विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 8 August 2020

शिंदेकुलभूषण श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार

 

🚩🐍🌞🐍🚩
शिंदेकुलभूषण
श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार 
----------------------------------------
"Mahadaji scindia,whose power had been so greatly increased,now exerted a decisive influence on the maratha councils,and entertained design of future grandeur.with which the ascendancy,or rather the existence of english in india was altogether incompatible."*
जेम्स मिल्स या इंग्लिश इतिहासकाराच्या 'History of british india'1820 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातील हा छोटा परिच्छेद याचा मराठी अर्थ पुढीलप्रमाणे-
"महादजी शिंदे यांची ताकत(पाटीलबाबांची उत्तर हिंदुस्थानातील विजयी घोडदौड) इतकी प्रचंड वाढली होती की मराठ्यांच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव वाढत चालला होता तसेच भविष्याकाळातील निर्णय महादजी शिंदे यांच्या सल्ला मसलतीनेच घेतले जाऊ लागले त्यामुळे इंग्रजांच्या भारतातील वाढत्या ताकदीला चांगलीच खीळ बसली होती.स्पष्टच म्हणायचं झालं तर इंग्रजांना भारतात टिकून राहणेसुद्धा आता अवघड वाटू लागले होते."
लेखाला सुरुवात करण्यापूर्वी आम्हाला हा परिच्छेद टाकणे योग्य वाटलं. याच कारण पुढे लेख वाचत गेल्यावर आपल्या लक्षात येईलच.शिंदे कुळात कित्येक वीररत्ने जन्माला आली परंतु श्रीमंत महादजीबाबांसारखा दुसरा कोणी होणे शक्य नाहीच. शिंदे कुळात जन्म घेऊन सर्वप्रथम ज्या एका नावामुळे अभिमानाने छाती भरून येते ते नाव म्हणजे 'श्रीमंत महादजी शिंदे सरकार'.
आताच एक-दोन दिवसांपूर्वी महादजी शिंदे यांचे ऐतिहासिक कागदपत्रांतील सांकेतिक नाव विदुर म्हणजेच दासीपुत्र अस एका पोस्टच्या माध्यमातून वाचनात आले.महादजीबाबांचा काही ऐतिहासिक पत्रात बाळकृष्ण असा ही उल्लेख आहे मंग तो न देता पोस्टकर्त्याला विदुर हा शब्द जवळचा वाटला.खरं तर महादजीबाबा यांना दासीपुत्र म्हणणे याला काही काडीचा आधार नसताना ही काहींनी मुद्दामहून याला महत्त्व दिले.आता झालं ते खूप झालं याला कुठेतरी उत्तर द्यायला हव असे ठरविले.पूर्वी वाचनात असे आले होते आणि त्याच वाईटही वाटले परंतु हि पोस्ट आजची पोस्ट बनविण्यास निमित्त ठरली.
काही इतिहासकरांच्या लेखणीने का? कशासाठी? कोणासाठी? पाटीलबाबांची बदनामी केली असावी हे त्यांचे त्यांनाच ठाऊक असावे.त्यांच्या संपूर्ण पुस्तकाला व त्यांच्या संशोधन कार्याला आम्हाला मुळीच दोष द्यायचा नाही.पण शिंदे घराण्याचा उत्कर्ष काही इतिहासकारांना का खुपत असावा? पाटीलबाबांवर विदूरत्वाचे शिक्के मारून एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे किंवा समूहाचे कुकर्म लपविण्याचा यांचा हेतू तर नसावा? याची उत्तरे शोधण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करायला हवा.
एखाद्या व्यक्तिच्या पर्वतासमान विशाल कार्याबद्दल चर्चा न करता अश्या फुटकळ गोष्टींना जास्त खत पाणी घातले जाते.छत्रपतींची बदनामी करायला काही इतिहासकारांची लेखणी तलवारीच्या धारेप्रमाणे चालली तर स्वराज्यभावनेने सदैव प्रेरित असणारा त्यांचा मावळा श्रीमंत महादजी शिंदे या लेखणीबहाद्दर लांडग्यांच्या तावडीतुन कसा सुटेल.!
बखर म्हणा किंवा इतर ऐतिहासिक साधने घ्या यामध्ये यांना त्यांच्या तूप रोटी साठी काही घावले तर त्याला किती मोठं करून सांगता येईल याचाच प्रयत्न केला जातो आणि याचीच री.. पुढे इतर जण ओढून अशी उणी-धुनी करत बसतात.त्यामुळे अश्या महापुरुषांच्या बद्दल संभ्रम निर्माण करणारे काही वाचनात आले तर आपल्या चौकस बुद्धीने याची सत्यता पडताळून पहावी.ज्या व्यक्तींचे कार्य कर्तृत्व एवढे मोठे असते त्यांच्या नावापुढे असे टॅग लावून आपली लेखन हुशारी दाखवणे मूर्खपणाचे ठरते.म्हणूनच लेखाला सुरुवात करण्यापूर्वी जेम्स मिल्स या इतिहासकाराच्या पुस्तकातील छोटासा परिच्छेद पाटीलबाबांचे विशाल कार्य दर्शविण्यासाठी योग्य वाटला म्हणून टाकला.
श्रीमंत महादजीबाबांना विदुर म्हणून हिणवले गेले या मागे खुप मोठे राजकारण होते आणि हे राजकारण नक्की काय होते आणि कशासाठी होते हे सविस्तर आपण आधी जाणून घेऊ,
श्रीमंत सुभेदार राणोजीराव शिंदे यांच्या द्वितीय पत्नी चिमणाबाईसाहेब शिंदे यांचे श्रीमंत महादजीबाबा हे पुत्र.चिमणाबाईसाहेब या दासी होत्या असही लिखाण केले गेले.त्यामुळे साहजिकच श्रीमंत महादजीबाबा हे दासीपुत्र होते असे लिहण्यास काहींना येथेच्छ परवानगी मिळाली.परंतु न.र.राजाध्यक्ष यांनी आपल्या जिवबादादा बक्षी यांचे चरित्र या पुस्तकात चिमणाबाईसाहेब यांच्या घराण्याबद्दल व सुभेदार राणोजीरावांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल छान माहिती दिली आहे व सर्व शंका-कुशंका दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.या पुस्तकामध्ये पुढीलप्रमाणे माहिती दिली आहे,
पाटीलबाबा राणोजींचे अनौरस किंवा दासीपुत्र होते,असा जो लोकप्रवाद आहे तो चुकीचा आहे. राणोजीराव हिंदुस्थानच्या(उत्तर हिंदुस्थानात) स्वारीवर गेले असता,दतिया संस्थानच्या राजपूत राजाशी त्यांची मोठी लढाई झाली.तिथे मराठ्यांनी राजपुतांचा मोड केला.राजपुतांचा पराभव करणाऱ्या श्रीमंत राणोजीराव शिंदे यांचा पराक्रम ऐकून दतिया संस्थानच्या राजकन्या चिमणाबाईसाहेब यांनी राणोजीराव यांच्या सोबत लग्न करायचे ठरविले.मोहिमेच्या धामधुमीमुळे अत्यंत साध्या पद्धतीने श्रीमंत राणोजीराव व चिमणाबाईसाहेब यांचा विवाह झाला.पुर्वी वाजतगाजत विवाह झाला तरच त्याला मराठे विवाह म्हणून मान्य करत.आणि याच कारणांमुळे हे लग्न तत्कालीन समाजाला मान्य नसावे.
न.र.राजाध्यक्ष यांच्या पुस्तकातील अधोरेखित करण्यासारखे एक वाक्य आहे ते वाक्य पुढीलप्रमाणे
"मराठ्यांचे बीज व राजपुतांचे क्षेत्र यापासून पाटीलबाबा हा नामांकित महाराष्ट्र वृक्ष झाला."त्यामुळे श्रीमंत महादजीबाबांच्या मातृकुळाविषयी शंका उपस्थित करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी हि ओळ पुरेशी आहे.
आपल्या राजकीय स्वार्थासाठी म्हणजेच पेशवे पदाच्या लालसेपोटी रघुनाथराव भट पेशवा उर्फ राघोबादादा याने अनेक निचकृत्ये केली ती सर्वाना माहितच आहे.राघोबादादाचा शिंदे सरकारांच्या जहागिरीवर डोळा होता.त्यासाठी त्याने बरेच प्रयत्न केले आणि त्यातूनच आपल्या स्वार्थासाठी रघुनाथराव पेशव्यांने महादजी शिंदे हे दासीपुत्र असल्याची राळ उठवून दिली.
पानिपतच्या युद्धात शिंदे घराण्यातील बरीच कर्तबगार माणसे धारातीर्थी पडली.एकटे श्रीमंत महादजीबाबा हेच पानिपतावरून माघारी परतले.त्यामुळे वारसा हक्काने शिंद्याची जहागिर हि पाटीलबाबांनाच मिळायला हवी होती परंतु पानिपतच्या युद्धानंतर बाळाजी बाजीराव पेशवा यांचा मृत्यू झाला त्यामुळे रिक्त झालेले पेशवा पद व शिंद्याचा सरंजाम याच्यावर डोळा ठेऊन असणाऱ्या रघुनाथराव पेशव्याला आयतीच संधी चालून आली.महादजी शिंदे हे दासीपुत्र असल्यामुळे ते शिंद्यांच्या जहागिरीचे वारस होऊ शकत नाही असे जाहीर करून टाकले.एवढ्यावरच न थांबता राघोबाने श्रीमंत महादजीबाबांच्या बद्दल शिंदे कुटुंबातील लोकांचे कान भरण्यास सुरवात केली.
पेशवेपद मिळविण्यासाठी आपल्या मर्जीतील लोक जवळ करायची व ज्यांचा विरोध होईल त्यांचे महत्त्व कमी करायचे हा राघोबाचा महत्वाचा हेतू होताच पण शिंद्याचा सरंजाम कसा आपल्या घश्यात घालता येईल त्याची सोय करण्यासाठी तो प्रयत्न करत होता.महादजी शिंदे कडे सर्व हक्क गेले तर ते आपल्या भविष्यास अपायकारक असल्याचे तो ओळखून होता.
महादजींचे मोठे बंधू तुकोजीराव शिंदे हे ही चिमणाबाईसाहेब यांचेच पुत्र होते मंग तुकोजीरावांचेच पुत्र केदारजीराव शिंदे यांना काही काळासाठी शिंद्याचा वारस नेमला होता.तेव्हा दासीपुत्राचा वारस म्हणून राघोबाने का आक्षेप घेतला नाही? यातून हेच सिद्ध होते की आपल्या सोयीच्या राजकारणासाठी राघोबादादाने हि दासपुत्राची राळ उडवून दिली होती.अल्पवयीन केदारजीराव शिंदे यांना हाताशी धरून आपला कार्यभाग साधायचा हा राघोबाचा प्रयत्न यशस्वी झाला नाही.पुढे केदारजीराव शिंदे पाटीलबाबांना येऊन मिळाले.आपल्या मर्जीतील मानाजी शिंदे फाकडे यांस शिंद्याचा सरंजाम देऊन पाटीलबाबांना त्रास देण्यात आला.
शिंदेशाही इतिहासाची साधने खंड-3 मध्ये आनंदराव फाळके यांनी या विषयावर प्रकाश टाकून दासीपुत्र हे प्रकरणच खोटे असून राघोबादादाने आपल्या राजकीय स्वार्थासाठी पाटीलबाबांना त्रास दिला हे सिद्ध केले आहे .शिवाय माधवराव पेशवा व पाटीलबाबांच्या संबंधावर आधारित काही पत्रांचे दाखले दिले आहेत.शिंदे सरकारांची असंख्य पत्र अभ्यासून आनंदराव फाळकेंनी मांडलेले मत म्हणजे "हा सूर्य आणि हा जयद्ररथ" म्हणावे लागेल.
लेखाच्या शेवटी पाटीलबाबांच्या तोंडून निघालेल्या एका करारी वाक्याचा आधार घेत लेख पूर्ण करूयात
"माझी तलवार या पाप्याचे(नजीबाचे)शिशुपाली शीर कापण्यास श्रीकृष्णाच्या सुदर्शनासारखी माझ्या हातातून निसटेल"
हे वाक्य यासाठी की शिंदे घराणे,श्रीमंत महादजीबाबा किंवा अन्य कोणत्या महापुरुषाच्याबद्दल कोणी बदनामीकारक लिखाण करून संभ्रम निर्माण करत असल्यास आपण हुशार होऊन,सत्यता पडताळून,आपल्या सुदर्शनरुपी लेखणीने या नजीबरुपी संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टींचा शिरच्छेद करा.
----------------------------------------
दि ग्रेट मराठा-श्रीमंत महादजी शिंदे सरकार फेसबुक ग्रुप
©प्रसादराव शिंदे

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...