विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 19 July 2020

रत्नागिरील गुहागार
























रत्नागिरील गुहागार
postsaambhar :Yogesh Bhorkar

गुहागर भारतातील महाराष्ट्र या राज्यातील रत्नागिरी जिह्यातील एक तालुका आहे. गुहागर आपल्या वर्जिन बीच, कॉयर आइटम, नारळ, सुपारी आणि मुख्यत हापुस आंबा यांसाठी प्रसिद्ध आहे. जवळच चिपळूण तालुका आहे आणि चिपळूण रेल्वे स्थानक ४४ किलोमीटर लांब आहे. दाभोळ पॉवर कंपनी च्यामुळे गुहागर च्या अर्थव्यवस्था मध्ये मजबुती आली, १९९० च्या दशक मध्ये या पॉवर प्लॅन्टची सुरुवात मध्ये काही किलोमीटर उत्तर दिशेला हा चालू करण्यात आला. त्याच्यामुळे इथे नवीन हॉटेल उगम झाले आणि स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला.

गुहागरमध्ये पहाण्याजोगी स्थळे व मंदीरे अशा प्रकारे आहेत:

श्री व्याडेश्वर मंदिर

श्री व्याडेश्वराचे प्रसिद्ध मंदिर गुहागर शहरात आहे.व्याडेश्वर हे शंकराचे प्राचीन जागृत देवस्थान म्हणून परिचित आहे. `श्री व्याडेश्वर महात्म्य` या संस्कृत पोथीनुसार व्याडेश्वराचे हे प्राचीन देवालय १२ व्या शतकात बांधले असावे परंतु येथील शिवलिंगाची उत्पत्ती मात्र प्राचीन आहे

श्री व्याडेश्वर देवस्थान हे शिवपंचायतन आहे. ज्या ठिकाणी शिवाच्या मंदिराबरोबर इतरही देवांची मंदिरे असतात त्याला शिवपंचायतन म्हणतात. मंदिराच्या चारही कोपऱ्यात प्रत्येक दिशेला गणपती, दुर्गादेवी, लक्ष्मीनारायण आणि सूर्यनारायणाची स्वतंत्र मंदिरे आहेत. या सर्व मूर्ती सुंदर असून त्या संगमरवरी आहेत. या प्राचीन मंदिरातील मुख्य गाभार्‍यात काळ्या पाषाणाचे शिवलिंग असून त्यावर सुरेख कोरीवकाम असलेल्या तांब्याच्या नागराजाची प्रतिमा आहे. पिंडीवर अभिषेक सुरू असतो व गोमुखातून अभिषेकाचे तीर्थ प्राशन करता येते.

मंदिराचे बांधकाम दगडी असून परिसराला दगडी तटबंदीसुध्दा आहे. समोरील भव्य सभामंडपात तेवढेच भव्य नंदीचे शिल्प आहे. याचबरोबर मंदिराच्या आवारात तीन दीपमाळा आहेत. भक्तांच्या मनातील अढळ श्रध्दास्थान असलेले व्याडेश्वर हे कोकणाच्या भटकंतीमधील एक चुकवू नये असे देवस्थान आहे.

बामणघळ, हेदवी

हेदवीला जाऊन तिथला जलस्तंभ न पाहाता परत येणे म्हणजे एका निसर्गनिर्मित चमत्काराला मुकणे होय! हेदवीची बामणघळ हा निसर्गाचा एक रौद्र आविष्कार आहे. हेदवीच्या गणेश मंदिराजवळ तीन किलोमीटर अलीकडे समुद्रकिनार्‍याच्या काळ्या कातळातील भेगेमधून चाललेला समुद्राच्या लाटांचा हा खेळ बघण्यासारखा असतो. ऐन भरतीचा वेळी गेल्यास उंच तुषार उडवत उसळणारा जलस्तंभ आपलं लक्ष वेधून घेतो.

शतकानुशतके इथे समुद्राच्या लाटांच्या आघाताने खडकामधे एक मीटरभर रुंद आणि १० मीटर लांबीची एक घळ किंवा भेग निर्माण झाली आहे. ३ ते ५ मीटर खोलीच्या या घळीतून भरतीच्या लाटांचे पाणी खूप जोरात आत घुसुन तेथील खडकांवर आपटते आणि यातून निर्माण होतो १० ते १५ मीटर उंचीचा अवर्णनीय जलस्तंभ!

त्यावेळी कपारीत होणारी पाण्याची प्रचंड खळबळ, रोरावात घुसणाऱ्या लाटांचा प्रचंड आवाज असा थरार अनुभवताना अंगावर रोमांच उभे राहतात. मात्र इथे येताना भरतीची वेळ गाठून येणं चांगलं कारण त्या वेळेस इथे उसळलेल्या जलस्तंभाचा अवर्णनिय नजारा दिसतो. या कपारीत समुद्राचे पाणी घुसून जेव्हा वर उसळते तेव्हा येथील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही त्यामुळे निसर्गाच्या या रौद्र रूपाचे दर्शन घेताना काळजी घेणे आवश्यक आहे.

बुधल सडा

कोकणामधे अगदी चित्रांत शोभावीत अशी पुष्कळ ठिकाणं आहेत. गुहागर तालुक्यातील `बुधल सडा` हा परिसर या बाबतीत विशेष आहे. अर्धवर्तुळाकार किनारा, रुपेरी वाळूची पुळण, किनाऱ्यावर हेलकावणाऱ्या रंगीत होड्या, त्यांना वेढणारे समुद्राचे निळे नितळ पाणी... अशा पार्श्वभूमीवर हिरवी गच्च शाल पांघरून या सौंदर्यात अजून भर घालणाऱ्या टेकड्या आणि या सर्वात विसावलेली, कौलारू छपरांची ती टुमदार कोळ्यांची घरे... खरोखरच एक स्वप्नातील गाव!

गुहागर तालुक्यातील बुधल सडा किंवा बुधल हे छोटेखानी गाव अगदी या वर्णनात चपखल बसतं. गुहागर - वेळणेश्वर रस्त्यावर अडूर गावाजवळील या गावाचा समुद्रकाठचा भाग म्हणजे बुधल. गावाच्या कडेला असलेल्या काळ्या खडकांवर समुद्राच्या लाटांचे सतत थैमान चालू असते.

खडकांवर आदळून शुभ्र तुषारांचं कारंज फुलविणारा लाटांचा खेळ नजरेचं पारणं फेडतो. बुधल हे पूर्वी ‘बुध्दीलग्राम’ किंवा ‘बुध्दीलदुर्ग’ म्हणून ओळखले जायचे. त्या काळी ते एक चांगले बंदर म्हणून प्रसिध्द होते परंतु आता इथे फक्त कोळीवस्ती आहे. गुहागर परिसराच्या पर्यटन यादीत बुधल सडा या ठिकाणाचा समावेश अपरिहार्य आहे. शेजारीच असलेल्या एका टेकडीवर दुर्गादेवीचे मंदीर आहे. तिथून दिसणारा नजारा डोळ्याचे पारणे फेडणारा आहे.

दुर्गादेवी मंदिर

वेलदूरच्या बाजूने गुहागरमध्ये प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस दुर्गादेवीचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर तेराव्या शतकातील असून मूळ हेमाडपंती असलेल्या या मंदिराचा जीर्णोध्दार केल्यामुळे त्याचे सौंदर्य अजूनच खुलून दिसते.

मंदिराच्या बाजूला तळे असून मंदिराचा सभामंडप भव्य आहे हा निसर्गरम्य परिसर कायम शांत असतो. गाभाऱ्यात विराजमान झालेल्या आदिमातेचे रूप नजरेत भरण्यासारखे असून येथे मनाला प्रगाढ शांतीचा अनुभव येतो.

अंजनवेल किल्ला

सागरीदुर्ग या प्रकारात मोडणारा हा किल्ला सात एकर परिसरावर पसरलेला असून किल्ल्याचा परिसर खूप सुंदर आहे. गडाला पूर्वेकडे व पश्चिमेकडे असे दोन दरवाजे असून गडाला जमिनीकडील बाजूस खंदक आहे. दक्षिणेकडील तटबंदी फोडून तिथे येण्याजाण्यासाठी वाट केली आहे. आत गेल्यावर देवड्या दिसतात व दरवाज्याची कमान आजही तग धरून आहे.

अंजनवेल मोक्याच्या ठिकाणावर वसला असल्याने अनेक सत्ताधारी त्याचे महत्व ओळखून होते. इ.सं.१७५५ रोजी तुळाजी आंग्रे यांनी याकूतखानाकडून अंजनवेल किल्ला जिंकून त्याचे गोपाळगड असे नामकरण केले. मात्र त्यापूर्वी १६६० पर्यंत किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता तर शिवाजी महारांजानी तो नंतर जिंकून घेतला. संभाजी महाराजांनी त्याची डागडुजी केली मात्र नंतर तो सिद्दी खर्यातखान याच्याकडे १६९९ मध्ये गेला. अखेर इ.सं.१७५६ मध्ये गोपाळगड पेशवाईत सामिल झाला.

किल्ल्यात प्रवेश केल्यावर आमराई नजरेस पडते. डावीकडे तटावर चढण्यासाठी पायऱ्या बांधल्या असून आजही किल्ल्याची तटबंदी भक्कम आहे. दरवाजावरील तटबंदीवरून फेरफटका मारताना समोरचा समुद्र, आसपासची हिरवाई मन मोहून टाकते. पुढे गेल्यावर दक्षिणेकडे १०० मीटर चालत गेल्यावर एका वाड्याचे अवशेष दिसतात. त्याच्या भिंती सुस्थितीत आहेत. गडाच्या भक्कम बुरुजांवरून समुद्र बघत एकांतात मारलेला फेरफटका दीर्घ काळ स्मरणात रहातो.

गुहागर तालुक्यातील अंजनवेल गावाच्या उत्तरेस गेल्यावर समुद्राच्या भूशिरावर अंजनवेल किंवा गोपाळगड हा किल्ला दिसू लागतो. गुहागरपासून १८ किमी. अंतरावर अंजनवेल आहे. रत्नागिरी उर्जा प्रकल्पापासून अंजनवेल गाव ६ किमी वर आहे. तर अंजनवेल गावापासून किल्ला फक्त २ किलोमीटर वर आहे. खासगी वाहनाने किल्ल्यापर्यंत जाता येते.त्याचप्रमाणे वेलदूर पासून बोटीनेही किल्ल्यावर जाता येते. किल्ला खासगी मालकीचा आहे परंतू तो पाहण्यास काही अडचण येत नाही. समुद्रसपाटीपासून अंजनवेल ६५ मीटर उंच असून चढण सोपी आहे.

गुहागर समुद्रकिनारा

गुहागर ते असगोली असा सुमारे ५ ते ६ कि. मी. लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा गुहागरला लाभला आहे. सुरुच्या बनातून दिसणारा चकाकत्या सोनेरी वाळूचा किनारा, त्यावर धडकणार्‍या शुभ्र फेसाळत्या लाटा, पूर्वेकडे लाभलेली डोंगराची पार्श्वभूमी आणि नारळी-पोफळीच्या बागातून,अथांग निळ्या सागराच्या सान्निध्यात वसलेला गुहागरचा किनारा तितकाच विलोभनीय दिसतो.

गुहागरच्या सफरीत तिथल्या समुद्रकिनाऱ्यावर समुद्रस्नानाचा मनसोक्त आनंद लुटता येतो. सूर्य डोक्यावर आल्यावर निर्धोकपणे समुद्रस्नान करण्यासाठी गुहागर इतका शांत व सुरक्षित समुद्रकिनारा दुसरा नसेल. मात्र समुद्रांत जाताना स्थानिकांकडून माहिती घेऊन जाणे केव्हाही चांगले.

मऊ पुळणीवर पावलांना गुदगुल्या करणारी मखमली वाळू अनुभवताना तासंतास केव्हा निघून जातात ते कळतंच नाही. त्याच वेळी वाळूतून हिंडणार्‍या छोट्याछोट्या खेकड्यांचं निरीक्षण करतानाही मजा वाटते. ही भटकंती अनुभवल्यावर पोटाची क्षुधा शमविण्यासाठी सोलकढी, उकडीचे मोदक, माशांचे विविध प्रकार, तांदळाची गरम भाकरी असे अस्सल कोकणी खाद्यपदार्थ पुरविणारी उपहारगृहे किनार्‍यावर आपली वाट बघत असतात.

दशभुजा गणेश, हेदवी

सुंदर समुद्रकिनारा असलेल्या वेळणेश्वरपासून दक्षिणेस फक्त १० किमी अंतरावर हेदवी येथील पेशवेकालीन गणेशमंदिर आहे. त्याकाळी पेशव्यांनी या मंदिर उभारणीसाठी एक लाख रुपये दिले असल्याचा उल्लेख आढळतो. मंदिराचा परिसर अतिशय प्रसन्न आहे व वरपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या असून गाडी रस्ताही बांधलेला आहे. रंगीत तटबंदी, आजूबाजूची आमराई व वेगवेगळ्या रंगीत फुलांनी सजलेल्या बागेच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारे हेदवी गणेशाचे दगडी मंदिर पाहून पर्यटक त्याच्या प्रेमात पडतात.

हेदवी येथील गणेशमूर्ती `श्री दशभुजा लक्ष्मी गणेश’ म्हणून ओळखली जाते. या मंदिरातील गणेशाची मूळ मूर्ती काश्मिरात घडवली गेली असे सांगण्यात येते. मूर्तीच्या गळ्यात नागराज असून डाव्या मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे. श्री गणेशाने हातात त्रिशूळ, धनुष्य, गदा, चक्र, शंख, परशू ही आयुधे धारण केली आहेत. त्याचबरोबर नीलकमल, पाश, रदन (दात), धान्याची लोंबी व मोदक अशा वस्तू आपल्या भुजांमध्ये धारण करणारी ही संगमरवरी गणेशाची मूर्ती अतिशय सुंदर आहे. अशा प्रकारच्या शस्त्रसज्ज मूर्ती इतरत्र दिसून येत नाहीत.

वेळणेश्वर मंदिर.

गुहागर तालुक्यातील एक अतिशय प्रसन्न व निसर्गसंपन्न ठिकाण म्हणजे वेळणेश्वर. इथल्या प्राचीन शिवमंदिरासाठी व सुंदर समुद्र किनाऱ्यासाठी हे ठिकाण विशेष प्रसिध्द आहे. वेळणेश्वर मंदिर परिसरात पोहोचल्याबरोबर मंदिराबाहेर उभ्या असलेल्या अतिशय सुंदर व भव्य दीपमाळा लक्ष वेधून घेतात.

मंदिराचा मूळ गाभारा खूप प्राचीन काळातील असून, सुमारे ४०० वर्षांपूर्वी हे आताचे मंदिर बांधून काढले असे म्हणतात.

गुहागरच्या पर्यटन नकाशावरील वेळणेश्वर हे एक न चुकवता येणारे ठिकाण आहे. सुमारे १२०० वर्षांपासून हे गाव या किनाऱ्यावर वसलं आहे. इथला एकांत, नारळी पोफळीच्या बागांनी वेढलेला परिसर, स्वच्छ समुद्रकिनारा आणि मनाला वेढून टाकणाऱ्या लाटांच्या घनगंभीर गाजेमुळे वेळणेश्वर परिसर वेगळाच भासतो.

वेळणेश्वर समुद्रकिनारा

गुहागर येथून मोडका आगरमार्गे साधरण २० किमी अंतर कापून गेल्यावर तीव्र उतार असलेला वळणावळणांचा रस्ता उतरून वेळणेश्वर गावात जाता येतं. हे गाव सुमारे १२०० वर्षांपूर्वी वसलं आहे असं सांगितलं जातं. वेळणेश्वरचा निसर्गरम्य समुद्रकिनारा अतिशय सुंदर आहे.

वेळणेश्वर समुद्रकिनारा
गुहागर येथून मोडका आगरमार्गे साधरण २० किमी अंतर कापून गेल्यावर तीव्र उतार असलेला वळणावळणांचा रस्ता उतरून वेळणेश्वर गावात जाता येतं. हे गाव सुमारे १२०० वर्षांपूर्वी वसलं आहे असं सांगितलं जातं. वेळणेश्वरचा निसर्गरम्य समुद्रकिनारा अतिशय सुंदर आहे.

नारळी पोफळींच्या बागांची झालर लाभलेला,स्वच्छ, विस्तीर्ण व लाटांच्या घनगंभीर गाजेने वेढलेल्या वेळणेश्वर समुद्रकिनार्‍याचे वेगळेपण त्याच्या अशा वैशिष्ट्यांमुळे उठून दिसते. चंद्रकोरीप्रमाणे दिसणाऱ्या किनार्‍यावर नारळाच्या उंचच उंच बागा पाहाण्यासारख्या आहेत.

किनार्‍यावरच वेळणेश्वराचे शिवमंदिर आहे. मंदिराच्या बाजूने जो भाग समुद्रात घुसला आहे त्याला `मेरूमंडल` असं म्हंटलं जातं. या गावाचा इतिहास हा वेळणेश्वर मंदिराचाच प्राचीन इतिहास आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे येथे निवासव्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने वेळणेश्वरला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. गावत राहाण्यासाठी उत्तम घरगुती निवासव्यवस्था व हॉटेल्स उपलब्ध आहेत. वेळणेश्वर भक्तनिवासातही उत्तम सोय होऊ शकते. वेळणेश्वरमध्ये प्रवेश करताना घाटातून किनाऱ्यावरील हिरव्या गर्द नारळाच्या झाडांच्या पार्श्वभूमीवर लांबवर, अगदी क्षितिजापर्यंत पसरलेला समुद्र बघताना आपण स्वतःला हरवून बसतो.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...