postsaambhar: अजय अरूण शिंदे, त्र्यंबकेश्वर. आपला आजचा नायक मराठी राज्यासाठी सर्वाधिक झिजलेल्या व बहुतांशी रणांगणावर मृत्यू पत्करलेल्या शिंदे घराण्यातील वीर आहे. या लेखाच्या नायकाचे नावही माधवरावच आहे मात्र तो त्याच्या महादजी, महादजी बाबा, पाटिलबाबा या नावांनीही ओळखला जातो.
आता आपण आपल्या लेखाचा नायक असणार्या माधवराव उर्फ महादजी शिंदे याच्या युद्धजीवनाचा आढावा घेऊ. मात्र तत्पूर्वी महादजीला शिंदे घराण्याची सरदारी मिळेपर्यंतचा शिंदे घराण्याच्या वाटचालीचा धावता आढावा घेणं आवश्यक आहे असं मला वाटत. महादजी शिंद्याचा जन्म उज्जेनचा सरदार राणोजी शिंदे याच्या रक्षापत्नी पासून ०३ डिसेंबर १७३० रोजी झाला. महादजी राणोजीचा अनौरस मुलगा असल्याने शिंदे घराण्याच्या सुरूवातीच्या वाटचालीत त्याचा तेवढा महत्वपुर्ण सहभाग नव्हता. मात्र एका मराठा सरदार घराण्यातील मुलाला मिळते ते सर्व शिक्षण व तलवारबाजी आदी युद्धकला महादजीही शिकला होता. राणोजी शिंदे यास जयाजी उर्फ जयाप्पा, ज्योतिबा व दत्ताजी हे तीन औरस तर महादजी व तुकोजी हे अनौरस मुले होती. राणोजी सतराशे पंचेचाळिसच्या जुलै महिन्यात शुजालपुरच्या लष्करी छावणीत मेला. यानंतर शिंद्यांची जहागिरी व सरदारी त्याचा मोठा मुलगा जयाप्पा यास मिळाली. जयाप्पा हा अत्यंत शुर व कर्तूत्ववान व्यक्ती होता. त्याने मल्हारराव होळकरासोबत मराठी सत्तेचा उत्तरेत एक दरारा निर्माण केला होता. मात्र त्याच्याच काळात शिंदे होळकरांतील तेढ वाढत जाऊ लागली. त्याला कारण झाले रघूनाथरावाची उत्तरेतील पहिली स्वारी. या स्वारीत राघोबाने सुरजमल जाटाच्या कुंभेरीच्या मातीच्या किल्ल्याला वेढा घातला. किल्ला मातीचा असला तरी वेढा अनेक दिवस रेंगाळला. अशातच एके दिवशी मल्हारराव होळकराचा एकुलता एक मुलगा खंडेराव जाटाच्या किल्ल्यावरून फेकल्या गेलेल्या तोफगोळ्याच्या हल्ल्यात मारला गेला. चिडून होळकराने जाटाविरूद्ध अधिकच कडक लढाई सुरू केली. मात्र अचानक जयाप्पाने जाटातर्फे मध्यस्थी करत वेढा उठवण्यास राघोबास भाग पाडले. यामुळे शिंदे होळकरांत कायमचे वैमनस्य झाले. पुढे जोधपूर संस्थानावरील शिंद्यांच्या कारवाईत होळकरांनी सहभाग घेतला नाही. जयाप्पाने स्वतःच्या शक्तीवर किशनगड, अजमेर व मेडता हे जोधपुरकरांचे किल्ले जिंकले. नागोर या किल्ल्याला वेढा घालून शिंदे बसले असतांना एके सकाळी तळ्यावरून आंघोळ करून परतलेल्या जयाप्पाचा जोधपुरच्या मारेकर्यांनी खुन केला. यामुळे चिडलेल्या दत्ताजीने नागोरवर निकराचा हल्ला चढवत ते जिंकले. लवकरच होळकरांनी जोधपुरच्या बिजेसिंगाचा पक्ष घेतला व तडजोड केली यामुळे शिंद्यांनी जयाप्पाच्या हत्येत मल्हारराव असल्याचा आरोप केला पण पेशव्याने दोघांनाही आपसात तडजोड करण्यास सांगितले. आता शिंद्यांची जहागिरी व सरदारी जयाप्पाचा मुलगा जनकोजी याला दिली गेली व तो पंधरा वर्षांचा तरूण असल्याने कारभार मात्र राणोजीचा तिसरा मुलगा दत्ताजी याच्याकडे सोपवला गेला. बुर्हाडी घाटाच्या लढाईत दत्ताजी अब्दालीच्या फौजांकडून मारला गेला व त्यानंतरच्या पानिपतच्या लढाईत जनकोजी मेला. यामुळे शिंद्यांच्या गादीला औरस वारस उरला नाही. राघोबाने शिंद्यांच्या वारसाहक्काच्या प्रकरणात बरीच घालमेल केली कधी हा तर कधी दुसराच अशा प्रकारे राणोजीच्या लांबच्या नातेवाइकांना राघोबाने शिंद्यांची जहागिरी दिली. मात्र शेवटी माधवरावाने पेशवाईवर संपुर्ण ताबा मिळवल्यावर महादजीस शिंद्यांची जहागिरी व सरदारी मिळाली. महादजीनेही १७६७ साली राघोबाविरूद्धच्या घोडपच्या लढाईत माधवरावास मदत करून कृतज्ञता व्यक्त केली.
आता शिंदेशाहीचा कुलमुखत्यार झालेल्या महादजीस पेशवा माधवरावाने उत्तरेत मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याचे कार्य दिले. महादजीनेही मोठ्या परिश्रमाने प्रथम माळवा व नंतर बुंदेलखंडावर मराठ्यांचे वर्चस्व निर्माण केले. आता शिंदे उत्तर भारताचे तारणहार बनले व यामुळे इंग्रज पुन्हा एकदा आपल्या बंगालच्या कोशात परतले. इंग्रजांनी साथ सोडलेला बादशाह शाहआलम आता महादजीची करूणा भाकू लागला. महादजीनेही मग आपल्या अनेक अटी लादून शाहआलमला अलाहाबादच्या किल्ल्यातून ताब्यात घेतले व वाटेत शुजाउद्दौल्यास बरोबर घेऊन तो प्रथमतः आग्रा व नंतर दिल्लीस पोहोचला. मराठ्यांचा अब्दालीनंतरचा सर्वात मोठा वैरी नजिबखान मेला असला तरी पानीपतात त्याची साथ देणारे अनेक रोहिला सरदार अजुनही रोहिलखंडात सुरक्षित होते. यामुळे महादजीने शाहआलमसह रोहिलखंडावर आक्रमण केले. यात त्याने शुक्रताल येथे नजिबाचा मुलगा झाबेताखान याचा पराभव केला व लवकरच संपुर्ण रोहिलखंड महादजीच्या ताब्यात आला. नजिबाबाद येथे असणारी नजिबखानाची कबर उद्ध्वस्थ करून महादजीने आपला भाऊ व पुतण्याच्या मृत्यूचा बदला घेतला. पानिपताची आठवण मनात ठेवून नजिबाच्या राजवाड्याला त्याने खणती लावली व असंख्य लूट बरोबर घेऊन तो आग्य्राला परत आला. माधवराव पेशव्यास ही विजयाची बातमी कळवून महादजीने ग्वाल्हेरचा किल्ला व शहर जिंकले. उत्तर भारत व माळवा तसेच बुंदेलखंड व शुजाचा अयोध्या प्रांत नजरेखाली ठेवण्यासाठी ग्वाल्हेरच योग्य ठरेल असा विचार करून महादजीने शिंद्यांची राजधानी उज्जेन येथून ग्वाल्हेरला आणली. याच सुमारास नारायणराव पेशव्याचा पुण्यात खून झाला व राघोबा पेशवा झाला. मात्र लवकरच नारायणरावाच्या बायकोला पुरंदर किल्ल्यावर मुलगा झाला व त्याचे नाव सवाई माधवराव नारायण असे ठेवण्यात आले. आता नाना फडणवीस, सखाराम बापू, मोरोबा फडणवीस व त्र्यंबकराव पेठे अशा कारभार्यांनी राघोबाला बाजूला करत माधवरावाच्या नावाने सातारच्या छत्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे आणविली. मात्र या पेढीवरच्या कारभार्यांच्या या समुहाला संरक्षणासाठी सेनापतींची आवश्यकता होती त्यासाठीच त्यांनी महादजी शिंदे व तुकोजी होळकर यांना अधिक अधिकार व स्वायत्तता देऊन आपल्या बाजूस आणले. हेच ते इतिहास प्रसिद्ध मराठा मंडळ वा बारभाईंचे कारस्थान.
यानंतर राघोबाने उघड उघड बंड केले व तो सुरतेस इंग्रजांच्या आश्रयास गेला. इंग्रजही मराठा साम्राज्यात ढवळाढवळ करण्याची संधी शोधतच होते. त्यामुळे त्यांनी साष्टीचे बेट, वसई, कल्याण व ठाणे ही खाडीवरील शहरे तसेच मोठी खंडणी आणि सोबतच मराठी साम्राज्यात व्यापाराचा अमर्यादित अधिकाराचा परवाणा इ. गोष्टींच्या मोबदल्यात राघोबाला मदत देऊ केली. याचमुळे मराठे व इंग्रज यांच्यात तब्बल आठ वर्षे चाललेले पहिले युद्ध सुरू झाले. या युद्धात मराठ्यांचे नेतृत्व महादजी शिंदे व तुकोजी होळकर यांनी केले. मुंबईहून पुण्याकडे येणार्या इंग्रज सैन्याचा मराठ्यांनी वडगाव व तळेगाव या दोन ठिकाणी मोठा पराभव केला. जवळजवळ सर्व इंग्रजसेना मारली गेली वा जखमी झाली. यामुळे इंग्रजांनी तातडीने मराठ्यांशी वडगावचा तह केला, या तहान्वये इंग्रजांनी साष्टी, वसई, ठाणे व कल्याण हा पेशव्याचा प्रांत परत करणे, राघोबाचा पक्ष सोडून त्याला मराठ्यांच्या ताब्यात देणे, सवाई माधवरावाच्या पेशवाईवरील हक्कास पुन्हा आक्षेप न घेणे तसेच सैन्याचा खर्च न मागणे या अपमानजनक अटी मान्य मान्य केल्या. मात्र हा तह गव्हर्नर जनरल हेस्टिंग्जच्या समितीला मान्य नव्हता म्हणून इंग्रजांनी तो फेटाळला व मराठ्यांविरूद्ध उत्तर भारतात आघाडी उघडली जेणेकरून दक्षिणेतील मराठा सैन्य कमजोर होईल. कर्नल पोप हॅमने ग्वाल्हेरचा किल्ला जिंकला तर कर्नल मुर व कॅमॅक यांनी पोप हॅमसोबत कोलारस येथे महादजीचा पराभव केला. मात्र नंतर लगेच आपल्या फौजा एकत्र बांधून महादजीने २१ जुलै १७८१ रोजी सिप्री या ठिकाणी ब्रिटिशांचा पराभव केला. या जवळजवळ वर्षभर चाललेल्या लढायांमध्ये कधी इंग्रज तर कधी महादजी जिंकले मात्र निर्णायक विजय मिळवण्यात दोन्ही पक्ष अपयशी ठरले. शेवटी १३ ऑक्टोबर १७८१ रोजी मराठे व इंग्रजांनी ना लाभ ना नुकसान या अटींवर युद्ध तहकूब केले. शेवटी मे १७८२ मधे शिंदे व इंग्रज यांच्यात सालबाईचा तह झाला, ज्यात इंग्रजांना साष्टीचे बेटसमुह व मुंबईजवळील दोन बेटे सोडून इतर मुलूख पेशव्याला परत मिळाला, राघोबाला पुणेकरांच्या हवाली करणे तसेच राघोबासाठी झालेला खर्च पेशव्याने इंग्रजांना परत देणे या अटी होत्या. हा तह नाना फडणवीसास मान्य नव्हता मात्र महादजीने मोठ्या मिनतवार्या करून नानास तहास मान्यता देण्यास भाग पाडले. तह मंजुर झाल्यावरच इंग्रजांनी महादजीच्या प्रदेशावरचा ताबा सोडला व राघोबास पुण्यास पाठवले. नंतर नाना व महादजीने राघोबास कोपरगावच्या वाड्यात बंदी बनवले व सतराशे पंचाऐशी साली मृत्यू होईपर्यंत तो तेथेच कैदेत होता.
या लेखाच्या दुसऱ्या भागात आपण महादजी शिंदेच्या मुघल दरबारातील कामगिरी व उत्तर भारतात मराठ्यांच्या प्रतिष्ठेच्या पुन:र्स्थापनेची माहिती घेऊ.
संदर्भ :
१) मराठी रियासत : गो. स. सरदेसाई.
२) फॉल ऑफ मुघल एंपायर : सर जदुनाथ सरकार.
(या लेखातील काही मजकूर अथवा संपूर्ण लेखाचा माझ्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे वापर केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल)
No comments:
Post a Comment