसर,गंजीफा इ. खेळही खेळले जात. विटीदांडू,चेंडूफळी,लगोऱ्या, ⇨ भोवरा,सूरपारंबी,पटपट सावली, ⇨ लपंडाव, वावडी वा ⇨ पतंग, एकीबेकी, हुतुतू, हमामा इ. खेळ मुलांमध्ये प्रिय होते. यांपैकी ⇨ विटीदांडू हा खेळ दक्षिणेतून महाराष्ट्रात आला. त्याचे मूळ नाव ‘वकट-लेंड मूंड’ असे होते. पिंगा, ⇨ फुगडी,टिपरी इ. मुलांचे खेळ प्रचलित होते. जनजीवनात लोकसंस्कृतीचे उपासक म्हणून मानले गेलेले वाघ्या-मुरळी,भुत्या,वासुदेव, ⇨ बहुरूपी,पोतराज इ. लोकरंजनाचे कार्य करीत. कथाकीर्तन, ⇨ गोंधळ, ⇨ भारूड इ. प्रकारची धार्मिक उद्बोधन करणारी करमणूक त्याकाळी रूढ होती. त्याचबरोबर बैल,रेडे,एडके,कोंबडे इ. ⇨पशूंच्या झुंजी, बैलगाड्यांच्या शर्यती,हत्तीची ⇨ साठमारी, साप-मुंगूसाची लढाई, अस्वले, माकडे इ. प्राण्यांच्या कसरती, ⇨ जादूचे खेळ, ⇨ पत्ते व पत्त्यांचे खेळ इ. महाराष्ट्रात पूर्वापार चालत आलेले लोकरंजनप्रकार होत.
खास जनानी खेळ म्हणून ओळखले जाणारे फुगडी, पिंगा, टिपरी,झिम्मा,कीस बाई कीस,आगोटा-पागोटा, कोंबडा यांसारखे नृत्य-खेळ मुली व स्त्रिया नागपंचमी,गौरी,हदगा इ. सणांच्या प्रसंगी खेळत.
मराठेशाहीत ⇨ लाठी, ⇨ बोथाटी, ⇨ फरीगदगा, कुस्ती,⇨ लेझीम इ. मर्दानी खेळ लोकप्रिय होते. कुस्त्यांचे आखाडे व स्वतंत्र ⇨ व्यायामशाळा शिवकाळापासून अस्तित्वात आल्या. सुदृढ शरीरसंपदा आणि उत्तम बलोपासना यांसाठी दंड,जोर,बैठका, ⇨ सूर्यनमस्कार, ⇨ मल्लखांब इ. व्यायामप्रकार मुले व तरूण यांच्यात मोठ्या प्रमाणात रूढ होते. शरीरस्वास्थ्यासाठी केले जाणारे ⇨ प्राणायाम व ⇨ योगासने यांनाही फार जुन्या काळापासूनचा वारसा आहे. कथाकीर्तनांबरोबरच लोकशाहीरांच्या लावण्या व पोवाडे ही जनसामान्यांच्या मनोरंजनाची या काळातील खास प्रभावी साधने होती.
लष्करी व शारीरिक शिक्षणाची सांगड हे महाराष्ट्राच्या क्रीडाविषयक इतिहासाचे वैशिष्टय आहे. शिवकालीन आखाड्यांत तरूणांना जोर,जोडी,कुस्ती यांबरोबरच धनुर्विद्या,दांडपट्टा,बोथाटी,तलवारबाजी,भालाफेक, ⇨ अश्वारोहण वगैरे शारीरिक कौशल्याचे प्रकार शिकविले जात. पेशवेकाळात होऊन गेलेले बाळंभटदादा देवधर हे आधुनिक मल्लविद्येचे प्रणेते होत. त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य दामोदर गुरू यांनी मल्लविद्येची अपूर्व सेवा केली. त्यांनी मल्लखांबविद्येचा प्रचार महाराष्ट्रात केला. तसेच ठिकठिकाणी व्यायामशाळाही स्थापन केल्या.
महाराष्ट्रात शिक्षण संचालनालयाची स्थापना १८५५ मध्ये झाली. त्या दृष्टीने शासकीय प्रयत्नांच्या पुढाकराने झालेल्या महाराष्ट्रातील शारीरिक शिक्षणाच्या वाटचालीचा मागोवा दोन कालखंडात घेता येईल : पहिला कालखंड शिक्षण संचालनालयाच्या स्थापनेपासून ते स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत (१८५५-१९४६) आणि दुसरा कालखंड स्वातंत्र्योत्तर काळापासून -१९४७ पासून – ते आजतागायत.
शारीरिक शिक्षण-शिक्षकांचे प्रशिक्षण : प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन स्तरांवर शारीरिक शिक्षण व क्रीडा ह्या विषयांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षक उपलब्ध व्हावेत,म्हणून प्रशिक्षणसंस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली. ही वाढ करताना १९६५-६६ मध्ये भारत सरकारच्या शिक्षण महामंडळाच्या आदेशानुसार शारीरिक शिक्षणाच्या प्रशिक्षणाचीही पुनर्रचना करण्यात आली. त्यानुसार पदविका-अभ्यासक्रमाचा दर्जा पदवीसमान करून ह्या शिक्षणाच्या पदवी-अभ्यासक्रमात शारीरिक शिक्षणासह अन्य क्रमिक विषयांपैकी एका विषयाच्या अध्यापनपद्धतीचा समावेश करण्यात आला. ह्यामुळे शारीरिक शिक्षणाबरोबर दुसरा एक बौद्धिक विषय शिकविण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरूवात झाली. ह्या पुनर्रचनेमुळे शारीरिक शिक्षकांचा दर्जा व वेतनश्रेणी इतर शिक्षकांबरोबर झाली. सध्या पदवीधरांकरिता शारीरिक शिक्षणाच्या पदवी-अभ्यासक्रमाची महाराष्ट्रात कांदिवली व वडाळा (मुंबई),पुणे, औरंगाबाद,नागपूर,(२) यवतमाळ,बार्शी,अमरावती (२) या ठिकाणी एकूण दहा महाविद्यालये आहेत.
ह्याशिवाय बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता तीन वर्षांचा शारीरिक शिक्षणाचा पदवी-अभ्यासक्रम चालविणाऱ्या दोन संस्था महाराष्ट्रात अमरावती व नागपूर येथे आहेत. प्राथमिक शाळांकरिता शारीरिक शिक्षणाचा खास अभ्यासक्रम देणारी एकूण १५ कनिष्ठ प्रशिक्षण-महाविद्यालये महाराष्ट्रातआहेत.या महाविद्यालयांत प्राथमिक शाळेतील अन्य विषयांचे प्रशिक्षण देणाऱ्या अभ्यासक्रमांतर्गत शारीरिक शिक्षणाचाही खास अभ्यासक्रम राबविला जातो.
भारतातील एकूण शारीरिक शिक्षणाच्या महाविद्यालयांपैकी सु. ५० महाविद्यालये एकट्या महाराष्ट्रात आहेत. यावरून शारीरिक शिक्षणाच्या प्रशिक्षणाची वाढ महाराष्ट्रात किती मोठ्या प्रमाणावर झाली आहे, हे दिसून येते.
याबरोबरच पतियाळा येथील राष्ट्रीय क्रीडासंस्थेत क्रीडा-मार्गदर्शनाचे खास प्रशिक्षण घेतलेले शिक्षक महाराष्ट्रात काम करीत आहेत. त्यांच्याकरिता शासनातर्फे विभागीय पातळीवर व जिल्हा पातळीवर क्रीडा-मार्गदर्शन-केंद्रे सुरू केली आहेत. या ठिकाणी खेळाडूंची निवड करून त्यांची गुणवत्ता वाढविण्याचे प्रयत्न होतात. महाराष्ट्रात सु. सहा-सात क्रीडा-मार्गदर्शन-केंद्रे असून ती हळूहळू प्रत्येक जिल्ह्यात एक ह्याप्रमाणे वाढविण्याचा प्रयत्न होत आहे.
शालेय क्रीडासामने: प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना खेळांतील स्पर्धात्मक अनुभव मिळावा व त्यांची क्रीडाक्षेत्रातील गुणवत्ता वाढीस लागावी, म्हणून जिल्हा-राज्य व राष्ट्रीय स्तरांवर शालेय सामने भरवले जातात. हे सामने तीन गटांत होतात : (१) लहान मुलांकरिता छोट्या स्वरूपातील ‘मिनी’ सामने,(२) कनिष्ठ गट आणि (३) वरिष्ठ गट. ह्या सामन्यांत एकूण १५ खेळांचा समावेश होतो : (१) मैदानी स्पर्धा, (२) व्हॉलीबॉल, (३) हॉकी, (४) फुटबॉल, (५) बास्केटबॉल, (६) खोखो. (७) कबड्डी, (८) बॅडमिंटन, (९) टेबल-टेनिस, (१०) कसरती खेळ(जिमनॅस्टिक्स), (११) कुस्ती, (१२) हॅंडबॉल, (१३) जूदो, (१४) पोहणे व (१५) क्रिकेट. महाराष्ट्राचा ह्या सामन्यांतील दर्जा उच्च प्रतीचा आहे. १९७०-७१ पासून महाराष्ट्राच्या माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांकरिता जिल्हानिहाय क्रीडा-शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरू झाली. तसेच अखिल महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतर्फे राज्य पातळीवर कुस्तीच्या स्पर्धा घेऊन त्यामध्ये खास गुणवत्ता दाखविणाऱ्या खेळाडूंनाही स्वतंत्र क्रीडा-शिष्यवृत्त्यांची तरतूद शासनाने केली आहे.
राष्ट्रीय क्षमता मोहीम: राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता अजमावून राष्ट्राची उत्पादनशक्ती वाढविण्याकरिता व राष्ट्रसेवेस त्यांचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा,या हेतूने भारत सरकारने १९६० पासून राष्ट्रीय क्षमता मोहीम सुरू केली. यातील कसोट्यांत भाग घेणाऱ्या लोकांना नियोजित नियमांप्रमाणे तीन गटांमध्ये प्रमाणपत्रे देण्यात येतात : (१) उच्च श्रेणी, (२) मध्यम श्रेणी व (३) साधारण श्रेणी. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात या कसोट्या घेण्याकरिता कसोटीकेंद्रे उभारली जातात. प्रतिवर्षी सु. ५० टक्के स्पर्धक उत्तीर्ण होतात. साधारणपणे दरवर्षी एक लाखापेक्षा अधिक युवक या मोहिमेत भाग घेतात.
भारत सरकारच्या योजनेप्रमाणे महाराष्ट्रातही ग्रामीण क्रीडा महोत्सव, तसेच स्त्रियांकरिता खास स्पर्धा व्यापक प्रमाणात प्रतिवर्षी आयोजित केल्या जातात.
No comments:
Post a Comment