विनोद जाधव एक संग्राहक

Monday 10 August 2020

#बाजीप्रभू_देशपांडे

 

#स्वराजाचे_शिलेदार 

 #बाजीप्रभू_देशपांडे

#पन्हाळ्याहुन_सुटका

( पोस्ट लांबलचक आहे परंतु शक्य तेवढे आटोपशीर आणि मुद्देसूद लिहिण्याचा प्रयत्न केला आहे )
अफजलखान टराटरा उभा फाडल्यावर युध्दातील एका नीतीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीला उसंत न घेता झटक्यावर झटके द्यायला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजा आदिलशाही मुलखांत सांगली कोल्हापूर मिरज भागात घौडदौड करु लागल्या. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज ८ हजार फौजेसह आदिलशाहीचा पन्हाळा जिंकून गडावर थांबले. पण अल्पावधीतच विजापुरहुन सिद्दी जौहर ३५००० पायदळ आणि २०००० घोडदळ घेऊन पन्हाळ्याच्या पायथ्याला पोहोचला. त्याने एवढ्या बलाढ्य फौजेसह पन्हाळ्याला घातलेला वेढा फोडणे किंवा हुसकावून लावणे वारंवार प्रयत्न करूनही सेनापती नेताजी पालकरांनाही अशक्य होऊन बसले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अंदाज बांधला कि पावसाळा जवळ आला आहे. इकडील पावसात सिद्दी जौहरची फौज थांबणार नाही लवकरच उठून जाईल. पण हा अंदाज चुकला. वळवाच्या काही वादळी पावसानंतर जूनमध्ये पावसाने संततधार धरली परंतु सिद्दी जौहर काही उठायचे नाव घेईना. यावर काहीतरी वेगळाच उपाय व्हायला हवा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा गडावर खलबताला बसले.. त्यात त्यांच्या सोबत बसले होते.. चव्हाण पाटील, रायाजी बांदल, आणि बाजीप्रभू देशपांडे..
कोण होते हे चव्हाण पाटील, रायाजी बांदल, बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद.
#चव्हाण_पाटील- चव्हाण पाटील हे पन्हाळा गडाजवळील नेबापुर गावचे पाटील.. छत्रपती शिवाजी महाराजांना बहुतेक नव्याने सामील झालेले आणि त्यांच्यासाठी सैन्यसंचयनाचे काम पाहत होते..
#रायाजी_बांदल - तत्कालीन हिरडस मावळात रोहिडा खोऱ्यातील ५३ गावांची पूर्वापार चालत असलेली देशमुखी रायाजी बांदल यांच्याकडे होती. त्या ५३ पैकी महुड गावात बांदल राहत होते. हे बांदल घराणे मूळचे बुंदेलखंडातील ते महाराष्ट्रात येवून स्थिरावले आणि रोहिडा खोऱ्यात ५३ गावांची देशमुखी मिळवून राहिले. यांचा स्वभावच अत्यंत पराकोटीचा लढवय्या. प्रसंगी आदिलशाही निजामशाही कोणालाही जुमानत नसत. यांच्यावर राजे शहाजीराजे यांचा विशेष प्रभाव असावा. त्यामुळेच बांदल छत्रपती शिवाजी महाराजांना थोडेसे लवकरच सामील झाले. तलवार गाजवणाऱ्या बांदलांचे धनुष्यबाणाच्या युद्धात विशेष प्रावीण्य होते आणि धनुष्यबाणाचे त्यांचे स्वतंत्र असे एक दल होते. म्हणूनच त्यांचे नाव बांदल असे झाल्याचे उल्लेख आहेत..
#बाजीप्रभू_देशपांडे- रायाजी बांदलांच्या ५३ गावांच्या कारभाराची जबाबदारी ही वंशपरंपरेने रोहिडा खोऱ्यातीलच शिंद गावच्या बाजीप्रभू देशपांडे यांच्याकडे होती. बंधु फुलाजी सह दांडपट्ट्यात विशेष निपुण असे बाजीप्रभू रायाजी बांदलांच्या सेवेत होते.
#शिवा_काशीद- यांना खलबतात किंवा मसलतीत चव्हाण पाटलांनी सामील करून घेतले. ही व्यक्ती चव्हाण पाटलांच्या नेबापुर गावातीलच होती..
यांच्या मसलतीत ठरल्याप्रमाणे पुढील हालचाली सुरू झाल्या.
प्रथम सिद्दी जौहरशी तहाची बोलणी चालु केली. खुद्द शिवाजी महाराज सिद्दी जौहरला येवून भेटतील असेही ठरले. अफजलखान प्रकरण ताजे असल्याने सिद्दी सावध होता. परंतु संततधार पडत्या पावसात चिखलात पाय रोवून उभे राहायचेही बहुतेक जीवावर आले असणार त्याच्याही. भेटीस येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करून विजापुरास जावे किंवा येथेच संपवावे या विचाराशी सिद्दी ठाम झाला. परंतु छत्रपती शिवाजी महाराज शरण किंवा तहाला येणार म्हणून सिद्दीच्या फौजेच्या वेढ्यात थोडीशी शिथिलता आली. आषाढ पोर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी भेट किंवा तह होईल असे दोन्ही बाजूंकडून ठरले होते.
सिद्दी जौहरला गाफील करण्याचे बहुतांश काम झाले होते.
आता पुढील ठरलेली चाल होती सिद्दी जोहरच्या फौजेचा वेढ्याला चकमा देवून बाहेर पडून विशाळगड गाठायचा. याची तयारी आधीपासूनच झाली होती. चव्हाण पाटील यांनी त्यांच्या हेरांकरवी मार्गाची पूर्ण लहानसहान माहितीची खात्री करून घेतली होती. स्वतः स्थानिक असल्याने चव्हाण पाटलांना त्या परिसराची उत्तम माहिती असावी. त्यांनी सुटकेच्या नियोजित मार्गांवर हेर/वाटाडे पेरुन ठेवले होते. शत्रूला चकमा देण्यासाठी व शत्रुला सुगावा लागलाच आणि तो पाठलाग करु लागलाच तर त्याचा वेळ वाया जावा म्हणून अजूनही काहीतरी वेळप्रसंगी उपाय असावा म्हणून तीही तजवीज आधीच करून ठेवली होती.. चव्हाण पाटलांचा माणूस शिवा काशीद यांची शरीरयष्टी बहुतांश छत्रपती शिवाजी महाराजांच्याशी मिळतीजुळती होती. शत्रूला चकमा देण्यासाठी चव्हाण पाटलांनी शिवा काशीदलाच छत्रपती शिवाजी महाराज बनवले आणि गडावरून एकाऐवजी दोन पालख्या बाहेर पडल्या.. बरोबर बांदलांचे ६०० सैन्य.. त्यात रोहिडा खोऱ्यातील महाले, शिंदे, मारणे, पोळ, शिरवले, कोंढाळकर, गव्हाणे, चोर, विचारे, खाटपे, जाधवराव यांच्यासह अठरापगड बाराबलुतेही सामील होते. गडाखाली सिद्दीची ५५००० ची फौज होती आणि त्यांचा वेढा फोडून ६०० जण बाहेर पडणार होते.. आणि बेत फसुन आमनेसामने सामना झालाच असता तर, तर परिणामांची कल्पनाही करवत नाही.. पोर्णिमेच्या रात्री नउ च्या सुमारास दोन्ही पालख्या, एकात खुद्द छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या पालखीत जीवावर उदार झालेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषातील शिवा काशीद. पोर्णीमेची रात्र म्हणजे तसा बऱ्यापैकी उजेड असतो. परंतु त्यावेळी आकाशात दाट ढगांनी चंद्रप्रकाश मिटला गेला होता. त्यात वारे कमी परंतु पावसाचा जोर भयंकर होता. तसे या वातावरणात उद्याच तह होणार आहे म्हणून सिद्दीची फौज अधिकच सुस्तावायला हवी होती. चव्हाण पाटलांनी वाटेत पेरलेले हेर/वाटाडे त्यांचे काम चोख बजावत होते. त्यांचे एकमेकांना सुचक इशारे होत होते. दम लागु नये म्हणून पालखीचे खांदेकरी पडत्या पावसातही चिखल तुडवत तुडवत न थांबता धावत्या चालत्या गतीतच बदलले जात होते. सिद्दी जोहरच्या फौजेची कोडी ज्या बाजूने फोडली गेली त्या बाजूला सिद्दीच्या जावयाच्या फौजेचा पहारा होता. काही वेळाने त्याच्या फौजेला आपल्या शेजारुन मोठा जमाव पुढे गेल्याचा सुगावा लागला आणि त्याने पाठलाग सुरु केला. पाठलाग होतोय याची बातमी वाटाड्यांच्या इशाऱ्यावरुन चव्हाण पाटलांच्या ध्यानी आली. तात्काळ शिवा काशीदच्या पालखीला पाठलाग करणाऱ्या सिद्दीच्या फौजेची दिशाभूल आणि वेळेचा अपव्यय करण्याचा हेतु साध्य करण्यासाठी मलकापुरच्या वाटेने सोडण्याचे ठरले. शिवा काशीद त्याही परिस्थितीत क्षणभरासाठी पालखीतून खाली उतरले. छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करून पुन्हा तात्काळ पालखीत बसले. आणि शिवा काशीद बसलेले पालखी मलकापुरच्या दिशेने निघाली. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी विशाळगडाच्या दिशेने निघाली. अपेक्षित तेच घडले. जोहरच्या जावयाने शिवा काशीद असलेली पालखी पकडली आणि ती पालखी त्याने तात्काळ बंदोबस्तात सिद्दी जोहरकडे नेली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषातील शिवा काशीदला सिद्दी जोहरच्या पुढे हजर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज पकडले गेल्याची बातमी जोहरच्या तळावर पसरली. आनंद आणि हर्षौउल्हाषित सिद्दीची फौज छत्रपती शिवाजी महाराजांना पाहण्यासाठी एकवटली. अफजलखानाला टराटरा फाडणारे छत्रपती शिवाजी महाराज सर्वांनाच पाहायचे होते. स्वतः सिद्दीही गोंधळून गेला होता. उद्या तहासाठी प्रत्यक्ष भेट होणार होती मग छत्रपती शिवाजी महाराज या अशा प्रकारे आदल्या रात्रीच छत्रपती शिवाजी आपल्या हाती असे येतील अशी कदाचीत इतरांप्रमाणे त्यानेही कल्पना केली नव्हती. तो गोंधळलेला असतांनाच गर्दीतून आवाज आला 'अरे ये तो शिवाजी नहीं हैं' .. मग मात्र सिद्दीच्या पायाखालची जमिन सरकली. छत्रपती शिवाजी महाराजांनी काहीतरी खेळी केलीय हे त्याने ओळखले. शिवा काशीदच्या पुढे उभे राहून त्याने विचारले कि 'कहाँ हैं शिवाजी'... शिवा काशीदने एवढेच उत्तर दिले कि 'तुम छत्रपती शिवाजी को कभीभी पकड नहीं सकते'.. रागाने लाल झालेल्या सिद्दीने शिवा काशीदच्या पोटात तलवार खुपसली. सिद्दीने चहुबाजुंना छत्रपती शिवाजी महाराजांना शोधण्याचे आदेश दिले. त्यापैकी ४००० घोडदळाची सिद्दी मसूदची एक तुकडीही होती. मसूदची तुकडी विशाळगडाच्या दिशेने निघाली.
छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी अंधारात चिखल तुडवत धावत होती. पुन्हा एकदा चव्हाण पाटलांच्या पेरलेल्या हेरांकडुन/वाटाड्यांकडुन पाठलाग होत असल्याचा इशारा झाला. तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पांढरपाण्यापर्यंत पोहोचले होते. येथे रायाजी बांदल आणि चव्हाण पाटलांनी आणखी एक निर्णय तात्काळ घेतला. पाठलाग करणाऱ्या शत्रूला गुंतवून ठेवण्यासाठी बांदलांच्या निवडक पंचवीस तिरंदाजांना मागे ठेवण्यात आले. परिणाम काय होऊ शकतो याची पूर्ण जाणीव परंतु जीवावर उदार झालेले. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी पडत्या अंधारात पावसात चिखल तुडवत पुन्हा विशाळगडाच्या दिशेने मार्गस्थ झाली. थोड्याच वेळात मागे थांबलेल्या २५ शुरवीर रात्रीच्या अंधारात मोर्चे लावल्याप्रमाणे जंगलात दबा धरून बसले. ४००० विरुद्ध २५ असा अत्यंत विषम लढा चालू झाला. मसूदचे सैन्य टप्प्यात येताच त्या पंचवीस बांदल सैनिकांनी वेगवेगळ्या बाजूंनी बाणांचा वर्षाव करायला केली. आपल्याला नक्की किती संखेच्या शत्रुने घेरले आहे हे मसूदला कळायला खूप उशीर झाला होता...त्या २५ बांदल सैनिकांचे बाण संपल्यावर त्यांनी हातघाईच्या लढाईला सुरुवात केली. परिणाम व्हायचा तोच झाला परंतु मसूदच्या फौजेला गांगारुन किंवा गोंधळात टाकून त्याचा वेळ वाया घालवण्यात यश आले होते. २५ बांदल पांढरपाण्यावर शहीद झाले परंतु मसूदची फौज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी यात अंतर वाढले होते. मसूद पांढरपाण्यावरुन पुढे सरकला तेव्हा महाराजांची पालखी घोडखिंड चढत होती.
पुन्हा चव्हाण पाटलांच्या वाटाड्यांचे शत्रू जवळ येत असल्याचे इशारे होऊ लागले. महाराजांची पालखी घोडखिंड चढून गेल्यावर वर थांबवण्यात आली. बांदल आणि चव्हाण पाटलांनी तातडीने विचार मांडला कि छत्रपती शिवाजी महाराजांनी ३०० बांदल घेऊन पुढे विशाळगडाकडे निघावे आणि उरलेले २५०/२७५ बांदल घोडखिंडीत पाठलागावरील शत्रूला अडवतील. बांदल आणि चव्हाण पाटलांच्या मते संपूर्ण मार्गात घोडखिंड हेच एकमेव असे ठिकाण आहे कि कितीही मोठ्या शत्रूला येथे अडवून ठेवता येणे शक्य आहे. पण शत्रू घोडखिंडीतुन वर आला कि त्याला थोपवणे अवघड होऊन बसेल. फौजेचे आणखी दोन तुकडे करणे महाराजांच्या जीवावर आले होते. पहिल्यात शिवा काशीद मागे राहिला, त्यानंतर पंचवीस बांदलांची तुकडी मागे राहीली आणि आता परत तिसऱ्यांदा तेच करावे लागणार होते. "लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जीवंत राहायला पाहिजे", या भावनेने बांदल सेना भारलेली होती. शिवाय बांदलांवर राजे शहाजीराजेंचा प्रभाव होता. त्यामुळे आपण जीवंत असतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या केसालाही धक्का लागणार नाही हा चंगच बांदलांनी मनाशी बांधला. महाराजांनी ३०० बांदल घेउन विशाळगड गाठावा आणि गडावर पोहोचल्यावर सुखरूप पोहोचलो म्हणून तोफांचे इशारावजा तीन आवाज करावेत तोपर्यंत बांदल घोडखिंडीत शत्रूला अडवून ठेवतील असे ठरले. रायाजी बांदलांच्या निर्वाणीच्या अंतिम निर्णयाला महाराजांना मान्यता द्यावीच लागली.
घोडखिंडीत २५०/२७५ बांदल तुकडीसह शत्रूला अडवण्यासाठी किंवा त्या तुकडीचे नेतृत्व कोण करणार हा विचार पुढे आला आणि बांदलांचे कारभारी बाजीप्रभू देशपांडे यांनी क्षणही न दवडता ही जबाबदारी उचलली. "गडावरून तोफेच्या आवाजांचा इशारा होईपर्यंत बांदल आणि बाजी घोडखिंडीतुन हटणार नाहीत आणि शत्रूचा एकही माणूस खिंड चढुन येवु शकणार नाही" असा निश्चयी विश्वास खात्री बाजीप्रभूंनी मालक बांदल आणि महाराजांना दिला. महाराज जड अंत:करणाने निरोप घेउन पालखीत बसले आणि ३०० बांदल मावळ्यांसह विशाळगडाच्या दिशेने निघाले. बांदल सेना आणि बाजीप्रभू देशपांडे यांनी वडील बंधु फुलाजीसह खिंडीत मोर्चे लावायला सुरुवात केली होती. एव्हाना पहाट होऊन उजडायला सुरुवात होत होती परंतु पावसाची रिपरिप चालूच होती. हवा वाहत होती. परंतु बांदल तुकडीत गारठा जाणवत नव्हता. सगळे बांदल गरम जोशात होते. याउलट पाठलगावरील मसूदची तुकडी मात्र मनातून गारठलेली होती. पांढरपाण्यावर मोजक्या पंचवीस बांदलांनी मसूदच्या चार हजाराच्या तुकडीला गारठवले होते त्यातून ते अजूनही पुरते सावरले नव्हते. मसूदची तुकडी वेगाने पाठलाग करत होती पण बांदल सेना आजूबाजूला कोठेतरी दबा धरून बसली असेल आणि कोणत्याही क्षणी गनिमी काव्याचा प्रयोग करतील याची भीती त्यांना वाटत होती. त्यातच जंगलातून अधूनमधून विचित्रपणे प्राण्यांचे आवाज येत होते. पडत्या पावसात प्राणी आडोशाला पडून राहण्याऐवजी आवाज कसले करतायेत याचे मसूदलाही कोडे पडले होते. पण ते चव्हाण पाटलांच्या वाटाडे/हेरांकडुन बांदल सेनेसाठी काढलेले सुचक आवाज आहेत याचा सुगावा मसूद आणि मसूदच्या सेनेला शेवटपर्यंत समजलेच नाही. घोडखिंडी पर्यंत चव्हाण पाटलांच्या हेरांनी त्यांचे काम चोख बजावले होते. मसूदची सुमारे चार हजाराची फौज घोडखिंड चढु लागली. बाजीप्रभू आणि बांदलांनी खिंडीवर मोर्चे लावल्याची मसूदला खबरच नव्हती. जेमतेम तीनचार माणसे दाटीवाटीने चढतील अशा ठिकाणाहून मसूदची फौज अर्ध्याहून जास्तची खिंड चढून आली असतांना बांदलांना इशारा झाला. खाली खिंडीत चढणाऱ्या मसुदच्या फौजेवर खिंडीच्या वरील डाव्या उजव्या आणि समोरील बाजूने बांदलांच्या बाणांनी वर्षाव झाला. बाण कोठून येतायेत हे कळेपर्यंत मसूदची खिंडीत शिरलेली फौज गारद झाली होती. मसूदची फौज काही वेळ मागे सरली. परंतु काही वेळाने मसूदची फौज पुन्हा सावधपणे खिंड चढु लागली. पुन्हा एकदा मसूदच्या अर्ध्याहून अधिक खिंड चढलेल्या फौजेची तीच अवस्था झाली. खिंडीच्या वरील दोन्ही बाजूंनी बांदल सेना बाणांचा वर्षाव करत होती तर बाजीप्रभू आणि फुलाजी खिंडीच्या वरील तोंडावरून काही बांदलांसह बाण सोडत होते. आता मात्र मसूदही इरेला पेटला. घोडखिंडीत मसूदचे खिंडीत शिरलेले सैन्य दुसऱ्यांदा गारद झाले होते. मसूदचे सैन्य पुन्हा घोडखिंडीत शिरु लागले. मागे हटायचे नाही आणि खिंडीत मरुन पडलेल्यांच्या अंगावरुनही चढाई करत राहण्याचा आदेश मसूदने दिला. एव्हाना चांगलेच उजाडले होते.. मसुदचे सैन्य लाटेप्रमाणे खिंड चढु लागले. या लाटेवर बांदल सेना दगडधोंडे फेकून मारु लागले. क्वचित बांदल खिंडीवरुन मसूदच्या सेनेवर मोठ्या शिळाही ढकलु लागले.
तिकडे महाराज विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले. पण तेथे सुर्वे आणि दळवी गडाच्या वाटा अडवून बसले होते. सोबतीचे तीनशे बांदल रात्रभर पडत्या पावसात चिखल तुडवत चालून आले होते. आणि समोर आराम करून ताज्या दमात असलेली सुर्वे आणि दळव्यांची फौज होती. गडावर सुरक्षित पोहोचून बाजीप्रभू आणि मागे राहिलेल्या बांदलांना इशारा देणे आवश्यक होते. महाराज पालखीतुन पायउतार झाले आणि बांदल सेना आणि बांदल पितापुत्रांसह सुर्वे आणि दळव्यांच्या फौजेला भिडले. विशाळगडाच्या पायथ्याशी घनघोर संग्राम चालु झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्यासह बांदल पितापुत्र सुर्वे आणि दळवींचा वेढा फोडण्यासाठी लढु लागले..
इकडे घोडखिंडीत मसूदची सेना दाटीवाटीने खिंड चढु लागली. खिंडीच्या वरच्या तोंडावर आता हातघाईची लढाई चालू झाली. फुलाजी आणि बाजी बांदलांसह तलवारी घेऊन पुढे येणाऱ्या शत्रूला कापून काढत होते. अजूनही बरेच बांदल दोन्ही बाजूंनी खिंडीवरुन खिंडीतील शत्रूवर नेम धरून दगडधोंडे भिरकावत होते. एव्हाना चांगलेच उजाडले होते. अशातच मसूदने ठासणीच्या बंदुका बाहेर काढल्या. मसूदच्या बंदुक्यांनीही खिंडीच्या खालून मोक्याच्या जागा पकडून खिंडीवरुन दगडफेक करणारे बांदल टिपायला सुरुवात केली. वरुन दगडफेक करणारे बांदल सावधपणे खिंडीच्या तोंडाकडील सहकऱ्यांना जाऊन मिळाले. खिंडीच्या वरच्या तोंडावर आता वेगळीच लढाई चालू झाली. किंवा अत्यंत अपुऱ्या जागेमुळे खिंडीतील वरचे तोंड हेच फक्त या लढाईचे ठिकाण उरले.खिंडीतील मसूदचे सैन्य खिंडीच्या तोंडावर येताच गारद व्हायचे आणि काही बांदल मागे सरायचे आणि त्यांची जागा दुसरे बांदल घ्यायचे. अशातच हातघाईत फुलाजींवर शत्रूचा जीवघेणा वार झाला. फुलाजी पडले. पडता पडता त्यांना बांदलांनी मागे घेतले आणि त्यांच्यावर वार करणाऱ्या शत्रूचेही तुकडे केले. वडील बंधु फुलाजी आपल्या आधी गेले, वडीलकीचा मान घेउन गेले. परंतु शोक करायला किंवा धाय मोकलुन व्यक्त व्हायला वेळ कोठे होता. आता बाजीप्रभुंनी दोन्ही हातात दांडपट्टा चढवला. बाजींचे दोन्ही हात गरगर फिरु लागले. वर्मी घाव बसलेला शत्रू मागे सरत होता नाहीतर जागेवर पडत होता. बांदलही एकमेकांना आलटून पालटून खिंडीवर आडून ठाम बसले होते. खिंडीत शिरलेली मसूदची फौज खिंड पार करु शकत नव्हती. आतापर्यंत खिंडीत मसूदच्या चार हजार फौजेपैकी तीन हजारांहून अधिक फौज मारली गेली होती, तीही फक्त २५०/२७५ बांदल सेनेकडून.. आणि वर चढण्याच्या प्रयत्नांतील मसूदची फौज खिंडीच्या वरच्या तोंडावर मारली जात होती. तरी मसूदसाठी त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे बांदल सेनेचा दोन्ही बाजुंचा दगडांचा मार बंदुक्यांमुळे बराचसा कमी झाला होता. आता मसूदने खिंड चढणाऱ्या त्याच्या फौजेत बंदुक्यांना मध्ये घेतले. मसूदच्या पुढील सैन्यामधे घुसलेले बंदुके ठासणीच्या बंदुकांनी खिंडीच्या वरच्या तोंडावरील बांदलांवर बार टाकु लागले. बांदल वीर जखमी होऊ लागले, शहीद होऊ लागले. पुढे लढणाऱ्या बांदलांच्या मागून बांदल तीरंदाजही तेवढेच तिखट उत्तर देवु लागले. मसूदची बंदुक्यांची चालही फारसी काम करेना.. कारण त्यात अत्यंत अपुरी जागा. बंदूक एकदा बार काढल्यावर पुन्हा ठासायला खाली घ्यावी लागत होती आणि वरुन पावसाचा जोर अजूनही कमी झालेला नव्हता. त्यामुळे बंदूक ठासून भरताना काळजी घेणे भाग होते. एवढ्या गोंधळात बांदल तिरंदाज तलवारबाज आणि दांडपट्टा चढवलेले बाजीप्रभू पुढे सरलेल्या मसूदच्या सैन्याची वाट लावत होते. बांदल आणि बाजीप्रभू तसूभरही मागे हटत नव्हते. जखमी किंवा शहीद बांदलांची जागा दुसरे बांदल घेत होते. एवढ्यात अचानकपणे मसूदच्या एका बंदुक्याचा एक बार बाजीप्रभूंना वर्मी लागला आणि बाजीप्रभू खाली कोसळले. बांदल त्यांना खिंडीच्या तोंडावरून वर बाहेर काढु लागले. नाही नाही म्हणत बाजीप्रभू तेथेच खिंडीतील दगडाला टेकून बसले. अजून कसा तोफांचा आवाज होईना म्हणून बाजी आणि बांदल चिंतेत होते. अजून तोफांचा आवाज झाला नाही म्हणजे अजूनही महाराज गडावर पोहोचले नव्हते. सुर्य तर ढगांच्या आड माथ्यावर आला होता. काही झाले तरी तोफा वाजल्या नाहीत म्हणजे महाराज अजूनही गडावर पोहोचले नाहीत आणि याचाच अर्थ आपल्याला गोळी लागली तरी अजून आपली मात्र जायची वेळ झाली नाही. क्षणभर अंधारी आले म्हणून मिटलेले डोळे उघडून बाजींनी आवाज टाकला अरे 'हाणा मारा सोडु नका, एकही वर येवु देवु नका'.. बांदल तलवारबाज आणि तिरंदाज मसूदच्या सैन्याला भारी पडत होते. मसुदच्या फौजेची अत्यंत मोठी जिवीतहानी झाली होती, तरीही तो मागे हटत नव्हता कारण त्याला आशा होती कि कदाचित सिद्दी जोहरकडून मदतीसाठी कुमक येईल. आणि अडीचशे ते पावणेतिनशे पैकीही फार कमी राहिलेले बांदल आणि जखमी बाजीप्रभूही जागा सोडत नव्हते कारण अजूनही तोफांचे आवाज झाले नव्हते. तोफांचे आवाज होत नाहीत तोपर्यंत आपले कर्तव्य पूर्ण होत नाही हे बांदलांनी मनाशी ठाम बांधले होते. बांदल मागे हटत नव्हते आणि जखमी बाजीप्रभू दगडाला टेकून दांडपट्टा उंचावून 'ए हाण मार' असा आवाज देत होते.
धार लागलेल्या ढगांच्या आडून सुर्य दुपारच्या प्रवासाला लागला होता. आणि एवढ्यात दुपारी दोनच्या सुमारास धडाम धुम असा तोफेचा आवाज आला. राहिलेल्या मोजक्या बांदलांनी 'हर हर महादेव' चा एकच आवाज उठवला. पुन्हा धडाम धुम असे तोफेचे आणखी दोन आवाज झाले. तोफेचे आवाज आणि बांदलांचा हर हर महादेव' च्या कल्लोळाचा मसूदला आणि मसूदच्या फौजेला काही अर्थ लागेना. मसूदच्या फौजेचा गोंधळ उडाला. छत्रपती शिवाजी महाराजांची एखादी गनिमी कावा करणारी तुकडी अवचित प्रकट होतेय कि काय ही भीती मसूदच्या फौजेत पसरली. इकडे उरलेल्या बांदल सेनेच्या तिरंदाजांनी सपासप बाण सोडून मसूदच्या वरच्या फळीला बरेच मागे ढकलून माघार घेण्याची तयारी सुरू केली. काही बांदल बाजीप्रभुंकडे गेले आणि त्यांना उचलु लागले. म्हणाले, 'उठा चला आता, तोफांचे बार झाले, आपले काम फत्ते झाले, आता आपल्याला निघायला हवे' ... तोफांचे आवाज बाजीप्रभूंनीही ऐकले होते. त्यांना आता उरलेल्या बांदलांची काळजी होती. घोडखिंडीत बांदलांच्या फौजेने बाजीप्रभूंच्या प्रयत्नांना नियोजनाला यशस्वी केले होते. बाजीप्रभूंचा प्राण कंठाशी आला होता. त्यांनी बांदल सैन्याला अंतिम संदेश आदेश दिला कि 'महाराज सुखरूप गडावर पोहोचले, आता तुम्हीही निघा, माझीही निघण्याची वेळ झाली आहे, महाराजांना माझा मुजरा सांगा'.. आणि बाजीप्रभूंचा वर आलेला हात खाली जमीनीवर गेला. बांदल समजून गेले कि बाजीप्रभू आता आपल्यातुन निघून गेले आहेत.
उरलेली बांदल सेना उलट खिंडीच्या वरील जंगलात पसार झाली. मसूदच्या फौजेपुढे काही क्षणांत बांदल दिसेनासे झाले. मसुद सैन्यासह खिंड चढून वर आला. खिंडीच्या तोंडावर आणि खिंडीच्या वर दोनशेच्यावर बांदल शहीद होऊन पडले होते. आणि खिंडीत मसूदचे जवळपास सव्वा तीन ते साडेतीन हजार सैनिक मरुन पडले होते. पांढरपाण्यावर बसलेल्या झटक्यापेक्षा घोडखिंडीत मसूदला वर्मी आणि मोठा झटका बसला होता. आता समोर घनदाट जंगल आहे. त्याकडे मसूद पाहत होता. पण आलेल्या अनुभवानुसार त्याला त्या जंगलात उरलेल्या फौजेसह शिरण्याचे धाडस होत नव्हते..
पन्हाळ्याहुन सुटकेच्या दिवशी घडलेल्या प्रसंगांच्या मालिकेचे हे अत्यंत थोडक्यात असे वर्णन आहे. काही गोष्टी माझ्याकडून राहिल्या असतील..
पण पन्हाळ्याहुन महाराजांच्या सुटकेचे पूर्ण श्रेय रायाजी बांदल, रायाजी बांदलांचे कारभारी बाजीप्रभू, नेबापुरचे चव्हाण पाटील व त्यांचे सहकारी शिवा काशीद आणि बांदलांचे ६०० वीर सैनिक यांचे आहे. शिवा काशीद आणि बाजीप्रभूंनी स्वराज्याच्या इतिहासात स्वतःसाठी मानाच्या सोनेरी पानाची जागा मिळवली. यावेळी बांदल सेनेत असणाऱ्या रोहीडा खोऱ्यातील काही वीरांच्या आडणावांचा उल्लेख वर केला आहे.. त्याव्यतिरिक्तही इतरही नावे असतील. कालांतराने झालेल्या मुघलांच्या २७ वर्षांच्या हल्ल्यात स्वराज्याच्या अनेक लिखित कागदपत्रांची अपरिमित हानी झाली. त्यामुळे स्वराज्याच्या पायाभरणीत स्वतःच्या जीवाला गाडून घेणाऱ्या अनेक वीरांची नावे अज्ञात आहेत..
या जुलै १२/१३ ला पन्हाळ्याहुन सुटकेला ३६० वर्षे पूर्ण झालीत. या प्रसंगी जीवाचे बलिदान देणारे शिवा काशीद, बाजीप्रभू आणि फुलाजी देशपांडे व बांदलांचे ज्ञात अज्ञात वीर शहीद सैनिकांना मी वंदन करून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो..
हर हर महादेव.

लेख साभार-: अज्ञात लेखक
लेखकाचे नाव माहिती नाही.

फोटो साभार anup1479

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...