विनोद जाधव एक संग्राहक

Monday 10 August 2020

#कोंडाजी_बाबांचा महापराक्रम आणि बलिदान.

 

#स्वराज्याचे शिलेदार

 #कोंडाजी_फर्जंद

#कोंडाजी_बाबांचा महापराक्रम आणि बलिदान.

'कोंडाजी बाबा' हा स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील शब्द.
इतिहासात कोंडाजी बाबा असा उल्लेख नाही. कोंडाजी फर्जंद असा
उल्लेख आहे.
टीव्हीवरील मालिकेत कल्पना आणि शब्द स्वातंत्र्य घेता येते.
थोडा काल्पनिक भाग सोडला तर हि मालिका बरीच इतिहासाला धरून अशी आहे.सध्या सुरु असलेल्या झी मराठी वाहिनीवरील स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील कोंडाजी बाबांचा मृत्यू प्रेक्षकांच्या हृदयाला चटका लावून गेला. जंजिऱ्याच्या सिद्दीला उभा सोलून काढावा इतपत लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला.वाचकांनी आग्रहाने 'कोंडाजी बाबांवर आपण लिहू शकाल का?' म्हणून विचारणा केली.वाचकांच्या विनंतीस मान देऊन हा लेख खास महाराष्ट्र धर्मच्या वाचकांसाठी लिहीत आहे.

बखरींच्या गर्दीत आपल्याला कोंडाजी फर्जंद यांच्या संबंधित जंजिरा प्रकरणाची नक्की माहिती कुठे मिळते ते आपण पाहणार आहोत.
दोन बखरींमध्ये आपल्याला ह्या कोंडाजी फर्जंद ह्यांची ह्या जंजिरा प्रकरणी माहिती मिळते.पण त्या अगोदर आपण 'फर्जंद' ह्या शब्दाचा मागोवा घेणार आहोत. महाराष्ट्र धर्म समूहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम यांच्या अभ्यासानुसार;

कोंडाजी फर्जंद ह्या शब्दातील फर्जंद शब्दाचा नेमका अर्थ काय होतो, आणि ह्याचा संबंध काय आहे ते तपासू. #छत्रपती_शिवाजी_महाराजांच्या पदरी कोंडाजी फर्जंद म्हणून महा-शूर होता. 'फर्जंद' (بچه ) ह्या फारसी शब्दाचा अर्थ मूल किंवा अपत्य असा होतो. ( ह्यात मुलगा किंवा मुलगी असे दोन्हीही अर्थ अभिप्रेत आहेत.) मराठीत मात्र 'फर्जंद' ह्या शब्दाला उप-स्त्रीपासून (दासीपासून नाही) झालेला मुलगा असा एक अर्थ प्रचलित आहे. ह्या उप-स्त्रीपासून जन्माला आलेले वंशज स्वतःला 'फर्जंद' असे आडनाव लावत असत.

महत्वाचे: उप-स्त्रीपासून झालेल्या मुलालाच फक्त 'फर्जंद' म्हणत असत असे नाही. 'एखाद्यास आपल्या मुलाप्रमाणे मानणे' ह्यासही 'फर्जंद' हा शब्द वापरत असत.उदारहर्णार्थ जावळीच्या एका महजरात ' बाळाजी चंद्रराव याचा फर्जंद दौलतराव' असा उल्लेख आहे. अब्दुल करीम बहलूलखान ह्याने गदगच्या देसायास पाठविलेल्या कौलनाम्यात ' तुवा फर्जंददाखील आहेसी' असे म्हंटले आहे. म्हणजे तू मला मुलासारखा आहे असा त्याचा अर्थ होतो.
शिवाजी महाराजांच्या फौजेतील काही लोक स्वतःस फर्जंद असे आडनाव लावत असत. ह्याचा अर्थ शिवाजी महाराज ह्यांना मुलांप्रमाणे जवळचे मानीत असा अर्थ आहे. बकाजी फर्जंदाच्या बाबतीत एका पत्रात ' तू साहेबांचा कदीम ईतबारी फर्जंद, पेशजी तुझ्या बापाने साहेबांचे येथे कष्ट मशागत व चाकरी केली.' असा स्पष्ट उल्लेख आहे.
कदीम म्हणजे जुना, इतबारी म्हणजे विश्वासू आणि पेशजी म्हणजे या पूर्वी असा अर्थ आहे.ह्या बकाजीचा बाप हा शिवाजी महाराजांच्या पदरी होता आणि त्याने फार मेहनतीने आणि विश्वासाने कामे केली होती.
कोंडाजी फर्जंद ह्यांचा बखरींतील उल्लेख. जेधे शकावली आणि सभासद बखरीत कोंडाजी फर्जंदाचा उल्लेख आलेला आहे. चिटणीस बखरीत शिवाजी महाराजांच्या सरदारांची जी यादी दिलेली आहे त्यात हिरोजी फर्जंद याच्या बरोबरच तुळोजी, महादजी, नागोजी आणि हरबाजी असे आणखी चार फर्जंद आडनावाचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात जंजिऱ्याच्या सिद्दीच्या इतिहासाची आपल्याला बरीच माहिती मिळते. अगदी थोडक्यात काही माहिती अशी. #जंजिऱ्याच्या उरावर शिवाजी महाराजांनी दुसरा जंजिरा उभा केला आणि तो म्हणजे कुरटे बेटावरील सिंधूदुर्ग किल्ला.
सिंधुदुर्गचा एका बखरीतील उल्लेख असा आहे.
#सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मान तारा।जैसे मंदिराचे मंडन,श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार।चतुर्दश महा रत्नांपैकी पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले।शिवाजी महाराजांनी समुद्रावर जे आरमार आणि किल्ले उभे केले त्या विषयी सभासद बखरीतील थोडक्यात उल्लेख असा आहे:
"शिवाजी राजियांनी व्यंकोजी द्त्तोस फौजेनिशी नामजाद केले. त्यांनी जाऊन सिद्दीचा मुलुख मारून हल्ला केला. तीनशे हबशी व्यंकोजीने मारले. दस्त फार केली. बारा जखमा ब्यंकोजीस खासा लागल्या. येशा चौक्या जागोजागी बसवून आले. सिद्दीने सल्याचे नाते लाविले परंतु राजियांनी सला केलाच नाही. राजियांनी समुद्रात जागाजागी गडकोट नवेच केले. गड बांधून कुल देशच काबीज केला. ठाणी ठेविली. मग सिद्दीचा इलाज चालेना. राजियांची जहाजे पाण्यांत सजिली. गुराबा व तरांडी व तारवे गलबते शिवोडा गुरोबा ऐसे नाना जातीची जहाजे कब्ज करून दर्या सारंग म्हणोन मुसलमान सुभेदार व नायक भंडारी म्हणोन ऐसे दोघे सुभेदार करून दोनशे जहाजे एक एक सुभा ऐसे आरमार केले."

आता आपण मुख्य विषयाकडे वळू.
#छत्रपती_संभाजी_महाराजांच्या इतिहासात जंजिऱ्याच्या सिद्दीच्या इतिहासाची माहिती हि फार थोडी आहे. कोंडाजी फर्जंद ह्यांची जंजिरा किल्ला फितवा करून मिळविण्याची मोहीम अपयशी ठरली आणि ह्या घटनेत त्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.
मुळात कोंडाजी फर्जंद ह्यांची आपल्याला प्रकर्षाने माहिती मिळते ती शिवाजी महाराजांच्या वेळी पन्हाळा किल्ला जिंकून घेण्याच्या मोहिमेत.
६ मार्च १६७३ रोजी अवघ्या ६० मावळ्यांच्या मदतीने कोंडाजी फर्जंद यांनी पन्हाळा स्वराज्यात जिंकून आणुन दाखविला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही अतुलनीय घटनांपैकी हि एक अविस्मरणीय अशी घटना आहे.महत्वाचे: कोंडाजी फर्जंद ह्यांना पन्हाळा किल्यावर गनिमी काव्याने फितवा करून किल्ला जिंकून घेण्याचा अनुभव होता. आणि ह्याच अनुभवाचा दुसरा प्रयोग जंजिऱ्यावर करण्यात आला.छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत जंजिऱ्याच्या मोहिमांविषयी ज्या काही हालचाली झाल्या त्यांच्याविषयी पुढे जाऊन बखरी लिहिणाऱ्या बखरकारांना फारशी माहिती नव्हती असे दिसते.
बखरींची भाषा समजायला थोडी कठीण वळणाची. वाक्य पुन्हा पुन्हा वाचून शब्दांचे अर्थ समजून घ्यावे लागतात. खालील बखरींची भाषा वाचताना तुम्हा वाचकांस थोडे कष्ट पडतील. पण हट्टाने हे सगळं वाचा. ह्यात तुम्हाला कोंडाजी फर्जंद ह्यांच्याविषयी बखरींतील अस्सल माहिती मिळेल.
मराठी साम्राज्याची छोटी बखर जंजिऱ्याच्या मोहिमेविषयी काही माहिती सांगते. परंतु ते सगळे सांगत न बसता बखरींत जिथे कोंडाजी फर्जंद ह्यांचा उल्लेख आला आहे तेव्हड्या बखरींची माहिती मी तुम्हास सांगतो.
मल्हार रामराव लिखित बखरीत पुढीलप्रमाणे माहिती आहे:
...त्यानंतर कोंडाजी फर्जंद यांनी आपण जंजिरे येथे जाऊन फितूर करतो असे म्हंटल्यावरून रवाना केला. त्याने तिकडे जाऊन ( जंजिऱ्यास जाऊन) चाकरी धरिली.जंजीऱ्यात जाऊन दारूखाना वगैरे आग लावून जाळवावे, भेद होईल तो करावा, असे (संभाजी महाराजांनी) सांगून ठेविले होते.
याने ( कोंडाजीने) बटकी खरेदी करून ( बटकी म्हणजे ठेवलेली बाई) त्यांना आपल्या मावळ्यांच्या बायका करून देऊन, आपणही एक ठेऊन काबिले सुद्धा म्हणोन जंजिऱ्याच्या सिद्दीच्या चाकरीस राहिले.
( हा बनाव एका गुप्त योजनेचा भाग होता.बटकी केवळ गुप्त योजनेचा भाग म्हणून ठेवली होती. ) काही दिवसांनी काझी महंमद तालकर याची बांदी (?) संभाजी महाराजांच्या लष्करास गेली होती ती तेथे त्याने ओळखली. आणि जंजिऱ्याच्या हबशास सर्व वर्तमान सांगितले.
ते समई चौकशी करिता सर्व कळले.नंतर कोंडाजी फर्जंद याची डोचकी मारिली. कोणास समुद्रात बुडविले, कोणी पळाले, असे जाहले.
हे वर्तमान संभाजी महाराजांस कळलियावरी जंजिरा कसे करून घ्यावा हे मनात आणिले.ते समई कबजीचे (कवी कलश) मार्फतीने 'दादाजी रघुनाथ देशपांडे परभू महाडकर' ( हा कायस्थ प्रभू होता. म्हणजे आजचे सी. के. पी. ) यानी जंजिरा घेऊन देतो म्हणोन संभाजी महाराजांपाशी बोलणे लाविले.तेंव्हा जंजिरा घेण्याविषयी मसलत करावी हा मनातील खंबीर, त्यात कबजीचे राजकारण, जंजिरा घेऊन दिला म्हणजे मजमू अमात्यपद द्यावे असा करार यादीवर करून देऊन, आरमाराचे सुभे दौलतखान व मायनाक व काबजी महंमद व गोविंदजी कान्हो, सरंजाम सुद्धा मदतीस देऊन व लोक बरोबर देऊन दादाजी देशपांडे जंजिऱ्यास रवाना केले.."
तर असा हा थोडक्यात कोंडाजी फर्जंद ह्यांची अस्सल माहिती सांगणारा बखरीतील पुरावा.

जेधे शकवलीत आपल्याला ह्याची नोंद आढळत नाही.
मात्र एका वतनासंबंधीच्या बखरीत पुढील मजकूर आढळतो:
खालील भाषा जरा अधिक कठीण आहे. मन लावून मोठ्याने वाचा म्हणजे समजेल."जंजिऱ्यावर एल्गार होतो म्हणून....आला.
त्यावर दादप्रभूस नेऊन याचा वारस राखीला.
त्यावर कुमाजीने कोंडाजीशी राजकारण केले कि जंजिरा घ्यावयाची एक तजवीज आहे. एक जीवास पन्नास माणूस. यांस नावाजावे आणि पालख्या द्याव्या आणि लोकांच्या बटकी त्यांस कबिले द्यावे आणि जंजिरा पळोन गेलेसे करावे. आणि ते जाऊन चाकर राहतील आणि जंजिरा काबीज करीतील. ऐसी तजवीज कोंडाजी, शेषोपंत व कुमाजी ऐसे रामेश्वराच्या देवळात बैसोन केली.त्याजवर ते पन्नास माणूस जंजिरा आले. ते खबर हजरत भिस्तीरोजी खानसाहेब यांस कळली. मग त्यांनी शास्ती फर्माविल्या. शास्ती करून पलीकडे उतरविले. ते शास्तीनूर तळीयाशी गेले. त्या शास्तीनूरातून एक मुख्य केला कि, हे खबर रुद्राजीने पोहचवली आणि कलिंगडे पाठविली होती.ऐसा कोंडाजीचा निशा कुमाजीने केला. त्यावर रुद्राजीने घरदारही लुटून हत्तीखाली घालावयासी गंगोली पावेतो नेले.
यास हे खबर महादजी बाजीने ऐकली. तो गांगवलिस आले. मग मुकुंद धोंडी देऊन सुभेदार व महादजी बाजी ऐसे मिळोन कोंडाजीची बहुत आजीजी केली. मग गंगोलीहून फिरविले. जमाना घेऊन सोडिले.
एक तागा सडा तो दिल्हा नाही. ऐसा सत्यानाश करविला. ऐसी खबर भिस्तीरोजी साहेब यांसी मालूम जाली. तेंव्हा पन्नास माणूस पालखीत घालून एक वरीस तलास करून आणला तो कुमाजीजवळ हातेर (हत्यार) तरकस होता. तैसाच धरून जंजिरा आणिला. मार चुना सिंपसिंपोन मार करीत जीवेच मारावा. मग दंड ५ हजार केला. त्यावर समान समानीनांत आपले बाप साहेबांचे बंदगीस राजापुरास आलो."
तर अशी कोंडाजी फर्जंद ह्यांच्याविषयी बखरींतील माहिती.
मल्हार रामराव लिखित बखरीतच आपल्याला ह्या कोंडाजींच्या जंजिरा प्रकरणाची माहिती नीट मिळते.

महत्वाचे: बखरी पूर्णतः विश्वसनीय नसतात. या अर्थी पूर्णतः अविश्वसनीय असतात असेही नाही.महाराष्ट्र धर्म समूहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम यांच्या अभ्यासानुसार;

बखरीतील फक्त चार ओळींची माहिती.
पण कोंडाजी फर्जंद ह्यांचा जंजिऱ्यावरील प्रत्यक्ष प्रसंग अंगावर शहारे आणणारा आणि अकल्पनीय असाच होता. दुर्दैवाने ह्या विषयी आपल्याला सखोल माहिती मिळत नाही. म्हणूनच झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत ह्या कल्पना विश्वाला जागा करून देण्यात आली. इतिहासात 'लवंगी बाई' असा कुठलाही उल्लेख नाही.
मालिकेत 'बटकी ठेवली' ह्या अर्थी ह्या लवंगी बाई शब्दाचा प्रयोग केला गेला असावा. अब्दुल्ला दळवी हि खरी व्यक्ती आहे. अब्दुल्ला दळवीचा आणि कोंडाजी फर्जंद ह्यांचा संबंध नाही. कोंडाजी प्रकरणात अब्दुल्ला दळवी मारला गेला नाही. अब्दुल्ला दळवीचा उल्लेख पुढील काही घटनांमध्ये आहे.
संभाजी महाराजांच्या संबंधित बखरींत जंजिरा प्रकरणाशी संबंधित काही अजून नावे सापडतात ती अशी. संभाजी महाराजांकडील लोक: मायनाक भंडारी, मायनाक भंडारीचा पुत्र, गोविंदराव काथे, गोविंद कान्हो, गोविंदराज जाधव, दादाजी परभू, संताजी पवळा, आरमार प्रमुख दौलतखान, काबजी महंमद, सिद्दी मिस्त्री. जंजिऱ्याच्या सिद्दीकडील लोक: अब्दुल्ला दळवी मुख्य, हसनजी छर्ग, आबाजी व मत्तीखान दोघे भाऊ, हसनजी व मलीकजी बिन युसूफ नाईक, मोरा तांडेल, युसूफ तांडेल, सैद दौलत, दंडाराजपुरीचा महमूद माखनजी आणि धोंडाजी, काजी महंमद तालकर, खैरतखान हबशी.
आता जंजिरा मराठ्यांनी जिंकला का? नाही. मात्र मराठ्यांनी जंजिरा जिंकून घेण्याचे प्रचंड प्रयत्न केलेले आहेत. ह्याच विषयावर लिहायला घेतले तर पुढील सहा महिने मी लिहू शकेल इतकी आपल्याकडे ह्या जंजिरा प्रकरणाची माहिती आहे. होय हे सत्य आहे कि; संभाजी महाराजांनी थेट जंजिरा किल्ल्यापर्यंत सेतू बांधायचा उपक्रम हाती घेतला होता. पण औरंगजेबाचे दक्षिणेकडील वाढते आक्रमण ह्यांमुळे संभाजी महाराजांना ह्यात पूर्ण लक्ष घालता आले नाही. शिवाय ह्या परियोजनेवर पैसा आणि माणसांचे प्राण अतोनात खर्च होत होते.
महाराष्ट्र धर्म समूहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम यांच्या अभ्यासानुसार;

महत्वाचे: संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर पुढे २५ वर्ष जंजिऱ्याचे सिद्दी मराठ्यांशी मैत्रीचा तह करून स्वस्थ बसून होते.
पुढे त्यांनी परत कुरापती सुरु केल्या.महत्वाचे: मराठ्यांनी पुढे जंजिऱ्याच्या सिद्दीस फक्त जंजिरा किल्ल्यापुरतेच आवळून ठेवले होते. मराठ्यांनी सगळा जंजिरा परिसर जिंकून आपल्या ताब्यात आणला होता. जंजिऱ्याच्या सिद्दींत घरगुती भांडणे खूप होती. त्यामुळे जंजिऱ्यावर कुठला सिद्दी बसवायचा ह्याचा निर्णय हा मराठ्यांना विचारूनच होत असे. #मराठेशाहीतील सरखेल कान्होजी आंग्रे आणि पुढे तुळाजी आंग्रे कुटुंबाचे स्वराज्याप्रती फार फार मोठे योगदान आहे. "जो अंजनवेल घेईल त्यास सरखेलीचें पद देऊं" अशी अट शाहू छत्रपतींनी घातली होती. त्याप्रमाणें तुळाजीनें स. १७४२ त अंजनवेलचा किल्ला जिंकून घेतला. त्यामुळे शाहू छत्रपतींनी तुळाजीस सरखले ही पदवी देऊन सुवर्णदुर्गापासून थेट दक्षिण कोंकणपर्यंतची हद्द वाटून दिली होती. आंग्रे-प्रकरणांत (१७५५-५६) इंग्रजांस घरांत घेण्याची पेशव्यांनी अक्षम्य चुकी केली. मानाजी व तुळाजी आंग्रे ह्या भावांच्या तंटयांत पेशव्यांनी तंटे सोडण्याऐवजी ते वाढतील कसे ह्यावर भर दिला.
इंग्रजांच्या छातीवर आंग्रे हे जबरदस्त दडपण होते, ते नाहीसे करण्यास इंग्रज फार उत्सुक होते व ती संधि आपण होऊन पेशव्यानीं दिली आणि इंग्रजांनी पेशव्यांस बाहुल्याप्रमाणे खेळवून आपला फार दिवसांचा हेतु तडीस नेला.
अत्यंत महत्वाचे: तुळाजी आंग्रेंच्या सारख्या मातब्बर शूर वीराचा जंजिरा प्रकरणी मोठा उपयोग करून घेता आला असता. मात्र #शाहू_छत्रपतींच्या पश्चात, पेशव्यांनी तुळाजीचा फार छळ केला. पेशव्यांनी 'गुप्त राजकारण मनात ठेऊन' मराठा शाहीतील जी काही मंडळी मुद्दाम दुःखवून दूर केली त्यात तुळाजी आंग्रे ह्यांचेही नाव आहे. रा.वासुदेवशास्त्री खरे म्हणतात की, "तुळाजी हा चित्पावन ब्राम्हणांचा कट्टा द्वेष्टा असून तो त्यांचा फार छळ करीत होता" (मराठे व इंग्रज प्रस्तावना, पृ. १८). त्यानें ब्राह्मणांस फार उपद्रव केला. रयतेस छाडाछेड केली. तो सरकारांत नेमणुकीप्रमाणें ऐवज न भरता उद्दामपणे वागू लागला व पेशव्यांस मुळीच जुमानीनासा झाला. ताराबाईचा व पेशव्यांचा तंटा जोरांत असता तुळाजीनें उचल घेतली; आरमाराच्या जोरानें पेशव्याविरुद्ध वावरणाऱ्या तुळाजीस नुसत्या फौजेच्या बळावर जिंकणे पेशव्यास शक्य नव्हते. या कारणास्तव आरमारास प्रति-आरमार आणून तुळाजीशी युद्ध करण्याचा व्यूह रचला. तुळाजीचा नाश करण्यास इंग्रज टपलेलेच होते. यामुळें पेशव्यांनी इंग्रजांची मदत मागताच त्यांनी ती मोठ्या खुषीने देऊं केली.'हेतुपुरस्पर व्यक्ती दोष मनात ठेवून' इंग्रजांच्या मदतीने मराठा आरमार मोडून काढायचे महापाप पेशव्यांनी केलेले आहे. दुर्दैव मराठ्यांच्या इतिहासाचे. असो. आंग्रे प्रकरणावर भविष्यात लिहिणार आहे.

एक जंजिरा स्वराज्यात नसला म्हणून काय झाले; शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सागरी-गडकोट किल्ल्यांच्या श्रुंखलेतील सिंधुदुर्ग, पदमदुर्ग असे किल्ले हे जंजिऱ्याच्या उरावर बसण्यासाठीच बांधलेले होते.
सिद्दी मुहमंदखान हा शेवटचा जंजिऱ्याचा सिद्दी होता. जंजिरा संस्थानच्या स्थापनेपासून म्हणजे इ.स.१६१७ पासून ते थेट ३ एप्रिल १९४८ पर्यंत म्हणजे ३३१ वर्षांनी हे जंजिरा संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले आणि भारताचा अविभाज्य अंग बनले. कोंडाजी फर्जंद, सुभेदार तानाजी #मालुसरे, #कंक मंडळी, #जेधे-बांदल, बाजी #पासलकर,प्रतापराव #गुजर, सूर्याजी #काकडे, हंबीरराव #मोहिते, जिवा #महाला असे असंख्य रणमर्द आणि अगणित ज्यांची नावेही इतिहासात सापडत नाहीत अश्या मर्द मावळ्यांनी आपल्या रक्ताचे सडे शिंपून हे हिंदवी स्वराज्य राखले आणि वाढविले आहे.

कोणासाठी ह्या वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले?
आपल्या स्व-भाषेसाठी
आपल्या स्व-धर्मासाठी,
आपल्या स्व-देशासाठी,
आपल्या राजासाठी,
आया-बहिणींची अब्रू वाचविण्यासाठी,
गाया वासरांच्या रक्षणासाठी
भगव्या झेंड्यासाठी
आणि सगळ्यात महत्वाच्या आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी.
म्हणजेच आपल्यासाठी...

श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...