प्रजाहितदक्ष लोकमाता अहिल्याबाई होळकर
postsaambhar :Sushant Harale
लोकांनी राजकर्त्याचे नाव पिढ्यान-पिढ्या काढावे त्यांचे धन्यवाद मानावे, त्यांचे गुणगान गावे. हे एका श्रेष्ठ, प्रजाहितदक्ष राज्यकर्त्याचे प्रमाण आहे. ज्यांच्या पराक्रमाने, सद्गुणी व तेजस्वी व्यक्तिमत्वाने आजही त्यांचे स्थान ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ आहे ते एक नाव जे प्रामुख्याने घेतले जाते ते म्हणजे लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचे. अहिल्यादेवी या कवी कुलगुरूंच्या या ओळीप्रमाणे राज्यकर्त्या होत्या. "स्वसुखानिरभिलाषा: खिद्यसे लोकहेतो:" ज्यांनी आपल्या सुखाची-दुःखाची पर्वा न करता, आपले तन-मन-धन प्रजाकार्यी लावले. याची साक्ष इतिहासकारांच्या दाखल्यातूनही मिळते. इतिहासकार जॉन माल्कम यांनी लिहलंय अहिल्याबाईस 'ब्राम्हण-क्षत्रिय, हिंदू-मुसलमान, सुष्ट-दुष्ट, सावकार-चोर सर्वच माळव्यात दुवा देतात आणि त्यांचे नाव आदराने पूज्यबुद्धीने घेतात.' कवी मोरोपंत लिहितात "न न्यायधर्मनिरता अन्या कलिमाजी ऐकिली कन्या". She was blessed by every tongue, by stern and gentle, by old and young (Mrs. Jone Welby)
अठराव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्राबाहेर आपली सत्ता मराठी सरदारांनी प्रस्थापित केली होती. त्यामध्ये इंदोरचे राजे होते मल्हारराव होळकर. १७३३ मध्ये मल्हारबाबांच्या खंडेराव या मुलाशी अहिल्याबाईंचे लग्न झाले. होळकरांच्या घरात आल्यानंतर त्यांच्यात असलेल्या अलौकिक गुणांचे तेज झळकू लागले. त्यांच्या हुशारीने, हिशोबी ज्ञानाने, कुशाग्र बुद्धीमुळे मल्हाररावांनी लवकरच खजिन्याची जबाबदारी त्यांना सोपवली. अहिल्याबाईंनी राज्यव्यवस्था, लढाई, न्यायव्यवस्था यातही लवकरच कसाब प्राप्त केले. यामुळे आपल्यामागे राज्याचे काय होईल याची त्यांची शंका मिटली होती. १७५४ मध्ये कुंभेरच्या लढाईत खंडेरावांना वीरमरण आले. त्यानंतर अहिल्याबाईंचे सासरे मल्हाररावांना हि देवाज्ञा झाली. यानंतर माळवा राज्याचा भार त्यांच्यावर आला. या दरम्यान त्यांचा पुत्र मालेराव याचाही मृत्यू झाला. एवढे दुःख कोसळूनही अहिल्याबाई धीर राहिल्या. पैशाच्या हव्यासाने इंदोरवर चालून आलेल्या राघोबाला आपल्या तेजाची आणि कारभाराची चुणूक दाखवली. राज्यावर अशी आलेली संकटे आपल्या तेजस्वी कारभाराने टाळली.
अहिल्याबाईंचे आणखीन मोठे योगदान म्हणजे त्यांनी हिंदुस्थानात पवित्र ठिकाणी मोठमोठ्या इमारती बांधून गोर-गरिबांची, यात्रेकरूंची अन्न-पाण्याची सोय केली. त्यांनी देवप्रयाग-धर्मशाळा, गंगोत्री-घाट, केदारनाथ-कुंड, बद्रीनाथ-कुंड, अयोध्या-घाट, प्रयाग-घाट,धर्मशाळा, वाराणसी-मंदिर,घाट, गया-मंदिर,घाट, अमरकंटक-धर्मशाळा, फत्तेगड-घाट, जगनाथपुरी-मंदिर, ओंकारेश्वर- मंदिर, महेश्वर-मंदिर,घाट, रामेश्वरम-धर्मशाळा, गोकर्ण-अन्नक्षेत्र, राजापूर-मंदिर, पंढरपूर-मंदिर, जेजुरी-मंदिर, पुणे-धर्मशाळा, ब्राह्मणगाव- मंदिर,घाट, इंदोर-मंदिर, उज्जैन-मंदिर, चिखलदरा-मंदिर, नागेश्वर-मंदिर, सोमनाथ-मंदिर, द्वारका-धर्मशाळा, नाथद्वारा-मंदिर, पुष्कर-मंदिर,धर्मशाळा, धर्मराजेश्वर-घाट, भामपूर-छत्री, वृदांवन-मंदिर, हरिद्वार-घाट, ऋषिकेश-घाट अशी पवित्र स्थाने बांधून काशीचा विश्वेश्वर मुक्त केला.
अहिल्यादेवींनी प्रचंड दानधर्म केला पण तो राज्याच्या दौलतीतून नाही तर खाजगी व मल्हाररावांच्या खाजगी संपत्तीतून केला. त्यांनी इंदूर जे एक छोटस गाव होत त्याला समृद्ध, वैभवशाली राज्य बनवलं. अहिल्यादेवींनी जेमतेम २९ वर्षाचा कारभार केला त्यामध्ये त्यांनी प्रजेच्या सुखाचा स्वतःचे दुःख विसरून विचार केला. प्रजेस योग्य न्याय मिळावा यासाठी त्या रोज कचेरीत बसत. प्रजेवर कोण जाच करत असे तर त्यास तात्काळ शिक्षा दिली जात. जमिनीचा कर एकदम माफक ठेवला होता. अहिल्याबाईंचा न्याय व जरब इतकी कि कोणालाही त्यांचा निर्णय अमान्य नसत. जंगलातील भिल्ल आणि गोंड यांच्यातील संघर्षाने राज्याचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना डोंगराळ भाग देऊन त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करून न्याय-निवड केल्याने तेही त्यांचा निर्णय आनंदाने मान्य करत. स्त्रिया सती जाण्याच्या काळात आपली दुःख बाजूला ठेवून बुद्धीने, तेजाने, राज्यव्यवस्थेच्या, न्यायव्यवस्थेने, दानधर्माने प्रजेचा ज्याप्रमाणे सांभाळ केला यावरून अहिल्याबाई एक प्रजाहितदक्ष आदर्श महाराणी ठरतात.
No comments:
Post a Comment