विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 18 August 2020

🚩 शिवराज्याभिषेक सोहळा🚩

 


🚩
शिवराज्याभिषेक सोहळा🚩
लेखन ✒️ डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
रायगड पाहुणेरावळे यांनी फुलून गेला. गडाची राजबिंदी ,हत्तीघोड्यांनी व मेणे - पालख्यांनी गजबजून वाहू लागली .राजबिदीवरची भव्य भव्य दुकानांनी नटलेली बाजारपेठ आता अधिकच थाट मांडून बसली .केवढा हा दिमाख ! या बाजारपेठेतील दुकानांची जोती अगदी सरळ सुतात उभी होती.उंची पुरूष पुरूष होती अन त्यांची जडणघडणही साय संगीत होती. दुतर्फा अशी घाटदार जोती घालून त्यावर भव्य दुकाने बांधलेली होती. मधला राजरस्तासुद्धा लांब, रुंद,ऐसपैस होता. दुकानांची जोती इतकी उंच बांधण्याचे कारण असे की, घोड्यावरच्या किंवा पालखीतल्या माणसाला खाली न उतरता वर बसल्या बसल्याच दुकानातून माल खरेदी करता यावा ! राजाने राजधानीत ! गडावरती राजप्रसाद , राण्यांचे व अष्टप्रधानांचे महाल, राज्यसभा, नगारखाना, महाद्वार,राज सेवकांची लहान-मोठी असंख्य घरे , श्रीजगदीश्वराचे मंदिर, आश्रमशाळा, गजशाळा ,गोशाळा इत्यादी इमारती; अठरा कारखाने ,बारा महाल ,त्यावरील अधिकार्यांची घरे, माड्या, सोपे ,मनोरे; याशिवाय खास समारंभासाठी आलेल्या सुमारे वीसहजार पाहुण्यांनी उभारलेले शामियाने, मंडप,राहुट्या इत्यादी विविध प्रकारच्या वस्तूंनी रायगड हा खरोखर राजधानी म्हणून शोभू लागला. फार सुंदर दिसू लागला होता रायगड. मंगलस्नान करून अष्टप्रधान आले .सामंत आले. राजदूत आले. राजाचे आप्तस्वकीय आले. पाहुणे आले, अधिकारी आले ,शास्त्र पंडित आले ,राजप्रसाद आनंदाने व सुगंधाने भर भरून गेला. मुख्य राज्याभिषेकाची वेळ ऊद्यावर येऊन ठेपली होती. सर्व सिद्धता झाली होती. सोन्याचे सुंदर चौरंग व सर्व प्रकारचे कलश अभिषेकासाठी राजा राणीची वाट पाहत होते. जेधे-बांदल मावळचे देशमुख, स्वराज्यासाठी अतोनात श्रमसाहस केलेले अनेक नवे जुने जिवलग, या आनंदसोहळ्यात आनंद लुटीत होते.व या आनंदात सर्व जण होते. पण- त्या गर्दीत ज्याची सर्वात जास्त धांदल धावपळ दिसायची तो महाराजांचा लाडका जिवलग तानाजी मालुसरे कुठेच दिसत नव्हता ! महाराजांचा दुसरा बालसवंगडी सूर्याजी काकडेही नव्हता !महाराजांना मुजरा करायला बाजीप्रभू नव्हते! मुरार बाजी ,बाजी पासलकर, प्रतापराव गुजर,- आणि कितीतरी जिवलग तिथे नव्हते.या सर्वांचे जीव की प्राण असलेले शिवाजीराजे पातशाही लेणी लेऊन तख्तावर बसतायेत अन हे कोणिही तिथे नाहीत! कोणते भाव उमटले असतील महाराजांच्या हृदयी ?- गहिवर ! कृतज्ञता! राज्याभिषेकासाठी सर्व पवित्र उदके आतुरली होती.महाराज ,सोयराबाई राणीसाहेब व संभाजी राजे सोन्याच्या चौरंगाकडे पावले टाकीत गेले.अभिषेक झाला .राजाराणीना सुवासिनींनी ओवाळले.राज्याभिषेक समयी शंभूराजे यांना युवराज म्हणून पट्टबंधन झाले व संभाजीराजे या सविद्य संस्काराने हिंदवी स्वराज्याचे धर्मसिद्ध व जन्मसिद्ध असे वारस झाले. गागाभट्टांनी धार्मिक विधी केले. सर्व राज्यचिन्हे व राज्यचिन्हे सिंहासनाभोवती झळकत होती. सोन्याचे अनेक भाले लखलखत होते. त्यातील एका भाल्याच्या टोकावर सोन्याचा एक सुंदर तराजू झुलत होता. दोन भाल्यांच्या टोकावर मोठ्या दातांचे सुवर्णमस्य लटकावले होते. काही भाल्यांना अश्वपुच्छें बांधलेली होती व ती भुरभुरत होती .अष्टप्रधान आपापल्या जागी उभे होते राज्यसभेत प्राचीन भारतीय संस्कृतीचा फार सुंदर आविष्कार झालेला दिसत होता. तसेच मुघली संस्कृतीचे नमुनेही येथे झळकत होते.भाल्यांच्या टोकावर बसविलेली सर्व चिन्हे मुघली होती.सिंहासनावर असलेल्या अष्टस्तंभाच्या सुवर्णमंडपीचा डौल पूर्णपणे इस्लामी होता.एकूण राजसभेसह सिंहासनाचा थाट अत्यंत अप्रतिम असाच होता.-आणखी एक हृदयस्पर्शी गोष्ट म्हणजे सिंहासनाच्या अगदी समोर असलेल्या भव्य प्रवेशद्वाराकडे नजर टाकली की , दर्शन घडत होते पूर्वक्षितिजावरील तोरणा आणि राजगड किल्ल्याचे ! आता फक्त ऊद्याच्या दिवसाची वाट पहायची होती.एकच धुन 6 जून 🚩जय जिजाऊ🚩 🚩 जय शिवराय 🚩

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...