विनोद जाधव एक संग्राहक

Monday 10 August 2020

काकोरी लुट

 




काकोरी लुट

ऑगस्ट १९२५. दोन दिवसांपूर्वीच लखनौच्या छेदीलाल धर्मशाळेत ते दहा तरूण उतरले होते. गुप्तपणे. एकमेकांशी काहीही ओळख न दाखवता. आज ते लखनौवरून येणाऱ्या आणि डेहराडूनकडे जाणाऱ्या ‘आठ डाऊन’ ट्रेनची वाट पहात उभे होते. त्यापैकी तिघे जण दुसऱ्या वर्गाच्या डब्यात चढणार होते तर सात जण तिसऱ्या वर्गाच्या डब्यात. आदल्याच रात्री त्यांनी हीच ‘आठ डाऊन’ ट्रेन लखनौ स्थानकाजवळ अडवण्याचा प्लॅन केला होता; पण काही क्षण त्यांना उशीर झाला आणि ट्रेन सुटली. सर्वजण निराश होऊन लखनौला छेदीलाल धर्मशाळेत परतले. त्यांच्या म्होरक्याने मग योजनाच बदलली. असं ठरलं की हे सगळे दुपारीच्या गाडीने लखनौच्या पुढच्या एका छोट्या स्थानकात जातील आणि तिथून मग ह्या ‘आठ डाऊन’ ट्रेनमध्ये चढतील. तो दिवस होता ९ ऑगस्ट १९२५ - ते छोटं स्थानक होतं ‘काकोरी’ - आणि तरूणांचा तो म्होरक्या होता पंडीत रामप्रसाद ‘बिस्मिल’!

ट्रेन काकोरी स्थानकात आली. दहापैकी तिघेजण - अश्कफुल्ला खान, राजेंद्र लाहिरी, आणि सचिंद्रनाथ बक्षी - हे दुसऱ्या वर्गाच्या डब्याची तिकीटं काढून चढले. उरलेले सातजण - पंडीत रामप्रसाद ‘बिस्मिल’, मुकुन्दीलाल, बनवारीलाल, कुंदनलाल गुप्त, केशव चक्रवर्ती, मन्मथनाथ गुप्त, आणि चंद्रशेखर आझाद - हे तिसऱ्या वर्गाची तिकीटे काढून ट्रेनमध्ये चढले आणि विखरून बसले. रामप्रसादांनी आधीच सांगितलं होतं की ट्रेन एका विवक्षित ठिकाणी आली की दुसऱ्या वर्गाच्या डब्यात बसलेल्यांपैकी कोणीतरी साखळी खेचेल - कारण तिसऱ्या वर्गाच्या डब्यातील साखळी धड असेल आणि ती खेचल्यावर ट्रेन थांबेल ह्याची खात्री नव्हती. ठरल्या ठिकाणी राजेंद्र लाहिरींनी दुसऱ्या वर्गाच्या डब्यातून साखळी खेचली. ट्रेन कर्कश्य आवाज करत थांबली. रात्रीचा काळोख. तिसऱ्या वर्गातल्या उतारूंनी पटापट खाली उड्या मारल्या आणि ह्यात आपले सात जणही होते. गाडी का थांबली पहायला गार्ड खाली उतरला आणि त्या दुसऱ्या वर्गाच्या डब्याकडे तिसऱ्या वर्गाच्या गर्दीसमोरून जाऊ लागला. त्याच्यावर पिस्तूल रोखून त्याला खाली पाडण्यात आलं. सगळ्या क्रांतिकारकांनी ठरवलेली कामं करायला सुरूवात केली. सोबतच्या ‘मॉसर’ पिस्तुलांना दस्ते लावले गेले. लोहमार्गाच्या दोन्ही बाजूस उभे पाहून पहारा सुरु केला गेला. गाडीतल्या उतारूंना ओरडून सांगण्यात आलं की - आम्ही सरकारचा खजिना लुटायला आलो आहोत. ऊतारूंना काहीही अपाय होणार नाही. कोणीही खाली उतरू नये किंवा खिडकीतून बाहेर डोकावू नये.

गार्डच्या डब्यातली मोठी लोखंडी तिजोरी खाली लोटून देण्यात आली. सोबत आणलेल्या मोठ्या छिन्नी हातोड्याने ती तिजोरी उघडायचे प्रयत्न सुरु झाले. रात्रीचा काळोख, त्यात उभी असलेली ट्रेन, आणि तिजोरीवर पडणाऱ्या घणांचा आवाज! रामप्रसाद आणि अश्कफुल्ला हे त्यांच्यात बलदंड. ते आळीपाळीने तिजोरीवर घाव घालत होते. हे सुरु होतं इतक्यांत समोरून दुसऱ्या एका ट्रेनचा आवाज ऐकू आला. दहाही जण शहारले. सरकारी कुमक इतक्यात लवकर कशी आली? रामप्रसादांना आठवलं की ही तर ‘पंजाब मेल’. भराभर सर्वांनी हत्यारं लपवली. घण मारणे बंद केले. थांबलेल्या गाडीतले उतारू वाटावेत असे सगळे जण उभे राहिले. पंजाब मेल मात्र न थांबताच निघून गेली. सर्वांना हायसे वाटले. तिजोरी फोडणे पुन्हा सुरु झाले. शेवटी एकदाची ती तिजोरी फाकली. त्यातून सर्वांनी पैश्यांच्या थैल्या काढून घेतल्या. सर्वजण शिस्तीने लखनौच्या विरूध्द दिशेला पळून गेले; पण पुढे ठरल्या ठिकाणी भेटून पुन्हा सर्व लखनौकडे पळाले. थैल्यांमधून पैसे काढून घेऊन त्या त्यांनी एका खड्ड्यात टाकून दिल्या. पैसे रामप्रसादांनी एका अज्ञात ठिकाणी लपवले.

हा दरोडा भारतभर भरपूर गाजला. इतका की व्हाईसरॉयकडून लंडनला भारतमंत्र्यालाही सर्व अद्ययावत बातम्या तारेने कळवल्या जात असत. (ह्यातील काही तारा ब्रिटिश लायब्ररीत जपून ठेवलेल्या आहेत. सोबतचे फोटो पहा.) सगळीकडे छापे आणि अटकसत्रं सुरु झाली. पोलिसांनी शाहजहानपुरमधून रामप्रसादांना पकडले. पण त्यांनी इतरांचा काहीच पत्ता लागू दिला नाही. बनवारीलाल पकडला गेला आणि त्याने माफीचा साक्षीदार व्हायचे ठरवले. (तो तर प्रत्यक्ष लुटीत सामील होता!) त्याच्याकडून ह्या सगळ्यांची नावे आणि ठावठिकाणा पोलिसांना मिळाला. एकूण २५ आरोपी पकडले गेले. काकोरी लूट हा एका मोठ्या कटाचा भाग होता आणि खरा कट हिंदुस्थानच्या बादशहाकडून (!) सशस्त्र बंड करून हिंदुस्थानचं सार्वभौमत्व हिरावून घेण्यासाठी होता असं स्वरूप ह्या खटल्याला देण्यात आलं. जस्टिस सय्यद ऐनऊद्दीनसमोर लखनौ उच्च न्यायालयात सुनावणी ४ जानेवारी १९२६ रोजी सुरु झाली. हा ‘काकोरी खटला’ही बराच गाजला. पुढे १ मे १९२६ रोजी जस्टिस हॅमिल्टनकडे हा खटला सोपवला गेला. तिथून दहा महिने - मार्च १९२७ पर्यंत साक्षीपुरावे चालले. सरकारने (त्या वेळचे!) सुमारे ११ लाख रुपये ह्या खटल्यावर खर्च केले.

सर्व क्रांतिकारी दोन गाड्यांनी कोर्टात आणले जात. ते देशभक्तीपर गाणी गात असत. घोषणा देत असत. लोकांची भरपूर गर्दी होत असे. ६ एप्रिल १९२७ रोजी ‘सरफरोशी की तमन्ना’ हे गाणे म्हणत सर्वजण कोर्टात शिरले. जस्टिस हॅमिल्टनने शिक्षा सुनावल्या. पंडीत रामप्रसाद ‘बिस्मिल’, राजेंद्र लाहिरी, ठाकूर रोशनसिंग, आणि अश्कफुल्ला खान ह्यांना फाशी झाली. अनेकांना जन्मठेप, १४-१०-७-५-४-३ वर्षांचे सश्रम कारावास झाले. सर्वमान्य पध्दत म्हणून फाशीविरूध्द दयेचा अर्ज करण्यात आला. अपेक्षेनुसार तो ३ ऑक्टोबर १९२७ रोजी सरकारकडून फेटाळला गेला. १९ डिसेंबर हा पंडीत रामप्रसाद ‘बिस्मिल’ साठी फाशीच्या दिवस मुक्रर करण्यात आला. सकाळी ६:३० वाजता त्यांना फाशीच्या तख्ताकडे नेण्यात आले. त्यांनी ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’ च्या घोषणा दिल्या. शेवटची इच्छा विचारल्यावर ते म्हणाले - “ब्रिटिश साम्राज्याचा विनाश व्हावा ही माझी इच्छा आहे”. वेदांमधला ‘विश्वान् देवान् सवितुर्दुरितानि’ हा मंत्र ते म्हणू लागले. फास आवळला गेला. मंत्र थांबला.

मृत्यूच्या आधी तीन दिवस रामप्रसादांनी भारतमातेच्या सेवेसाठी पुनर्जन्म घ्यायची इच्छा त्यांच्या डायरीत लिहून ठेवली होती. ते लिहीतात -

यदि देश-हित मरना पडे मुझको सहस्रों बार भी
तो भी न मैं इस कष्ट को निज ध्यान में लाऊ कभी ।
हे ईश भारतवर्ष में शत बार मेरा जन्म हो
कारण, सदा ही मृत्यू का देशोपकारक कर्म हो ॥

आज काकोरी लुटीत सामील असणाऱ्या सर्व क्रांतिकारकांना शतश: नमन!

- संकेत कुलकर्णी (लंडन)

फोटो (ब्रिटिश लायब्ररीतून) :-

1. भारतमंत्र्याला काकोरी लुटीची माहिती कळवणारी तार - १७ ऑगस्ट १९२५
2. वर्तमानपत्रात आलेली बातमी - २० ऑगस्ट १९२५
3. काकोरी खटल्याचे कागद - मुखपृष्ठ
4. चौघा क्रांतिकारकांची फाशी कायम केलेल्या निर्णयाची तार - ४ ऑक्टोबर १९२७

#यांनी_घडवला_भारत

#इतिहासाच्या_पाऊलखुणा

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...