विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 8 August 2020

नेसरीच्या लढाईचा इतिहास

 

नेसरीच्या लढाईचा इतिहास
बहलोलखानाविरुद्ध झालेली हि लढाई नेसरीची लढाई म्हणून ओळखली जाते. नेसरी हे कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ साली स्वतःचा राज्याभिषेक करण्याचे ठरविले आणि सगळ्या स्वराज्यात या सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहोचली, सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. राज्याभिषेकाच्या काही काळ आधीच विजापूरच्या आदिलशाहने आपला एक सरदार स्वराज्यावर पाठविला, या सरदाराचे नाव होते बहलोलखान.
बहलोलखान स्वराज्यावर चालून तर आला पण सोबत १२,००० सैन्य घेऊन तो स्वराज्यात दाखल झाला. इतके मोठे सैन्य घेऊन त्याने संपूर्ण स्वराज्यात धुमाकूळ घातला होता, स्वराज्यातील रयतेवर अनेक जुलूम केले आणि जनतेला बेहाल करून सोडले. शिवराज्याभिषेक होण्याआधीच स्वराज्यावर आलेले हे संकट परतवून लावण्यासाठी शिवराय युक्ती लढवत होते. शिवरायांनी हि महत्वाची कामगिरी स्वराज्याचे सरनौबत कुड्तोजी गुजर म्हणजेच प्रतापराव गुजर यांच्याकडे सोपविली.
प्रतापरावांनी दिलेली कामगिरी स्वीकारली आणि आपली फौज घेऊन सरनौबत निघाले बहलोलखानाचा बिमोड करायला. या खानाच्या अवाढव्य फौजेशी कसा सामना करावा या विचारात प्रतापराव आपल्या फौजेसह आगेकूच करीत होते. प्रतापरावांना एक युक्ती सुचली, बहलोलखानाची छावणी जेथे होती त्या ठिकाणी मोठे जलाशय होते आणि याच जलाशयातून बहलोल खानाच्या फौजेला पाणीपुरवठा होत होता.
मराठ्यांच्या सैन्यांनी बहलोलखानाच्या छावणीला चारही बाजूनी घेरले आणि सर्वप्रथम ज्या जलाशयातून खानाच्या सैन्याला पाणीपुरवठा होत होता ते जलाशयच आपल्या ताब्यात घेऊन तेथे फौज तैनात केली. प्रतापरावांनी खऱ्या अर्थाने खानाचे पाणी बंद केले होते. पाण्यावाचून खानाच्या सैन्याचे हाल होऊ लागले. आपण इतक्या जलद मराठ्यांच्या तावडीत सापडू अशी कल्पना खानाने स्वप्नात देखील केलेली नव्हती.
परंतु, बहलोलखान मात्र जलद आपल्या सैन्यानिशी सज्ज झाला, त्याचे सैन्य देखील अतिशय मोठे आणि एकेक सैनिक उंच धिप्पाड पठाण. अशा दोन्ही गटांमध्ये घमासान युद्ध सुरु झाले. असा देखील उल्लेख सापडतो कि, बराच वेळ हे युद्ध चालू असतांना खानाच्या सेनेतील एक मोठा हत्ती अचानक पिसाळला आणि सैरावैरा धावत सुटला आणि त्या धावपळीत त्या हत्तीनेच खानाचे बरेच सैन्य घायाळ केले आणि मग तो हत्ती मराठ्यांच्या सैन्यात घुसला तसा लगेच त्याला शांत करण्यात आले आणि ताब्यात घेण्यात आले.
मराठ्यांनी या युद्धात आपली उत्तम कामगिरी दाखविली आणि सोबतच खानाच्या सैन्याला इतके युद्ध चालू असताना देखील पाणी मिळत नव्हते त्यामुळे त्याचे सैन्य आणि तो स्वतः देखील अस्ताला आला. बहलोलखानापुढे आता दोनच मार्ग होते, एक तर युद्ध करून मरून जाणे नाहीतर सरळ मराठ्यांना शरण जाणे. खानाने दुसरा मार्ग निवडला आणि मराठ्यांशी बोलणी सुरु केली. आम्ही केवळ बादशाहच्या आदेशाचे पालन करीत इथवर आलो आहोत, आम्ही आमची शरणागती स्वीकारतो परंतु आम्हाला अभय द्या अशी आर्त विनवणी बहलोल खानाने केली.
बहलोल खानाची व त्याच्या सैन्याची झालेली अवस्था पाहून प्रतापराव नरमले आणि त्यांनी चक्क हातात आलेल्या बहलोल खानाला मुक्त केले आणि सोडून दिले. शिवरायांनी प्रतापरावांना या कामगिरीवर पाठवतांना खानाचा बिमोड करूनच या अशी सक्त ताकीद दिली असून सुद्धा प्रतापरावांनी ऐनवेळी खानाच्या सैन्याला अभय दिले. हि बातमी शिवरायांपर्यंत पोहोचली आणि शिवराय एकाएकी राग अनावर होऊन प्रतापरावांना बोलू लागले. त्यांनी प्रतापरावांना पत्रव्यवहार केला आणि त्या पत्रांमधून त्यांच्या कामाचा जाब विचारण्यात आला. एक सरनौबत म्हणून त्यांनी केलेलं हे काम शोभणारे नाही.
या पत्राने प्रतापराव खजील झाले. इकडे बहलोलखान अजूनही महाराष्ट्रात होता आणि पुन्हा स्वराज्यावर हल्ला करण्यास सज्ज होत होता. हि बातमी हेरांमार्फत शिवरायांना मिळाली. लागलीच शिवरायांनी प्रतापरावांना पत्र लिहिले. या वेळेस पुन्हा आपल्या चुकीची शिक्षा म्हणून शिवरायांनी बहलोलखानाचा बिमोड करण्यासाठी प्रतापरावांना नियुक्त केले आणि बहलोल खानाला ठार केल्याशिवाय परत आम्हाला तोंड दाखवू नये अशी सक्त ताकीद महाराजांनी प्रतापरावांना दिली.
प्रतापरावांना शिवरायांचे पत्र जिव्हारी लागले आणि आपली घोडचूक लक्षात आली. प्रतापरावांना खबर लागली की कोल्हापूर नजीक नेसरी गावाकडील रस्त्याने खान आगेकूच करीत आहे. नेसरी पासून नजीकच मराठ्यांची छावणी सज्ज होती. छावणीत साधारण १२०० ते १५०० सैन्य असावे. प्रतापरावांना वेळोवेळी शिवरायांचे पत्रातील बोल विचलित करीत होते. स्वतःच्या चुकीवर त्यांना पश्चाताप होत होता. खानाच्या १२,००० फौजेसमोर आपली १२०० ते १५०० फौज घेऊन जाणे हे त्यावेळी प्रतापरावांना योग्य वाटत नव्हते.
मराठी सैन्य या घटनेशी परिचित नव्हते परंतु छावणीतील ६ सरदारांनी प्रतापरावांना बाहेर जाताना पहिले आणि ते ६ सरदार चक्क प्रतापरावांसोबत बहलोलखानाशी दोन हाथ करण्यास निघाले. आपण काय करतोय, आपण कुणाशी दोन हाथ करण्यास जातोय, किती मोठ्या संख्येने असणाऱ्या सैन्याला आपण ७ च्या संख्येने विरोध करायला जातोय अशी किंचितशी काळजी देखील या वीरांना करावीशी वाटली नाही. आपल्या ध्येर्याने वेडे होऊन हे ७ वीर घोडी दौडत नेसरी येथे चाल करीत होते.
बहलोल खान नेसरी डोंगरातील खिंडीत असतांनाच अचानक समोरून धुळीचे लोट दिसू लागले आणि खानाने पहिले तर फक्त ७ सरदार त्याच्या दिशेने वेगाने दौडत येत होते. हे ७ हि जण वाऱ्याच्या वेगाने आणि आवेशाने खानाच्या सैन्यात दाखल झाले आणि समोर येईल त्याला ठार करत सैन्याची फळी चिरून ते पुढे जात होते. शेवटी १२,००० सैन्यापुढे ७ जणांचा काय निभाव लागावा मंडळी. एकेक सरदार अंगावर वार झेलत धारातीर्थी पडत होता आणि अखेर स्वतः प्रतापराव देखील धारातीर्थी पडले.
या झालेल्या प्रकाराला काय म्हणावे तेच समजत नाही. निष्ठा काय असते हे प्रतापरावांनी आणि त्या ६ वीरांनी सिद्ध केले. प्रतापरावांसोबत जे ६ वीर सरदार पुढे आले त्यांची नावे; विठ्ठल अत्रे, कृष्णाजी भास्कर, विठोजी, दिपोजी राऊतराव, सिद्दी हिलाल आणि विसाजी बल्लाळ अशी होती. हे ७ वीर काळाच्या पडद्याआड गेले असले तरीही इतिहासाच्या पडद्यावर ते नेहमीच झळकत राहतील असेच त्यांचे शौर्य आहे. याच त्यांच्या शौर्याचे वर्णन करण्यासाठी वेडात मराठे वीर दौडले सात हे गाणं लिहिलं आणि गायलं देखील गेलं. या गाण्यामुळे देखील या ७ वीरांची आठवण नेहमीच सर्वाना येत राहील.
शिवरायांना प्रतापराव आणि इतर ६ सरदार गेल्याच्या बातमीने चक्क स्वतःची एक बाजू निकामी झाल्यासारखं वाटलं. महाराजांच्या रागाने खजील होऊन, स्वराज्यासाठी आणि शिवरायांसाठी प्रतापरावांनी आपल्या जीवाची देखील परवा न करता शर्थीने लढत दिली. आपले राजे आपल्यावर खफा आहेत हि भावनाच त्यांच्यासाठी किती विषारी होती आणि शिवरायांनी आपल्या बद्दल मनात असलेला राग नाहीसा करावा या एका आशेपोटी प्रतापरावांनी कमालच केली.
शिवराय नेहमी म्हणायचे कि सैनिकाला स्वामीभक्ती तर येतेच परंतु, स्वामी कुणाला म्हणावं हे अनेकांना माहित नसतं. प्रतापराव गुजरांनी मात्र या दोन्ही वाक्यावर स्वतःला सिद्ध केलं. कुणाला स्वामी म्हणावं हे देखील प्रतापरावांनी अचूक समजून घेतलं आणि आपल्या स्वामीसाठी वेळप्रसंगी जीवही पणाला लावून आपली स्वामिनिष्ठा देखील सिद्ध केली.
प्रतापराव आणि त्या ६ वीर सरदारांना आदरांजली म्हणून नेसरी, कोल्हापूर येथे त्यांच्या आठवणीत एक स्मारकदेखील उभारण्यात आले आहे. हे स्मारक नेहमीच आपण सर्वांना स्वामीनिष्ठेची व्याख्या शिकवत राहील आणि त्या ७ वीर सरदारांच्या पराक्रमाची आपल्या मनात आठवण ठेऊन जाईल.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...