विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 8 August 2020

🚩"सेनापती कापशीकर घोरपडे आणी इचलकरंजीकर घोरपडे"🚩

 

🚩"सेनापती कापशीकर घोरपडे आणी इचलकरंजीकर घोरपडे"🚩
postsaambhar:साईप्रसाद गुत्तीकोंडा
कोल्हापूर प्रांताची देशमुखी व सरदेशमूखी कापशीकरांकडे विजापूरकरांच्या अमदानीपासून चालत आली आहे.छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकीर्दीत संताजीराव घोरपडे हे सरसेनापती बनले.सरसेनापती संताजीरावांचे दोन विवाह झालेले होते.त्या दोन्ही पत्नीला प्रत्येकी एक मुलगा होता.पहिल्या पत्नीच्या मुलाचे नाव होते राणोजीराजे आणी दुसऱ्या पत्नीच्या मुलाचे नाव होते पिराजीराव.या दोन मुलांच्या खेरीज संताजी घोरपडे यांचा एक मानसपुत्र होता.त्याचे नाव होते "नारायण महादेव उर्फ नारोपंत जोशी."
नारोपंत मुळात हुशार आणी त्यात सरसेनापतींच्या मानसपुत्राचा मान त्यांना होता.संताजीच्या प्रत्येक लढाईत नारोपंत असायचा त्यामुळे त्याला युद्धाचा अनुभव चांगला होता.शिवाय सरसेनापती सदैव लढाईच्या आणी छत्रपतींच्या कामगिरीवर व्यस्त असल्याने त्यांनी आपल्या जहागीरीचा कारभार नारोपंताला सोपवला.सरसेनापतींच्या एकंदरीत जहागीरीचे रक्षण नारोपंताने खंबीरपणे केले.
त्यानंतर सरसेनापती संताजीरावांचे सेनापती पद गेले. त्यांचा म्हसवड नजीकच्या कारखेल गावी खून करण्यात आला.त्यांच्या मृत्यूच्या वेळी राणोजीराजे आणी पिराजीराव लहान होते.मात्र त्यानंतर संताजींचे थोरले पुत्र राणोजीराजे यांचे युध्दात निधन झाले .कापशी जहागीरीचा कारभार सांभाळायला कोणी सक्षम नव्हते. त्यामुळे कापशी जहागीर कोणीही गिळुन टाकली असती पण नारोपंताने सरसेनापतींच्या फौजेला आणी त्यांचे बंधु गजेंद्रगडचे बहिर्जी घोरपडे यांच्या फौजेला एकत्र आणून कापशीच्या जहागीरीत तैनात केल्याने कापशी संस्थानाच्या भोवती सैनिकी ताकद दिसू लागली.
छत्रपती राजाराम महाराजांच्या नाराजीमुळे जरी संताजींचे सेनापती पद काढून घेतले असले तरीही
छत्रपती ताराराणीसाहेबांच्या काळात कापशीकर घोरपडे घराण्याला सरंजाम मिळाला होता.सन १७०३ -०४मध्ये हा सरंजाम बाबत महाराणी ताराबाई यांचे पुत्र छ.शिवाजीराजे दुसरे यांनी पिराजीराव यांचे नावे दिला आहे.त्यातील काही कलमे ही घोरपडे घराण्यावर छत्रपतींच्या असलेल्या मर्जीचे पुरावे आहेत. ह्यात 'मशारनिल्हे ' असा उल्लेख जिथे आहे तो पिराजीराव घोरपडे यांच्याबद्दल आहे....
(१) मशारनिल्हेचे पितें संताजी घोरपडे यांस मामले मिरज येथील अठरा कर्यातीचें देशमुखी वतनें दिलीं होतीं तेणेंप्रमाणें यांजकडे करार....
(२) सरदेशमुखीचें वतन मशारनिल्हेस पेशवीपासून होतें तेणेप्रमाणें करार. सुभा पन्हाळा व मामले मिरज....
(३) मशारनिल्हेचे वडील बंधु राणोजी स्वामिकार्यावरी पडले त्यानिमित्त त्यांची स्त्री संतुबाई इजवरी कृपाळु होऊन तिचा योगक्षेम चालण्यानिमित्त कसबे कापशी गांव इनाम दिला....
(४) नारो महादेव यांनी कष्ट मेहनत बहुत केली या बाबे त्यांस भिलवडी हा गांव इनाम दिला....
(५) मशार निल्हेकडे सरंजाम करून सरदार दिल.....
(अ) संभाजी निंबाळकर. हजार फौजेची दौलत.
(आ) वेंकटराव नारायण पांचशें जमावाची तैनात.
म्हणजे नारोपंताने त्यांचे छत्रपतींच्या दरबारातील वजन वापरून हा सरंजामजाबता कापशीकरांना मिळवुन दिला होता हे स्पष्ट आहे.शिवाय कापशी गाव हे संताजीचा मोठा मुलगा राणोजीराजे याच्या विधवा पत्नीला भविष्यातील खर्चासाठी दिला होता हे सुद्धा स्पष्ट आहे.नारोपंतांनी घोरपडे घराण्याची पारंपारिक कापशी,मिरज आणी पन्हाळ्याची वतने छत्रपतींकडून कापशीकरांना पुन्हा मिळवून दिली.आणी व्यंकटराव नारायण म्हणजे नारोपंतांचा लहान मुलगा त्याला पाचशे स्वार तैनातीस दिले.स्वतः नारोपंताला भिलवडी गाव इनाम मिळाले.
आजपर्यंत बहीर्जी राजे घोरपडे यांचे घराणे हे "गजेंद्रगडकर घोरपडे " म्हणून आणी पिराजीरावांचे घराणे हे "कापशीकर घोरपडे " म्हणून ओळखले जाते.मात्र या घटनेचा कापशीच्या अर्थकारणावर परिणाम झाला. कारण म्हाळोजीराजे घोरपडे यांचा सरंजाम सत्तावीस लाख रुपयांचा होता.मुधोळकर,गुत्तीकर,गजेंद्रगडकर आणी दत्तवाडकर घराण्याचे हिस्से वजा होऊन संताजीच्या वाट्याला नऊ लाख रुपयांचा सरंजाम मिळाला आणी संताजींचे पुत्र पिराजीराव यांना यापैकी पाच लाखांचा सरंजाम मुलुख ताब्यात मिळाला.नारोपंत नसते तर हेसुध्दा शक्य होणार नव्हते.कारण कापशीकर आपल्या पक्षास चिकटून राहिल्यानें राज्याला उपयोग होत आहे हे नारोपंताने ताराबाईंच्या प्रत्ययास आणून दिल्याने त्यांनीं मिरज व पन्हाळा येथील देशमुखी व सरदेशमुखी वतन पुन: पिराजीराव याजकडे कायम केले आणी या वतनाचा सर्व कारभार नारोपंतांना पिराजीरावांकडून त्यांच्या नावे करून दिला.
यानंतर घडलेल्या सगळ्या घटना कापशीकर घोरपडे घराण्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत.सातारा आणि कोल्हापूर या दोन छत्रपतींच्या दरम्यान कोल्हापूर संस्थान अत्यंत बळकट रहावे यासाठी कोल्हापूर गादीने घोरपडे घराण्याला अधिकाधिक सन्मान दिला.
कापशीकर घराण्यातील पिराजीराव घोरपडे यांना"सेनापती"बनवले गेले.मुख्य म्हणजे आजपर्यंत हे " सेनापती "पद कापशीकर घोरपडे घराण्याकडेच आहे.मात्र पिराजीराव घोरपडे हे वयाने लहान असल्याने सेनापती पदाची सर्व कामे त्यांचे वतीने नारोपंत पहात असत.या जबाबदारी सोबतच कोल्हापूर संस्थानच्या मंत्रीमंडळाचे सचिवपद नारोपंतांना मिळाले होते."कापशीच्या जहागीरीचा इचलकरंजी हा स्वतंत्र भाग नारायणरावास इनाम दिला" आणी नारोपंताने या उपकाराचे स्मरण म्हणून आपले आडनाव बदलून घोरपडे केले. म्हणजे इचलकरंजीकर नारायणराव घोरपडे या नावाचे कापशीसोबतचे असे भावनिक नाते होते.त्यानंतर अनेकदा नारोपंतानी कापशीकर घोरपडे घराण्याला सहाय्य केले आहे.त्याशिवाय कापशीकर घोरपडे घराण्याच्या किताबांपैकी ‘ममलकतमदार’ व मानमरातबापैकीं जरीपटका व नौबतीचा मान संताजीरावांनी मानलेले पुत्र या नात्याने बाळगण्याविषयीं नारोपंतांना मिळाले.इचलकरंजीकरांच्या घराण्यांत हा किताब व बहुमान अद्यापपर्यंत चालू आहे. नारायणराव घोरपडे हे साधे असामी नव्हते. त्यांचे पुत्र व्यंकटराव घोरपडे हे स्वराज्याच्या पेशव्यांचे जावई त्यामुळे छत्रपतींच्या दरबारात व्यंकटरावांचे वजन चांगले होते सन १७२८ मध्ये सेनापती पिराजीराव हलकर्णी येथे युद्धात मृत्यूमुखी पडले.पिराजीरावांचे पुत्र राणोजीराजे हे सेनापती बनले.पण तरीही व्यंकटरावांनी त्यांना सर्व सहाय्य केले. मात्र आर्थिक स्थितीने डबघाईला आलेले कापशी संस्थान खालसा करण्यासाठी कोल्हापूरकर छत्रपती संभाजीराजेंनी योजना केली.त्यामुळे राणोजीराजे सातारकर शाहू छत्रपतींच्या आश्रयाला गेले.तिथेही व्यंकटरावांच्या वजनामुळे कापशीकरांना आदराची वागणुक मिळे कारण कापशी जहागीरीचा मालक जरी राणोजीराजे असले तरीही जहागीरीचा भोगवटा व्यंकटरावांच्या नावाने होता.पिराजीरावांच्या मृत्युनंतर कापशीच्या देशमुखी आणी सरदेशमुखीच्या सनदा थेट व्यंकटरावांच्या नावे करण्यासाठी शाहू छत्रपती अनुकूल होते पण कापशीकरांनी नारोपंतांच्या केलेल्या सन्मानाची जाणीव ठेऊन व्यंकटरावांनी सरंजाम सन १७३४ साली राणोजीराजेंच्या नावे घेतलाव कापशीकरांना देशमुखीचा भोगवटा राणोजीराजेंच्या नावे करुन दिला.शिवाय स्वतः श्रीमंत पेशव्यांनी कापशी संस्थानची हमी घेतली. मात्र कापशी संस्थान घोरपडेंना मिळण्यासाठी व्यंकटराव आणी स्वतः पेशव्यांनी केलेले प्रयत्न जेव्हा राणोजीराजेना समजले तेव्हा त्यांनी व्यंकटरावांना सप्रेम भेट म्हणून मौजे रांगोळी हे गाव इनाम दिले.शिवाय देशमुखी सनद दिली. महाराष्ट्रातील एकंदरीत सरदार घराण्यातील वंशवेलींचा अभ्यास केला तर " कापशीकर घोरपडे " हे घराणे कोणत्याही दत्तक वारसांशिवाय आजपर्यंत अगदी थेट वारसाहक्काने " सरसेनापती " पदाचा वारसा अखंडीत चालवत आहेत.आणी आजही इचलकरंजीकर घोरपडे हे स्वतःला जहागीरीचा मालक म्हणवून न घेता भोगवटादार म्हणूनच मानतात.

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...