विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 8 August 2020

छत्रपतींचा बुद्धिबळाचा डाव

 

छत्रपतींचा बुद्धिबळाचा डावChhatrapati Shivaji Maharaj's Empire at Dervan in the form of the ...
आदिलशाहपुढे पदर पसरून राजांच्या प्राणांची भीक मागणं! स्वराजाच्या शपथा विसरून जाणं अन् मिळविलेलं स्वराज्य पुन्हा आदिलशाहच्या कब्जात देऊन टाकणं. नाहीतर शहाजी राजांचा मृत्यू. स्वराज्याचा नाश आणि शिवाजीराजांच्याही अशाच चिंधड्या उडालेल्या उघड्या डोळ्यांनी पाहणं हे आऊसाहेबांच्या नशीबी नव्हतं ! शिवाजीराजांनी स्वराज्यावर याचवेळी चालून आलेल्या फत्तेखानाचा प्रचंड पराभव केला होता. सुभानमंगळ , पुरंदर गड , बेलसर आणि सासवड या ठिकाणी राजांनी आपली गनिमी काव्याची कुशल करामत वापरून शाही फौजा पार उधळून लावल्या होत्या. सह्याद्रीच्या आणि शिवाजीराजांच्या मनगटातील बळ उफाळून आलं होतं.
अन् त्यामुळेच आता कैदेतले शहाजीराजे जास्तच धोक्यात अडकले होते. कोणत्याही क्षणी संतापाच्या भरात शहाजीराजांचा शिरच्छेद होऊ शकत होता, नाही का ?
पण शिवाजीराजांनी एका बाजूने येणाऱ्या आदिलशाही फौजेशी झुंज मांडण्याची तयारी चालविली होती , अन् त्याचवेळी शहाजीराजांच्या सुटकेकरताही त्यांनी बुद्धीबळाचा डाव मांडला होता. राजांनी आपला एक वकील दिल्लीच्या रोखाने रवानाही केला. कशाकरता ? मुघल बादशाहशी संगनमत करून मोघली फौज दिल्लीहून विजापुरावर चालून यावी , असा आदिलशाहला शह टाकण्याकरता.
राजांचा डाव अचूक ठरला. दिल्लीच्या शहाजहाननं विजापुरावरती असं प्रचंड दडपण आणलं की , शहाजीराजांना सोडा नाहीतर मुघली फौजा विजापुरावर चाल करून येतील! वास्तविक दिल्लीचे मोगल हे काही शिवाजीराजांचे मित्र नव्हते. पण राजकारणात कधीच कुणी कुणाचा कायमचा मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो. उद्दिष्ट कायम असतं.
हे शिवाजीराजांचं वयाच्या अठराव्या वर्षीचं कृष्णकारस्थान होतं. अचूक ठरलं. विजापूरच्या आदिलशहाला घामच फुटला असेल! शहाजीराजांना कैद करून शिवाजीराजांना शरण आणण्याचा बादशाहचा डाव अक्षरश: उधळला गेला. नव्हे , त्याच्याच अंगाशी आला. कारण समोर जबडा पसरलेला दिल्लीचा शह त्याला दिसू लागला. त्यातच भर पडली फत्तेखानाच्या पराभवाची. चिमूटभर मावळी फौजेनं आपल्या फौजेची उडविलेली दाणादाण भयंकरच होती.
मुकाट्यानं शहाजीराजांची कैदेतून सुटका करण्याशिवाय आदिलशहापुढे मार्गच नव्हता. डोकं पिंजूनही दुसरा मार्ग बादशहाला सापडेना. त्याने दि. १६ मे १६४९ या दिवशी शहाजीराजांची सन्मानपूर्वक मुक्तता केली. अवघ्या सतरा-अठरा वर्षाच्या शिवाजीराजांची लष्करी प्रतिभा प्रकट झाली. मनगटातलं पोलादी सामर्थ्यही प्रत्ययास आलं. वडीलही सुटले. स्वराज्यही बचावलं. दोन्हीही तीर्थरुपच. किशोरवयाच्या पोरानं विजापूर हतबल केलं. अन् ही सारी करामत पाहून इतिहासही चपापला. इतिहासाला तरुण मराठ्यांच्या महत्त्वाकांक्षा क्षितीजावर विस्मयाने झुकलेल्या दिसल्या

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...