विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 8 August 2020

#मराठा_आरमार

 





#मराठा_आरमार

मराठा आरमाराची स्थापना शिवाजी राजे भोसले यांनी १६५८ मध्ये केली. पायदळ आणी घोडदळ नंतर हे मराठा लष्करी व्यवस्थेचे तिसरे अंग झाले

" आरमार म्हणजे एक स्वतंत्र राज्यांगच आहे,जैसे ज्यास अश्वबळ त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्वतच ज्याजजवळ आरमार त्याचा समुद्र आहे "
अतिशय सुरेख आणि त्याकाळातील आरमाराचे महत्त्व सांगणारे हे वर्णन.

"स्वराज्य निर्मितीचा गडकिल्ले आणि सह्याद्रीच्या साथीने सुरू झालेला अश्वमेध ,1656 साली जावळी बरोबरच रायरीच्या ,स्वराज्यातील समावेशाने सागर किना-याला जाऊन धडकला."

◆आरमाराचा इतिहास आणि बांधणी

शिवाजी महाराज १२-१३ वर्षांचे असताना म्हणजे १६४२-४३ मध्ये त्यांची रवानगी पुण्याला वडिलांच्या जहागिरीवर करण्यात आली.पुण्यात आल्यावर त्यांनी मावळ व आसपासचा प्रदेश जिंकून घेतला.आदिलशाहीच्या जहागिरीत राहून येथील किल्ले जिंकून सत्तेची पाळेमुळे रोवली.राजगड,रोहिडा,तोरणा,कुवारगड,कोंढाणा इत्यादी किल्ले ताब्यात आणले. इ.१६५५-५६ मध्ये जावळी सर केल्यावर रायगड किल्ला स्वराज्यात आला आणि स्वराज्याची हद्द समुद्राला जाऊन भिडली,तेव्हा स्वराज्याचा संबंध सिद्दी,इंग्रज,पोर्तुगीज,डच,फेंच या सत्तांशी आला.(आजचा मुंबईतील कुलाबा हा प्रदेश सिद्दीच्या अमलाखाली होता.)सिद्द्यांची राजधानी दंडराजपुरी येथील जंजिरा किल्ल्यावर होती.किनारपट्टीवर धाडी घालणे,लुट करणे,जाळपोळ करणे,बायका पळवणे,लोक बाटवणे हा सिद्द्यांचा जुना धंदा होता.या सगळ्याची दखल शिवाजी महाराजांनी घेतली होती.

पुढे १६५७ मध्ये महाराजांनी कल्याण,भिवंडी पावेतो प्रदेश काबीज केला,त्यामुळे सिद्द्यांशी संपर्क-संघर्ष होणे अपरिहार्य होते. कृष्णाजी अनंत सभासद लिहितो, "पुढे राजीयास राजपुरीचे शिद्दी,घरात जैसा उंदीर तैसा शत्रू यास कैसे जेर करावे म्हणून तजवीज पडली." सिद्द्याचे पारिपत्य करण्याकरिता आरमार उभारण्याची निकड होती.आरमार निर्मितीमुळे इंग्रज,डच,पोर्तुगीज,फ्रेंच या सत्तांना शह बसून सार्वभौमत्व सिद्ध होणार होते.याच राजकीय कारणाकरिता महाराजांनी आरमार उभारले.आज्ञापत्रात रामचंद्र पंत अमात्य म्हणतात, "आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यागच आहे.जैसे ज्यास अश्वबळ त्याची पृथ्वी प्रजा आहे.तद्वतच ज्याचा आरमार त्याचा समुद्र.याकरिता आरमार अवस्यमेव करावे."

महाराजांनी कल्याण,भिवंडी जिंकल्यावर कल्याणच्या खाडीत सुमुहुर्ताने आपल्या आरमाराची पहिली पठाणे तरती केली.पोर्तुगीज दफ्तरातील आधाराप्रमाणे इ.१६५९ मध्ये मराठ्यांच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. त्याचा तपशील असा,"आदिलशाहीचा सरदार शहाजीच्या मुलाने वसई व चौल कडील प्रदेश काबीज केला असून तो बलिष्ठ झाला आहे.त्याने काही लढाऊ गलबते कल्याण,भिवंडी,पनवेल या वसई तालुक्याच्या बंदरामध्ये बांधिली आहेत.त्यामुळे आम्हांस सावध राहणे भाग झाले आहे.ही गलबते समुद्रात फिरकू न द्यावी म्हणून (पोर्तुगीज)कॅप्टन ला आम्ही आज्ञा केली आहे की,त्याने सदर गलबते बंदरातून बाहेर येउच देऊ नये." वसईस जहाज बांधणारे कुशल कारागीर होते.रुय लैताव व्हीयेगस व त्याचा मुलगा फेर्नाव व्हीयेगस यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांनी वीस लढाऊ (Sanguicies) गलबते बांधण्यास सुरुवात केली.ही जहाजे आपण सिद्द्याविरुद्ध लढण्यासाठी बंधित आहोत,असे शिवाजी राजांनी जाहीर केले होते.कारण असे जाहीर केल्याशिवाय पोर्तुगीज त्या जहाजांना कल्याण-भिवंडीच्या खाडीतून बाहेर समुद्रात पडू देणे शक्य नव्हते.सुमारे तीनशे चाळीसच्या वर कारागीर व इतर लोक जहाज बांधणीचे काम करत होते.बायकामुलांसकट त्यांची संख्या बाराशेच्या वर होती.

शिवाजीचे आरमार तयार झाले तर सिद्द्याबरोबर आपल्यालाही(पोर्तुगीज) त्याचा त्रास होणार या भीतीने शिवाजीचे आरमार तयार होण्यापूर्वी (पोर्तुगीज लोकांनी) नोकरी सोडून द्यावी,म्हणून वसईचा कॅप्टन आन्तोनियु द मेलु कास्त्रु याने प्रयत्न केले.परिणामी ही सगळी मंडळी शिवाजी महाराजांची नोकरी सोडून गुप्तपणे मुंबई व वसई येथे पळून गेली. चौलच्या कॅप्टनने पोर्तुगीज गव्हर्नरास लिहिलेल्या पत्रानुसार चौल मध्ये राजे पन्नास तारवे बांधीत होते त्यातील सात तारावे बाहेर पडण्याच्या तयारीत होती. इ.१६६७ च्या शिवाजीच्या वाढत्या सामर्थ्याबद्दल विजरई कोंदी द सांव्हिसेन्ति याने एका पत्रात व्यक्त केलेले मत उल्लेखनीय आहे. "शिवाजीचे नौदलही मला भीतीदायक वाटते.कारण त्यांच्याविरुद्ध आम्ही सुरुवातीपासूनच कारवाई न केल्यामुळे त्यांनी किनाऱ्यावर किल्ले बांधिले आणि आज त्यांच्याजवळ पुष्कळ तारवे आहेत;पण ही तारवे मोठी नाहीत."

शिवाजीच्या आरमारात गुरबा, तरांडी, तारवे, गलबते, शिबाड, पगार या प्रकारची जहाजे असल्याची सभासद सांगतो.त्यात मचवे, बभोर, तिरकती पाल होते हा उल्लेख मल्हाररामराव चिटणीस करतो.लढाऊ जहाजात गलबत, गुराबा व पाल ही प्रमुख होती.गलबतांपेक्षा गुरबा मोठ्या प्रमाणावर असत आणि पाल सर्वात भारी असे.ही सर्व जहाजे उथळ बांधणीची म्हणजे लांबीच्या प्रमाणात अधिक रुंदीची असत.नाळीकडील भाग खूपच निमुळता व उघडा असे,त्यामुळे त्यांना समुद्राचे पाणी कमी घर्षणाने कापता येई.नाळीवर आलेले पाणी उघडेपणामुळे दोन्ही बाजूंनी वाहून जाई.

◆ शिवकालीन नौकांचे प्रकार पाहूयात :

▶संदेशवाहक होडी:
हा होडीचा सर्वात लहान प्रकार असून तो व्हलवता येत असे.यावर डोलकाठी नसे.क्वचितच एखादे शीड असे.

▶Water-boat : या होड्या पिण्याचे पाणी ने-आण करण्यासाठी वापरत असे.

▶मचवा :
हे एक छोटे जहाज असून ते व्हलवता येत असे. त्यावर सुमारे २५-४० सैनिक असत.हे जहाज त्वरेने हालचाल करत असे. यावर शक्यतो तोफा नसत व केवळ छर्रे व ठासणीची बंदूक असणारी शिपायांची तुकडी असे.

▶शिबाड :
हा मालवाहू जहाजाचा प्रकार आहे.त्यावर तोफा बसवून ते युद्धासाठीही वापरत असत.यावर एक डोलकाठी व शिड असून ते व्हलवता येत नसे ते केवळ वाऱ्याच्या आधारे एकाच दिशेने चालत.

▶गुराब :
हे जहाज शिबडापेक्षा मोठे असून त्यावर २ किंवा ३ डोलकाठ्या असत व प्रत्येक डोलकाठीवर २ चौकोनी शिड असत. गुराबेवर जहाजाच्या लांबीशी काटकोनात प्रत्येक बाजूने ५-७ तसेच नाळेवर समोरून व पिछाडीस एक तोफ असे.यावर सुमारे १००-१५० सैनिक असत.

▶तिरकती : हे तीन डोलकाठ्यांचे जहाज असे.

▶पगार : ही छोटी होडी असे.

जहाज बांधणीसाठी लागणारा चांगल्या प्रकारचा साग कोकणात विशेषतः वसईच्या आसपास मिळत असे. शिवाजी राजांच्या आरमारी व्यवस्थेत २०० जहाजांचा एक सुभा केला जात असे. मायनाक भंडारी व दौलतखान हे आरमाराचे प्रमुख अधिकारी होते.तीन डोलकाठ्यांची जहाजे व्यापाराकरिता मस्कत पर्यंत जात असे. आरमाराचे संरक्षण किनाऱ्यावरील किल्ले व खड्या यामुळे होत असे.आरमारात कोळी, भंडारी, गाबित, भोई, खारवी, पालदी-मुसलमान व इतर यांचा भरणावैशिष्ट्य

◆आरमारातील जहाजांची काही वैशिष्ट्ये :

▶ मराठ्यांच्या आरमारात गलबत व गुराब ही संख्येने जास्त व पाल ,शिबाड ही इतर काही महत्त्वाची जहाजे असत.
▶ शिडापेक्षा ,वल्हवत न्यायची जहाजे भरपूर होती.
▶ गलबत, गुराब, पाल ही काही लढाऊ प्रमुख जहाजे असत.
▶ आरमारात ,समुद्रातील लढायांमध्ये वेगाला खुप महत्व होते. शिडाची जहाजे असल्यास ती वेगाने चालत.काही वेळेस वारा नसल्यास वल्हवणारी जहाजे या कामी फायद्याची ठरत.
▶ मराठ्यांच्या जहाज बांधणी मध्ये काही वैशिष्ट्य आढळून येतात जसे की जहाजाची उथळ बांधणी,लांबीच्या प्रमाणात अधिक रूंदी,काहीसा निमुळता भाग, ज्यामुळे पाणी कमी घर्षणाने व वेगाने कापता येई.
▶ कल्याण भिवंडीची खाडी, पनवेल ,कुलाबा,विजयदुर्ग,मालवण येथे ही जहाजे प्रामुख्याने बांधली जात.यासाठी लागणारे सागाचे लाकूड कोकण व वसईच्या आसपास उपलब्ध होत असे.
▶ आरमाराच्या संरक्षणासाठी प्रामुख्याने किल्ले व खाड्या यांचा उपयोग होत असे.

◆मराठ्यांच्या आरमारातील जहाजांची विविध साधनातील संख्या :

सभासद बखर - 700
चिटणिस बखर - 400-500
चि.बखर - 640
__________
प्रकार / संख्या
1) गुराब मोठे -30
2) गुराब लहान - 50
3) गलबते - 100
4) तारू - 60
5) महागिरी - 150
6) होडी- 160
7) पाल - 25
8) जुग- 15
9) मचवा - 50

◆आरमार नियोजन /उद्दीष्टे

➡ आरमाराच्या योग्य नियोजना करिता वेगवेगळे सुभे केले जात.प्रत्येक सुभ्यात पाच गुराबा व पंधरा गलबते असत. व यांच्या सर्व नियोजनासाठी सरसुभेदार नेमले जात.
➡ आरमाराला लागणारे सामान वेळोवेळी व योग्यवेळी पोहचणे गरजेचे असत.यासाठी पायदळ,घोडदळ ,बिगारी,जनावरे यांचे योग्य नियोजन केले जाई.
➡ पर्जन्यकाळामध्ये जहाजे खराब होऊ नयेत तसेच आरमाराचे या काळात नुकसान होऊ नये ,या करिता आरमाराची छावणी केली जाई.या काळात जहाजाच्या लाकडाला किड,ओलावा या उपद्रवी गोष्टींपासून वाचविण्यासाठी काळजी घेतली जाई.वेगवेगळ्या बंदरांमध्ये छावणी करून पर्जन्यकाळानंतर जहाजे पुन्हा दुरूस्त केली जात.
➡ आरमारामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जलदुर्ग होय. आरमाराच्या हालचाली, संरक्षण इ बाबीतून जलदुर्गांचे महत्त्व अनन्यसाधारण. तसेच आरमाराच्या छावणीकरीता ही याचा वापर होत असे.किल्यांच्या सहाय्याने समुद्रावर हुकुमत गाजविता येत असे. याला आरमाराची जोड असे.
➡ महाराजांनी याच दृष्टीने 25 नोव्हेंबर 1664 रोजी सिंधुदुर्गचा पाया घातला.तसेच पद्मदुर्ग, खांदेरी,विजयदुर्ग, सुवर्णदुर्ण असे कित्येक जलदुर्ग नव्याने बांधले तर काही जिंकून नव्याने बांधणी केली.
➡ कोकण किनारपट्टीच्या सुरक्षिततेबरोबरच ,संदेशवहन ,दळणवळण ,अर्थव्यवस्था ही आरमार व जलदुर्ग उभारणीची काही प्रमुख उद्दीष्टे.

◆आरमार आणि पर्यावरण

आरमाराच्या बांधणीसाठी,डागडुजी साठी व इतर कामांसाठी प्रामुख्याने लाकडाची प्रमुख गरज लागत असे. यासाठी मुख्य सागाबरोबरच इतर वृक्षांचा वापर केला जाई.आंबे ,फणस इ वृक्षांचे लाकूड फायद्याचे ठरत.
परंतु या स्वराज्याच्या सर्व कामातही,आरमाराची गरज आणि पर्यावरण तसेच रयतेच्या, लोकांच्या भावनांचा शिवकाळात प्रर्कषाने विचार केलेला दिसतो.
आरमारासाठी लागणारी स्वराज्यातील कोणतीही झाडे हवी तशी, मनाप्रमाणे तोडू नयेत हा खास शिरस्ता होता. प्रत्येक मोठी झाडे ही प्रजेने मोठ्या काळजीने जतन करून, कित्येक वर्षे काळजी घेऊन वाढवलेली असतात.आंबा, फणस यांसारखी झाडे एक-दोन वर्षात मोठी होत नाहीत तर त्याची कित्येक वर्षे काळजी घ्यावी लागते.अशी झाडे तोडून प्रजेला दुःख देऊ नये.यापेक्षा त्या मालकाची परवानगी घेऊन त्यास योग्य मोबदला देऊनच ,त्याच्या परवानगी ने ती झाडे तोडावीत. नसल्यास जी झाडे जिर्ण झाली आहेत अशाच झाडांचा वापर करावा.

आरमार या स्वराज्याच्या धोरणाबरोबरच,रयतेची,प्रजेची आणि तेवढीच पर्यावरणाची घेतलेली काळजी आपल्याला दिसून येते.
आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते,
|शिवरायांसी आठवावे,
जिवित तृणवत मानावे,
इहलोकी, परलोकी, रहावे, किर्तीरूपे|

संदर्भ -
शिवाजी महाराजांचे आरमार: भा.कृ.आपटे
सभासद बखर
चिटणीस बखर
आज्ञापत्र
इतिहासाच्या पाऊलखुणा-१
मराठ्यांच्या इतिहासाची साधने:पोर्तुगीज दफ्तर

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...